
(अंदाजे वाचन वेळ: ५ मिनिटे)
अंधार. गडद, गुडूप, काळाकभिन्न अंधार. अस्तित्वशून्य अंधाराची स्थिती होती ती. संपूर्ण शांतता. भयाणमृत शांतता. जीवघेणी भीतीदायी शांतता. न प्रतिक्रिया, न प्रतिसाद… कारण म्हणजे अस्तित्वहीनता. शून्य! काहीच नाही! निस्तब्धता!
एक प्रकाशशलाका शिरली. त्यापाठोपाठ असंख्य प्रकाशकिरणं लगोलग शिरली. असंख्य रंगांची दृग्गोचरता लेवून अपूर्वाई उधळत प्रकाशाने सर्वत्र उजळून टाकलं. झगमगाट प्रसारला.
आणि मग तापायला लागलं. प्रखरता वाढायला लागली. वाढत वाढत ती उष्णता आणि वाढू शकणार नाही एव्हढी वाढली आणि सगळं काही नष्ट झालं. असं म्हणतात की अग्नीत, किंवा उष्णतेत म्हणा हवं तर शुद्धीकरणाची प्रखर शक्ती असते. सगळी अशुद्धी नष्ट करून सर्वोत्तम तेच घडवते.
आणि मग दाह शमायला लागला. थंड होऊ लागलं. बराच वेळ गेला आणि दाहकता विरून शीतलता स्थिरावली. एक रिकामं गोलाकार पात्र होतं ते. काळ सरकत होता. अमृततुल्य घटकांनी युक्त परिपूर्ण मिश्रणाने ते पात्र भरलं. मिश्रणातले सगळे घटक जीवनभार सांभाळण्यासाठी अगदी परिपूर्ण होते. उष्मा, पाणी, पोषणानं संतृप्त. एका स्थिर जीवनभूमीसाठीचे असणारे सगळे गुण या धरेवर होते. सर्वत्र समतोल राखला गेला होता. एक आदर्श वातावरण तयार झालं होतं. या धरेनं तिचं महत्त्वपूर्ण, अढळ स्थान अखेर कमावलं होतं. सर्वत्र एक प्रकारची शांतता, तृप्तता आणि स्थैर्य विकसित होऊ पाहत होतं. अंधार, अस्तित्वविहीनता आणि असह्य उष्मा पचवून ती घडली होती. अस्तित्वविहीनतेतून प्रकट होण्यासाठी तिनं ऊर्जेचं सार सामावून घेतलं होतं. तिनं उर्जेला सामावून, स्थिर करून जीवनसंभाळ करण्यायोगं उत्क्रांत करून घेतलं होतं. जीवन उत्पन्न करणारी अवकाशस्थ अशी चेतना फक्त तेव्हढी हवी होती तिच्या गर्भधारणेसाठी. जीवन आरंभासाठी उत्साहित होतं. समय नेहमीप्रमाणे पुढेच सरकत होता.
अखेर ते घडलंच! तिच्यावर हातभार आशीर्वाद उमटला. जीवन उमलून फुलण्यासाठी, बहरण्यासाठी फक्त वेळ हवा होता.
नियतीत होतं ते घडतंच. त्या आशीर्वादात जीवनाची बीजं होती. धरा गर्भारली. त्या जीवनाची अपेक्षा, कोडकौतुक, गर्भारशीचा काळ… सगळं कसं अमूल्य होतं. अगदी कल्पनेपल्याडची घटना असणार होती ती. ते गूढ, जीव चैतन्य निर्माण होण्याचा कालावधी, ती सत्त्वपरीक्षा अगदी असह्य श्रेणीतली होती. ताणतणावाची होती. त्या सृष्टीनिर्माणाची साक्ष स्वतःच होणं किती विस्मयजनक असणार!
घडू दे जे होतंय ते. जीवनाला स्वतःच उत्फुर्त होऊ देत. नको आता कसली मध्यस्थी! वातावरण तयार करणं, जीवनोपयुक्त धरा निर्मिणं आणि आशीर्वादाचा ठसा… बस्स! एव्हढं पुरेसं आहे. आता वेळ आहे ते एक पाऊल मागे घेण्याची, आणखी ढवळाढवळ न करण्याची. विना हस्तक्षेप ती धरा तशीच निपचित पडली. जणू अनादी अनंत काळ, आणखी एक युग, एक अनंतभर सोशिकता ती मागत होती.
शेवटी एक ठिपका उपजला. अगदी लहानगा! जीवनाची अखेर सुरुवात झाली. त्या धरेचा पूर्ववर्ती जीवक, प्रथम जीव होतं तो. दिसायला काळासावळा, कृष्णवर्णी आणि तुळतुळीत कांतीचा अद्वितीय जीव होता तो. जीवितांचं पाहिलं स्थळ, पहिली वाढ होती ती. इथून सर्वदूर प्रसार पावणार होती त्या धरेवरची जीवनशृंखला. इथून बाळसं धरून, बहरून, फळून कल्पनेपल्याडचा मार्ग धुंढाळणार अशी अपेक्षा होती. समस्त अवकाशाची कीर्ती धरेवरती अवतरवून विश्वाची शक्ती प्रकट करण्याची क्षमता बाळगण्याची अपेक्षा करणं कमी नव्हतं. अपेक्षा असली तरी भार अथवा दडपण नव्हतं ते. निव्वळ प्रेमाखातर, अतिवकाळजीपोटी आणि सर्वोच्च समर्पणापायी उद्भवलेली ती अपेक्षा साधी सरळ आशा मात्र होती.
ते अखेर यशच होतं. श्रमाचं आणि धीराच्या कामाचं मिळालेला गोड बक्षिस होतं ते. सृजनानं निर्मात्याला दिलेलं लक्ख स्मित होतं ते.
काही वेळानंतर एक वेगळा ठिपका उद्भवला. जीवनवाढीचा दुसरा ठिपका. त्यानंतर तिसरा आणि मग एका मागोमाग बरेच टिपके त्या आशीर्वादाच्या कड्या कोपऱ्याने जागो जागी निर्मित झाले. प्रत्येक ठिपका अद्वितीय, निराळ्या रंग ढंगाचा आणि गुणांचा होता. प्रत्येकाचा वेगळं अस्तित्त्व, वेगळा रंग होता… काळा, सावळा, पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, निळा, शेंदरी, जांभळा आणि वर्णपटलातील असंख्य रंगांचा. प्रकाशाला अंतरंगी सामावून त्यालाच जणू परावर्तित करत होते ते निरनिराळे ठिपके. ते सगळे अद्वितीय असले तरी त्यांच्यातून जाणारा समानतेचा एक धागा होता, तो म्हणजे आशीर्वाद देणारा तो हात!
चढ उतार करत जीवन समोर सरकत होतं. त्या ठिपक्यांच्या उगमस्थानी एकसारखी आणि काहीशी समांतर उत्क्रांती होतं राहिली. थोडाफार फरक असला तरी वैविध्यात रंग, चैतन्य आणि उत्साह त्या जीवनगर्भी धरेवर तिच्या कान-कोपऱ्यांतून ओसंडून वाहत होता.
आणि अपरिहार्य, अटळ, अघटित घडायचं ते घडलंच. टाळायला हवी होती तो घटनाक्रम जवळ येऊ लागला. आपत्ती जवळ जवळ येऊ लागली होती. जीवनाच्या धाग्या-दोऱ्यांतून लपलेला शाप हळूहळू स्थिरावत जवळ येऊ लागला होता.
सरहृद्देत मिळतंय त्यापेक्षा आणखी जास्तीची हाव एका वाढीस लागली. तिच्या सीमेत ती राहू शकणार नाही एव्हढी ती फोफावली. तिला आणखी हवं होतं… आणखी जागा, आणखी शक्तीस्त्रोत, शक्तीस्त्रोतांपासून आणखी जास्त, जीवनाकडून आणखी जास्त. स्व वाढीसाठी तिनं इतर वसाहतींवर हल्ला चढवला, धरेत आणखी खोल मुळं धसवली आणि वर उंचावर ती फोफावत गेली.
त्या वसाहतीचा वाढीचा हव्यास इतरही वसाहतींत पोचला. तिनं वाढीचे हातपाय पसरून इतर वसाहतींत अतिक्रमणं केली. महत्त्वाकांक्षेची पाळंमुळं विस्तारून सीमा वाढवल्या. वसाहतींच्या समानतेचा दुवाच त्यांच्यासाठी शाप बनला. एकाच गुण, दुसऱ्याला वाण म्ह्णून लागला. बऱ्याच वाढींनी वसाहत विस्तारासाठी आक्रमणं-प्रतिआक्रमणं सुरु केली. जीवघेण्या विस्तार शर्यतीतून दूर राहू इच्छिणारे किंवा दुर्बल वसाहती त्यांची धरा वाचवू शकले नाहीत. काळ समोर जात होता तशी असल्या वसाहती नामशेष झाल्या, अस्तित्वहीन झाल्या. जीवनसंघर्षात तग धरू शकल्या नाहीत किंवा जिवीतार्थ संसाधनं नसल्याने नष्ट झाल्या.
जागेसाठीच्या संघर्षात कित्येक वसाहती एकमेकांशी लढल्या. श्वेतवंशी विरुद्ध कृष्णवंशी, हरित विरुद्ध पिवळे, रक्तवर्णी विरुद्ध शेंदरी… आणि लढाया सुरूच राहिल्या. विरोधी वसाहतींविरुद्ध एकत्र मोर्चे बांधल्या गेले आणि कालांतराने स्वार्थसिद्ध झाल्यावर लगेच तोडल्याही गेले. कुण्या एके काळी समृद्धतेच्या वरदानाने पावन झालेली धरा आता मृतप्राय होऊ लागली होती. काही काळापुरती का होईना मधेच कुठेतरी दोन-तीन वसाहती ऐक्याने सोबत राहून कालोघ्यात तग धरून राहिली होती. तेव्हढाच कसला तो दिलासा!
विषण्ण डोळ्यांनी वरून बघितलं. कुणे काळी जीवनाच्या चैतन्याने ओतप्रोत भरलेलं ते पात्र आता अनागोंदीत विखुरुन ढासळलं होतं. नियतीच्या खेळानं कुजून मरणोन्मुख झालं होतं. या अनागोंदीचा सर्वांत मोठा कर म्हणजे संपूर्ण निर्मूलन!
एक मोठी उलथापालथ झाली. पात्रात महाप्रलय अवतरला. जीवन उन्मळून कोलंडलं होतं. पात्र परत एकदा रिकामं झालं होतं. क्षमेची भीक मागत काही जीवन रूपं त्या पात्राला कशीबशी चिकटून तग धरून राहण्याचा प्रयत्न करत होती.
“हे सगळं बिना कामाचं आहे, निरुपयोगी आहे. सगळं परत एकदा नव्यानं करावं लागेल.” एक ध्वनी गुंजला.
एका नवीन सुरुवातीला पेट्री डिश तयार होत होती. निर्जंतुकीकरणासाठी ऑटो क्लेव्ह भट्टीत टाकल्या जात होती. परत एकदा तोच भयाण काळोख आणि परत एकदा शांतता पसरली.