अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे
मी सातवी किंवा आठवीत असतानाची गोष्ट आहे. इंग्रजी च्या पुस्तकात ‘ऍन फ्रॅंक ची डायरी’ असं काहीसं शीर्षक असलेला धडा होता. त्यावेळी बालविद्या किंवा नवनीत च्या गाईड्स मिळायच्या. त्यातून इंग्रजीच्या धड्यांची मराठीत भाषांतरं असायची. मी ते भाषांतर आधीच्या उन्हाळ्यातच वाचून काढलं होतं. मला पण वाटलं की आपणही डायरी लिहायची.
आज्जी कडून थोडे, आजोबांकडून थोडे, काही पणजीकडून असे थोडे थोडे पैसे जमा करून एक २०० पाणी हार्ड बाऊंड वही विकत घेतली. त्या नव्या कोऱ्या वहीचा सुगंध म्हणजे ‘वाह वाह!’ एक निळ्या शाईचा रेनॉल्ड्स ०४५ चा पेन पण विकत घेतला. दुसऱ्या रफ पेपर वर आडवे तिडवे, गोल रेघा-रेखोट्या मारून पेनाची टीप पण ‘फ्री फ्लोविंग’ करून घेतली.
पहिल्या पानावर काहीही लिहायचं नाही. दुसऱ्या पानावर टॉप मार्जिन मध्ये बरोबर मधोमध ||श्री|| लिहिलं. आता प्रश्न पडला की लिहावं काय डायरी मध्ये? भाषांतरात वाचलं तर त्यात ऍन फ्रॅंक ने लिहिलेला फार थोडा भाग होता. त्यावरून नेमकं काय लिहावं ते मला समजेच ना. शिवाय एवढं चांगलं आपल्याला नाही बुवा लिहिता येणार हे आधीच समजून चुकलं होतं. तसं तास दीड तास विचार करूनही काही सुचलं नव्हतं. बरं विचारावं कुणाला तर ते ही नाही कारण कुणाला समजलं की मी डायरी लिहितोय तर ते मी काय लिहितोय ते वाचून मला चिडवतील असं वाटायचं. मी काही डिपेस्ट सिक्रेट्स वगैरे लिहिणार नव्हतोच कारण ७ वी – ८ वी च्या पोरांचे त्या काळी काही सिक्रेट्स वगैरे नसायचे. असले तरी त्याच्या सगळ्याच मित्रांना ते माहिती असायचे. बरं, ही मित्र मंडळी घरी येऊन आग लावा-लावी नव्हते करत. तेव्हडं मात्र चांगलं! धन्यवाद मित्रांनो!
एका फार जिवलग मित्राला विचारलं की तू लिहितोस का डायरी वगैरे? त्याने नाही म्हटलं तरी मला माहिती होतं की तो ही माझ्या सारखाच उपद्व्यापी! मग मीच म्हटलं की डायरी मध्ये दिवसभरात काय काय घडलं ते लिहायचं असते. त्याचा चेहरा बघून मला अंदाज आला की आपण म्हणतो ते बरोबर असावं. त्यानेही हो ला हो म्हटलं.
घरी आलो. दुपारची वेळ होती. हा डायरी लिहायची वेळ नव्हे, रात्री लिहू असं स्वगत करत जेवण करून मस्त पैकी झोप काढली. रात्र झाली तेव्हा लिहायला बसलो. सगळ्यांचं लक्ष चुकवून पेंग येण्याआधी जे सुचलं ते लिहीत गेलो.
२-३ दिवस अगदी उत्साहाने पानं भरत गेली. आठवडा उलटला. प्रत्येक पानावरचा मजकूर थोड्याफार फरकाने सारखाच! काय तर… ‘आज सकाळी ६ ला उठलो; मग हे केलं … मग ते केलं. शाळेत गेलो, मस्त्या केल्या, वाकुल्या दाखवल्या, खोड्या काढल्या, कुणाला बदडलं, कुणीतरी मलाच बदडलं… सायंकाळी ६ वाजता क्रिकेट खेळायला गेलो. अंधार झाला तरी इंनिंग्स संपलीच नव्हती पण आज्जी, मामा ओरडतील म्हणून बॅटिंग सोडून परत आलो. आता झोप येत आहे. उद्या परत लिहेन.’
आठवडा झाला आणि एक दोन दिवस डायरी लिहिलेच नाही. गॅप पडली म्हणून थोडंसं लिहून झोप काढली. रविवार असल्याने सुट्टीच आणि मग काय विचारता? जितके दिवस सुटले तेवढ्या सगळ्या दिवसांची पानं लिहून काढली. काही सुचलं नाही तर जुनी पानं चाळायची आणि मागच्या पानावरचाच मजकूर छापायचा.
३-४ आठवडे झाले आणि डायरी लिहायचं भूत मानगुटीवरून उतरलं. पण माझ्या प्रिय मित्राने त्याच्या मामाने की दादाने दिलेली नवी कोरी डायरी दाखवली. आणि आमचा मुहूर्त काढून डायरी विकत घेण्यासाठी प्रयास सुरु झाला. परत आज्जी, आजोबा आणि पणजी ला ‘पैसे द्या’ म्हणणं, चॉकलेट-गोळ्यांमध्ये पैसे न घालवता बचत सुरु झाली. पुरेसे पैसे जमवून झक्कास डायरी घेतली आणि परत डायरी लिहिण्याचा उद्योग सुरु… आतापर्यंत अंदाज आलाच असेल की पुढे काय झालं असेल.
त्यानंतरही मध्ये मध्ये कधी कधी डायरीचे पानं लिहायचो. अंतर पडलं की आधीची पानं फाडून त्याचे चिटोरे करू दे, कधी चुलीत आग लावण्यासाठी तर कधी कागदाची विमानं, होड्या करण्यासाठी उपयोग करू दे असे कारनामे करायचो.
आता लॅपटॉप आला, स्मार्ट फोन आला, टॅब आला. कधी इंग्रजीत डायरी तर कधी मराठीत रोजनिशी लिहू लागलो. दोन तीन दिवस झाले की कधी लौकर झोप येते तर कधी कंटाळा येतो म्हणून गॅप पडते. पुढला मुहूर्त बघून ‘पेजेस फ्रॉम माय डायरी’ किंवा ‘वीकएन्ड डायरी’ अश्या काहीश्या शीर्षकाच्या फाइल्स आणि फोल्डर्स क्रिएट होतात. डायरी मात्र कधीही ४-५ पानापुढे जात नाही.