अंदाजे वाचन वेळ : २ मिनिटे
सासरी गेलो की पाहुणचार होतो. असाच एकदा सासरी गेलो होतो. पंक्तीत बसलो. वाढणं सुरू झाली. जेवण मस्तंच बनलं होतं. सुग्रास जेवण मिळालं की करणाऱ्या हातांची स्तुती झालीच पाहिजे. “मस्त झालं आहे जेवण. भाजी तर आहाहा.” असं म्हणून थाळीतला एक एक पदार्थ कसा छान, चविष्ट बनला आहे त्याबद्दल मी स्तुती सुरू केली. सगळं झालं. सासरेबुवा म्हणाले, “जावई बाप्पू, तुमच्या “ही” नेच बनवला आहे स्वयंपाक.”
आता सासरी गेलं की आमच्या ‘ही’ ला सैपाकातून आराम असा माझा समज. मला वाटलं सासूबाईंनी बनवला असेल स्वयंपाक, लेक माहेरवाशीण म्हणून आलेली म्हणून. झाला ना घोळ. ती वेळ निघून गेली. हिने ही काही म्हटलं नाही किंवा हिच्या कानापर्यंत गोष्ट गेलीच नसावी.
काल रात्री जेवतांना “येऊ कशी कशी मी नांदायला” बघत होतो. आपल्याला आवडतात त्या सिरियली कधी बघायला नाही मिळत आणि हिच्या आवडीच्या सिरियली मारून मुटकून बघायला लागतात. असो. तर सिरियलितला ओम पुराण पोळीचा एक घास खातो आणि म्हणतो, “स्विटू ने बनवली आहे नं पुरणपोळी!?” स्विटूची आई विचार करते की “एकाच घासात याने बरोब्बर ओळखलं की पुरणपोळी स्विटूनेच केलेली आहे.”
झालं! बेडा गर्क!
ही : “बघा. त्याने कसा एका घासात ओळखली स्विटू ने बनवलेले पुरण पोळी. आणि तुम्ही बघा. लग्न होऊन पाच वर्षं झालीत. मागे माहेरी गेलो होतो तेव्हा खास तुमच्यासाठी मी सैपाक घरात आई नको नको म्हणत असतानाही खमंग सुग्रास पंच पक्वान्न तयार केले. पाच वर्षं माझ्या हातचं खाऊनही तुम्हाला माझ्या हाताची चव कळत नाही. धन्य हो धनी!” असं म्हणत हिने हात जोडले हो.
मला वाटलं आपली ही किती मनोभावे नवऱ्यासाठी स्वयंपाक बनवते. ते बघून मला गहिवरून आलं. मी ही मग भोळा सांब बनून हात वर करून आशीर्वाद दिला. हे बघून ती फुगून बसली ते आत्तापर्यंत!
बायकांचं ना बुवा काही समजतच नाही. वरतून अश्या सिरियली बघून नं ह्यांच्या अपेक्षा फारच उच्च कोटित जाऊन बसतात. अशा वेळी आमच्या सारख्या सध्या सरळ बुवांनी काय करावं?