अंदाजे वाचन वेळ : १ तास
दिवेलागणीची वेळ झाली होती. गावात घरोघरी लावलेल्या पणत्या-दिवे, टेंभे आणि कंदील टिमटिमत होते. पाऊलामागून पाऊल टाकत राघोबा घरी पोचला आणि समोर त्याच्या अंगणाच्या फाटकाला खेटून बसलेली गुणाबाई दिसली. मान उजव्या बाजूने झुकवून, कपाळावर उलट्या मनगटाच्या आधार टेकवून गुणा त्याचीच वाट बघत होती.
डोक्यावर पांढऱ्या लुगड्याचा पदर ओढून काठ दातात दाबून खिन्न, मलूल आणि दु:खाने खचलेल्या चेहऱ्याची ती पन्नाशीकडे झुकलेली बया तिच्यापेक्षा एखाद-दिड वर्षाने मोठ्या भावाकडे हक्काचा आधार मागायला आली होती. तिचा मालक, नवरा साधारण दोन आठवड्या आधीच वारला होता. तिच्या गावी शेजारीपाजारी सगळ्या बायांच्या पोटी उपजलेली लेंढारं दिवसरात्र तिच्या कौलारू घरासमोर खेळायची आणि स्वतःच्या वांझोट्यापणाला दोष देत ती गेली पस्तीस वर्ष आयुष्य ओढत होती. नवऱ्याचं गणगोत तिला आपल्यात मानत नव्हतं आणि तिच्या गणगोतनं तिला वाळीत टाकलं होतं, शेजारीपाजारी तिला कधी हळदकुंकवालाही बोलावत नव्हतं की घरी सहज मदतीला म्हणूनही तिला गिणत नव्हतं. घरची, शेत-वाडीतली मिळेल ती कामं करत ती आतापावेतो जगली.
नवरा वारला, आधार गेला आणि नवऱ्याच्या भावाबंधकीने तिचं राहतं घर विकटाक करून गुणाला राहत्या कपड्यानिशी हाकलून लावलं. रडतखडत तंगडतोड करत ती बिचारी वीस बावीस मैल पायपीट करून तिच्या माहेरी, राघोबाच्या आणि तिच्या बापाने ढोरमेहनतीने बांधलेल्या घरी पोचली.
तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत काहीश्या अनिच्छेनेच राघोबानं विचारलं, “कवा आलीस वं, गुणे?”
त्याच्या कपाळावरच्या आठ्यांच्या जाळ्यांकडे लक्ष न देता ती म्हणाली, “बस्स. आत्ताच.” दाताखाली दबलेल्या पदराचा काठ एका हाताने काढत तिनं राघोबाकडे बघितलं.
त्यानं फाटकाची कडी उचकवली आणि वऱ्हांड्यात पाऊल टाकलं.
“एकटीच आली का?” केवळ विचारणा करायची म्हणून त्यानं विचारलं. त्यात काळजीच्या भावाचा लवलेशही नव्हता
“हाओ बाप्पा! एकटीच आली. मले कहाडलं माह्या घरातून…” पुढे आणखीही काही बोलायचं होतं पण डोळ्यांतून पाण्याच्या धारा काढत हुंदके देत ती रडू लागली.
“थे त हुनारच होतं न बाई. आता रडून का फायदा?” वऱ्हांडा ओलांडून त्याने धोतराला बांधलेली किल्ली काढली आणि कुलूप उघडलं. कडी बाजूला सरकवून त्याने दरवाजा उघडला.
गुणा गुपचिप त्याच्या मागे आली. हात पाय धुण्यासाठी तिने अंगणात गाडलेल्या रांजणात गडवा डुबवला.
“कुठीसा गेला होता गा दादा?” चूळ थुंकत तिने विचारलं.
“कुठी न्हाई. बालीले सासरी पोचून आलो.” म्हणेस्तोवर त्याने पायावर गडव्याने पाणी टाकलं. पाऊलावर पाऊल चोळीत त्याने पाउलांवरची धूळ-माती साफ केली.
“अन गोदाबाई?” तिने भावजयीबद्दल विचारलं.
“ती असन शेजारी-पाजारी गेली.”
“सांजच्या वक्ताले? इतल्या वक्ताले. घर-दार बंद करून…”
“हे पाय बई, आल्या आल्या काई आमच्या घरात कटकट लावून नको. गेली असन, येईन.” गुणाच्या विचारणीला काही किंमत न देता राघोबा बाफरला.
किंचित दचकून गुणा मागे सरकली. “न्हाई तसं न्हाई…पर” विषय बदलवत तिने तिच्या पुतण्याबद्दल विचारलं, “अन रतन? तो बी गेल्ता का तुह्यासंग?”
“हव” त्याने तुटक उत्तर दिलं.
आपला भाऊ आपल्याला बघून अजिबात आनंदाला नसणार हे तिला ठाऊक होतंच पण अश्या वागणुकीची तिने विचारही केला नव्हता. तसाही भाऊ असून ती तिच्या जवळचा कधीच नव्हता. वयाच्या अठरा-विसाव्या वर्षी तिला व्याहून दिल्यानंतर न तिच्या वडिलाने, ना तिच्या भावाने कधी विचारपूस करण्यासाठी म्हणूनही तिच्याशी संबंध ठेवला नव्हता.
बापाच्या शेवटच्या समयी गुणा आली होती तेव्हा तिच्या बापाने पाझरत्या डोळ्यांनी आणि द्रवलेल्या हृदयाने तिला जवळ बोलावलं होतं. त्याच्या पश्चात दहा एकर जमिनीतला एक तुकडा, एक एकर गुणाला देण्याची त्याची शेवटची इच्छा त्याने राघोबाला सांगितली होती. मरणाच्या खाटेवरच्या माणसाच्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवावा म्हणून त्याने हो म्हंटल जरूर पण त्याची तिला हा हिस्सा देण्याचा अजिबात विचार नव्हता.
त्यावेळी गुणा तिच्या नवऱ्यासोबत आनंदात जगत होती. खाण्यापिण्याची आबाळ नव्हती आणि तिला जमिनीच्या या तुकड्याची काही गरज नव्हती. बापाने वचनात दिलेल्या जमिनीचा हक्क आपल्याकडे असो व भावाकडे, गरज पडेल तेव्हा मागून घेऊ असा त्यावेळी विचार करत राघोबापाशी जमिनीबद्दल तिने कधी विचारणा केली नव्हती आणि कालांतराने तिलाही याचा विसर पडला. दादला आपल्याला काही कमी पडू देणार नाही याची तिला खात्री होती.
पण आता काळ बदलला होता. दोन आठवड्यापूर्वी घडलेल्या घटनेने ती निराधार झाली होती. लाचार म्हणून जगणे तिला मान्य नव्हते. भावाकडून बापाने जाहीर केलेल्या वचनानुसार एक एकर जमीन मिळवून तिथेच झोपडी बांधून ती राहणार होती. पण हा विषय काढायचा कसा तिला समजत नव्हतं.
“बरं. आला न्हाई मंग आजूक?”
“न्हाई. येईन. गेला आसन दोस्ताईकडं.” अंगणातल्या नारळीच्या दोऱ्यांनी अर्धवट विणलेल्या खाटेवर बूड टेकवत तो बसला.
“हं S S …”
अंधार गुडूप व्हायला सुरुवात झाली होती. हातभराच्या अंतरावरचं दिसणं अंधुक होतं होतं. गुणाच्या घरी तिन्हीसांजेच्या वेळीसच तुळशीपाशी पणती, दाराच्या दोन्ही बाजूला पणत्या आणि ओसरीवर दोन कंदील लावून उजेड केलेला असायचा. तिनं अंगणातून घराकडे पाऊल वळवलं. “दादा, पणत्या कंदील कुठीसा ठेवलं हाईस?” बाईचं काम म्हणून दिवेलावणी करावी असा विचार करत तिने विचारलं.
“बालीच्या मायलेच मालूम असन दिवे गिवे कुठं असन ते. येऊ दे तिले करन तेच.” बंडीतल्या खिश्यात हात टाकून त्यानं माचीस डबी आणि बिडीचं बंडल काढलं. तोंडाशी बिडी धरत, माचिसची एक काडी पेटवून त्याने बिडी शिलगावली. आत एक दीर्घ श्वास ओढत त्याने कसलासा विचार करत धुराचा लोट बाहेर काढला. “हे घे.” माचीसची डबी तिच्याकडे फेकत त्याने विचारलं, “कसं काय येणं केलं मंग?” या विचारण्या मागे तिची काळजी कमी आणि बापाला दिलेल्या वचनाची अंधुक आठवण जास्त होती. बाप गेल्यापासून त्याने अक्खी दहा एकर जमीन वाहली होती. गुणाने आतापर्यंत जमीन मागितली नसल्याने ती विसरली असेल पण तरीही एकदा मनातला किंतु काढावा म्हणून त्याने विचारलं.
गुणा काही बोलली नाही पण त्याच्या अश्या विचारण्यामागे जमिनीच्या तिच्या हक्काबद्दल काही विचार असेल असं तिला वाटलं. माचीसची एक काडी पेटवून ती त्याच्या तोकड्या प्रकाशात एक एक पाऊल टाकत दरवाज्यापाशी पोचली. “एखादा टेंभा आसन दरवाज्यामागे?” एव्हडं बोलत तिने दरवाच्या मागे हात चाचपडावाला. हाती टेंभा लागला. दुसरी काडी पेटवून ती वातेला लावणार तोच “थांबा वन्संबाई” म्हणत तिच्या भावजयीने ओरडा केला.
फाटकातून अवजड अंगाचा बोजवारा सांभाळत ती लगबगीने गुणापाशी पोचली. राघोबाकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकत तिने गुणाच्या हातचा टेंभा आणि माचिसडबी हिसकली. “मानसले समजत नई, पण बाई तुमाले त समजायले पाह्यजे. उल्साकबी धीर न्हाई. घरची बाई मी हाओ. द्या मले!.” तिच्या चिडचिडीच्या सुरात गुणाच्या नुकत्याच आलेल्या वैधव्याबद्दल सांत्वना तर नव्हतीच पण तिच्यासारख्या सवाष्णीच्या घरात एका विधवा आणि निपुत्रिक बाईने पाऊल ठेवण्याबद्दल राग होता.
गुणाच्या मनात कालवाकालव सुरु झाली. भावजयीच्या पहिल्याच वाक्यातून अपमानाचं शल्य तिला टोचलं होतं. मानी असली तरी तिची पडती बाजू असल्याने डोळ्यांतून टचकन पाणी निथळता निथळता अपमान गिळून टाकणं एव्हढंच ती करू शकली. टेंभा हिसकल्याने अर्धवट बांधलेली मूठ तशीच क्षण दोन क्षण ठेवून “हं” करत ती मटकन खाली बसली.
घरात गोदाबाईनं दिवे लावले. रात्रीच्या सैपाकाची तयारी सुरु झाली तशी गोदाबाईनं गुणा यावेळी आल्याची कुरकुर सुरु केली. तिच्या पुटपुटत्या कुरकुरीकडे राघोबानं काही फारसं लक्ष दिलं नव्हतं तरी गुणाचं असं घरी येणं त्यालाही आवडलं नव्हतं.
“गुणे, कावून आली म्हणलं?” घसा खाकरत राघोबा म्हणाला.
एवढा वेळ गुपचूप बसलेली गुणा डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, “तसं काही विशेष न्हाई. तुले त मालूम हाये का होऊन बसलं म्हाया जीवनात. मले दुसरं कुणीच न्हाई तुह्याशिवा. म्हणलं तुया आधार होईन. म्हूनशान आली.” गुणा शब्दांत शब्द गुंतवरून हळूच पुढला विषय काढणार होती.
चुलीतला विस्तव फुंकणीने वाढवत तव्यावरची भाकर उचलून गोदाबाईनं चुलीच्या धगीपाशी भाजण्यासाठी ठेवली. डोळ्यांत जाळ आणून ती परत काहीतरी पुटपुटली.
“मले समजत हाये का तुह्यावर का बीतून ऱ्हायली पर आमचं आम्हालेच सुधारत न्हाई त तुले का अन कसा आधार द्या म्हणतो मी?” राघोबा सरळ बोलून मोकळा झाला. गुणा फाटकाशी दिसल्यापासून तिला कसं कलटवायचं याचा रीतसर बेत तो रचत होता.
गुणाबाईनं दिव्या-कंदिलाच्या उजेडात चहुवार बघितलं. शेतातल्या धान्याच्या पोती रचलेल्या बघून त्याच्याकडे खाण्यापिण्याची काही कमी नाहीच हे तिला उमजलं होतं. तिची नजर चहुवार फिरतांना बघून गोदाबाईनं खोचक रडगाणं सुरु केलं, “कष्ट करा लागते बाई धान्य पिकवाले. असंच थोडी मिळते? अन आमच्या उलश्याक घरात हात-पाय पसराची जागा न्हाई अन आता तुम्हीबी येत म्हणता …” नवऱ्याकडे बघत तिने सूचक पणे या बयेला लौकर रवाना करण्याची खूण केली.
“तू थांब वं. तू काह्यले बोलतं.” गोदाला उगाच रागवाणीच्या सुरत बोलत राघोबा गुणाकडे वळला. “हे पाह्य, पाहिजे त एक दोन दिवस ऱ्हाय. गोठ्यात तुयी सोय करतो पाह्यजे तं. अन मंग जाय आपल्या गावाले.”
“मी कुठं जाऊ दादा. धनी न्हाई, घरातून त्यायच्या गणगोतानं भाहीर काढलं. तथी तं जाऊ शकत न्हाई. तुही बहीण हाओ नं म्या. तूच करशीन नं महं. इतली तं मदत जरूर करशीन.” आता गुणाच्या दाटलेल्या गळ्यातून कुठल्याही क्षणी हुंदका फुटणार होता.
“कसंय नं वन्सबाई, एकदा लगीन झालं का घर सुटते हे तं तुम्हाले बी समजते. नवरा जित्ता असे तवरीक. मंग पोरगा संभयंते. आता तुमाले तं कोणी न्हाई, पर मंग आमच्यावर काहून लोढनं बनता बाई?” गोदानं खोचक टोमणा मारला तसा गुणानं हुंदके देत रडणं सुरु केलं.
राघोबानं तिच्याकडे लक्ष नं देता गोदाला भाकरी-भाजी मागितली आणि बेदरकार पणे तो खाऊ लागला. चुलीजवळ गोदाचं पुटपुटणं परत सुरु झालं. गुणाच्या डोक्यात तिच्या मृत नवऱ्याच्या आठवणी आणि तिच्या वांझोट्यापणाच्या दुःखानं कलह सुरु केला. दुःखानं शब्द निघत नव्हते आणि डोळ्यांतून निघणाऱ्या आसवांच्या धारेला बांध नव्हता. दबलेल्या हुंदक्यांत आणि मनातल्या विचारांच्या काहुरात घुसमटलेली एकटी गुणा अंगाची वळचटी करून कोपऱ्यात बसून राहिली.
राघोबाचं जेवण झालं तसं ढेकर देत त्यानं थाळी सरकवली ती थेट गुणाच्या दिशेनं गेली. थाळीच्या जमिनीवरच्या सरकल्याच्या त्या आवाजाने गुणाच्या विचारांची तंद्री तुटली. त्या थाळीत अन्नाचे उरले सुरले कण बघून पुढचं आयुष्य गावात हात फिरवून पोट भरण्याची वेळ येईल या विचाराने तिच्या अंगावर शहारा उठला. आपला भाऊ आपल्याला काही तरी आधार देईल अशी तिची आशा फोल ठरली होती.
“राघोदादा…” ती काहीश्या निर्धाराने उच्चरली, “मले का भीक लागाचं जिनं देशीन काय? घराचं नाव बदनाम हुईन अशानं. आईक महं, बापाले मरनवक्ती देलेलं वचन आठिव.”
“काह्यचं वचन?”
“बापानं मले जमिनीचा एक एकर द्याले सांगितलं हुतं तुले.”
“अस्सं व्हय तुया येण्याचं कारन. तुले हिस्सा पाह्यजे.”
“तसं न्हाई. मले फकस्त राहायसाठी जागा पायजे. जमिनीवर पिकन ते खाऊन जगिन म्या. कुणाच्याबी वाडीत कास्तकारीचे कामं करून राहीन. आताशिक राहिले आसरा अन धान लावासाठी म्हूनशान मले बापानं दिलेली जमीन पाह्यजे.” गुणाबाईनं मनातलं म्हणून दाखवलं.
“ओ वन्स, इसरा थे. मामंजी जाऊन लई वकत झाला. अन त्याईनं तं असं काही म्हनलंच नव्हतं.” गोदा चिडून चुलीजवळून गुणाच्या दिशेनं उठून उभी झाली.
“दादा, वैनीले सांग खरं खरं. आपल्या बापाची शपथ हाय तुले. त्याईनं एक एकर जमीन मले द्याचं वचन मांगितलं हुतं. तू बी साक्षी हाय अन मी बी.” अगतिक गुणाने कळवळून राघोबाकडे दाद मागितली.
“हे पाय गुणे, तुले म्हणून तं राह्यलो न मी, एक-दोन दिस ऱ्हाय. गायीच्या गोठ्यात करतो तुही तरतूद. मंग जाय जिकडं जायचं तिकडं… जमिनीचं बोलशीन तं मी वचन देन्या-अगुदरच बाप गेला. तं जमिनीचा हिस्सा तुह्या कसा? सांग मले. मी तं काई वचन नव्हतं देल्लं. महां डोस्कं काई भिन्न नोक करू. हिस्सा तं तुले भेटत नई.” राघोबानं आवाज चढवून ओरडा करत गुणाच्या अंगाजवळ चाल केली.
दोन पाऊलं मागे सरून गुणा अविश्वासाच्या भावानं त्याच्या कडे बघत राहिली. “तुही बहिन हाओ मी रे दादा. कायले खोटं बोलून राह्यला. माह्यावर असा संकट नसतं आलं तं मीच नसती आली पदर पसरवत.”डोळ्यांतल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत गुणाने विनवणी सुरु केली. “तुमाले का कमी हाय का? घरी अन्न-धान्य वाटण तेवढं हाय. गरिबी तं न्हाईच. मले माह्या हिस्स्याचा एक एक्कर द्याले तुमाले का कमी होणार तं न्हाई. तसबी बाप गेल्यापासून आतावरीक तुमीच तं माह्या हिस्स्यावर पिकवू पिकवू खाल्लं. मले कमी नव्हती तं मी बी नई मांगितलं. आता मुश्किल वकत आला म्हूनशान महाच हाक मागाले आली तं तू असा बोलतं. तुहीच बहिन हाओ न म्या, एकाच बापाची हाओ ना आपण दोघं”
“एका बापाचे असलो तरी तू माही बहिन नाही. व्हय तिकडं.” राघोबा चिडून ओरडला.
“नको रे दादा, असं बोलू.” गुणाच्या डोळ्यांतून पाण्याची संततधार निघाली.
“तुलेच शरम वाटाले पायजे का आपण काहून भावाच्या घरी जा अन त्याचा हक मारा. आली लुंगुई लुंगुई करत. त्याले बी काई ना काई संसाराची तक्लीफ असन. बालीचं लगीन केलं. तिच्या लगिनात पैसे अडका का कमी लागला असन याचा तं विचार कर. मामंजी जित्ते होते तवा तं तुमच्यापासून काई मदत नाई झाल्ती. गेले तवापासून याईनंच तं समदं केलं. इतले साल शेत-वाडीत घाम गाळू गाळू पैसे जमवला तवा कुठं इथवर पोचलो. आता श्रीमंती दिसली तं आली लचके तोडाले, कुत्रीवानी.” गोदा तावातावत तिच्या अंगावर धावत जात बोल बोल बोलली
तिच्या शब्दांनी कानात गरम शिसं ओतल्यागत गुणाला झालं आणि ती जागीच थिजली. आतापर्यंतच्या आयुष्यात तिचा एवढा अपमान कधीच झाला नव्हता.
“दादा, तुले काही कमी नाई होत. नको देऊ मले एक एक्कर, मले उलशीक जमीन दे झोपडी बांधाले बाकीचं मी पाहून घेईन. कमीत कमी भीक मागाचा तं वकत नको येऊ दे माह्यावर. मी मेली का माही ती जमीन बी तुह्याकडंच ठेव.” राघोबा मेलेल्या बापाला दिलेलं वचन साफ झुगारून देऊन सख्ख्या बहिणीशी असं वागेल याची तिला कल्पनाही नव्हती. तडजोड करून किमान थोडी जमीन मिळाली तरी काबाडकष्ट करून अन्न मिळण्याइतकं कमावता आलं तरी मानाने उरलेले दिवस घालवता येतील असा विचार करून तिने आर्जव सुरु केले.
गुणा घाबरून दबत आहे हे बघून गोदानं राघोबाला डोळ्यांनी “पहा तिला” म्हणत इशारा केला. गुणा जगो वा मरो तिला काही घेणं-देणं नव्हतं. हातांनी कागद चाळवत असल्याचा इशारा करून तिने राघोबाला हिस्सापत्राची आठवण करून दिली.
“तुहा काई बी हक्क न्हाई अन मी तुले काई जमीनीचा हिस्सा देत न्हाई. तुकडा बी देत न्हाई. तसं बी तुह्याकडं हिस्सापत्र न्हाई तं तू महं काई करू शकत न्हाई.” गोदाच्या त्या इशाऱ्याने राघोबाची बेदरकार हिम्मत वाढली होती. तसंही त्याला गुणाला तिच्या हक्काची जमीन त्याला द्यायचीच नव्हती. पाठमोऱ्या राघोबाकडे बघत असतांना तिच्या डोक्यात धगधगणाऱ्या रागाचा संताप हळूहळू अंगभर पसरू लागला.
गुणाच्या आर्जवांना काही किंमत नसल्याचं तिला जाणवलं. कदाचित जनाच्या भीतीपोटी तरी घाबरतील म्हणून ती ओरडली, “मी गावभर बोंबलत बोभाटा करीन तुह्या नावाचा. तू माही जमीन खाल्ली म्हून…पाप लागन तुले. पचनार न्हाई म्हाई जमीन…” एव्हढं बोलून ती अंगणाकडे धावत पळाली.
राघोबा तिला पकडण्यासाठी तिच्या मागे पळाला. उंबरठा ओलांडता ओलांडता गुणा अडखळली आणि पायऱ्यांवरून तोंडाच्या भारावर पडली. त्या आघाताने तिचं नाक आणि तोंड ठेचून निघालं. डोळ्यांसमोर झिणझिण्या भिरभिरल्या. थरथरत्या हाताने तिने तोंडाला हात लावला आणि भिंतीला लटकवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात हातावरच्या लाल रक्ताकडे बघताच स्वत:चं तोंड फुटलं असल्याची जाणीव झाली. फुटलेल्या रक्ताळलेल्या तोंडातून तुटलेले तीन दात थुंकून ती ढसाढसा रडायला लागली. राघोबा तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून ढिम्म उभा ठाकला. मागून अवजड अंगाचा डोलारा सांभाळीत गोदा उंबरठ्यावर पोचली. समोरचं दृश्य बघून गदागदा हसू लागली.
“आता कायचं तोंड उघडान, वन्सबाई? कशी जिरली?” तिच्या हसण्याच्या गडगडाटात राघोबाही सामील झाला.
ठणकणाऱ्या नाका-तोंडावरती हात गच्चं दाबून धरत गुणाबाई कण्हत कण्हत उठून उभी राहिली. डोकं गरगरायला लागलं होतं. भळाभळा वाहणाऱ्या रक्तानं तिचं नाक तोंड माखलं होतं. रक्ताच्या धारीने आणि तोंडातून गळणाऱ्या लाळीने सारवलेलं अंगण जागोजागी डागाळायला लागलं होतं. झोकांड्या देत फाटकाकडे जाता जाता, हुंदके, बोबड्या आवाजात ती म्हणाली, “मनाची न्हाई अन जनाची बी लाज न्हाई तुले, दादा. कायले घरची बात गावाजवळ काढाले भाग पडून राह्यला. मले उलशीक जमीन दे अन मी माहं तोंड बी नाही दाखवनार.”
तिच्या पोरीचं नुकतंच लग्न झालं होतं. हिने गावभर इज्जतीचा बोभाटा केला तर तिचा नवरा तिला टाकून देईन आणि जन्मभर पोरीला सांभाळत बसावं लागेल. रतन्याचं याच दिवाळी नंतर लग्न उरकून येणाऱ्या सुनेकडून स्वतःची सेवा करून घेण्याची स्वप्न बघत होती ती. तिच्या सोबत आणखी पैसे अडका येईल आणि कामासाठी फुकटची मोलकरीण मिळेल असे मनात मांडे घालीत गोदा सात-आठ महिने दूर असलेल्या दिवाळीची वाट बघत होती. गुणाच्या धमकीने तिचे सगळे स्वप्न धुळीस मिळतील असं वाटून तिचा संताप वाढत चालला होता.
“अशी कशी जाशीन बाई? बदनामीच्या धमक्या कोणाला देऊन ऱ्हायली वं?” म्हणत गोदानं तरातरा तिच्याकडे जात तिच्या झिंज्या पकडल्या आणि एका झटक्यात तिला खाली ओढलं. त्या हिसक्यासरशी गुणाबाईचा तोल घसरला आणि ती परत तोंडाच्या भारावर दण्णकन आदळली.
“आया S S यी गं!” गुणाबाई जिवाच्या आकांतानं किंचाळली तोच राघोबानं तिच्या रक्तानं माखलेल्या तोंडावर एक हात दाबून तिच्या किंचाळीला घुसमटून टाकलं. दुसऱ्या हातानं गोदाला घरात जाऊन तिच्या मुसक्या बांधण्यासाठी दोर आणायला पाठवलं.
“तुले तं आता जित्तीच सोडत न्हाई म्या. म्हाई बदनामी करशीन व्हय? व्हायमाले…” तावातावत राघोबा तिच्या चेहऱ्यापाशी जाऊन ओरडत होता.
“हाव करीन. माहा हक्क चोरला तू. अक्ख्या गावाले सांगीन म्या.” घुसमटलेल्या आवाजात विव्हळत गुणा म्हणाली.
वारंवार तोच तोच संवाद म्हणत, ऐकत राघोबाच्या संतापाचा पारा चढत गेला. अंधारात इकडे तिकडे जमिनीवर चाचपडत हाती आला गुरं-ढोरं हाकण्याचा दंडुका. अंगातला सगळा जोर एकवटून त्याने गुणाच्या टाळक्यात सरळ हाणला. त्याच क्षणी दोरखंड घेऊन अंगणात आलेल्या गोदाच्या आणि राघोबाच्या तोंडावर रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या.
“आई… मेली … मेली …”
तोंडातून हलकासा कालवा करत आधीच अर्धशुद्धीत गेलेली गुणा त्या प्रहाराने खाली कोसळली. राघोबानं तिच्या डोक्यात तेव्हढ्याच ताकदीचे आणखी दोनदा प्रहार केले.
गुणांची कवटी फुटून मेंदूचा चेंदामेंदा झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात हात-पाय झाडत गुणा अंगाला वेडेवाकडे झटके देऊ लागली. तिच्या आजूबाजूची जमीन रक्तानं पार माखून गेली. अंगातून प्राण जाऊ लागला तशी तिची तडफड धीमी धीमी होऊ लागली. शेवटचे आचके देताना कसल्याश्या निर्धाराने तिने डोळे उघडले. अजूनही हाती दंडक घट्ट पकडून उभा असलेला बेदरकार नजरेचा तिचा भाऊ आणि लोभिष्टपणाच्या आहारी गेलेली तिची भावजय दोघेही डोळ्यांतून अंधुक अंधुक दिसत होते.
“शा… शा… शाप… देते. तू…तू … परत येईन… मरशीन…” ओठांच्या अशक्त हालचालींतून गुणाचे शेवटचे शब्द निघाले. तिच्या शापातले कित्येक शब्द ओठांतून निघण्याआधीच हवेत विरून गेले.
अंगावरची वैधव्याच्या प्रतिकाची पांढरी साडी तिच्या गडद लाल रक्तानं लालेलाल झाली. माहेरी कुण्या एके काळी याच अंगणातून हिरवी साडी चोळी घालून सासरी गेलेल्या गुणाचा तिच्याच भावानं आज निर्घृण खून केला होता. तिच्या तडफडणाऱ्या देहकडे बघून शिसारी आल्यानं गोदानं तिथंच वांती केली. तिच्या वांतीचा पाट वाहत जाऊन गुणाच्या रक्तात मिसळू लागला.
आपल्या हातानं रागाच्या भरात स्वतःच्या बहिणीचा खून झाल्याचं राघोबाच्या लक्षात आलं. पुढले काही क्षण जागेवरच थबकून तो जमिनीवर कोसळला. हातातला दंडुका तसाच हातात घट्ट पकडून त्याने दुसऱ्या हाताने माथ्यावर हात आपटला. क्रोधाचा आवेश ओसरायला लागला होता आणि गुन्ह्याची जाणीव हळूहळू त्याच्या अंगी भिनायला लागली तशी त्याचं अंग थरथरू लागलं. घश्याला कोरड फुटली आणि हातपाय लटपटू लागले. हातून झालेल्या कृत्याच्या जाणिवेने त्याचं हृदय वेगात धडधडू लागलं.
गोदा हळूच त्याच्या कानात पुटपुटली, “झालं जे झालं ते. आता मुडद्याची सोय लावा पयले.” तोंडावर हात ठेवत वांतीची आलेली उबळ रोखून धरत तिने चहुवार पसरलेल्या रक्ताच्या थारोळ्याकडे आणि ठिकठिकाणी उडालेल्या शिंतोड्यांकडे बघितलं.
अंगात उरली सुरली ताकद एकवटून राघोबानं गुणाचे पाय पकडले. खाली वाकून तिचा देह खांद्यावर उचलला आणि हळूहळू उठून उभा झाला. इकडे तिकडे बघत हिची सोय कुठे लावावी याचा विचार करत होता. गोदानं त्याला खाणा-खुणा करत मागे मागे यायला सांगितलं. दोघांनी घराच्या मागे खोदलेल्या शेणखताच्या खड्ड्यात तिला फेकून दिलं. राघोबानं जमेल तेव्हडी शेण, माती, पाला-पाचोळा टाकून तासाभरात भरता येईल तेव्हडा खड्डा भरला. तिकडे गोदानं विहिरीतून बादली-बादलीनं पाणी ओढत, धापा टाकत अंगण सारावली. रक्ताचे डाग घासून घासून, शेणाच्या सरावणानी लिपून पोतुन झाकून टाकले. रांजणातल्या पाण्यानं दंडुका धुवून धुवून स्वच्छ साफ केला आणि गोठ्याच्या वरती हात पुरवून लपवून ठेवला.
उरलेली अख्खी रात्र त्या दोघांनी एकमेकांशी काही नं बोलता घरातल्या कोपऱ्यात एकमेकांकडे बघत जागत घालवली. अपराध आणि भीतीच्या भावनेचा किडा हळू हळू दोघांचंही डोकं पोखरू लागला होता.
मंदावलेल्या कंदिलाच्या टिमटिमत्या उजेडाचा आधार घेऊन झोपेने जड झालेल्या पापण्या कश्याबश्या थोपवत ती दोघंही जागरण करत बसली. रात्री कधी तरी बसल्या बसल्याच झोपी गेलीत. रात्र सरली. पहाट झाली. ताठरलेल्या डोळ्यांना किलकिलतं उघडून राघोबानं समोर बघितलं. गोदा बसली होती त्या कोपऱ्यात रक्ताचं थारोळं साचलं होतं.
“आ S S ” त्याच्या थरारत्या आरोळीनं घराच्या भिंती दणाणल्या. त्याने डोळे गच्चं बंद केले. “न्हाई … न्हाई” करत तो परत ओरडला. त्याच्या खांद्यावर रतन्यानं हात ठेवला आणि “बाबा… काय झालं, बाबा” करत त्यानं घाबऱ्या स्वरात विचारलं. दचकून राघोबानं डोळे उघडले आणि वरती मान करून बघितलं. नजरेसमोर रतन्याचा चेहरा दिसला तरी त्याचा चेहरा भीतीने पंधरा फाटक पडला होता. मान थरथर हलवत त्याने समोर बघितलं. गोदा त्याच कोपऱ्यात थराथरा कापत बसून होती. तिला बघून त्याच्या जिवात जीव आला पण रात्रीच्या हत्याप्रकरणाने त्याचं हृदय धडाधडा वाजत होतं. जागेवरून उठून तो गोदाकडे गेला.
गोदा अंगात थंडी-ताप भरल्यासारखी थराथरा कापतच होती. रतन्याने आणि त्याने तिला जागेवरून उठवली आणि अंथरून टाकून तिला लेटवलं. तिच्याजवळ रतन काळजीने थांबला होता. राघोबाच्या मनात शंकेची कसलीशी पाल चुकचुकली. त्यांना तिथेच सोडून तो अंगणाशी धावत गेला. पहाटेच्या उजेडात उंबरठ्यापासून फाटकापर्यंत त्यानं नजर भिरभिरवली. अंगणातली जमीन शेणाच्या सारवणानं आणि उगवत्या सूर्याच्या प्रकाशानं गुळगुळीत चमकदार शेवाळी दिसत होतं. अंगणात येरझारा घालत, जमिनीवर वाकून बघत त्यानं खात्री पटेस्तोवर शहानिशा केली. आदल्या रात्रीच्या हत्याकांडाचा लवलेश जमिनीवर कुठेही दिसत नव्हता.
घरात परतून त्याने साशंक मुद्रेत रतनची विचारपूस केली. रतन त्या रात्री त्याच्या शेतातल्या मचाणावर थांबला होता. तिथेच झोपून त्याने रात्र काढली होती. पहाटे पहाटेच तो घरी पोचला होता. राघोबा असं का विचारतोय म्हणून त्याने तिनदा विचारलं पण राघोबा शेवटच्या विचारण्यानं चवताळला. त्याच्या अश्या अवताराने चमकून रतन चूप बसला.
तो दिवस अंगावर थंडी-ताप काढत गोदा बिस्तऱ्यावर आजारी पडून राहिली. सायंकाळपर्यंत बरी होऊन तिनं घरकामाला हात लावला. वरवर सामान्य व्यवहार आणि कामं करत आला दिवस, गेला दिवस करता करता त्या रात्रीनंतर तेरा दिवस उलटून गेले. इतक्या दिवसांत त्या दोघांनीही झालेल्या घटनेबद्दल ब्र ही काढला नाही.
तिन्हीसांजेची वेळ झाली. गोदा हातात पणती घेऊन अंगणातल्या तुळशीपाशी पोहचली. तुळशीला प्रदक्षिणा मारून झाल्यावर तिनं तुळशीला मान वाकवून नमस्कार केला. पुटपुटत तिने दोन्ही कानांना दोन्ही हातांनी स्पर्श केला. डोळे उघडले आणि आपसूकच तिची नजर फाटकाकडे गेली.
फाटकापाशी कुणीतरी पांढरं पोतं आणून ठेवल्यासारखं दिसलं म्हणून ती सावधपणे फाटकाकडे चालत गेली. “कोन हाये रं”. तिनं हाक मारली. तसं ते पोतं हलत हलत पाठमोरं उभं झालं. गोदाच्या दिशेने वळल्यावर ते पांढरं पोतं लालसर होऊ लागलं. हा काय प्रकार आहे हे गोदाच्या ध्यानात येईपर्यंत तो आकार हवेत क्षणार्धात विरून गेला. किंचाळ्या फाडत गोदा जागीच थिजली. कपाळावरच्या घामाच्या थेंबांना टिपत श्वास रोखून तिने नीट फाटकाकडे बघितलं. तिथे कुणीच नव्हतं पण तिला स्पष्ट दिसलेलं दृश्य आठवत होतं. ती तिथेच खाली मटकन घाबरून बसून राहिली.
तासा-दिड तासाने रतन आणि राघोबा वाडीतून घरापाशी आले. फाटकाच्या कडीच्या उचकटण्याचा आवाज ऐकून तिला काही वेळा आधी दिसलेल्या दृश्याच्या आठवणीने गोदा भयंकर किंचाळली. राघोबा धावत तिच्या पाशी पोचला. तिचा रडवेला चेहरा वर उचलून कितीदा तरी “काय झालं?” म्हणून विचारत राहिला पण किंचाळण्या आणि रडण्याशिवाय गोदाने काहीच केलं नाही. दोघांनी तिला घरात नेलं. हवेत विरलेल्या वारंवार होणाऱ्या त्या आकृतीच्या आठवणींमुळे भेदरलेल्या चेहऱ्याने त्या दोघांकडे आलटून पालटून वेड्यासारखी बघत रडत राहिली.
तासभर घरात गोदाच्या किंचाळण्या-रडण्याला कंटाळून रतनला गोदाजवळ थांबवून राघोबा ओसरीत आला. वारंवार समजावूनही ती रडण्याची थांबली नव्हती आणि तिच्या रडण्या-ओरडण्यानं त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. घरात, दरवाज्यापाशी दिवे कंदील काहीच लागले नव्हते. रात्रीच्या काळाकुट्ट अंधारात समोरचं काहीच दिसत नव्हतं. हलक्या आवाजात पुटपुटत त्यानं बायकोला शिव्या देत चीड-चीड करणं सुरु केलं. डोकं भणभणायला लागलं होतं त्याचं. ओसरीच्या खांबाला टेकून त्यानं बंडीच्या खिश्यात हात टाकला. माचीस आणि बिडी बाहेर काढली. त्याची पुटपुट कुरकुर सुरूच होती. खाली मान घालत बिडी तोंडाशी धरली. माचीस काडी शिलगावली. जळक्या गंधकाच्या दुर्गंधींसोबत पिवळसर लाल उजेड पडत गुल पेटला. त्याच्या चेहऱ्यापासून वीतभर अंतरावर त्या हलक्याश्या उजेडात रक्ताळलेलं कपाळ आणि फुटलेल्या तोंडाच्या गुणाबाईचा चेहरा क्षणार्धात झळकला. त्यासरशी त्याचं हृदय धडधडून वाजलं आणि छातीत जीवघेणी कळ उठली. पुढल्याच क्षणी पेटलेली माचीस काडी हवेच्या झोतानं विझली. छातीला उजव्या हाताच्या पंजाने दाबून धरत खांबाच्या आधाराने तो गप्पकन खाली पडला.
आतमधल्या खोलीतून बाप किती तरी वेळचा बाहेर पडला तो अजून आत आला नाही म्हणून गोदाला ‘लगेच येतो’ म्हणत रतननं खांद्यांवर टॉवेल गुंडाळला. भिंतीच्या खोबणीत ठेवलेला टेंभा पेटवून तो बाहेर आला. त्या उजेडात छातीला धरून हात पाय झाडत पडलेला राघोबा त्याला दिसला. बाप तोंडाने हुं की चूं करत नाही बघून “बाबा… बाबा” हाका मारल्या पण राघोबा काही उत्तर देई ना. काय करू आणि काय नाही विचार करत कधी त्याला उठवून बसू दे, कधी त्याचा हात खांद्यावर उचलून घेऊ दे तर कधी कमरेला हातांचा विळाखा घालून ओढू दे करत कसाबसा त्याने राघोबाला घरात आणला.
रात्रभर ती दोघंही थाऱ्यावर आली नाही. रात्री कधीतरी ती तिघंही झोपली. सकाळ झाली. रात्रीच्या घटनेबद्दल रतन गोदाला विचारणार होता पण जागं झाल्यापासून ती परत थरथर कापायला लागली होती. तिच्या अंगाभोवती पांघरून गुंडाळून त्याने राघोबाकडे बघितलं. त्याचीही स्थिती काही ठीक झाली नव्हती. तोही थरथर कापत होता. रात्रीच्या थंडीमुळे दोघंही गारठले असतील असं त्याला वाटलं.
हळू हळू सूर्य उगवता झाला आणि ती दोघं जरा जरा थाऱ्यावर येऊ लागली. दोघंही सुधारत असल्याचं बघून रतनचा धीर वाढला. जमेल तसा चहा करून त्याने दोघांनाही पाजला आणि आदल्या सकाळची शिळी भाकर, ठेचा पांढऱ्या धोतराच्या कापडात गुंडाळून शिदोरी भरली. राघोबाला “वाडीत जातो” म्हणून तो घराबाहेर पडला.
घरात दोघंही स्थिरस्थावर व्हायला लागली असली तरी एकमेकांकडे न बघताच त्यांनी आपापली काम सुरु केली. न्हाणी, भांडी धुणी करून गोदा स्वयंपाकाला बसली. राघोबा काल रात्री आपल्याला भ्रम वगैरे झाला असल्याचा समज करत झालेली घटना विसरण्याचा प्रयत्न करत होता. स्वतःला काही ना काही कामात दोघंही गुंतवून ठेवत दोघांनी दिवस काढला. तिन्हीसांजेची वेळ झाली पण गोदाची घरातून अंगणात जाऊन दिवे लावणी करण्याची हिम्मत झाली नाही. लौकर चूल पेटवून त्याच्या आगीच्या प्रकाशात तिने स्वयंपाकाला सुरुवात केली. राघोबाही स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात बसून त्या उजेडाकडे बघत मनाला वेळ काढत होता. बिडी ओढण्याची त्याची इच्छा झाली होती पण परत नजरेसमोर गुणाबाईचा चेहरा परत दिसेल याची भीती वाटत होती. उघड्या दरवाज्यातून थंड हवेच्या झुळूका येण्यास सुरुवात झाली. जागेवरून उठून त्याने दरवाजा बंद केला आणि परत त्याच्या जागी येऊन बसला.
गोदा स्वयंपाकात गुंतली होती पण तिच्या डोक्यात फाटकापाशी दिसलेल्या आकृतीचा विचार परत डोकावू लागला होता. तिने आता पर्यंत ही गोष्ट राघोबाला सांगितली नव्हती. पण आणखी मनातल्या मनात कुढत बसण्यापेक्षा तिने त्याला सांगण्यासाठी तोंड उघडलं.
“आवं धनी”
दोन्ही गुढघे मुपडून त्यात मुंडकं खुपसून बुडावर बसलेल्या राघोबानं मान तशीच ठेवून “हूँ…” केलं.
“काई न्हाई. काळ सांजच्या वक्ताले मले कानी फाटकापाशी…” पुढलं बोलण्याआधी तिनं मोठा आवंढा गिळला तरी तिला घश्याला कोरड पडल्यासारखं वाटत होतं. पोटात भीतीने अचानक खड्डा पडला आणि हुंदके देत म्हणाली, “… सफेद पोतं फाटकापाशी ठिवलेलं दिसलं हुतं. का व्हय म्हून पाहिले गेली त ते सफेद पोतं रगतावानी लालेलाल हू लागलं म्हून मले भेव वाटलं. अन मंग काई समजाच्या अगुदर गायब झालं.”
ते ऐकून राघोबांचं डोकं गररायला झालं. हात पाय बधिर झाल्यासारखं वाटू लागलं आणि त्याच्या डोक्यात भीतीनं थैमान घालायला सुरुवात केली. “का सांगून ऱ्हायली वं? मी भाईर उभा हुतो. आतमधी तुहं किंचायनं अन रडनं सुरु हुतं अन माह डोस्कं दुखले लागलं म्हून मी ओसरीत गेलो. बिडी काढली अन काडी चेतवली त मले गुणेचं फुटकं थोबाड दिसलं अन गायब झालं…” त्याच्या अंगावरून सरसरून भीतीची लाट वाहत गेली.
“म्हंजे… म्हंजे… वन्सं तुमाले दिसली म्हंता?” गोदाच्या थरथरत्या कापऱ्या आवाजात तिची भीती व्यक्त झाली. “आता मेल्यावर आपल्या मानगुटी बसन वाटते.”
“काई बी नगं बोलू, भवाने. दिमाकात थेच थे घुमत रायते म्हून दिसत आसन. भरम असू शकन.” त्याने कशीबशी तिची आणि स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
“असन. पर तेराव्या दिवशी असं दिसलं. अन आपन त्याईचं काई बी न्हाई केलं. तं त नसंन?”
“का मालूम? पन आता काई बी करू शकत न्हाई आपन. आता कायचं दुख करा? लोकं इचारतीन, रतन्या इचारन तं का सांगाचं? जाऊ दे.”
“तरी बी मले वाटते का शांती बिंती करू न्हाई तं मांत्रिक बिन्त्रिक आनू. न्हाई काई तं समाधान तं हुईन.” तिने सुचेल तसा तोडगा सांगितला.
“पैसे लागते त्याच्यासाठी. कुठून आनू?” राघोबा चिडत म्हणाला.
“पैसा का कमी हाये का? एक दोन तीन धानाचे पोते ईका अन आना पैसे…” तीही ओरडून म्हणाली.
“बोंबलू नगं. मले समजते. शिकवू नको मले. समजते सारं मले. तुह्यापासचे काढ नं… मारे इकडं तिकडं भरून ठिवतं. धान अन बिन इकांचं मले नको सांगू.” त्याचा स्वर वाढला तसं त्याच्या डोक्यात वेदनेने जबरदस्त कळ उठली.
“हाओ. तुमाले काय हाये. माहे व्हय थे पैसे. अन तुमीच तं टेनपं हानलं बाईच्या टक्कूऱ्यात. तुमीच निस्तरा आता.” चिडत ती चुलीपाशी टान्नकन उभी झाली.
“तू तं निरी हुभीच होती. तुले तं मज्जा आल्ती नं पाहिले. अन आगीत तेल तं त्याच टाकलं. चालली मले शिकवाले.” राघोबा तावातावत बोलत होता. “अजून सांगशीन तं एकच दिन ऱ्हायपाटीत. एका झापडीत खालीच पडशीन.”
“हाओ. तुमचीच बहिन होती थे. तुमीच मारलं अन मले सांगता.” गोदाच्या चिडक्या आवाजात आणखी धार आली होती.
“तं तिची जमीन मी मेलो का तुलेच देणार हुतो नं. अन आता का जास्त बोलशीन तं तू हाय अन मी हाय.” त्याचे हात थरथरायला आणि पाय लटपटायला लागले होते. डोक्यात दुखण्याची कळ तीव्र होत चालली होती.
दोघं ही जागच्या जागी रागाने कापत उभे होते. एकमेकांकडे रागाने बघत, डोळे वटारात आणखी काही बोलतील तोच दोघांच्याही डोळ्यांसमोर एकाच वेळी त्या रात्री केविलवाण्या चेहऱ्याने गुणाबाईने केलेल्या आर्जवाचे क्षण तराळले. क्षण दोन क्षण तसेच गेले आणि शांततेचा भंग करत दरवाजा किरकिरला तसं दोघेही अचानक भीतीने शहारले.
“का झालं?” दरवाजा उघडून रतन आत आला. “दरवाजा कायले बंद केल्ता?” दोघांकडेही बघत काहीतरी घडलं असल्यासारखं वाटलं. त्याचा आवाज ऐकून दोघंही चपापले पण रतन दिसल्यावर त्यांना हायसं वाटलं.
“काई न्हाई… काई न्हाई” म्हणत दोघांनी वेळ काढून नेली.
रतन आणि राघोबा जेवण्याची ताटं घेऊन बसली. गोदानं थाळ्यांत भाकरी आणि पिठलं वाढलं आणि उठून आतल्या खोलीत गेली. गेल्या तासभरापासून तिची मान सारखी खाजवत होती. स्वयंपाक करेपर्यंत खांद्यानंच जमेल तेवढी खाज शांत करण्याचा तिने प्रयत्न केला होता पण आता खाज फारच वाढली होती. आरश्यासमोर ठेवलेल्या टेंभ्याच्या उजेडात तिनं न्याहाळून बघितलं. मानेच्या उजव्या-डाव्या बाजूपासून गळ्यापर्यंत लाल रंगाचे चट्टे पडलेले तिला दिसलं. “माय माय वं, लै खाजवून राह्यलं” म्हणत तिनं हाताच्या नखांनी मान खाजवायला सुरुवात केली. हळूहळू मानेपासून गळा, खांदे, हात खाजवायला लागली.
इकडे रतनने सहजच गोष्ट काढली. “बाबा, मागच्या आठवडापासून काईतरी सडल्यासारखा वास येऊन राह्यला. तुमाले येऊन न्हाई राह्यला का? आज म्हनान, उद्या म्हनान असं वाटलं पन काई न्हाई…”
थोडा विचार करून राघोबानं विषय बदलला, “एखांदा मामुजी गिमुजी मेला असं म्हून येत असं वास तुले. मले तं काई येऊन न्हाई राह्यला अन ना तुया मायले आला.”
“मी पाह्यतो उद्या. इतला सडका वास थोडी येते उंदराचा. एखांद्यानं काई मारून बिरून टाकलं असन वाटते त्याचाच वास सुटला.” थाळीतून जेवणाचा घास घेत म्हणाला, “मले तं जेवण बी न्हाई धकून राह्यला त्याच्याच्यानं.” थाळी सरकवून तो हात धुवायला मोरीकडे गेला.
रतननं वास कशाचा येते आहे, कुठून येते आहे म्हणून शेणखताच्या खड्ड्याकडे गेला आणि खड्डा खोदून काढला तर बिंग उघडं पडेल याची त्याला जाणीव झाली. थाळी सरकवून त्यानं मोरीकडे जाऊन हात धुतले आणि रतनला म्हणाला, “बाबू, बालीकडं जशीं उद्या पहाटे. लै दिस झाले. का सुरु हाये त्याईचं पाहून येशीन”.
“बाप्पा, आत्ता महिनाई नसन झाला तुमी जाऊन आल्ते नं जी बालीकडं.”
“तुले जाय म्हनलं नं म्या.” आवाज चढवून राघोबा ओरडला. “उद्या निघ अन संगतीनं तुरीच्या दोन पिवाश्या घिऊन जाय.”
राघोबाच्या ओरडण्याच्या आवाजानं गोदा तिथं आली. “जाय गा बाबू बा म्हून ऱ्हायला तं. झाकटीत जाय अन रातीस येऊन जाय न्हाई तं दोन तीन दिस ऱ्हाय. तुले वाटन तसं कर.” तिनं जाणाऱ्या रतनला समाजावणीच्या सुरत म्हंटलं. काही न बोलता निमूटपणे तिथून निघून गेला.
खुसफूस करत राघोबानं आणि गोदानं पुढल्या दिवशी शेणखताचा खड्डा खोदून गुणाचं प्रेत पोत्यात टाकून दूर कुठूनतरी पुरून किंवा जाळून टाकण्याचा आराखडा बांधला. गोदा गावाच्या वेशीजवळच्या मांत्रिकाकडे जाऊन घरात झाडाफुकीचा उपचार करणार होती.
रतन आणि राघोबा पहिल्या खोलीत झोपायला गेले. पडल्या पडल्या राघोबा घोरायला लागला होता. स्वयंपाक खोलीत गोदानं अंथरून टाकलं. अंगावर पांघरून घेतलं आणि डोळे बंद केले. अर्धा तास झाला असेल. गोदाचं अंग खाजवणं सुरु झालं. मानेपासून सुरु झालेली खाज संपूर्ण शरीरावर उठली. “आ S S … आ S S , स्स्स … ऊं… ऊं… कुई… कुई…” विव्हळत, एका कडावरून दुसऱ्या कडेवर पलटत अंग कधी जमिनीवर घासत, कधी हाताने, कधी पायाने अंग खाजवत अस्वस्थपणे तिने लोळण घेणं सुरु केलं. पालथं पडलेल्या गोदाच्या चेहऱ्यापाशी वितभराच्या अंतरावर गुणाचा चेहरा हसू लागला तशी भीतीने तिची बोबडी वळली. “मले तू कुत्री म्हणलं हुतं नं? आता तुही गत बी तशीच हुईन.” म्हणत ती अदृश्य झाली.
“ए… हाडं … हाडं … कंचं कुत्रं इल्लायून ऱ्हायलं तं…” रतन ऊं… ऊं… कुई… कुई… च्या आवाजानं चिडला.
अंगभर भयानक खाजवलेल्या अंगातून दाह होणं सुरु झालं आणि त्यासोबत तीच विव्हळणं वाढलं.
“माही जमीन मले दे रे दादा” राघोबाच्या स्वप्नात गुणाबाई आली.
“न्हाई देत. माही व्हय जमीन. न्हाई देत.” राघोबा मान हलवत बडबडू लागला.
“माही जमीन मले देतं का न्हाई? न्हाई तं अख्ख्या गावात बोंबलू बोंबलू सांगन म्या. म्हाई जमीन महा हक व्हय, बापानं दिला हुता मले.” गुणाबाई म्हणाली.
“न्हाई… न्हाई देत.” म्हणत त्यानं गुणाला मारण्यासाठी हात उगारला.
तिच्या डोक्यातून रक्त पाघळू लागलं, तिनं तोंडाला हात लावून काढला तसा तिच्या तोंडातून तीन दातं हातावर पडली. हसत हसत गुणा म्हणाली, “मी तं मेलीच हाओ. कितीकदा मारशीन आजूक? तू मातर तडफडू तडफडू मरशीन, माह्यासारखा.” आणि ती अदृश्य झाली.
“न्हाई S S ” किंचाळत राघोबा जागा झाला. त्याच्या संपुर्ण अंगात झिणझिण्या उठल्या आणि डोकं दुखायला सुरु झालं.
बापाच्या किंचाळल्याने रतन खडबडून जागा झाला. बापाच्या अंगाला हात लावून त्याने उठवलं तसा भेदरलेल्या चेहऱ्याने त्याने त्याच्या कडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यात त्याला गुणाचा रक्तबंबाळ फुटलेला चेहरा दिसला तसा आणखी दांदरला आणि जीवाच्या आकांताने किंचाळला.
गोदाही लगबग तुरुतुरु चालत पहिल्या खोलीत अंग खाजवत आली. राघोबाच्या कपाळावर, कानावर हात ठेवत शांत व्हा म्हणत रडू लागली. एका हाताने तिचं अंग खाजवणं सुरूच होतं. हळूहळू राघोबा जरा ताळ्यावर आला. घाबऱ्या चेहऱ्याने इकडे तिकडे बघणं सुरूच होतं. अंगातून वाहणाऱ्या झिणझिण्या आणखी तीव्र होऊ लागल्या होत्या. कशीबशी सारवासारव करून तिघंही आपापल्या जागी परतले. रतन परत झोपी गेला पण गोदा आणि राघोबा दोघं ही रात्रभर तळमळत होती.
दिवस उजाडला. गोदा उठून न्हाणीघरात गेली. सुजलेल्या डोळ्यांनी तिनं अंगाकडे बघितलं. तिच्या संपूर्ण शरीरावर जागोजागी ओरबाडून ओरबाडून झालेल्या जखमांतून रक्त बाहेर येऊ लागलं होतं. गडव्यातून पडणाऱ्या पाण्याच्या धारेने अंगभर झोंब उठली आणि वेदनेनं तिचं विव्हळणं सुरु झालं. अंघोळ पूर्ण न करताच ती न्हाणीघरातून बाहेर पडली.
राघोबा ओसरीतल्या खांबाला टेकून फाटकाकडे बघत उभा होता. काळ रात्री झिणझिण्या सुटलेल्या अंगात आता बधिरता येऊ लागली होती. त्याचं लक्ष तुळशीकडे गेलं. तुळशीवृंदावनापाशीच त्याच्या हातांनी गुणाचा मुडदा पाडला होता. ती कोसळली होती त्या ठिकाणी त्याची नजर खिळून गेली होती. रात्रभर तळमळत असल्यानं डोकं ठणकत होतंच. ताठरलेल्या डोळ्यांसमोर गुणाबाई वृन्दावनाशेजारी सफेद लुगडं घालून दिसली. एक दोन पाऊलं पुढं टाकून ती राघोबाच्या दिशेने समोर आली. तिच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहायला लागलं. ते दृश्य बघून राघोबा जागीच थिजला. भर सकाळी त्याच्या समोर त्याच्या पापकृत्याचा प्रसंग तराळू लागला आणि रडवेला चेहरा करत खांबाच्या आधाराने खाली कोसळला. चालत चालत गुणाबाई त्याच्या पाशी आली आणि तिने त्याच्या चेहऱ्यासमोर फाटलेला जबडा विलक्षण उचकटला. त्यासरशी रक्ताच्या चिरकांड्या उडून त्याच्या अंगावर उडाल्या. भयाने तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्याने डोळे गप्पकन बंद केले.
“बाबा… येतो म्हनलं…”राघोबाच्या खांदयावर रतननं हात ठेवला तसा तो भयानक किंचाळला. दचकून रतन मागे सरकला. डोळे उघडून भ्रमिष्टासारखा रतनकडे त्यानं बघितलं.
“काय झालं बाबा? दोन-तीन दिसापासून माय अन तुमि काई ठीक दिसून न्हाई राह्यले.” त्यानं काळजीनं विचारलं.
डोळ्यांची उघडझाप करत राघोबा सावरला, “काई न्हाई झालं. तू निघ. बालीची इचारपूस करून येशीन.”
रतनला अजूनही तारतम्य ठीक वाटत नव्हतं. तरी घरी त्यांना सोडून बालीच्या गावाकडे जाण्यासाठी निघाला.
तो निघून अर्धा तास झाला आणि गोदाबाई ओसरीत आली. ठरल्याप्रमाणे ती मांत्रिकाकडे जाण्यासाठी निघाली. राघोबानं गोठ्यावरती ठेवलेला फावडा-कुदळ खाली उतरवला. त्यासोबत गुणाच्या डोक्यात हाणलेला दंडुकाही खाली पडला. तिन्ही अवजारे घेऊन तो शेणखताच्या खड्ड्याकडे वळला.
घरातून निघालेली गोदा अंग खाजवत कशी बशी वेशीपर्यंत पोचली. सूर्याच्या चढत्या उन्हाने तिच्या अंगाला चटके बसू लागले, अंगातून निघणाऱ्या घामाने जखमांत जाण्यास सुरुवात केली आणि तिचं अंग आणखी चुणचुण खाजवू लागलं. जितकं अंग ती खाजवू लागली तितकं बरं वाटण्याऐवजी आणखी खाज वाढू लागली. उन्हाच्या तापत्या झळांपासून वाचण्यासाठी ती झाडाची सावली शोधू लागली. वेशीपाशी दूरवर एक झाड तिला दिसलं त्याच्या दिशेनं ती धापा टाकत चालू लागली. तोंडातून लाल गळू लागली होती आणि एक एक पाऊल टाकणं कठीण होत गेलं. ते झाड जसंजसं जवळ येऊ लागलं तसतसं सडक्या अन्नाची, पालापाचोळ्याचे आणि घाणीची दुर्गंधी तीव्र होत गेली. नाकाच्या घ्रानांतून दुर्गंधी श्वासागणिक तिच्या फुफ्फुसांत जाऊ लागली. किळस येऊन तिनं जागीच ओकारी केली आणि त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बेशुद्ध होऊन कोसळली. सकाळ सरली, दुपार सरली, सायंकाळ झाली पण तिकडे कुणी फिरकलं नाही आणि कोसळलेली गोदा बेशुद्धावस्थेतच पडून राहिली.
रात्र झाली आणि गोदा शुद्धीवर आली. सर्वत्र अंधार पडलेला होता. लटपटणाऱ्या पायांनी ती उठून उभी झाली. हात पाय खाजवत अडखळत्या पाऊलामागे पाऊल टाकत ती समोर जात होती. अंगावरच्या जखमांत काहीतरी वळवळत असल्याचं तिला जाणवलं. हातावरच्या एका जखमेकडे तिनं नीट निरखून बघितलं तर एक पांढरी अळी वळवळ करत आत आत शिरल्यासारखी तिला दिसली. वेदनेने “स्स्स” आवाज करत तिने हातावरच्या त्या जखमेभोवती तिने कचकचून चावा घेतला. तशी ती आणखी वेदनेने कळवळून किंचाळली. मानेवर तिला वळवळ जाणवली तशी मान वळवत तिने तिथली खाज क्षमावण्यासाठी डोक्याला मागे घासत खाजवणं सुरु केलं. पोटावर खाज सुरु झाली म्हणून एका हाताने पोट खाजवू लागली तर एक हात पाठीची खाज घालवण्यासाठी मागे नेली. खाजेने ती पिसाळून गेली होती. “स्स्स… स्स्स” करत असतांना अचानक डोळ्यांसमोर गुणाबाई दिसली तशी तिने किंचाळी फोडली.
“मले तू कुत्री म्हनलं हुतं नं. आता भोग कुत्र्याईची खरूज…” हसत हसत गुणाबाईच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहायला सुरुवात झाली.
गोदानं किंचाळून किंचाळून ओरडत धावपळ करायला सुरुवात केली. अंधारात वाट मिळेल न मिळेल तिकडे धावू लागली. रस्ता सोडून एका शेताच्या काटेरी कुंपणातून पळली आणि धप्पकन विना काठाच्या विहिरीत पडली. त्या विहिरीतल्या पाण्यात गटांगळ्या खात तिने हात पाय मारले पण अवजड शरीर पाण्यावर फार काळ तरंगणं शक्य नव्हतं. विहिरीतून वरती आकाशाकडे बघत हात पाय मारत असतांना शेवटच्या क्षणी तिला गुणाचा रक्तबंबाळ चेहराच दिसत होता.
इकडे सकाळी सकाळी राघोबानं गुणाला पुरलेल्या ठिकाणी खोदायला सुरुवात केली. घामाच्या धारा निथळू लागल्या. कुदळीच्या प्रत्येक वाऱ्यासोबत गुणाच्या डोक्यावर केलेल्या वारांची आठवण त्याच्या डोक्यात घुमू लागली. डोकं ठणकायला सुरुवात झाली. अर्धाअधिक खड्डा खोदून झाला असेल तोच त्याच्या हातापायांत मुंग्या आल्या, डोकं हलकं हलकं वाटू लागलं आणि उथळ श्वास-निश्वास सुरु झाले. रतन परत येण्याआधी त्याला पुरलेल्या प्रेताची विल्हेवाट लावायची होती. धापा टाकत त्यानं खड्डा खोदायला परत सुरुवात केली. त्या खड्ड्यातून गुणाचं सडकं प्रेत दिसू लागलं. त्याच्या हातांतल्या झिणझिण्या तीव्र झाल्या आणि डोक्यापर्यंत शिलक गेली. डोकं भयानक ठणकायला लागलं आणि त्याने फावडा सोडून दोन्ही हातानी डोकं दाबून धरलं. डोळ्यांसमोर परत एकदा गुणाबाई दिसली आणि तुटलेल्या जबड्यातून विकट हसत त्याच्या पाशी ती पोचली. “देतं का न्हाई माही जमीन? न्हाई देत? तं मग अथीच मर…” म्हणत तिच्या डोक्यांतून उडालेल्या रक्ताच्या चिरकांड्यांनी तो न्हाऊन निघाला. त्याने जोरजोरात किंचाळ्या फोडल्या आणि चाचपडत त्याने दंडुका हाती धरला. त्याच्या एका टोकाला घट्ट पकडून त्याने जमिनीवर दंडुक्याचं दुसरं टोक टेकवलं आणि अंगातली सगळी ताकद एकवटून स्वतःच्या टाळक्यात त्यानं घाव घातला. त्याचं डोकं फुटलं आणि तो तोंडाच्या भारावर खड्ड्यात पडला. सर्वांगाला शेण लागलं आणि आचके देत हात पाय झाडत कसाबसा तो जागीच पलटला. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि संपूर्ण शरीर बधिर होऊ लागलं होतं. डोळ्यांसमोर गुणाबाईचा तुटक चेहरा दिसू लागला आणि त्याची शुद्ध हरपली.
त्याचे डोळे उघडले तेव्हा रात्र झाली होती. हात-पायांत जाणीव होत नव्हती पण डोक्यात गुणाबाईचं हत्याप्रकरण परत परत दिसू लागलं होतं. सताड उघड्या रक्ताळलेल्या डोळ्यांतून निघालेला आसवांचा ओघळ आषाढातल्या थंडीत गारठण्याआधीच खप्पड गालांवरून निथळला. किर्रर्र-काळोख्या रात्रीच्या अखेरच्या प्रहरी राघोबाच्या आक्रसलेल्या जबड्यातून “आघ S S घग S S घग” एवढाच अखेरचा कंठ्यध्वनी निघाला.
रतन दुसऱ्या दिवशी दुपारी गावाच्या वेशीतून आत येत होता तेव्हा गावातल्या कुणीतरी त्याची माय वेशीजवळच्या विहिरीत पडून मेल्याचं सांगितलं. धाय मोकलून तो रडत तिच्या टम्म फुगलेल्या शरीराकडे बघत होता. कसाबसा त्याला शांत करून गावातल्या त्याच्या गड्यांनी बैलबंदी करून तिच्या प्रेताला आणि त्याला घरी पोचतं केलं. गोदाच्या प्रेताला अंगणात आणलं आणि तुळशी-वृन्दावनापाशी ठेवलं. त्याच्या सोबत पोचलेल्या लोकांनी अंगणात बसायला सुरुवाट केली.
रडत रडत रतननं दरवाजा लोटला आणि बापाला शोधत. हाका देत तो शेणखताच्या खड्ड्याजवळ पोचला. तिथं मृत पडलेल्या राघोबाकडे बघत ओक्साबोक्सी रडला आणि त्याला खड्ड्यातून बाहेर काढता काढता गुणाबाईच्या सडण्यास सुरुवात झालेल्या प्रेताचाही शोध लागला. त्याच्या मागोमाग आलेल्या दोघा-तिघांनी दोन्ही प्रेतं अंगणात तुळशी-वृन्दावनापाशी आणून एकमेकांपाशी ठेवली.
तिन्ही प्रेतांना स्वच्छ करून त्यांचा अंत्यविधी त्याच दिवशी रतननं पार पाडला. रात्रीपर्यंत आलेली सगळी मंडळी एक एक करून आपापल्या घरी गेली. रतन एकटाच घरी राहिला. त्या तिघांचा मृत्यू असा रहस्यमय पद्धतीने झाला त्याचं कोडं त्याला विचार करून सुटता सुटेना. अंगणात तुळशीसमोर तीन दिवे मांडून तो अंगणातल्या खाटेवर झोपी गेला.
सकाळी उठून रतननं घर साफ केलं. अंघोळ करून त्यानं पिशवी भरली आणि अंगणात येऊन त्यानं घराकडे शेवटची नजर टाकली. फाटक उघडलं आणि घर सोडून तो निघाला. त्यानंतर गावात कधीही तो कुणाला दिसला नाही. त्या दिवसानंतर त्या घराकडे कुणीही फिरकलं नाही. ज्या जमिनीसाठी गुणाचा खून झाला होता त्या जमिनीवर पुढलं वर्षभर तणकटाशिवाय काहीच उगवलं नाही.
वर्षभरानंतर बालीचा नवरा बालीला आणि नुकत्याच जन्मलेल्या लेकीला घेऊन तिथं राहायला आला. लेकीचं नाव बालीच्या आत्येच्या नावावर “गुणाबाई” ठेवण्यात आलं आणि पुढे सगळी जमीन आणि घर तिच्या नावानं झालं.दिवेलागणीची वेळ झाली होती. गावात घरोघरी लावलेल्या पणत्या-दिवे, टेंभे आणि कंदील टिमटिमत होते. पाऊलामागून पाऊल टाकत राघोबा घरी पोचला आणि समोर त्याच्या अंगणाच्या फाटकाला खेटून बसलेली गुणाबाई दिसली. मान उजव्या बाजूने झुकवून, कपाळावर उलट्या मनगटाच्या आधार टेकवून गुणा त्याचीच वाट बघत होती.

वर्षभरानंतर बालीचा नवरा बालीला आणि नुकत्याच जन्मलेल्या लेकीला घेऊन तिथं राहायला आला. लेकीचं नाव बालीच्या आत्येच्या नावावर “गुणाबाई” ठेवण्यात आलं आणि पुढे सगळी जमीन आणि घर तिच्या नावानं झालं.
..Mast story dada 😮
वाचणाऱ्याला गोष्ट आवडली यात लेखकाचं यश आहे.