घरच्या घरी सूप अथवा सार कसा बनवावा?
सध्या लॉकडाऊनमुळे कोपऱ्यावरच्या ‘इंडियन’-चायनीजच्या हॉटेलातून सूप मागवणं अशक्य झालं आहे. सूप बनवायला असं कोणतं मोठं शास्त्र असावं? असा विचार करीत मी स्वतःच घरी सूप बनवायला घेतला.
एक मोठा चमचाभर तेल कढईत गरम केलं. त्यात बारीक तुकडे कलेला कांदा, मिरची, लसूण आणि अद्रक हलकंसं परतून अथवा sauté करून घेतलं. त्यात अंदाजे ३०० एम एल किंवा मोठा प्यालाभर पिण्याचं पाणी ओतलं. यात चवीनुसार दोन चिमुट मीठ भुरभुरलं आणि नीट ढवळून काढलं. एका वाटी भरून साधं पिण्याचं पाणी घेऊन त्यात साधारण दोन चमचे कॉर्न स्टार्च एकजीव होईस्तो मिसळलं. हे मिश्रण मग कढईतल्या उकळत्या पाण्यात ओढलं. दोन तीन मिनिटं उकळून पळीने वाटीत ओतलं की गरमागरम सूप ग्रहण करण्यास मोकळे.
जरासा ट्विस्ट म्हणून तेलात सोनेरी होईस्तो तळलेलं अंडं अर्धा कापून सोडलं की ‘गोल्डन फ्राईड एग ड्रॉप विथ जिंजर गार्लिक सूप’ तयार.