अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे
फिजेट स्पिनर म्हणून काही एक खेळणं आहे. बरेच दिवस कुणी न कुणी त्याबद्दल बोलत असायचं आणि मी वेंधळ्यासारखं “बरं बरं”, “हो काय…छान” असं काही बाही बोलून आपलं अज्ञान लपवून ठेवायचं असंच धोरण अवलंबलं होतं .
हे प्रकरण नेमकं काय आहे म्हणून गूगल केलं, तेव्हा कळलं की त्यात रॉकेट सायन्स असं काही नाहीये. मध्ये बॉल बेअरिंग असलेलं पॅड आणि त्याला जोडून दोन किंवा तीन छोटे वर्तुलाकार चकत्या. मध्यात पकडून किंवा टेबल वर ठेवून चकत्या फिरवायच्या आणि त्या फिरतांना बघायच्या. असं केल्याने म्हणे स्ट्रेस रिलिव्ह होतो, अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टटीव्हिटी डिसऑर्डर असणाऱ्यांनाही मन एकाग्र करायला मदत होते.
महिन्याभरापूर्वी आमच्या हिला सोबत घेऊन फिरायला गेलो होतो तेव्हा एका पाचवी सहावीच्या पोरानं साडे तिनशे ला एक असे तीन स्पिनर्स विकत घेतले. आमच्या काळी रोज एक चॉकलेट या हिशोबानुसार साडे तिनशे रुपयांमध्ये साडे तिनशे दिवसांचा कोटा पूर्ण व्हायचा. “पैसे दे… पैसे दे” असं सततचं गाऱ्हाणं आजीकडे लावल्यावर कुठे एखादा रुपया हातावर मिळायचा. त्यात किती तो आनंद!
असो, आमच्या वेळी नव्हते आमचे असले लाड असं मनातल्या मनात पुटपुटत आम्ही निघालो समोर… आपल्याला काय? आपले थोडीच पैसे जात आहेत. मनातलं लहान पोर मात्र अजूनही त्या फिजेट स्पिनर मधेच अडकून होतं. बिचारं रडवेलं मन. नाही म्हणायला खिशातून काढले असते साडे तिनशे आणि घेतलं असतं एखादं स्पिनर तर खिशाला काही चोट नव्हती फारशी पडली. पण एक तर मध्यमवर्गीय बाणा आणि सोबत बायको. “काहीही घेता का हो? अजूनही लहान आहेत का ? जास्त पैसे आले असतील तर द्या मला साडी घेऊन.” असं काहीसं बोलत, टोमणे ऐकवत घरापर्यंतचा माझा प्रवास असह्य कटकटीने भरून गेला असता. घरी आल्यावरही माझी सुटका झाली नसतीच म्हणा!
आज हिम्मत करून आणलं बुवा एक स्पिनर, शंभर रुपयात फक्त. घरात पोचताच हळूच फिजेट स्पिनर पिशवीतून काढून खिशात ठेवलं. बायकोला म्हणालो “हे बघ, सहज गम्मत म्हणून घेतलं. फक्त शंभरीला गं. छान आहे नं” असं म्हणत, एक डोळा मिचकावत बायको कडे बघितलं. आता पुढे काय होणार म्हणून काय विचारता राव? मारला ना तिने स्वतःच्या कप्पाळावर हात. “लहानांहूनही लहान आहेत हो तुम्ही. मला दिले असते शंभर रुपये तर आठवडाभराची भाजी झाली असती नं”, इति आमची ही.
आणखी शब्दाला शब्द नको म्हणून मी गप्प बसलो. बायकोला करू देत भुणभुण जरा वेळ, होईल शांत. असे विचार करत मी आराम खुर्चीत विसावलो. तर कसलं काय, दिड तास उलटला तरी बाई काही शांत होई ना. कटकट…कटकट…कटकट. स्ट्रेसच आला मला. मला आठवलं की फिजेट स्पिनर स्ट्रेस कमी करतो. सहज म्हणून मी त्या खेळण्याला उलथा पालथा करू लागलो. जरा फिरवला टेबल वर. लहान असतांना सूत गुंडाळून भोवरा फिरवायचा तसंच काहीसं होतं ते. जसा जसा मी त्या स्पिनरशी खेळायला लागलो तसा तसा आणखी मी रमायला लागलो. तसं बघता त्या संमोहनाच्या प्रयोगात ती आत आत फिरून डोळ्यांना चक्रावणारी चकती आणि या स्पिनर मध्ये फार फरक नाही. नाही नाही म्हणता तब्बल अर्धा तास गुंग होऊन मी खेळात होतो. उगाच त्या स्पिनर ला कधी अंगठ्यावर, तर कधी तर्जनीवर फिरवलं. अचानक मनात विचार चमकून गेला. महाभारत काळी श्रीकृष्णाने तर्जनीवर सुदर्शन फिरवलं होतं. त्याकाळचे सुदर्शन चक्र फिजेट स्पिनर असावं का?
“अहो, स्वप्न नगरी के महाशय. जेवण करून घ्या. काय तर ते काही बाही खेळणी घेऊन येत कुणा कुणाचं बघून”, असं म्हणत आमच्या ह्या आल्या हाक मारत.
स्वप्नाच्या आकाशातून मी खाली उतरलो. पोटात कावळे तसेही काव काव करत होतेच. थाळी मांडलेलीच होती. ताटात लोणचं घ्यावं म्हणून उठलो, आमची बयो कुठेय बघावं म्हटलं तर हिने अवतार धारण केलेला, एक हात कटीवरी, दुसऱ्या हाताच्या तर्जनीवर स्पिनर लीलया पेलत. दाराआड मी गालातल्या गालात हसत.
“आता उद्याच आणखी एक स्पिनर आणा हो. छान आहे बाई हे खेळणं”, आमच्या ह्या.
क्षणातच माझा सगळा स्ट्रेसच रिलीज झाला.