अंदाजे वाचन वेळ : १ मिनिट
पूरात दगड्याने दिवस – रात्र काबाडकष्ट करून बांधलेली झोपडी वाहून गेली. त्या झोपडीत त्याच्या बायको, धोंडीनं एक एक रुपया जमवून अडीअडचणीला कामात येतील म्हणून दगड्याच्या नकळत लपवलेली पिशवी सुद्धा वाहून गेली.
पूर ओसरणाऱ्या नदीच्या काठी बसून दोघंही स्वतःच्या कमनशिबी आयुष्याला दोष देत बसली होती. होतं नव्हतं सगळं गेलं आणि राब राब राबून निरक्षर कफल्लांच्या आयुष्यात दारिद्रय ठरलेलं. दोघांनी एकमेकांकडे हताश नजरेने बघितलं आणि जीव देण्याची हिंमत नव्हती म्हणून गावाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. धोंडीचा पाय कशात तरी अडखळला. पडता पडता दगड्याने तिला सावरलं. खाली बघतो तर धोंडीच्या पायाशी एक गाठोडे!
उत्सुकतेपोटी धोंडीने गाठोडे उघडले. त्यातल्या लुगड्या-पातळात कुण्या बयेचे दाग-दागिणे आणि कापडांत गुंडाळलेलं नोटांचं बंडल तिच्या हाती लागलं. या गाठोड्याचा मालक-मालकीण आता ती दोघीच होती. हातातल्या गाठोड्यातल्या श्रीमंती कडे दोघांनी मोठ्या आशेने पाहिले.