अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे
एका वेळची गोष्ट आहे. खूप खूप आधीची.
सकाळच्या वेळीस नेहमी प्रमाणे मुंग्या अन्नधान्य जमा करायला वारुळांतून बाहेर पडायला लागल्या होत्या. मुंग्यांचा मुख्य आहार म्हणजे छोटीमोठी धान्य आणि बिया. मुंग्या मोठ्या उद्यमशील… सतत काही ना काही काम करत. ठरवलेली कामं निमूटपणे करायची, टंगळमंगळ करायची नाही हा त्यांचा शिरस्ता. या शिस्तीत सरसकट सगळ्या कामकरी मुंग्या जन्मलेल्या, वाढलेल्या.
रात्री पावसाचा हलका शिडकावा पडलेला असला तरी सकाळी आकाश मोकळं असल्याने अन्न जमा करायला वातावरण चांगलं होतं. पानांवरती दवबिंदू पडलेले, गवताला कोवळी पालवी फुटलेली होती. सवयीप्रमाणे मुंग्यांच्या एका टोळीला घेऊन टोळीची प्रमुख मुंगी कदमताल करीत एका मार्गाला लागली. असतील तिच्या सोबत २० – २५ मुंग्या. टोळीतल्या सगळ्या मुंग्यांमध्ये उत्साह अपार. कोवळ्या उन्हात, उबदार वातावरणात मार्गक्रमण करत ही टोळी जवळच्या माळरानाकडे निघाली.
चालता चालता पुढारी मुंगी समोरील दृश्य बघून जागीच थबकली. काही झालं तरी पुढारी मुंगीने सांगितल्याशिवाय रांग मोडायची नाही हा मुंग्यांचा नियम, त्यामुळे बाकीच्या मुंग्या पण थांबल्या. पुढारी मुंगीने गोलाकार करण्याची आज्ञा केली. या सगळ्या मुंग्यांनी ज्याच्या भोवती घेर घातलेला होता ते काय असेल बरं?
एखाद्या पोतड्यात मुसक्या बांधलेल्यासारखा एक कोष जमिनीवर पडलेला होता, अगदी निपचित! उन्हाची तिरीप त्यावर वर पडत असल्याने त्याच्या शेपटाने जराशी काय ती वळवळ केली तेवढीच. नाहीतरी वरवर अगदी निष्क्रिय दिसत होता तो कोष.
“अरे रे! काय ही दुर्दशा या जीवाची! गरीब बिचारा.”, एक मुंगी म्हणाली.
दुसरी म्हणाली, “काही दुर्दशा वगैरे नाहीये. आळस भरलाय अंगात ह्याच्या.”
“हो ना. उन्ह पडत आहे तरीही वाटेतून दूर होणार नाही.”, आणखी एक मुंगी म्हणाली.
“तरी बघ काय नशीब आहे याचं. आपण कसं हवं तिकडे हिंडू फिरू शकतो, झाडावरती चालू शकतो, अगदी उंचातल्या उंच झाडाच्या सर्वांत दूरच्या फांदीच्या टोकावरती सुद्धा पोचू शकतो. पण हा याच्या नशिबाने बिचारा फार फार तर कोषातल्या कोषात पायांची साधी हालचाल फक्त करू शकत असेल.” कुणी मुंगी म्हणाली.
त्या कोषातल्या जीवाने फक्त ऐकून घेतलं आणि काहीही उत्तर दिलं नाही. पुढारी मुंगीने कामाला लागण्याची शीळ घालताच मुंग्या आपापल्या कामाला लागल्या. कुणी अन्नाचा कण आणू दे, कुणी दवबिंदू डोईवर घेऊन जाऊ दे, कुणी गवताची पाती कुरतडू दे, असे त्यांना सांगितलेली कामं करू लागल्या.
दिवसांमागुन दिवस निघून जात होते. तो कोष होता तिथेच पडून होता. मुंग्या सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून जाऊ लागल्या. हळू हळू त्या कोषाची हालचाल अगदीच बंद झाली.
एक दिवस मुंग्या जवळपासच असतांनाच कोष थरथरा कापायला लागला. अचानक कोषाचं आवरण फाडून एक नवाच जीव बाहेर पडला. अगदी अलगदपणे त्याने त्याचे रंगबिरंगी पंख उघडले. अतिशय सुंदर असं ते फुलपाखरू होतं. त्या फुलपाखराने आजूबाजूच्या मुंग्यांकडे नजर फिरवली. शांतपणे तो मुंग्यांना म्हणाला, “तुमची श्रमिकता आणि सामर्थ्य वाखाणण्यासारखी आहे. तुम्ही हवं तिथे तुमच्या पावलांनी जाऊ शकता. धावा अथवा पळा, पण ऐकू शकत असाल तर ऐका मुंग्यांनो, माझ्यातही भरारी घेण्याचं सामर्थ्य आहे. कोषात असतानाची माझी तगमग तुम्हांस समजू शकली नाही, ती तुम्ही समजावी अशी माझी अपेक्षाही नाही. मात्र केवळ वरवरच्या दर्शनावरून कुणावरही हवी तशी मतं प्रदर्शित करतांना… जरा सांभाळून! कुणास ठावं, तो जीव तुमच्यापेक्षाही वरचढ ठरू शकेन.”
असं म्हणत, अवाक झालेल्या मुंग्याकडे शेवटचा कटाक्षही न टाकता फुलपाखरू हवेच्या झुळूकेवर स्वर होऊन त्याची रंगबिरंगी पंख फडफडवत आनंदात दूर उडून गेला.