अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे
लहान असताना माझ्या आजोळी चहा चिनी मातीच्या छोट्ट्याश्या कपमध्ये गाळून बशीच्या मध्यभागी ठेवून सादर केल्या जायचा. या चिनीमातीच्या चहाच्या कपांना दुसऱ्या कशाची सरच नाही. कुणी पाहुणे मंडळी वगैरे आली असली की खास ठेवणीतली कपं फडताळातून निघायची आणि त्यांच्या सोबतीला बश्या! एका मोठ्या ट्रे मध्ये चहाच्या कप-बश्या घेऊन मंडळींना वाटणं लहान मुलं-मुलींचं ठरलेलं काम असायचं. कपचं बूड बशीवरून किंचित उचलून बशीच्या किनाऱ्याला जरासं स्पर्शून ‘चुईईईईईईन्ग’ असा आवाज आला की माझं लक्ष तिकडे जायचं. पाहुणा आता कपच्या कानाला पकडून कपला साधारण ३०-४५ अंशाच्या कोनात तिरका करून बशीत कपमधला अक्खा चहा ओतायचा. पांढरी सफेद बशी त्या कथिया रंगाच्या द्रावणाने अगदी ओतप्रोत भरली जायची. कमाल म्हणजे अशी काठोकाठ भरलेली बशीत घडी घातलेल्या पायांच्या मांडीपासून दिड-अडीच फूट ओठांपर्यंत नेणं, तेही चहाचा एक थेंबही न सांडवता, हे एक वेगळंच कौशल्य! बशीतल्या गरम चहावरून पाच सहा वेळी फुंकर मारली की बशीच्या काठाला ओठ लावून भुरक्या मारत मारत चहा प्यायला या मंडळींना काय मजा यायची हे तीच सांगू शकतील. आता कप बशीत सादर केलेला चहा सहसा पाहायला मिळत नाही. पुढे पुढे चिनीमातीच्या बारीक कानाच्या कपांची फॅशन गेली आणि स्टेनलेस स्टीलची कपं आलीत. धुणीभांडी करतांना चिनीमातीच्या कप-बश्या फुटायच्या. मग अक्ख्या सेटमधले चार-पाच कपांचे कान तुटले किंवा कपचे काठ तडकले की नेहमीच्या वापरात अश्या कपांची नेमणूक व्हायची. त्या मानाने स्टेनलेस स्टीलचे कप्स दीर्घायु आणि स्टेनलेस स्टीलच्या बश्या तयारच होत नसल्याने म्हणा, फडताळात ठेवलेल्या कपबश्या इतिहासात जमा व्हायला लागल्या.
स्टीलचे कप्स आधुनिक असण्याचे प्रमाण व्हायला लागले आणि बश्यांतून चहा फुंकून फुंकून भुरके मारीत मारीत पिणे मागासलेपणाचे लक्षण ठरायला लागले तेव्हापासून बश्या ट्रे मधून हद्दपार व्हायला लागल्या. स्टीलच्या कपच्या बारीक कडीच्या कानाला अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत पकडून हवं असल्यास मध्यमेने ४५-६० अंशाच्या कोनात कपला आधार देऊन कपने चहा पिणे असलं काहीसं शास्त्र असतं मला कुणीतरी कधीतरी सांगितलं होतं. कधी-मधी मला हे आठवलं की मी असं काही आढळतं का याचा शोध घेत असतो. चहा पिऊन होतं आलं की कपमध्ये तळात जरा तरी चहा ठेवावा. आता मला सांगा, तळाच्या गळासह चहा घटाघटा फस्त करणाऱ्या मंडळींचा जीव हळहळत नसेल का असा तळाशी मुद्दाम ठेवलेला चहा बघून!
स्वतःच्या घरी किंवा मित्रमंडळी, पाहुण्यांकडे सोडून चहाची तलफ भागवायची असल्यास टपरीशिवाय दुसरा पर्याय नाही. सुरुवातीला काचेच्या प्याल्यात मध्ये चहा मिळायचा. पारदर्शी प्याल्यातून दिसणाऱ्या रंगावरून कडकपणा, वाफेवरून ताजेपणा आणि दरवळणाऱ्या सुगंधावरून चहाच्या दर्जाची पारख केली जाऊ शकते. कॉलेज कँटीन किंवा टपरीवर मित्रमंडळींसोबत अश्या ग्लासच्या प्यालांतून प्यायलेल्या चहाच्या आठवणी कित्येकांनी जपलेल्या असतील. आज चार मित्र मंडळी जमली की चहा पिण्यासाठी टपरीवर गेलो की काचेच्या प्याल्याची जागा कागदी डिस्पोझेबल कप्स ने घेतली. ‘युझ अँड थ्रो’ च्या जमान्यात या कागदी कपांनी कचराच जास्ती होतो. असो!
“अहो! चहा घ्या.” म्हणत आमच्या ही ने चहा समोर सादर केला आणि माझी तंद्री भंगली. बघतो तर काय, चक्क कप-बशी मध्ये चहा!