अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे
उत्तम चहा करणे ही सुद्धा एक कला आहे. कुणाकुणाला चहा तयार करणे नाही जमत. केवळ दुधात चहापत्ती टाकली, चमचाभर साखर टाकली आणि एखाद-दोन उकळ्या आणून कपामध्ये चहा गाळला म्हणजे चहा झाला. असा चहा करणे अथवा पिणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे हो! एखाद्याने आपल्याकडे चहा मागूच नये म्हणून अश्या पद्धतीचा चहा करण्याचा घाट घातला जातो. तेव्हा, चहाच्या चाहत्यांनो सावध असा.
एका व्यक्तीपुरतं निर्भेळ चहा करावयाचा असल्यास, एका पसरट बुडाच्या पातेल्यात एका कपाची शिग काठोकाठ भरेल एवढं दूध टाकावं. दुधावरची साय काढून ठेवण्याचा खाष्टपणा अज्जीबात करू नये. दुधात साय नसेल तर चहाला चव म्हणून नावालाही नसते. आजकाल, ‘लो फॅट मिल्क’ हेल्दी असतं, ‘एनरिच्ड, फोर्टिफाइड मिल्क’ वगैरे भारी शब्द जाहिरातींतून वापरून आपल्या गळ्याखाली हे असलं दूध उतरविण्याचा प्रचार सुरु आहे, त्याला न जुमानता आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून मुद्दाम घट्ट साय असेल तेच दूध वापरावं. शक्य असेल तर गायीचं किंवा म्हशीचं धारोष्ण दूध मिळालं तर “वाह! क्या बात है|”.
आता या दुधाला एकदा उकळून घ्यावं, त्यात एक छोटा चमचा चहापत्ती टाकावी. चहापत्ती कोणती चांगली? ते मात्र तुम्हाला वेगवेगळ्या चहापत्त्या ट्राय केल्यानंतरच समजेल. महाग असेल तीच चहापत्ती चांगली असं-बीसं काही नसतं, भ्रम आहे तो. आता आच मंद करावी, एका कपला एक चमचाभर साखर टाकावी. एवढं झालं की चिमूटभर आलं पावडर किंवा पाव अंगठाभर अद्रक बारीक किसून टाकावं. त्यातल्या त्यात जर दगडी खल-बत्ता असेल तर अद्रक चांगला ठेचून त्याचा रस पूर्णतः पिळून चमच्यात काढावा. ठेचलेल्या अद्रकाचा चोथाही टाकूनच द्यावा. रेडिमेड चहा मसाला असेल तर तो अर्धा चिमूट भुरभुरावा. नसेल तर, जायफळ, काळे-मीरं, दालचिनी खलबत्त्यात नीट कुटून, तलम कापडातून गाळून डब्बीत भरून ठेवावं आणि हवं तेव्हा चिमूट-अर्धा चिमूट वापरावं. आता वेळ आहे वेलचीची. एक किंवा दोन अक्ख्या वेलच्या बत्त्याने कांडून घ्याव्या. वेलची कडक वाळलेली असावी. वेलची जेवढी बारीक होईल, तेवढी छान सुगंध देईल. ही वेलची आणि त्याची टरफलं उकळत आलेल्या चहात भुरभुरून टाकावी. मंद आचेवरचा चहा लगेच काढून घेण्याचा उतावीळपणा करू नये. दोन किंवा तीन उकळ्या आल्यानंतर पातेल्यातला चहा पळीने किमान वीस पंचेवीस वेळा तरी ढवळावा. परत दोन किंवा तीन उकळ्या येऊ द्याव्या. एव्हाना २५-३५ टक्के चहा आटला असेल. म्हणजे कपच्या शिगेभर असलेलं द्रावण कपच्या कडीच्या वरच्या दांडीपर्यंत कढावला गेला असेल, द्रावणाचा रंग साधारण चुना मिसळलेल्या काथ्याच्या रंगासारखा दिसायला लागला आणि वेलची मिश्रित चहाचा मंद मंद सुगंध दरवळू लागला की समजावं झाला उत्तम चहा तयार. चहा असा चवीला, की पिणाऱ्याने कौतुकाने आणखी किमान अर्धा कप तरी चहा आणखी मागावा नाहीतर पुढल्या वेळी मुद्दाम चहा पिण्यासाठी कारणं काढून यावेच तरी!
आता चहागाळणीतून हा चहा बारीक कानाच्या कपमध्ये गाळून ओतावा. कप हवेच्या छोट्या मोठ्या बुडबुड्यांच्या फेसाने भरून जायला हवा. बशीच्या मधोमध कप ठेवला आणि आजूबाजूला बिस्किटं किंवा टोस्ट सजवून ठेवले की समारंभपूर्वक चहा औपचारिकरीत्या पिण्यासाठी तयार!
बरं, कधी येतंय मग चहा प्यायला?