
(अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे)
आकाश ६-७ महिन्यांआधीच एका ऍड एजेन्सीत रुजू झाला होता. आधी दोनेक वर्षांचा अनुभव गाठीशी होता पण कमाई फारशी नव्हती. कुटुंब वाढलं, गरजा वाढल्या आणि कमाईत वाढ व्हायला हवी म्हणून त्याने बऱ्याच ठिकाणच्या मुलाखतींअंती त्याच्या नशिबाने इथे त्याची निवड होऊन इथे रुजू झाला.
आठवडाभर सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० पर्यंत डिझाइन्स बनवता बनवता त्याच्या नाकी नऊ यायचे. पण ह्या कंपनीत किमान चार-पाच वर्षं तरी राहावं असा त्याने रुजू होण्यापासूनच ठरवलं होतं. पहिल्याच वर्षी कंपनीच्या वार्षिक महोत्सवात “बेस्ट अपकमिंग डिझायनर” किंवा “एक्सट्रा माईल अवॉर्ड” मिळवण्यासाठी त्याची सतत धडपड सुरु असायची. मॅनेजर देतील ती कामं रात्री उशिरापर्यंत थांबूनही संपवायची. कामाशी काम ठेवायचं आणि फक्त काम काम आणि कामच करायचं हेच त्याच धोरण होतं. इथे नावलौकिक मिळाला की मॅनेजर मॅडम त्याच्यासाठी नक्कीच “उत्तम ग्राफिक डिझायनर” असा चांगला शेरा देतील.
पुढे एखाद्या मोठ्या ऍड एजन्सीत क्रिएटिव्ह डायरेक्टर व्हायचं स्वप्न साकार करायचं म्हणजे ही कामाचा भार कितीही असला तरी करिअरच्या सुरुवातीचा संघर्ष सहावाच लागतो. आगीतून तावून सुलाखून निघूनच सोन्याची खरी पारख होते म्हणतात.
आकाशचा नव्या ऑफिस मध्ये हा पहिलाच नाताळ सण होता. कामं सांभाळून नाताळासाठी ग्रीटिंग्स च्या डिझाइन्स बनवणं, काहीतरी नवीन कल्पना सुचवणं, जमेल तिथे पुढाकार घेणं असं सगळं करत मॅनेजर च्या डोळ्यांत त्याची कंपनीसाठी असणारी तगमग, पुढाकार वगैरे भरेन आणि अप्रेझल मीटिंग मध्ये त्याला चांगले गुण आणि पगारात चांगली वाढ मिळेल अशी आशा मनी ठेवून तो पुढे पुढे करत असायचा.
एका दिवसाआधी ऑफिस मध्ये “सिक्रेट सांता” करण्याचं ठरलं. काय हा प्रकार बुवा? आधीच्या कंपनी मध्ये असलं काही नव्हतं झालेलं कधी. टीम मधल्या एकेकाची नावं लिहिलेल्या चिट्ठ्या टाकायच्या. ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल तो त्याचा सिक्रेट सांता. त्याच्यासाठी किमान ५०० रुपयांपर्यंतची एखादी भेटवस्तू घ्यायची. त्यावर ती भेटवस्तू कुणासाठी त्याचं नाव लिहायचं आणि नाताळाच्या पूर्व संध्येला ऑफिसमधल्या टेबलावर ठेवायची. ऑफिस सुटण्याआधी सगळे एकत्र जमणार आणि मिळालेली वस्तू घरी नेणार. कुणी कुणाला काय भेट दिली ते कुणालाही कळणार नाही.
“अरे वा! असंही असतं होय?!” आकाश साठी हे नवीनच होतं. कल्पना मोठी चांगली आहे. पण महिन्याच्या अखेरीस आठवड्याचा भाजीपाला घरी येईल तेव्हढ्याचा खर्च भेटवस्तूसाठी करावा हे त्याच्या अकाउंटमधल्या उरल्यासुरल्या रुपयांनी त्याला विचारलं. घरभाडं, गाडीचे हफ्ते, वाणसामान, पेट्रोल आणि काय काय ते देऊन २०००० च्या पगारातले महिन्याच्या अंती उरतातच कितीसे? त्यातही हा ५०० रुपयांचा फटका आधीच फाटक्या खिश्याला भगदाड पाडणाराच.
एक आठवडा भाजी ऐवजी डाळी खाउयात की. खिचडी, भात, काही न काही करेलच बायको. समजूतदार आहे ती. आपण तिला ग्राह्य धरतोय हे कळत असूनही घरी जाता जाता एका व्हरायटीज स्टोर जवळ तो थांबला. नको तिला सांगायला. तसंही आपण एकटेच कमावतो आहोत नं? केला थोडा खर्च आणि काही खोटं कारण सांगितलं तरी काय समजणारेय तिला? वेळ मारून घेऊ. थोडी कळ सोसू. असा विचार करून तो पाकीट ठेवलेल्या खिशाला हाताने दाबत दुकानात शिरला.
नाताळाच्या सजावटीच्या सामानाने, रोषनाईने दुकान झगमगत होतं. त्या झगमगाटात त्याच्या तोकड्या कमाईची कुवत मात्र काळवंडलेली होती. फडताळांवर ठेवलेल्या वस्तू स्वतःच्या घरी ठेवाव्या म्हंटलं तरी अंमळ महागच होत्या. दुसऱ्या कुणासाठी तरी भेटवस्तू म्हणून त्या घ्यायच्या तर केवळ “हम भी किसीसे कम नहीं” चा आविर्भाव दर्शवण्यासाठीच.
त्याने ऑफिसमध्ये उचललेली चिट्ठीही उघडली नव्हती. त्याने खिशातून पाकिट काढलं. चिठ्ठीची घडी उलगडली. “मॅनेजर मॅम?!” ओठांनी पुसटसं पुटपुटत पहिल्यांदाच त्याने मॅम उच्चारलं. मॅडम एकदम मॉडर्न. राहणीमान, वागणं-बोलणं एकदम टापटीप. ऑफिस मध्ये “मॅडम” म्हणायचा तर बाकीचे सहकारी त्याला हसायचे. मॅडम नाही, “मॅम” म्हणायचं, असं सांगायचे. गावाकडच्या शाळा कॉलेज मध्ये मॅडम म्हणणं शिकवलेलं ते इतक्या सहजासहजी कसं सुटणार?
“आता ह्यांना काय बरं गिफ्ट द्यायचं? ह्यांना शोभेन अशी कोणती वस्तू द्यावी म्हणजे फार नाही तरी किमान ठीक-ठाक तरी.” समोर फळ्यांवर ठेवलेल्या वस्तूंखाली दुकानदाराने त्यालाच कळातील अशा अंक-आकड्यांत काही तरी लिहिलेलं. त्याला विचारावं तर कदाचित आपली ऐपत निघेन म्हणून न विचारताच बराच वेळ तो फक्त इकडे-तिकडे बघत होता. एखादी वस्तू आलटून पालटून बघावी, त्यातल्या त्यात काही विकल्प मिळतोय का ते बघत तो वेळ घालवत होता. शेवटी काही कळेना म्हणून बावचळल्यासारखा झाला.
“क्या चैईये, भाया?”
“कुछ नही| ऐसेही देख राहा था| वो ऑफिस में कार्यक्रम है| तो गिफ्ट लेना था|”
“ऐसा बोलो ना| सब मिलता अपने यहां| महेंगा… सस्ता… बोलो तो भाया चाहिये क्या?”
सस्ता ऐकून आकाशला जरा हायसं वाटलं. “बताव तुमही|”
दुकानदाराने निरनिराळ्या वस्तू दाखवल्या. त्यातली एक घड्याळ त्याला आवडली. बायकोसाठी घावी का? त्याने विचार केला. छान दिसेल तिला. तिच्या गव्हाळवर्णी नाजूक मनगटावर सोनेरी मुलामा दिलेली, इटुकली-पिटुकली चौकोनी डायल असलेली घड्याळ, मस्त दिसेल नं!
“पसंद आई? करू पॅक?”
“कितने की?”
“भाया, आपके लिये सिर्फ एक हजार दो सौ की|”
“उतने में तो मेरा दो हफ्ते का भाजी पाला हो जाता है| ठीक से लगाव|”
दोघांची बराच वेळ घासाघीसी सुरु होती. ह्याला घड्याळीची किंमत ठीक वाटली तरी पाकिटात तेव्हढा दामा नव्हता. विकणारा आणि विकत घेणारा दोघांच्या अपेक्षित किमतीची मेळ बसली की विक्री होते. तो मेळ बसेना. शेवटी उरलेला माल आहे आणि दुकानदाराला तो काढायचा आहे हे आकाशच्या लक्षात आलं आणि सरळ “पाचशे देतो, नाही तर जातो.” म्हणत तो वळला.
“अच्छा, आप जिते| पॅक करके देता हूँ|”
“पॅकिंग का चार्ज नहीं है ना?”
दुकानदाराने वर वर हसण्यावरती नेलं तरी आकाशने त्याच्या चेहऱ्यावरचे “ऐपत नसताना कशाला येतात असे लोकं” असा आविर्भाव बरोबर हेरला. तरी इतकी सुंदर, महागातली घड्याळ मॅमला भेट म्हणून देतोय, तिच्या “गुड बुक्स” मध्ये असण्याचा ह्याचा प्रयत्न. ऑफिस पॉलिटिक्स नाही, किंवा करिअर मध्ये समोर जाण्यासाठी लाडीगोडी म्हणून नाही पण निव्वळ इतक्या सुंदर वस्तूला बघून तरी मॅडम च्या चेहऱ्यावर आनंद दिसेन. कोण असेल तो माझा “सिक्रेट सांता” असं ती विचारेन पण कुणाला समजणार नाही अशा प्रकारे उद्या भेट ठेवू नाताळाच्या झाडाखाली असा विचार करत तो मनातल्या मनात हसला. कुणाचा तरी दिवस चांगला जाईल आणि ते कारण आपण असू.
क्षणभर बायकोसाठीच ठेवावी का ही? तिलाच सुखद धक्का द्यावा का? असाही विचार त्याचा मणी डोकावला पण पगार वाढला की ह्याही पेक्षा भारीतलं घड्याळ देऊया ठरवलं.
“लो|” दुकानदाराने त्याच्या हाती छान लाल-चुटुक, चमचमत्या प्लास्टिक चं आवरण असलेला डब्बा दिला.
पाकिट उघडून त्याने बघितलं तेव्हा पन्नास, वीस, दहाच्या सुट्ट्या नोटा मोजत त्याने पाचशे मोजले. आता पाकिटात फक्त १७० बाकी. नोटा देण्यासाठी हात पुढे केले आणि दुकानदाराने नोटांना पकडलं, ओढलं. ह्याच्या हातातून नोटा गेल्या पण पैसे ओढण्याची जाणीव ह्याला आणि लुळ्या, चुरगळलेल्या, जुन्या नोटांत असलेला ताण त्याला जाणवला. क्षणभर दुकानदारालाही वाटलं की हा महिन्याच्या उरल्या-सुरल्या चार-पाच दिवसांसाठी पुरता कफल्लफ झालेला आहे.
दुसऱ्या दिवशी नाताळची पूर्व संध्या ऑफिसमध्ये धूमधामात साजरी होऊ लागली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. ऑफिस मधली सगळी मंडळी मौजमजा करत होती आणि आकाश मॅडमने तातडीने दिलेलं काम वेळेत संपवण्याचा प्रयत्न करत होता. क्लायंटने पाठवलेले बदल वारंवार येत होते आणि आधीचे बदल संपण्याआधीच नवीन बदल येत होते. मॅडम तशा ऑफिसमध्येच येणार होत्या पण कार्यक्रमात गुंतल्या होत्या.
“ओह, माय गॉड! देखो तो कितनी थंड है ऑफिस में|” मॅडम कोपऱ्यातल्या सजवलेल्या ख्रिसमस ट्री कडे बघत उद्गारल्या. “किसने किया ये नेटिव्हिटी सिन? बेबी जीजस, मदर मेरी, फादर जोसेफ और तीन मॅजाइज एकदम कूल लग रहे हैं|”
आकाश जरा सुखावला कारण त्या सजावटीची कल्पना आणि बरंचसं काम त्यानेच केलं होतं. इतर सहकारीही होतेच मदतीला पण त्यातल्या त्यात त्याचा सहभाग जास्त होता. मॅनेजर मॅडम ने स्तुती केली म्हणजे पाठीवर शाबासकी दिल्यासारखीच की!
“चलो… चलो| गिफ्ट्स देखते हैं| किसके सिक्रेट सॅनटा ने किसको क्या सरप्राईज दिया है पता तो चले|” मॅडम तशा आनंदातच होत्या. उद्या ऑफिसला सुट्टीच असणार होती आणि आजचा दिवस पण त्यांच्या साठी काही फारसा व्यस्त नव्हता. व्यस्त तर त्यांच्या हाताखाली असलेले सहकारी होते. क्लायंट्स चं काम त्यांच्या वर सोपवून मॅडम निर्धास्त होत्या.
त्यांच्या टीम मधल्या एकेकाने पुढे येऊन आपापली नावं असलेल्या भेटवस्तू उचलल्या आणि आपापल्या जागेवर गेले. ऑफिस मध्ये जिंगल बेल्स सुरु झाल्या. सांता आला नाचत, बागडत आणि प्रत्येकाशी हसत खेळत. आलिंगन देत, हातात हात मिळवत चोकोलेट्स आणि कॅंडीज उधळत, आनंद वाटीत फिरला. आकाश साठी हे नवलच होतं. काही उत्सुकतेने मिळालेली भेट उघडून बघत होते. काहींच्या चेहऱ्यावर हसू, तर काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य! काहींनी नाकं मुरडली आणि काहींनी “ठीकेय” म्हणत भेटी बॅगेत भरल्या. कुणाचा कोण सिक्रेट सांता असावा ह्याचे अंदाज बांधणं सुरु झालं. कुणी बरोबर ओळखलं तर कुणी नाही. त्यातली गम्मत बघत आकाश मजा घेत होता. सहज म्हणून तो मॅडम च्या डेस्क कडे गेला.
मॅडम ला केलेली पॅकिंग फारच आवडलेली दिसतेय. दुरूनच तिच्या हावभावाचा अंदाज घेत तो जवळच्याच खांबाआड उभा होता. तिला जशी उत्सुकता होती तशीच त्यालाही तिला मिळालेली भेट कशी वाटते त्याची उत्सुकता होता. तिने डब्बा उघडला. “क्या मिला? क्या मिला?” करत तिच्या मैत्रिणी आणि एक दोन सहकारी आजूबाजूलाच उभे होते. आकाशाची उत्कंठा अगदी कंठाशी आली होती. त्याच्या डोळ्यांत कधी आनंदाश्रू डबडबतील असं झालं होतं.
“ये तो मैं अपने काम वाली बाई को दे दूंगी|”
त्याचा क्षणभर कानांवर विश्वासच बसला नाही. इतक्या विचारपूर्वक घेतलेल्या भेटवस्तू ची किंमत क्षणातच कवडीमोल झाली. इतका पैसा खर्च करून त्याला त्याने दिलेल्या भेटवस्तूची झालेली अशी अवहेलना डोळ्यांतून दु:खाश्रू बनून तराळली. त्या खांबाच्या निर्जीव आधाराने त्याला आणखी कोलमडण्यापासून तात्पुरतं वाचवलं. पुढे कोण काय म्हणालं ते कानावर पडून न पडल्यासारखंच होतं. खिन्न मनानं तो त्याच्या जागेपाशी गेला. ऑफिस सुटण्याचा वेळ झालाच होता. त्याने निमूटपणे बॅग उचलली, कार्ड पंच केलं. पार्किंग मध्ये गेला. गाडी सुरु केली आणि सुन्न डोक्यानं घरी परतीचा प्रवास सुरु केला. डोक्यात कसलाच विचार नाही, फक्त यंत्रवत श्वास घेणं आणि रस्त्यावरून गाडी चालवणं सुरु होतं. एका सिग्नलजवळ एक बिअर अँड लिकर शॉप्पी दिसली. झालेलं दुःख बधिर करण्यासाठी का लोकं पीत असतील? आजवर दारूच्या बाटलीही ना शिवलेला तो, बाटली घेण्यासाठी थबकला. त्याला त्याची लाज वाटली. केवळ एक अपमानही मानसिक स्थैर्याची पातळी उचकटून द्यायला पुरेशी असू शकते. खिशात फक्त १७० रुपये की घरी बायको वाट बघत असेल म्हणून दुःखी झालेल्या मनाला आवार घालत सिग्नल सुटलं तसा गाडी समोर हाकत घरी पोचला आणि थेट गादीवर अंग टाकलं.
बायकोला काहीतरी बिनसल्याच जाणवलं पण श्रमलेल्या आकाशला उठवून “अहो, जेवण तरी करून घ्या.” म्हणणं तिला काही रास्त वाटलं नाही. जाग येईल तेव्हा सोबतच जेवू असा विचार करत ती टीव्ही वरचा तिचा आवडता कार्यक्रम बघत राहिली.
तासा-दिड तासाने टीव्ही च्या आवाजाने त्याचा डोळा उघडला. तिरमिरतच तो जागा झाला. पोटात भूक आगडोंब उभा करीत होती आणि ऑफिसमधल्या प्रकरणाने त्याचा पारा वाढीस लागला. तणतणत तो ताटापाशी बसला. ठणकन त्याने ताट आपटलं. “भूक लागलीये मला. जेवायला मिळेल का ह्या घरात? सैपाक झाला आहे की दिवसरात्र टीव्ही बघण्यातच वेळ गेला तुझा?” त्याचा चढा आवाज ऐकून त्याची बायको घाबरलीच पण शब्दाने शब्द वाढेल म्हणून “हो… हो… आणते.” म्हणत ती स्वयंपाकघरात गेली.
टीव्ही वर रामायणाचा एक भाग सुरु होता. त्याकडे त्याचं लक्ष फारसं नव्हतं. डोक्यात “ये तो मैं अपने काम वाली बाई को दे दूंगी|” घुमू लागायला सुरुवात झाली. चिडचिड वाढू लागली. त्याची दोन वर्षाची लहानगी त्याच्या कडे “बा… बाबा … बाब्बा!” करत पोचली पण तिचा लाड करण्यासाठी घ्यावं ह्या मनःस्थितीत तो नव्हताच. रागाच्या भरात त्या बिचारीवरही तो भडकेन ह्याची जाणीव त्याला होती. कसाबसा स्वतःला आवरत रिकाम्या ताटावर रेघा ओढत बसला होता.
“बाजरीची खिचडी केलीये. तुम्हाला आवडते नं म्हणून.” त्याच्या बायकोने कुकर मधली खिचडी त्याच्या समोरच्या ताटात वाढत म्हंटलं.
“हूं.” त्याच्या असल्या त्रोटक प्रतिसादाने तिला त्रास व्हायचा पण उगाच का बोला? शांत होईल तेव्हा आपसूकच संभाषणाला सुरुवात होईल. तिने निमूटपणे चटणी, लोणचं आणि पापड वाढला. तिनेही स्वतः साठी ताट वाढलं.
टीव्हीवर रामायण सुरूच होतं आणि ह्याच्या डोक्यातलंही. त्याची मुलगी लडिवाळपणे त्याच्या अंगा-खांद्यावर खेळू पाहत होती आणि हा तिला हलके हलके झिडकारू बघत होता. खेळता खेळता तिने ह्याच्या ताटावर ताव मारणं सुरु केलं. इवल्याश्या हातानी खिचडीचे मुटके करून खात होती. लहानग्यांच्या खाण्यापेक्षा पसरवणंच जास्त असतं. भाताचे कण जमिनीवर आणि ताटात अस्ताव्यस्त पहुडू लागले. तिने लक्ष वळवलं लोणच्याकडे. आधीच बसत आलेली सर्दी परत आंबट-चिंबट खाण्याने वाढीस लागेल म्हणून त्याने नजरेनेच बायको कडे बघितलं. “तिनेही जाऊ द्या हो.” नजरेनंच म्हंटलं आणि रामायण बघायला लागली. ह्याने “बोलून काही फायदा नाही” ह्या अर्थाने मान डोलावली.
मुलीने लोणच्याचा एक तुकडा चाखला आणि ताटात ठेवला. दुसरा उचलला आणि परत ठेवला. तिसरा उचलला आणि परत ठेवला. चौथा उचलला आणि ह्या तुकड्याची चव तिला चांगली वाटली म्हणून तोच उष्टा तुकडा हाताने आकाशच्या तोंडाकडे नेला. “बाब्बा… घ्या…”
“अगं… काय हे? सांभाळ नं तिला.” आकाशने त्याच्या बायकोला ओरडलं. इकडे त्याची मुलगी अजून जोशाने लोणच्याचा तुकडा आणखी आणखी त्याच्या तोंडाकडे नेऊ लागली.
“अहो कशाला चिडता? आपलीच मुलगी आहे नं. घ्या खाऊन तिच्या समाधानासाठी.” बायको समजावणीच्या सुरात म्हणाली.
हा मात्र मान “नाही… नाही” करत राहिला. ती मात्र त्याचं जिद्दीने त्याला “खा… खा…” करत होती.
“लक्ष्मण,ये जो बुढिया जुठे बेर खिला रही है उसमें मुझे जुठन नहीं अपितु उसके अपने राजकुमार, अपने प्रभू के प्रति समर्पित भाव से किये गए प्रेम का दर्शन हो रहा है| यह शबरी, बुढिया रंक होते हुए भी, सीमित साधन, खान-पान की वंचना होते हुए भी केवल निस्सीम भाव से अरण्य से बेर हमारे लिये धुंढ लायी है| बेर खट्टे होंगे तो उन्हे चखकर अलग रख रही है और सिर्फ मिठे, रसिले बेर ही हमें अर्पण कर रही है| हे लक्ष्मण! मेरे भ्राता! इस प्रीतिभरी भेंट को मैं इसके प्रभू होने के नातें कैसे अवहेलीत करुं? यह शबरी के बेर मेरे लिए सर्वोत्तम भेंट है| आओ, तुमभी इनका आस्वाद लो| तुम भी इसे मिलने वाले आमोद से वंचित न करो| भेंट तो भेंट होती है चाहे बडी हो या फिर छोटी| इसे हर्ष के साथ स्वीकारो|”
रामायणाच्या त्या दिवशीच्या भागाचा शेवट ह्या संवांदाने झाला आणि आपसूकच आकाशने त्याच्या मुलीच्या इवल्याश्या हाताने देऊ केलेला लोणच्याचा तुकडा चाखला. त्या उष्ट्या तुकड्याच्या आंबट गोड चवीने ऑफिसमधल्या कडवट प्रसंगावर मात केली. डोक्यावरचा भर क्षणार्धात नाहीसा झाला. त्याने हात धुतला आणि मुलीकडे बघून प्रेमाने म्हणाला, “मला नं एक गम्मत मिळालीये ऑफिसमध्ये… एक सरप्राईज आहे माझ्या इटुकल्या पिट्टूकल्या गोंडुल्या साठी…”
त्याने बॅग मधून त्याला मिळालेल्या भेटवस्तूचा डब्बा समोर केला. मुलीने पॅकिंग चा कागद मोठया उत्सुकतेने फाडला आणि डब्याचं झाकण उघडलं. त्यात एक छोट्टासा चॉकलेट गोळ्यांनी भरलेला कॉफी मग होता.
“य्ये… य्ये… मला गम्मत मिलाली. य्ये…!!!” मुलगी आनंदाने चित्कारली. आकाश आणि त्याची बायको तिच्या आनंदात सामील झाले. त्या दोघींसाठी आकाश हाच सिक्रेट सांता बनला होता, त्यांना माहिती असलेला.
Nice one