अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे
ऑफिस सुटलं. घाई गडबडीने पार्किंग मधून गाडी काढली. साधारण पाऊणे सात वाजले असतील. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या ऑफिसातली मंडळी घरी जाण्याच्या ओढीने निघाली. कॅम्पस मधून बाहेर निघतांना रस्त्याच्या एका कडेवरून दुसरीकडे जाणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच! दोन्ही कडून ये-जा करणाऱ्या दुचाक्या-चारचाक्यांची वर्दळ!
अश्याच गाड्या थांबल्या असतांना एक हाडकुळी, पोटाचं खप्पड झालेली, गरीब बापडी म्हातारी ‘काही तरी खायला द्या हो, या म्हातारीला! न बोलताच ती हातवारे करून विनवण्या करीत होती. मोटार सायकल वर असणाऱ्यांना काटक्या हातांनी स्पर्श करून, ‘देव तुझं भलं करो, बाबा काही मदत कर’ अश्या आशयाने बघत होती. ऑफिसात कामाचे टेन्शन्स, बॉस ची कटकट आणि क्लायंट्सने केलेलं डोक्याचं भरीत अश्या मनस्थितीत असणारे आम्ही सुशिक्षित पांढरपेशे मध्यमवर्गीय कसले तिला दाद देतोय? घरी जाऊन कधी एकदा आपल्या बायकामुलांसोबत बोलू किंवा सोफ्यावर बसून बायकोने घरी येताच मोठ्या लाडाने तयार केलेला गरम चहा बिस्किटं खात टीव्ही वरच्या बातम्या किंवा क्रिकेट चा सामना बघू दे असं आम्हाला झालेलं असतं नं!
ती म्हातारी एकासमोर हात पसरून, दुसऱ्याकडे वळत होती. एव्हाना रस्त्यावर गाड्यांची फार गर्दी झाली होती. रस्ता पार करून पलीकडे जावं म्हटलं तरी ते शक्य नव्हतं. १० – १२ मिनिटं झाले असतील थांबून. कधीही सिग्नल हिरवा होईल आणि आपण गाडी पुढे रेटू याचीच आम्हाला घाई झालेली. गाड्या ऑन वरच होत्या. १०-१२ मिनिटात तसं बघितला तर न्यूट्रल वर गाड्या असल्या तरी एकत्रित पणे ३०-४० रुपयांच्या पेट्रोल चा नाश झाला असेल. थोडा वेळ आहेच तर खिशातून मोबईल काढून फेसबुक वर कुणी काय पोस्ट केलंय ते बघू दे, कुणाचा तरी कॉल आलाय तो रिसिव्ह करू दे, कुणाला तरी कॉल करू दे, किंवा उगाच चला म्हणून मोबाईलवर खेळू दे असं चाललं होतं. तसं बघितलं तर ५-१० रुपये सर्वांकडेच असतात. तेवढे पैसे एखाद्या दिवशी एखाद्या कुण्या गरीबाला दिले तर फार काही बिघडत नाही. खिशातून व पाकिटातून चिल्लर काढायला ही फार वेळ लागत नाही.
मग त्या म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचा भाव बघूनही कुणाच्या हृदयाला पाझर का फुटत नाही? आपण इतके का असंवेदनशील झालो आहोत? आज एका म्हातारीला पैसे दिले तर ती उद्या परत आपल्याला पैसे मागायला येतील असं वाटत असेल तर तसंही नसतं. आणि दररोज ५-१० रुपये अश्या एखाद्या गरिबाला दिले तरी खिसा काही फारसा रिता होत नाही.
सिग्नल हिरवा झाला. सगळ्यांनी गाड्या समोर रेटायची घाई केली. उगाच पुढल्या सिग्नल मध्ये गर्दीत आपण अडकू आणि घरी जायला उशीर नको व्हायला आणखी. म्हातारी अडकली आणि एका गाडीचा धक्का लागून खाली पडली. ‘का मधा मधात येतेस म्हातारे?’ अशी कंमेन्ट मारून आम्ही सुशिक्षित पसार झालो. नाही म्हणायला चार-चाकीतल्या एका बाईने काच खाली करून ‘चक-चक’ केलं आणि ‘आपण काही काही करू शकत नाही बाई’ या आविर्भावात गाडी समोर रेटली.
रस्ता पार केला तरी ती म्हातारी काही उठे ना. एव्हाना रस्त्याच्या दुसऱ्या कडेला पोचलेलो आम्ही आता थांबलो. खिशातून मोबईल काढून फेसबुक वर पोस्ट करू लागलो. ५-१० सेकंद होत नाहीत तोच पब्लिक खोळंबताय म्हणून गाड्यांचे भोंगे वाजायला लागले. त्या आवाजात म्हातारीच कण्हणं केव्हाचंच विरुन गेलं. ‘उठली, म्हातारी उठली!’ असं कुणीतरी म्हटलं. एक दोन माना उंचावल्या आणि म्हातारी लंगडत लंगडत जागा मिळेल तिथे बसावं असं करीत एका झाडाच्या आधारानं टेकून हात-पाय चोळीत बसली. आम्ही आमचं मुकाट बघण्याचं कर्तव्य मात्र तेवढं केलं.