
लहानपणी नागपंचमी मोठी उत्साहात साजरी करायचो. ती आठवण आणि सहज सुचलं ते लिहून काढलंय. बघा, तुमच्याही काही आठवणी जाग्या होतात काय ते. वाचा, आणि अभिप्राय कळवा.
श्रावणातला पहिला सण… नागपंचमी
लहानपणी शाळेला सुट्टी असायची. आदल्या सायंकाळी यथेच्छ खेळून रात्री गाढ निजलेला मी ताजातवाना होऊन सकाळी न्हाऊन देवापुढे उदबत्ती लावून प्रार्थना म्हणायचो. बाहेर भूर भूर पाऊस तर कधी सकाळची कोवळी सोनेरी उन्ह.
घराजवळ वारूळ असायचं. उधळ्या-मुंग्याचं असलं तरी सापाचं समजून घ्यायचं आणि हळद-कुंकुम-फुलं वाहून बाया-माणसं पूजा करायची. आपण आपलं झालं की बाजूला मजा बघत उभं रहायचं. ओल्या नारळाचा, चिरंजी किंवा साखर दाण्यांचा प्रसाद देईल त्याच्या कडून घ्यायचा आणि अर्ध पोट भरेपर्यंत खायचा. घरी जाऊन नाश्त्याची गरजच नसायची.
कधी गारुडी येऊन पुंगी वाजवायचा. टोपलीतला दात पाडलेला नाग किंवा एखादा साप डोलायचा. बिचाऱ्याची कीव आली तरी लहान म्हणून काहीच करू शकायचो नाही. त्या त्रस्त सर्पाला बाया हळदी कुंकू वहायच्या. दूध पाजायला म्हणून वाटी ठेवायच्या. त्या सर्पाला त्रास झाला तरी तो बापडा सांगायचा तरी कुणाला? तसं बघता मुंग्या, उधळ्या, कीटक वगैरेंसाठी साखर, पुरण वगैरेचा प्रसाद ठेवून जीवसंवर्धनाचा उपदेश आणि पायंडा घालावा म्हणूनही ही प्रथा सुरु झाली असावी.
नाग किंवा साप धनाचे रक्षण करतो म्हणे.
मुख्यत्वे लोकं शेती करत तेव्हा शेत म्हणजेच त्यांचे धन. उंदिर वगैरे धान्याची, मातीची नासधूस करत आणि साप-नाग त्यांची शिकार करून शेतीची रक्षा करत म्हणून त्यांना संपत्ती-धनाचे रक्षणकर्ते समजल्या जाऊ लागलं.
जुन्या काळी लोकं पैसा-अडका, नाणी-दागिणे जमिनीत पुरून किंवा भिंतीत चिणून ठेवत. कारण काय? तर लुटारू-चोरांनी नेऊ नये म्हणून. कालांतराने ज्याने पुरले त्यालाही आठवण नसे आणि भेगा-भोकातून एखादा साप त्या ठिकाणी वस्ती करून राहत असे. क्वचित त्याची पिल्लेही तिथेच वाढीत. एखाद वेळी अशी संपत्ती सापडली आणि साप दिसला तर साप धनाचे रक्षण करतो अशी समजूत आणखी पक्की व्हायची. मग कधी कधी घरातल्या किंवा नातेवाईक म्हाताऱ्या सापा-नागाच्या गोष्टी सांगून उगाचच आम्हाला टरकवयाच्या. त्यांच्या साठी ती गंम्मत असली तरी आम्हाला दरदरून घाम फुटायचा. पुढे आम्ही ह्या गोष्टी मित्र-मैत्रिणींना सांगायचो आणि फुशारक्या मारायचो.
घरी करंज्या, पापड्या, पुरणपोळी वगैरे पदार्थ बनवल्या जायचे. सकाळी पूजा करून प्रसाद म्हणून देवासमोर, नागच्या तांब्या-पितळ्याच्या मूर्ती समोर ठेवल्या जायचा. कधी आजी बनवेल त्या पदार्थाची चव घेणं हे माझंच काम असायचं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कागदावर लहानपणी नागाचं चित्र काढून त्याला रंग देणं हे काम माझं असायचं. त्याची पाच पिल्लं ही काढायचो. कधी श्री शंकराची पिंड, तर कधी वारूळ, हिरवाळीवर डोलारा काढून बसलेला नाग, तर कधी रंगबेरंगी नाग काढायचो. कल्पनेत येईल तशी चित्र काढायचो.
ती मजा आजच्या शहरी, विभक्त कुटुंबात असणाऱ्या मुला-मुलींना नाही अनुभवता येणार कदाचित. आमच्या घरी मात्र आपला सण जमेल तसा साजरा करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. संस्कृती जपण्यासाठी आपणच प्रयत्न करणं अपेक्षित आहे, नाही का?
पोस्ट टाकण्यात जरा उशीर झाला असला तरी अखेरीस, अखिल सामान्य जणांस, कृषक समाजास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!