अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे
शाळेतली गोष्ट आहे. मधल्या सुट्टीनंतर कसला तरी पिरियड होता. आमचे त्या विषयाचे मास्तर आले नव्हते. इतर मास्तर आणि मास्तरीणी आपल्या वर्गात शिकवीत होते. आणि म्हणून आमच्यावर लक्ष ठेवायला कुणीच नव्हतं. अशी सुवर्णसंधी आमच्या वर्गातल्या पोरं-पोरी दवडणार कशी? झाला दंगा सुरु. नाही म्हणायला दोघं-तिघं जणं शांत होती. मी पण गुपचूप, आपल्या वहीत गणिताची उदाहरणं उतरवून घेत होतो. गणित म्हटलं की मला ‘आकडेच’ यायचे. असो, माझा एक मित्र मोठा हुशार गणितात. त्याचीच वही घेऊन गणितं छापत होतो.
कुणीतरी नवी खोड शोधून काढली. अश्या नव्या खोड्या एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वणव्यासारख्या पसरतात. किचिड-मीचीड केलेली पानं म्हण की वह्या पुस्तकांना लावलेली वर्तमानपत्राची कव्हर्स, त्यांचे बारीक बारीक चिटोरे करायचे आणि मुलामुलींचं “शुभ-मंगल सावधान” करायचं. दहा मिनिटात अख्खा वर्ग चिटो-यांनी भरून गेला. तरी बरं कुणी डब्यातला मोकळा भात अक्षता म्हणून उधळल्या नव्हत्या.
गोंधळ “सातवे आस्मा” वर पोचायला काही वेळ लागला नाही आणि जे व्हायचं तेच झालं. एक भयंकर कडक मारकुंडे मास्तर आले. “कुणी केला आहे हा कचरा?”, असं गरजले. मास्तरांचा राग लै भारी. पोर-पोरी कुणीच त्यांच्या तडाख्यातून सुटायचं नाही. सगळे चळा-चळा कापायचे. कुणीच बोलत नाही पाहून मास्तरांनी हातातली बेशरमच्या वेलाची ओली काडी टेबलावर आपटली. काडीचं तुटली मधातून. पोरं-पोरी फिदीफिदी हसायला लागली. हश्याचा आवाज ऐकून मास्तरांनी जमदग्नी रूप धारण केलं. “शेवटचं विचारतो आहे मी. कुणी केला हा कचरा. सांगा नाही तर एकेकाला बदडून काढेन”, म्हणत मास्तरांनी पहिल्या बेन्चवरच्या पोराला लाकडी पट्टी मागितली. त्या पोराने विचार केला असावा की एक तर आपल्याला पण छडीचा प्रसाद मिळणारच आहे तर का म्हणून पट्टी द्या, शिवाय पट्टी तुटली आणि घरी माहिती पडलं तर बाप आपल्याला झोडपणार. किंवा त्याने थोडा वेळा पूर्वी “गांधींचे असहकार तत्व” वाचले असावे. “नाही आणली मी पट्टी, सर.” तो म्हणाला. मास्तरांच्या डोळ्यात अंगार! थोबाडावर बसणार तोच बाजूच्या दिड-शहाण्याने आपली स्टीलची पट्टी मास्तरांच्या हातात दिली. भैताड वाणाचं!
“पाच म्हणायच्या आत सगळं कचरा साफ झाला पाहिजे.” मास्तरांची ऑर्डर आली आणि सगळे गुपचूप कचरा-चिटोरे वेचायला लागले. मास्तराच्या चेह-यावर अतीव आनंद ओसंडून वाहू लागला. आपलं न ऐकण्याची हिम्मत कुणातच नाही असा त्यांचा (गैर) समज. त्याला कुणीतरी तडा द्यायलाच पाहिजे नं. मास्तरांची नजर माझ्यावर पडली. मी गणितं उतरून घेण्यात मश्गुल. शिवाय मी चिटोरे केलेच नव्हते म्हणून मी का उचलू? शिवाय लोकमान्यांची शिकवण इतिहासाच्या पुस्तकात, गोष्टींच्या पुस्तकात वाचून वाचून पक्की झालेली.
“मी गणितं करत होतो, सर. आणि मी चिट्ठ्या नाही फेकल्या.” मी म्हणालो.
“पिरियड कशाचा आहे? गणिताचा आहे का?” मास्तर. मी मास्तरांचा टोन ऐकून टरकलो. मी पुढे काही बोलायच्या आत “दे दणा दण”. “शिस्त आहे की नाही काही? दिड शहाणपणा करतोस जास्त. माज आलाय तुला.” असं म्हणत परत कधी इकडे तर कधी तिकडे, कधी इथे तर कधी तिथे मार बसत होता. मला बुकलून काढल्यावर मास्तर फिरले. मला मास्तरांनी जाता जाता जास्तच कचरा उचलायला लावला. रिंग मध्ये WWE वाले पहेलवान पट्टा दाखवत फिरतात. हे मारकुंडे मास्तर स्टील ची पट्टी उगारत फिरतात.
बाजूच्याने मला “घेन्न बाप्पू करशीन शहाणपणा…’ अश्या आविर्भावात बघितलं. मी मनोमन ठरवलं पुढल्या वेळी मी पण चिटो-या करणार. मी पण मस्त्या करणार. धिंगाणा घातला तर फक्त ओरड मिळते, मार मिळण्याच्या धमक्या मिळतात, मार नाही. पुढल्या वेळी मात्र काय झालं ते नंतर सांगेन.