अंदाजे वाचन वेळ : १० मिनिटे
पोस्ट ग्रॅड्युएट असलेली अनघा स्वतःचं शिक्षण संसारगाड्यात भरडेल म्हणून लग्न करायला तयार नव्हती. पण कितीही नाही म्हंटलं तरी मुलीचं लग्न होऊन ती सुखाच्या संसारात वागावी अश्या तिच्या आई-वडिलांच्या इच्छेलाही ती नकार देऊ शकत नव्हती. अनुबंधच्या रूपाने तिला सावरून घेणारा जोडीदार मिळाला. पूढे अथर्वचा जन्मही लौकरच झाला.
जरा कुठे दोघांच्या सहजीवनाला स्थिरता येऊ लागली होती पण पुण्यासारख्या मोठ्या शहरात एकट्या अनुबंधाच्या तुटपुंज्या महिना रु. ३० हजारात किती भागणार? स्वतः पुढाकार घेऊन, अनुबंधच्या साथीने तिने एक छोटासा व्यावसायिक कोर्स शनिवार-रविवारचे क्लासेस लावून पूर्ण केला. शनिवार-रविवार अनुबंधच्या ऑफिसला सुट्टी म्हणून त्याने अथर्वला दोन पूर्ण दिवस सांभाळायचे आणि हिने मन लावून शिकायचं. असं करत करत तिने कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि नोकरीसाठी मुलाखती देणं सुरु केलं. लौकरच तिलाही नोकरी मिळाली खरी पण अथर्वचा सांभाळ कसा होईल या विवंचनेत दोघेही पडले. तीन वर्षाच्या अथर्वला दुसरा कसलाही पर्याय नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून डे-केअर मध्ये ठेवावं लागत होतं.
खिशात मिळालेलं इन्सेन्टिव्ह ओसंडून वाहत होतं. बायको आणि मुलाला हवं ते गिफ्ट घेऊन देण्याचं अनुबंधचं स्वप्न पूर्ण करणं त्याला आज शक्य होतं. हाफ डे टाकून त्याने अनघाला तिच्या ऑफिसमधून पिक केलं आणि ती दोघं थेट डे-केअरला पोचली. बऱ्याच दिवसांनंतर दोघांनाही फावला वेळ मिळाला होता. तीन वर्षाच्या अथर्वला घेऊन दोघंही फिनिक्स मॉल मध्ये फिरायला जाणार होती.
दुपारपासून ती तिघं फिर फिर फिरली. फिनिक्स मॉलच्या फूड कोर्टमध्ये जंक फूड ऑर्डर केल्या गेलं. अथर्वने पहिल्यांदाच फ्रेंच फ्राईज खाल्लीत आणि नारंगी रंगाचं कोल्ड ड्रिंक प्यायलं. त्याच्यासाठी तो पहिलाच अनुभव होता. रोज-रोजच्या वरण-भात आणि भाजी पोळी च्या जेवणात बदल. पहिल्यांदाच निराळी चव चाखायला मिळाली होती. त्याच्या गोंडस चेहऱ्यावरच्या आनंदाचे बालसुलभ हावभाव बघून दोघंही हरखून गेली. फोम च्या भिंतींनी बांधलेल्या आणि सॉफ्ट बॉल्स ने भरलेल्या किड्स अरेना मध्ये उड्या मारू दे, छोट्या घसरगुंडीवरून घसरू दे, टेड्डीज आणि बन्नीज सोबत मस्त करू दे अश्या कित्येक खेळांत गुंग होऊन खेळून दमल्यावर तो तिथेच झोपी गेला. अनुबंध आणि अनघा त्याला घेऊन बऱ्याच उशिरा रात्री घरी पोचले.
दरवाजा उघडून ते घरात शिरले. अनुबंधच्या डाव्या खांद्यावर मान टेकवून चोचीसारखं तोंडाचा चंबू करून अथर्व निजला होता. बेडरूममधल्या बिछान्यावर अलगद अथर्वाला ठेवून हळुवार त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फेरत अनुबंध त्याला हलके हलके थोपटत पहुडला. आज त्याच्या मुलाच्या बाललीला यथेच्छ बघण्याचं आणि कौतुक करण्याचं समाधान त्याला आज अनुभवता आलं होतं. पहुडल्या पहुडल्याच झोप केव्हा लागली त्याला कळलंच नाही.
अनघा तिचं सावरणं, फ्रेश होणं आटोपून बेडरूम मध्ये आली. अनुबंध गाढ निद्राधीन झाला होता. ती ही दमली होती. रोज रोज च्या दिनक्रमातून आज जरा वेळ सुटका झाली होती. दिवसाचा शेवट कुटुंबासोबत क्वालिटी टाईम व्यतीत करण्यात गेल्याचं तिलाही समाधान लाभलं होतं. निरागस बालकासारखा चेहरा करून निजलेल्या अनुबंध कडे बघून तिला गालातल्या गालात हसू आलं. बेडरूम चा ट्यूबलाईट मालवून तिने मंद प्रकाशाचा नाईट लॅम्प सुरु केला आणि गॅलरीत जरा वेळ गार हवा अंगावर झेलावा म्हणून रेलिंग ला टेकून उभी राहिली. समोरच्या इमारतीतले काही लाईट्स तेव्हढे सुरु होते बाकी सगळीकडे अंधाराचं साम्राज्य. मनातल्या मनात मॉलमधल्या गमतीजमती घोळवत, आनंदाच्या आणि समाधानाच्या क्षणांना पुनःश्च उजाळा देत कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. रातकिड्यांच्या किर्रर्र किर्रर्र संगीतात मधातच कुठून तरी “में… में” आवाज साथ देत होता. डोळ्यांत पेंग आली आणि गॅलरी बंद करून ती बिछान्यावर पहुडली ती समाधानाचं स्मित ओठी घेऊनच.
दिवस उजाडला. फ्रेश होऊन गॅलरीत पहाटेच्या उगवत्या सूर्याची किरणं चेहऱ्यावर झेलत अनघा एकटक समोरच्या मैदानाकडे बघत होती. मैदानात धनगरांच्या छोट्या छोट्या तीन खोपट्या थाटलेल्या होत्या. त्यांच्या अवतीभवती असंख्य मेंढ्या-बकऱ्यांचा कळप पसरला होता. घराचे ई एम आईज, गाडीचे लोनचे हफ्ते, सोसायटीचा मेंटेनन्स, दर महिन्याचा वाणसामानाचा, ऑफिस-घर ये-जा करण्याचा खर्च असे काही खर्च नसतीलच ह्यांना असा विचार करत तिने आपल्या सव्वा चारशे क्षेत्रफळात बंदिस्त केलेल्या वन बी एच के अपार्टमेंट मधल्या सेफ्टी आणि कम्फर्ट कडे बघत पुढल्या क्षणी त्या समोरच्या विमुक्त जीवनाकडे काहीश्या असूयेनेच बघितले. खुल्या मोकळ्या आकाशाच्या चादरीखाली आणि जमिनीवर अनिवार, उन्मुक्त वाढलेल्या हिरव्याकंच गवताच्या मुलायम बिछान्यावर सतत भटकणारे ही कुटुंब एव्हढ्या मोठ्या पसाऱ्यासकट निश्चित जगत आहेत आणि आपण मात्र शिकलेली, पुढारलेली लोकं पुढल्या महिन्याचा जमाखर्च कसा बसवावा या विवंचनेत खंगत आहोत.
“आणि सादर आहे, वाफाळता मसाला चहा विथ पिंच ऑफ सुंठ, खास तुझ्यासाठी सखे-साजणे” म्हणत अनुबंधाने तिच्या समोर चहाचा कप समारंभाने प्रस्तुत केला. विचाराच्या तंद्रीतून जागी होतं तिने त्याच्या कडे एक मस्तपैकी सुहास्य-वदने मूक धन्यवाद दिला.
“मी चक्कर मारून येत आहे. येणारेस का की जाऊ एकटाच?”
“जा. मी बसते जरा सकाळची उन्ह खात आणि पुढल्या मेंढरांकडे बघत… में … में…” आणि खळखळून हसली. चहाच्या पहिल्या सिपचा आस्वाद जिभेवर घोळवत “थँक्स या! फॉर द कप्पा टी…” म्हणत तिने त्याला हातानेच जा म्हंटल.
अथर्व तोवर डोळे चोळत जागी झाला आणि “मम्मा… मम्मा…” करत तिच्या पाशी पोचला. ती बसली होती त्या पफी स्टूलवर उभा राहत त्याने तिच्या गळ्यात हात टाकला आणि गालाचा मुका घेतला. समोरच्या मेंढ्यांकडे एकटक बघत त्याने तिला तुटक्या फुटक्या वाक्यांत विचारलं, “व्हॉट इज धिस मम्मा? व्हॉट इज धिस?” या वाक्यांसोबत त्याचे टपोऱ्या डोळ्यांतून व्यक्त होणारं बालसुलभ कुतूहल इवल्या इवल्या हातांच्या प्रश्नार्थक हातवाऱ्यांनी आणखीच लोभस वाटलं तिला. त्याच्या गालाचा मुका घेऊन तिने मेंढयांकडे हात दाखवत म्हंटलं, “दिज आर शिप्स. बा बा ब्लॅक शिप.”
डे केअर मध्ये सांभाळणाऱ्या मिस आणि मावश्यानी शिकवलं असेल किंवा त्याच्या वयायेव्हढ्या मुलांसोबत वावरून स्वतःच असे वाक्य शिकला होता तो. कधी कधी अश्याच नवनवीन वाक्यरचना करून त्यामुळे होणाऱ्या मुक्या-पाप्यांच्या वर्षावात स्वतःचं कौतुक करून घेण्याचं नवीन तंत्र अगदी बेमालूमपणे वापरायला शिकला होता तो. “चला पटापट… ब्रश ब्रश ब्रश युअर टिथ” म्हणत तिनं अथर्वला आत पिटाळलं.
समोरच्या मैदानातल्या कळपांची चळवळ सुरु झाली. मोठ्या मेंढ्या-बकऱ्या में…में… चा मोठ्यांदा कलकलाट केकाटायला लागल्या. तिची दृष्टी समोरच्या त्या धनगर बायांच्या हालचालीकडे गेली. त्या पिल्लांना एक-एक करून उचलून जाळीच्या कुंपणात टाकू लागल्या. त्यांची लेकरं असलेल्या मेंढ्या त्या स्त्रियांचा मागे मागे जात कुंपनाबाहेरून त्यांच्या त्यांच्या पिल्लांना हाका देत होत्या. पिल्लीही इकडून तिकडे तुडतुड करत त्यांच्या त्यांच्या पायांपाशी जाण्याचा प्रयत्न करत होती. त्या दोघांच्या मध्ये त्या बारीक जाळीचा तो अडसर अनघाला अस्वथ करू लागला.
काही माणसं काही तरी ओरडली. “श्वि ई ई … श्वि ई ई … च्क … च्क…” शिळेचा आवाज घुमवत माणसं त्या मेंढ्यांना हाकलू लागली आणि एकापाठोपाठ “में…में…” करत तो कळप मैदानाच्या भिंतींच्या फाटकासाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेतून बाहेर पडत मार्गस्थ होऊ लागला. मागे उरल्या त्या खोपट्या, बाया आणि त्यांची तान्ही लेकरं, सोबतीला मेंढ्या-बकऱ्यांची काटकुळी कोकरं.
तिला आज सुट्टी असली तरी शनिवारी अनुबंधाला ऑफिसला प्रोजेक्ट्स च्या कामासाठी जावं लागायचं. मॉर्निंग वॉक करून तो घरी येईल त्या आधी फटाफट कामं उरकून घ्यावीत म्हणून ती गॅलरीतून उठून घरात आली. घरातल्या कामाला सुट्टी ती कसली? अथर्वला खेळवत कधी नाश्त्याची तयारी करू दे तर लगेच एकाबाजूला कुकर लावू दे, तिसरीकडे अथर्वने मांडलेला पसारा आवरू दे असं करता करता दोन तास खर्ची पडले. अनुबंधाचा जेवणाचा डब्बा भरून त्याला टा-टा करून दोन क्षण फुरसतीचे मिळावे म्हणून मोबाईल हाती घेतला पण अथर्व कसला तिला काही करू देतोय.
आज डे-केअर मध्ये जाणं नाही आणि सोबतीला आई म्हंटल्यावर आपल्या निरनिराळ्या कला दाखवून तिचं अटेन्शन आपल्याकडे ओढून घेण्याचा त्याचा हट्ट सुरु झाला. “मम्मा… हे बघ. मी … मी …” करत हे ना ते कारभार करत त्याने सतत तिच्यामागे आवरा-सावरीच्या कामं लावली. खेळता खेळता धडपडणं, मग लागलं म्हणून अर्धा तास रडणं. मग भूक लागली की “हे नको ते दे”, “असं नाही तसं कर” करत सकाळभर तिच्यामागे कामं लावली. कधी लटके रागे भरत, कधी लाड करत, कधी त्रासून, कधी हसून त्याचं मन भरेपर्यंत त्याला हवं ते अटेन्शन दिलं. खेळून थकला तेव्हा आपसूकच बिन-बॅगवर जाऊन पडला आणि जांभया देत झोपी गेला. त्याला नीट बिछान्यावर लेटवलं तेव्हा कुठे तिला दम घ्यायला वेळ मिळाला.
घड्याळीच्या काट्यांकडे लक्ष गेलं तेव्हा तिला कळलं की पहाटेची कोवळी उन्ह देणारा सूर्य एव्हाना माथ्यावर येऊ लागला होता. कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकून परत ती गॅलरीत उभी झाली. समोरच्या खोपटांच्या बाजूलाच त्या तिनं कुटुंबांचा एकत्रित स्वयंपाक सुरु झाला होता. दगडाविटांच्या तात्पुरत्या बनवलेल्या चुलीतून धुराचा लोट पसरू लागला होता आणि वाऱ्यासोबत तो आजूबाजूला पसरू लागला. बाजूच्या इमारतीतल्या दोन-चार घरांतून गलेलठ्ठ आकारांची बाया-माणसं त्यांच्या त्यांच्या गॅलरीत आली. त्या धुराकडे आणि मैदानातल्या खोपटांकडे हात दाखवत कसली तरी बडबड करत परत घरात निघून गेली.
अनघाचं लक्ष त्या जाळीच्या कुंपणात कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत निजू घातलेल्या कोकरांकडे होतं. बिचारी पिल्लं असतील महिना-दोन महिन्यांची. आईच्या मागे मागे फिरत, दुधासाठी ठोसे मारत, बागडत राहण्याच्या दिवसांत त्यांना इथे कोंडून ठेवलं गेलंय. त्या धनगरांचंही बरोबरच आहे म्हणा, कुठे बागडता बागडात ही पिल्लं हरवली तर? त्या मोठ्या मेंढयांना पोटं आहेत ती ही भरायची आणि या तान्ह्या कोकरांना दिवसभर फक्त दूध प्यायचं असतं. मधामधात अडथळे आणणाऱ्या या कोकरांना बायांच्या हवाली करत मोठ्या मेंढयांना चरायला नेणं म्हणजे सांभाळायचा व्याप जरा कमी.
इकडे स्वतःच्या तान्हयांना सांभाळत, कोकरांशी खेळू देत या बायांची जबाबदारीही मोठी. आज जरा मोकळ्या मैदानात आहोत म्हणून बरं पण कुठल्या जंगलात किंवा माळरानात बस्तान बांधलं असतं तर कोकरं कोल्ह्या-चोरांनी पळविण्याची भीती जास्त. त्यांना सोडून कुठंही जात येत नाही. लहानाची बऱ्यापैकी मोठी झाली की समज येते तेव्हा असली जराशी मोठी झालेली पिल्लं मग कळपाबरोबर जाऊ शकतात. त्यांच्यावर नजर ठेवणं बऱ्यापैकी शक्य असतं.
वॉशिंग मशीनच्या बझरचा आवाज आला आणि अनघाची तंद्री तुटली. तिने कपडे काढून वाळवायला टाकली. स्वयंपाक झालाच होता. जरासं गरम करून तिनं जेवण आटोपलं आणि वेळ काढावा म्हणून कधी मोबाईल बघू देत, कधी गेल्या आठवड्यापासून टेबलावर पडलेलं वाचायला हाती घेतेलेलं पण दहा-बारा पानांपुढे वाचल्या न गेलेलं पुस्तक चाळू देत असं करत करत ती अथर्व जवळ बसली. त्याच्या गोंडस एंजलिक चेहऱ्याकडे बघत त्याला कुशीत घेऊन कुरवाळू लागली. “एंजल व्हेन अस्लिप, डेव्हिल व्हेन अवेक”. त्याच्या खोड्यांनी त्रस्त होण्यासाठी तिला आठवड्यातली फक्त शनिवार-रविवार एव्हढी दोनच दिवस मिळत होती. त्याच्या सोबत घालवायला मिळणारे हे दोनच दिवस तिच्या आयुष्यातल्या रोजच्या घड्याळीच्या मिनिट आणि तासकाट्यांच्या टिक टिक वर श्रमवणाऱ्या जीवनातले ओऍसिस होते. या दोन दिवसांची ती चातकाप्रमाणे वाट बघत बसायची, प्रत्येक आठवड्याला…
वर्किंग डेजना घाई-गडबडीत तयारी करून सकाळी अथर्व आणि अनघाला स्कुटरवरून अनुबंध पहिले डे-केअर मध्ये नि मग तिच्या ऑफिसपर्यंत सोडून त्याच्या ऑफिसला जायचा. सकाळी ही धावपळ, दिवसभर ९ तासांची शिफ्ट आणि सायंकाळी घरी परतीचा प्रवास एव्हढ्या दिनक्रमात ती दोघं गुरफटली होती. त्यात लहानग्या अथर्वकडे लक्ष देता येत नाही म्हणून हिची होणारी भावनिक तडफड, रोज ९ तास काम करूनही पुरून जमा होईल एव्हढा पगार न मिळणं आणि त्यामुळे होणारी चिडचिड सांभाळत मानसिक विस्फोट न होऊ देता स्मितहास्याने दोघंही संसार करत होती. त्याशिवाय पर्याय तरी काय तो दुसरा? अस्वस्थ – कासावीस करणाऱ्या विचारचक्रात हरवलेल्या अनाघाचाही डोळा लागला.
दरवाज्याची बेल वाजली आणि अथर्व ची झोपमोड झाली म्हणून त्याने चिरक्या आवाजाचा सूर लावला. त्या बेलच्या आवाजापेक्षा ह्या सुरानेच तीही जागी झाली. अनुबंध घरी आला म्हणजे सायंकाळचे ७.३० वाजले की काय? छे! पाच वाजलेत. तिने अथर्वला कडे वर घेऊन दरवाजा उघडला. पायातले जोडे काढत अनुबंधाने बॅग तिच्या हाती देत घरी प्रवेश केला. अथर्वसाठी आणलेली चॉकलेट बार समोर धरत त्याने त्याला तिच्या कडून घेतले आणि बाप लेक दोघे एकमेकांशी बडबडगप्पा करण्यात गुंग झाले. हातातली बॅग टेबलावर ठेवून तिने त्या दोघांकडे एक कटाक्ष टाकला. बाप आला की लेकरू त्याच्याशी खेळण्याच्या नादात तिला विसरून जायचा. आतापर्यंत केलेला लाड गेला वाया. लब्बाड! अनुबंधला तर तिच्यापेक्षाही कमी वेळ मिळायचा अर्थवाचे लाड करायला. हे स्वतःच उमगल्याने ती ओशाळली.
चेहऱ्यावर पाणी मारून ती फ्रेश झाली आणि अनघा बेडरूममध्ये बिछाना नीट करायला गेली. तिकडे त्या बाप लेकांना घालवू दे वेळ हवा तेव्हढा. आपसूकच तिची नजर गॅलरीतून मैदानाकडे गेली. त्या जाळीच्या कुंपणातल्या कोकरांना कसली तरी आस, ओढ लागलेली होती. अस्वस्थपणे अस्फुट आवाजात “में में …” करत ती त्यांच्या मायांना साद घालत होती.
सुरुवातीला क्षीण ऐकू येणारा गोंगाटाचा “में में …” आवाज मैदानाच्या मोकळ्या फाटकातून प्रवेशणाऱ्या मेंढ्या-बकऱ्यांच्या कळपाने क्षणोक्षणी ठळक होत गेला. त्या जाळीच्या कुंपणाची फाटकं मोकळी करण्यात आली. दुडूदुडू धावत, टुणटुण वेड्या वाकड्या उड्या मारत लहानगी कोकरं त्यांच्या त्यांच्या मायांना त्या विशाल कळपात शोधू लागली. अनावर ओढीने कोकरांची त्यांच्या मायांशी भेट होताच इवली इवली शेपटं हलवत त्यांच्या अवती भवती पिंगा घालत त्यांच्या वक्षांना ठोसे मारत दुग्धप्राशन करू लागली.
डे-केअर मध्ये अथर्वला सायंकाळी रिसिव्ह करतांना तो ही असाच दुडूदुडू धावत आपल्या भोवती पिंगा घालतो. ९-१० तास दुरावलेल्या त्या दोघांच्या जीवांचं दिवसाअखेर मिलन होतं. तिचं कोकरू, तिचा अथर्व! भावनिक अनिवारता बंध तोडून मोकळी झाली होती. सकाळपासून अस्वस्थ-कासावीस झालेल्या अनघाच्या डोळ्यांतून सुखाश्रु ओघळू लागले.
एव्हाना अनुबंध आणि अथर्व दोघंही गॅलरीत आली आणि त्यांच्या नकळत तिने डोळे पुसले.
“बा … बा … ब्लॅक शीप, हैव यु एनी वुल?” अथर्व चित्काराला. अनघा आणि अनुबंधानेही सूरात सूर मिसळून दिला. गप्पा-गोष्टींना ऊत आला. गालावर हसू आणि चेहऱ्यावर आनंद याशिवाय जीवनात काय हवं? त्यांच्या आवाजात मेंढ्या आणि कोकरांचा “में में …” चा आवाजही मिसळून गेला होता.