
(अंदाजे वाचन वेळ : ३० मिनिटे)
तो सहाव्या मजल्यावर पोचला. तो दाराबाहेर उभा होता. पाठीवरची बॅग त्याने उतरवली. दीर्घ श्वास घेतला. शर्ट पॅन्ट खोचली. चेहऱ्यावरुन रुमाल फिरवला आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाची लक्ख झळाळी आल्याचं त्याला जाणवलं. त्याने बेल दाबली. बॅगेतल्या त्या दिवशीच्या टारगेटचं ओझं नेहमी एव्हढं असलं तरी मानसिकदृष्ट्या ते ओझं हलकं वाटत होतं.
ऑफिसमधल्या आज सकाळच्या सेल्स मोटिव्हेशन सेशनमध्ये सगळ्या विक्रेत्या मंडळींना त्यांच्या त्यांच्या सिनिअर्सने चांगलचं चढवलं होतं. “हम होंगे कामयाब!” च्या आशावादी मंत्राने ती सगळी मंडळी भारली होती.
“सकारात्मकता, अविरत प्रयत्न आणि हसरा चेहरा ह्या त्रिसूत्रीवर सेल्स करता येतो. टारगेट अचिव्ह करता येतं.” सेल्सपर्सन्सच्या गटागटांत अशा कमीअधिक आशयाची उत्साहवर्धक चर्चा झाली होती. असे पेप टॉक्स सकाळी सकाळी ऑफिसमध्ये व्हायचे. मात्र आजचा दिवस वेगळा होता. आज विशेष इन्सेन्टिव्ह मिळणार होता. जो कुणी जुनिअर सेल्सपर्सन आजचं टारगेट पूर्ण करेन त्या खास लोकांनाच ब्रांच हेड सायंकाळी वैशालीत नेणार होता. ज्याला कुणाला काय खाण्या पिण्याचं हवं असेल त्यानं ते मागून घ्यावं. खर्चाची रक्कम ब्रांच हेड स्वतःच्या खिशातून टाकणार होता. त्याच्या कडून मिळणाऱ्या अशा खास ट्रीटची संधी सीनिअर सेल्सवाल्यांना पण क्वचितच कधी मिळायची. ब्रांच हेडने ह्या ट्रीटची घोषणा केली आणि प्रत्येक गटाच्या मुख्य सिनिअरने आपापल्या टीमला, त्यातल्या प्रत्येक सदस्याला उत्साहाची टोचणं दिली. ही संधी कशी एकमेवद्वितीय आहे ह्याची जाणीव करून दिली.
“शुक… शुक… इकडे ये.”
तो त्याच्या टीमच्या सदस्यांच्या घोळक्यात उभा होता. त्याच्या टिम लिडरनं त्याला हळूच स्वतःजवळ बोलावलं. तो घोळक्यातून निघाला आणि टिम लिडरकडे गेला. त्यानं त्याच्या कानात ह्या संधीचे फायदे सांगितले. त्याला स्वतःला अशी संधी कधीच मिळाली नव्हती असंही ठोकपणे सांगितलं. गेल्या दिड-दोन वर्षांपासून तो ह्या कंपनीत काम करत होता. दर रोजचं किमान टारगेट तो सहज साध्य करायचा. आता त्याचं ध्येय होतं, स्वतःची टिम तयार करायची. त्यांना मार्गदर्शन करायचं. त्याला टिम लिडर वरून ग्रुप टिम लिडर व्हायचं होतं. तो स्वतः फार लांबवरच्या गावातून ह्या शहरात आला होता. इथली शहरातली मुलं-मुली त्याच्या टिम मध्ये फार काळ टिकायची नाहीत. त्यांना फक्त कुठल्यातरी सेल्सचा / विक्री कौशल्याचा अनुभव मिळवायचा असायचा किंवा गरजे पुरती, मौज मजा करण्यापुरती कमाई झाली तरी ठीक होतं. दोन-तीन महिने ओळखी-पाळखीच्या परिसरांतून ती त्यांचा दर दिवशीचा सेल्स टारगेटचा वाटा भागेल एव्हढी कामं करायची आणि आलेली रक्कम खिशात टाकून पसार व्हायची. ह्या टिम लिडरला मात्र त्याच्या टिम मध्ये कामसू, त्याच्यासारखीच महत्त्वाकांक्षी मुलं हवी होती. त्याच्या गावाकडून अशी ओळखीची गरजू मुलं नोकरीच्या शोधात आली की तो त्यांना ह्या कंपनीत रुजू करून घ्यायचा.
आपल्या ओळखीचा टिम लिडर आहे. त्याने चांगल्या संधीची नोकरी देतो म्हणून सांगितलं होतं म्हणून तो मोठ्या आशेनं दोन महिन्यापूर्वी इथे आला होता. त्या टिम लिडरच्या शब्दाखातीर “हो ला हो” म्हणत ह्या कंपनीत रुजू झाला होता. त्याचं पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं. तो कुठेही त्याच्या कौशल्याला साजेशी, शिक्षणाला न्याय देईल अशी नोकरी शोधू शकला असता. गरज होती ती तेव्हढा वेळ काही नं काही करण्याची. राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी सोय होईल यासाठी धडपडण्यासाठी हाती मिळेल ती नोकरी त्याने करायचं ठरवलं होतं. तोवर राहायला जागा मिळतेय आणि आल्या आल्या नोकरी मिळतेय म्हंटल्यावर तो मागचा पुढचा विचार न करता तयार झाला होता.
तो इंग्रजी, हिंदी आणि मराठी छान बोलायचा. त्याच्या बोलण्याची छाप त्याने चांगलीच पाडली होती. ह्या टिम लिडरच्या ओळखीने नोकरी लागण्याची त्याची आशा होती. शिवाय ह्या कंपनीने राहण्याची सोय मोफत करून दिली होती. वरून हवी तशी, हवी तेव्हढी टिम वाढवून टिम लिडर, ग्रुप टिम लिडर, सेल्स मॅनेजर, ब्रांच हेड आणि समोर बढतीही मिळू शकणार होती. गरज होती ती सातत्याने, चिकाटीने काम करण्याची. सेल्स वाढवण्याची. कंपनीसाठी रेव्हेन्यू आणण्याची. त्याच्या सारख्या चुणचुणीत मुलाला हे सहज शक्य असल्याचं ब्रांच हेडनं मुलाखतीतच सांगितलं होतं. त्याच्यातलं पोटेन्शिअल ओळखलं होतं.
काम तसं सोपं होतं. दिवसाला ४९९ रुपये किमतीच्या ४ डिक्शनऱ्या विकणं. एका विकलेल्या डिक्शनरी मागे ४० रुपये सेल्सपर्सनच्या खात्यात जमा व्हायचे. ७ डिक्शनऱ्या विकल्या की कमिशन प्रति डिक्शनरी ६० रुपये व्हायचे. १० पेक्षा जास्त विक्री झाली की प्रति डिक्शनरी १०० रुपये मिळायचे. झालेली कमाई आठवड्याच्या अंती किंवा महिन्याच्या शेवटी रिसेप्शनिस्ट कडून रोख घेणे असे दोन पर्याय होते. सहसा सगळीच मंडळी महिन्याच्या शेवटी कमाई वठवून घ्यायची. महिन्याच्या शेवटी ऑफिसमध्येच जंगी पार्टी व्हायची. कोल्डड्रींक्स आणि समोसा-वडापाव असला काही बेत असायचा.
त्या ब्रांच मध्ये फार कमी असे काही सेल्सपर्सन्स होते की जी अशी दर दिवशी हजार रुपये कमाई करू शकायचे. आता त्यांनी आपापल्या शहरात ह्या कंपनीच्या शाखा उघडल्या असल्याच्या गोष्टी अधून मधून व्हायच्या. ह्या ब्रांचचा हेडही असलाच महारथी होता म्हणे!
त्या ब्रांचच्या सगळ्या सेल्सपर्सन्सचा मुख्य मार्गदर्शक! पाच वर्षांआधी तो एक आदर्श सेल्समन होता. मेहनतीने रोज १५ -२० डिक्शनऱ्या सहज विकायचा. त्याचा जीवनात समोर जाण्याचा ध्यास, ध्येय्यासक्ती, महत्त्वाकांक्षा यामुळे केवळ पाच वर्षांतच तो ब्रांच हेड झाला होता. ते ही केरळ सारख्या दूरवरच्या राज्यातून ह्या अनोळखी शहरात येऊन! आता शहराच्या टोकाशी नवीन विलाज बांधणं सुरु होतं. तिथे त्याचा मोठा विला आहे. अंगणात त्याला आवडतं म्हणून लालभडक रंगाच्या ऐसपैस दोन मोटारी आहेत. विकेन्डसना कंपनीच्या रिजनल डायरेक्टर सोबत त्याच्या पार्ट्या होतात वगैरे वगैरे चर्चा व्हायच्या. एकंदरीत तो पाचच वर्षांत मोठा आसामी बनला होता, ते ही डिक्शनऱ्या विकून! असल्या चर्चा ऑफिसमध्ये मिटींग्स मध्ये व्हायच्या. “इफ आय कॅन डू इट, सो कॅन यू!” असा साधाच पण सकारात्मक, जोशपूर्ण संवादफेक करून त्याच्या रोजच्या ऑफिसच्या मिटींग्सचा तो समारोप घ्यायचा.
त्यानंतर प्रत्येक ग्रुप मध्ये टिम लिडर्स आणि ग्रुप लिडर्स आपापल्या चेल्यांची सेल्स पिचचा अभ्यास घ्यायचीत. कोण कुठे कमी पडतोय, कुणाला संवादांमध्ये किंवा कुण्या संभाव्य ग्राहकाने काही अडचणीचा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यावे, शहरातल्या कोणत्या भागात केव्हा विक्रीसाठी जावे, एखाद्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड असेल तर त्याला चहापाण्याला देऊन किंवा गोड बोलून कसं पटवावं, एक डिक्शनरी खपली तर आजूबाजूच्यांना कसं पाठवावं किंवा आणखी काही डिक्शनऱ्या त्यांच्या कशा गळ्यात माराव्या वगैरे वगैरे गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जायचं.
त्याला सुरुवातीचा एक महिनाभर फक्त ह्या किंवा त्या सेल्सवाल्यासोबत फिरायचं होतं. कधी ह्या लिडर बरोबर तर कधी त्या लिडर बरोबर जाऊन ती लोकं कशी विक्री करतात ते शिकायचं होतं.
गेली दोन महिने तो ह्या कंपनीतल्या वातावरणाशी, कामाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याने जन्मात कधी कसल्याच गोष्टीची विक्री केली नव्हती. त्याचा नोकरीचा हा पहिलाच अनुभव होता. शिक्षणासाठी त्याने वडिलांची कमाई बरीच खर्चली होती. आता त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली. विज्ञानाची पदवी औपचारिकरीत्या हाती मिळायला, निकाल लागायला ३-४ महिने शिल्लक होते. तोवर नोकरीचा अनुभव मिळावा म्हणून तो ह्या शहरात आला होता. ह्या टिम लिडरच्या ओळखीने त्याला नोकरी मिळाली होती. पण दर रोज विक्री करून दर रोज पैसे कमवा अशा कमिशनवाल्या नोकरीची त्याने कल्पना केली नव्हती. घरून २ महिने पुरतील एव्हढेच रुपये त्याला मिळाले होते. तोवर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं भाग होतं.
कंपनीनं राहण्याची व्यवस्था जवळच केली होती. एका मोठ्या २ बी एच के फ्लॅट मध्ये कंपनीत काम करणारी मुलं मुली एकत्रच रहायची. मुलं हॉल मध्ये आणि मुली बेडरूम मध्ये अशी व्यवस्था होती. ग्रुप टिम लिडर्स दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपायची. गाद्यांना गाद्या चिपकवून डोक्याशी सुटकेसी, पिशव्या ठेवून सगळी जुनिअर्स आणि टिम लिड्स झोपायची. दिवसभर उन्हातान्हात, पावसात डिक्शनऱ्या विकत ही सगळी सेल्सवाली मंडळी फिरायची. नाश्ता-जेवण बाहेरच टपरीवर खायची आणि बरेचदा उशिरा रात्री फ्लॅट वर पोचायची. मग थोडा वेळ टंगळमंगळ केला की झोपी जायची. बहुसंख्य मुलं-मुली दिवसभरच्या श्रमाने गादीवर जागा मिळेल तिथेच झोपी जायची. काहींच्या डोळ्यांत दारूच्या आणि गांजाच्या नशेची झिंग रहायची.
त्याच्या टिम लिडर सारखी काही होती ज्यांच्या डोळ्यात स्वप्नं होती. त्यांना त्यांच्या ग्रुप लिडर्सने, ब्रांच हेडने आणि एकंदरीत कंपनीने दाखवलेल्या मार्गावरून डोळे झाकून विश्वास ठेवून सतत प्रयत्न करणं भाग होतं. दुरवरचं गाव सोडून इथे आलेली. आईवडिलांच्या डोक्यावरून स्वतःच्या अपयशाचा भार उतरवून जिद्दीनं, स्वबळावर काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्याची प्रबळ इच्छा होती. मनात विश्वास होता की हीच नोकरी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेन. आशावाद असला की काहीही शक्य होऊ शकतं अशी मानसिकता तयार होत गेली होती. ह्या कंपनीच्या कार्यप्रणालीचा डोळे झाकून अवलंब केला तरच यश, श्रीमंती मिळणार. त्यात कुहेही कमतरता राहिली तरी यश दूर पळणार म्हणून लिडर्स दाखवतील तो मार्गच योग्य कसा आहे ह्याबद्दल मनातल्या मनात विचार घट्ट रुजवायचा. आधीचं शिक्षण विसरायचं. फक्त डोळेझाक करायची. रोज डिक्शनऱ्या विकायच्या आणि आपली टिम बनवायची. मग त्यांना सेल्सचं प्रशिक्षण द्यायचं. पुढे टिम वाढली आणि त्यांनी कमाई आणणं सुरु केलं की पदोन्नतीला गवसणी घालणं कुठे दूर? शिवाय ब्रांच हेड चा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायचा. तो जर पाच वर्षांत यशस्वी जीवन जगू शकतो तर मग आपणही यशस्वी होऊ असा आशावाद ठेवायचा. सकाळी मिटिंगमध्ये आपल्या टिमच्या सदस्यांना कसं प्रोत्साहित करायचं? कसा त्यांच्याकडून आणखी सेल्स करून घ्यायचा याचा विचार करत सुजलेल्या डोळ्यांनी झोप येईपर्यंत तो विचार करत रहायचा.
“ब्रांच हेड सारख्या मोठ्या व्यक्तीसोबत मोकळेपणानं बोलण्याची संधी, त्याच्या अनुभवातून मिळणारं ज्ञान, चांगला सेल्स करण्यासाठी काही टिप्स आणि युक्त्या या सगळ्यांसोबत इतर सेल्सपर्सन्स समोर बढाया मारण्यासाठी मिळणारं प्रयोजन, बॉसच्या नजरेत किंमत वधारणं वगैरे वगैरे अशी बरीच प्रोत्साहनं असतीलच की.” त्याच्या टिम लिडरनं त्याच्या कानात सांगितलं. “आता ऍक्शनमोड मध्ये ये. तू फक्त दाखवून दे की तू सेल करू शकतो. मी, बॉसने तुझ्यावर ठेवलेला विश्वास खरा करून दाखव. आता कसा तू अधून मधून एखादी डिक्शनरी विकतो. आणखी प्रयत्न कर. आज काहीही झालं तरी टारगेट पूर्ण करायचंच! एकदम फुल्ल कॉन्फिडन्सने पिच कर. फिल्ड मध्ये पोहचला की धडाधड पिच मारायच्या. जो दिसेल समोर त्याला पिच मार. लॉ ऑफ एव्हरेज! जितकी पिचची संख्या वाढवशील तितके जास्त चान्सेस असतील की दिवसाअखेरपर्यंत तुझं टारगेट पूर्ण होईल. एखादी डिक्शनरी कमी विकली गेली तरी मी मदत करेन तुला.”
“हो.” तो फक्त कसनुसा म्हणाला. गेल्या दोन महिनांपासून तो फक्त वणवण फिरत होता.सकाळचा नाश्ता दहा रुपयांत आटोपता घायचा. ७ रुपयांचा पोहा आणि ३ रुपयाचा चहा. ऑफिसमधून बॅग भरायचा. पाठीवरच्या बॅगमध्ये पाच डिक्शनऱ्या, एका हातात आणखी दोन डिक्शनऱ्या घेऊन सकाळी ९ पासून ला कुणा न कुणा सोबत ह्या नवख्या शहरात फिरायचा. कधी ह्या भागात तर कधी त्या वस्तीत. कधी गल्ली बोळांत तर कधी मोठाल्या सोसायटींत, कधी रस्त्यावर तर कधी कंपन्यांमध्ये. ९.३० वाजल्यापासून दुपारी ३ पर्यंत त्याच्या ग्रुप लिडर सोबत किंवा टिमच्या एखाद्या सदस्यासोबत दिसेल त्याच्या माथी डिक्शनरी मारण्याच्या प्रयत्नात तो असायचा. हलकं फुलकं काही खाल्लं की परत ६-६.३० पर्यंत परत वणवण सुरु. सायंकाळी ७-७.३० पर्यंत तो ऑफिसला परतायचा. त्याची सुरुवातीची भीड चेपली होती. तो स्वतः विक्री करायला शिकला होता खरा पण हवा तसा विक्रीतला सराईतपणा त्याला जमेना. त्याच्या कडून कधी दोन तीन डिक्शनऱ्या खपल्या तरी त्याला ऑफिसमध्ये जायला बरं वाटायचं. दररोज खप मात्र त्याच्याकडून काही होईना. कितीही प्रयत्न केला तरी. आपलं कुठेतरी कमी पडतंय असं त्याला वाटत राहायचं. ह्याच्या टिम लिडर ने, ब्रांच हेड ने दाखवलेल्या विश्वासात आपण खोटं पडतोय असं वाटत राहायचं. त्याचं अपयश इच्छाशक्तीला झाकोळू लागलं होतं. सुरुवातीचा उत्साह ढवळू लागला होता.
जस जसे दिवस जाऊ लागले तसतसं त्याला डिक्शनरीत न छापलेली पानं आढळू लागली. काही लोकांनी त्याला प्रतिबद्दल सुनावलं. हा माल कस्टमचा आहे. रिजेक्ट झालेला, नाकारलेला माल आहे. बनावटी डिक्शनऱ्या आहेत. हा सगळा प्रकारचं फ्रॉड आहे. वगैरे वगैरे. विकतोय त्या मालाबद्दल विक्रेताच समाधानी नसेल, मालावर त्याच्या विश्वासच नसेल तर त्याच्याकडून विक्रीही होत नाही. विक्रीचा आनंद मिळत नाही. फिल्डवर आलेला हा अनुभव त्याने कित्येकदा मिटींग्स मध्ये सांगितला होता पण एकूण एक सगळे लिडर्स आणि ब्रांच हेड हे सगळे “ऑब्जेक्शन्स” आहेत म्हणून पटवून द्यायचे आणि “आपलं काम फक्त सेल्स, विकणं” आहे ह्यावर विश्वास ठेवायला सांगायचे. प्रॉडक्ट चांगलचं आहे. विक्री ना होण्याचे बहाणे देणं बंद करून फक्त “विका, विका आणि विका” एव्हढाच ध्यास ठेवला की बरोबर विक्री होते हे त्या सगळ्यांचं म्हणणं असायचं.
त्याचा आत्मविश्वास मात्र डोलत होता. कधी दोन-तीन डिक्शनऱ्या विकल्या गेल्या की तो खुश व्हायचा, त्याच्या आत्मविश्वासाला उधाण यायचं. कधी एकही डिक्शनरी विकली गेली नाही की मात्र ओहोटी लागायची त्याच्या आत्मविश्वासाला. विक्री होवो न होवो, उत्साह, सकारात्मक विचार डामाडोल होऊ दिला नाही आणि परत परत प्रयत्न करत राहिलं की यश मिळतं ह्यावर विश्वास ठेवायचा. हा नेहमीचा उपदेशाचा डोस त्याचा ग्रुप लिडर आणि ब्रांच हेड पाजायचे.
आज नाही तर उद्या तरी दररोजचं टारगेट आपण पूर्ण करायला लागू ह्याचं उसनं अवसान आणून तो कामाला लागे. वरून त्यानं त्याच्या ग्रुप लिडरच्या त्याच्या वरच्या विश्वासालाही सांभाळण्याचं दडपण घेतलेलं होतं. मारून मुटकून तो दोन महिने खिशातले पैसे घालवून शहरभर बस, ऑटो, पैदल करत फिरला. होतील तेव्हढा माल विकला तरी किमान जगायला होईल येव्हढीही कमाई तो करू शकत नसे. वडिलांनी आगाऊ दिलेली रक्कम संपत आली होती. मिटींग्स मधल्या उपदेशाची मात्रा उतरली की निराश होऊन त्याच्या नोकरीच्या निवडीबद्दल विचार करत असे. पण नकोशी वाटणारी, उपकाराने मिळालेली नोकरी सोडण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. कोण जाणे उद्यापासून कसल्या चमत्काराने तो दररोज किमान टारगेट पूर्ण करू शकला, विक्रीकौशल्यात निपुणता मिळवू शकला तर यशस्वी होऊन तो आई वडिलांना आनंदाने बढाया सांगू शकणार असता. आशेच्या भरवश्यावर एका मागून एक दिवस तो काढत होता.
दुसरं मन मात्र ह्या असल्या नोकरीच्या कशी निष्पन्न होणार नसल्याचं ओरडून ओरडून सांगत होतं. नुसती खच्चराने ओझी वाहण्याची कामं ही. पोपटपंची करून सेल्स पिचची गरळ ओकायची. वेबसाईटवर, मोबाईलवर हवा त्या शब्दाचा संदर्भासकट अर्थ चिटकीसरशी मिळत असताना लोकांना डिक्शनरी विकत घेण्याची गरज वाटेनाशी झाली होती. काही निवडक लोकं घ्यायची पण ह्या व्यवसायाला पुढे भविष्य किती आणि गती ती केव्हढी? ह्याचा विचार त्याच्या डोक्यात फिरायचा. पण नकारात्मकता नको म्हणून त्या मनाच्या विचारला तो दाबून टाकायचा, उसनी आशा घेऊन. त्या “हो… नाही” च्या द्वंदात त्याला कधी झोप लागायची कळायचीच नाही. दुसरा दिवस उजाडायचा तो घाईघाईत न्हाणं करून ऑफिसमध्ये जाण्याचा घाईत. दिवसभर पळापळ करताना दुसरीकडे कुठे राहण्यासाठी जागा शोधणं किंवा दुसरी नोकरी शोधणं ह्यासाठी वेळच मिळेना! शिवाय त्याच्या टिम लिडरला मनातलं सांगून जाणंही शक्य नव्हतं. तो त्याच्या मिठ्ठास वाणीने त्याला असं काही पटवून देई की त्यातून बाहेर निघणं अशक्य होई. त्याला “ना” म्हणणं अशक्य होई. कंपनीनं राहायला दिलेली जागा फुकट होती, त्याचा खर्च ती मागत नव्हती. टारगेट पूर्ण नही झालं तरी काही बोलणी मिळत नव्हती. काढून टाकत नव्हती. “किती कमाई करायची, ज्याचं त्याने ठरवावं” म्हणत स्वात्रंत्र्य देऊ करत होती. पण ह्या सगळ्यात आपण गुरफटत जातोय. कोळ्याने केलेल्या जाळ्यात आपण अडकत जात आहोत हे कळूनही तो काहीच करू शकत नव्हता. अस्वस्थ, कासावीस होऊन तो इथे अडकला होता.
“चलो गाईज! मिटिंग के लिए चलो|” कुणीतरी आतमधून आवाज दिला.
तो आणि त्याचा टिम लिडर एकमेकांकडे खाणाखुणा करत “चला चला… ऑल द बेस्ट!” म्हणत आतमध्ये गेले. मिटिंग सुरु झाली. नेहमीप्रमाणे कुणी किती सेल केला त्याचा हिशोब झाला. आदल्या दिवशी सर्वांत जास्त विक्री केलेल्यांचं कौतुक झालं. उत्साहवर्धक पेप टॉक्स झाले. जोश आणणाऱ्या फिल्ड क्राईज झाल्या.
“जॉईन अस इन क्रिएटिंग एक्साइटमेंट, फोक्स! ज्युस… ऍड मोर ज्युस इन युअर लाईफ! सेल मोर! एन्जॉय द प्रोसेस.” ब्रांचहेडच्या भाषणाने अख्ख्या खोलीतली मंडळी जोशात “ज्युस”… “ज्युस” करून चित्कारु लागली.
मिटिंग संपली. सेल्सपर्सन्सनी आपापल्या बॅगा भरल्या. पाठीवर एक बॅग, हातात मावतील तेव्हढे सुट्या डिक्शनऱ्या घेतल्या आणि त्यांचा टोळ्यांमागून टोळ्या भराभर निघाल्या. रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या दिशांना त्या टोळ्या निघाल्या.
“आज एकदम फुल जोश मध्ये सेल्स करायचा. इतकी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लक्षात ठेव हीच वेळ आहे इंप्रेस करायची.” जाता जाता त्याच्या टिम लिडरने त्याला थांबवत म्हंटलं.
“एक गोष्ट सांगतो. गुरुकिल्ली समज. यशासाठी भूक पाहिजे. आज कमावलं नाही तर रात्री पॉट भरायला पैसे नसतील हे ध्यानात ठेवायचं. भूखे शेर जैसा शिकार करना पडता तो सक्सेस मिलता. उपाशी राहशील तर जोमाने काम करशील. टारगेट पूर्ण करायला जोम पहिले. काहीही झालं तरी सेल्स व्हायलाच पाहिजे. हवं तर जेवणाचा वेळ कमी कर, जेवूच नको. पोटात पीळ पडली की आतमधून सेल्स करण्याची ताकद येते. त्या शक्तीचा वापर कर.” त्याचा टिम लिडर हातवारे करत, चेहऱ्यावर उत्साहाचे, आत्मविश्वासपूर्ण सजीव भाव आणत म्हणाला. “सी यु इन द इव्हिनिंग! ऑल द बेस्ट!”
“येस! नक्कीच! आज करतोच मी टारगेट पूर्ण.” त्याने ही विश्वासानं आश्वासन दिलं आणि जवळच्या बस स्टॉप वर येणारी बस पकडण्यासाठी धावला.
खांद्यावर ओझं, हातात बुकं आणि मनात आशावाद घेऊन तो धापा टाकत धावत्या बस मध्ये चढला. बसमधल्या गर्दीतून वाट काढत तो समोर समोर सरकत होता. गर्दीत इतरांच्या अंगाला होणार स्पर्श कितीही टाळतो म्हंटलं तरी अटळ होता. बाया-माणसं दाटीवाटीने उभी होती. बसण्यासाठी जागा मिळणं केवळ अशक्यच होतं. उकाड्याने घामाच्या धारा निथळायला सुरुवात झाली होती. घामाचा कुबट वास नाकात शिरत होता. धक्काबुक्की सहन करत तो चुळबुळत होता. मध्येच कुणीतरी कुतूहलाने त्याच्या हातातल्या डिक्शनरी कडे बघत होतं. त्याच्या नजरेशी नजर भेटताच त्याला वाटायचं की “लोकांना उत्सुकता आहे ह्या डिक्शनरी मध्ये. आपण उगाच नकारात्मक विचार करतो अहोत.” मागच्याला त्याच्या बॅगची अडचण झाली आणि तोंडातून त्राग्याचा “पचक्क्क!” आवाज काढला. त्याने बॅग पाठीवरून उतरवली आणि समोर घेतली. त्याचा समोरच्याला त्रास झाला. तोही पुटपुटला. “कशाला उगाच ओझं वागवतोस रे. काही चांगला कामधंधा कर. ही कसली ओझे वाहण्याची कामं करतोस? दुसऱ्याला नुसता त्रास!” अनुनासिक स्वरातल्या चिडचिडीची त्याला जाणीव झाली आणि त्याने बॅग सोबत अंग चोरलं. शक्य तेव्हढा बारीक होऊन त्याने आणखी जागा करून दिली.
पुढला थांबा आला आणि हळूहळू सरकत तो बसमधून उतरला. हात आणि अंग अवघडलं होतं. हातातल्या डिक्शनऱ्या पदपथावर ठेवलेल्या बॅगवर ठेवून हात मोकळा केला. अंगाला पीळ दिला आणि परत माल उचलून त्याने सभोवताली नजर फिरवली. मुख्य रस्त्यापासून जरा अंतरावर एका गल्लीत आजूबाजूला सुखवस्तू लोकांची वस्ती होती. आज ही फिल्ड त्याच्या टारगेट पूर्ण करण्याच्या कामानेला योग्य असल्याचं त्याला जाणवलं. तिकडे त्याचे पाय वळले.
गर्दीत चुरगळलेला शर्ट पॅन्टमध्ये व्यवस्थित खोचून त्याने बेल्टचं बकल नीट लावलं. केसांतून हात फिरवून भांग केला. समोरच्या वाण्याच्या दुकानात मालकाशिवाय कुणीच नव्हतं. सेल्स पिच करायला त्याच दुकानातून त्याने सुरुवात केली. त्या व्यक्तीच्या भावनेला साद घालत त्याने पिच मध्ये बदल केला. भाषण खुलवत नेलं. हसत, प्रसन्न वदनाने त्या दुकानदाराला चांगलचं पटवलं आणि नशिबाने साथ दिली. आपण नाही पण मुलगा तरी शिकेन. डिक्शनरीचा उपयोग होईल म्हणून त्या दुकानदाराने डिक्शनरी हातोहात घेतली. त्याचा पहिला खप अनपेक्षितपणे झाला. हातात पाचशेची नोट मिळाली. त्याने खिशातून प्रामाणिकपणे एक रुपया त्या दुकानदाराला देऊ केला कारण रुपये २५०० छापील किमंत असलेल्या डिक्शनरीची सवलतीतली विक्री किंमत रुपये ४९९ म्हणून सांगितली होती. बाकी सेल्सपर्सन्स पाचशे मिळाले की एक रुपया खिशात टाकायचे. तो मात्र खिशात चिल्लर घेऊन फिरायचा. त्याचा प्रामाणिकपणा आणि तो. दुकानदाराने एक रुपयाचं नाणं गल्ल्यात टाकला आणि उद्गारला, “पैसा है, माल लेना| धंधा है, चोख करना|”
त्याला हे वाक्य फारच आवडलं. पुढे कधीतरी हे असलं वाक्य तो सेल्स पिच करतांना वापरू शकणार होता. कित्येकदा काही लोकं चेक द्यायची आणि पुढे तो वठला नाही की दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला शोधीत फिरा, त्याच्या मागे मागे करा आणि रोख रक्कम मिळावा किंवा डिक्शनरी परत घ्या. असली उद्योगं त्याच्या व्यवसायात परवडण्यासारखी नव्हती. तो ही एक-दोनदा असा फसला होता म्हणून तो चेक घेईच ना. आता कुणी चेक देऊ केला तर त्याला तो हीच पंच लाईन टाकणार होता. निव्वळ मिठ्ठासीने काम नाही भागत हे ही त्याला अनुभवाने कळलं होतं. कधी कधी व्यक्ती, परिथिती बघून विक्रीतल्या आक्षेपांचा सामना करावा लागतो.
तिथून पुढे निघून तो पुढल्या ठिकाणी वळला. कोण व्यक्ती संभाव्य ग्राहक होऊ शकतो ह्याचा अंदाज घेत, कधी नेमकं तर कधी शब्दपाल्हाळ लावत तो सेल्स पिच करू लागला. दोन तासानंतर आणखी एक डिक्शनरी विकल्या गेली. दुपार झाली होती. पोटात भुकेचे कावळे ओरडत होते पण आज तो फ्लो मध्ये होता. इतके दिवस सेल्स पिच करून, ग्राहकांचे आक्षेप समजून प्रत्युत्तरं देऊन तो हळूहळू बोलण्यात तरबेज होऊ बघत होता. आणखी दोन डिक्शनऱ्या विकल्या की टारगेट पूर्ण होईल आणि त्याच्या टिम लिडर म्हणाला तसा “भूखे पेट” राहून सायंकाळच्या जेवणाचा प्रश्न डोक्यात असेल तर चेवून काम करता येतं. तसाही कित्येकदा तो फिल्ड मध्ये असला की जेवणाच्या वेळा टळायच्या. वडा पाव, समोसा, ऊसाचा रस असं काही पोटात ढकलून परत विक्री कामाला सुरुवात करायचा. सकाळी मिळालेल्या उपदेशाने चेकाळून त्याने जेवण टाळलं.
परत दिसेल त्याला, घरोघरी जाऊन तो डिक्शनरी विकू लागला. काहींनी त्याचं एउन घेतलं. काहींनी त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला.
एका ठिकाणी बिल्डिंगमधल्या सिक्युरिटी गार्डला “भाऊ… दादा” करून त्याने प्रवेश मिळवला. सोसायटींमध्ये मोठाल्या बिल्डिंगमध्ये असा प्रवेश मिळाला की सर्वांत वरच्या माळ्यावर जाऊन पहिल्यांदा प्रयत्न करायचा.
पहिलं कारण म्हणजे खालच्या माळ्याहून वरच्या माळ्यावर पायऱ्या चढत जाणं म्हणजे शक्ती व्यर्थ करणं. तसंही दिवसभर चाल चाल चालून थकतंच. सर्वांत वरच्या माळ्यावरून सुरुवात केली की उतरताना शक्ती कमी खर्च होते.
दुसरं कारण म्हणजे प्रत्येक बिल्डिंगला लिफ्ट नसते. लिफ्ट असली तरी ती प्रत्येक माळ्यावर वापरायची नसते कारण लिफ्टचा दरवाजा उघड बंद होतानाचा आवाज ऐकून एखादा खत्रूड माणूस सिक्युरिटी गार्डला बोलावतो आणि मग तो विक्री करणाऱ्याला हाकलतो. त्याला प्रवेशासाठी आधीच चिरीमिरी दिली असली तरी. त्याचा दहा रुपयांनी चहा पाण्याचा खर्च सांभाळला असला तरी त्या बिचाऱ्याला घर चालवण्यासाठी राखणदारी करावी लागते. त्यावर तो कसा पाणी फेडणार? वरून त्या बिचाऱ्यासाठी का अडचण करा?
तिसरं कारण म्हणजे एखाद्या माळ्यावर कुणी हटकलं आणि जावं लागलं तरी एखाद दोन माळी सोडून विक्रीसाठी दार ठोठावण्याची संधी असतेच की. ती संधी खालून वरती जाताना फारशी मिळत नाही कारण परत सिक्युरिटी गार्डला हाकलण्यासाठी येणार. वरचे मजल्यांवरची विक्रीची संधी वाकुल्या दाखवत राहणार.
हे सगळं त्याला ऐकून, अनुभवातून उमजलं होतं. त्या बिल्डिंगमध्येही तो सर्वांत वरच्या मजल्यावर गेला. त्याने बेल वाजवली. लोखंडी जाळीच्या दरवाज्यामागे लाकडी फळ्यांचा दरवाजा एका म्हाताऱ्या आजीबाईने जरासा उघडला. लुकलुकती मान बाहेर काढत तिने साशंक दृष्टीने त्याच्याकडे बघितलं. त्याने हसतवदने नमस्कार करून त्या बाईला डिक्शनरी दाखवली. लोखंडी दरवाज्याच्या जाळीच्या फटीतून त्याने डिक्शनरी आत सरकवली आणि पकड ढिली केली. म्हातारीच्या हातात ती डिक्शनरी अलगद आली. विद्येचा मान राखणाऱ्या पिढीतल्या त्या म्हातारीने डिक्शनरी खाली पडू नये म्हणून नीट घट्टपणे पकडली आणि आलथून पालथून बघितली. काही पानं चाळली. गुळगुळीत पांढऱ्या पानांवरचे इंग्रजी शब्दार्थ बघितले. त्या पानांवर रंगबिरंगी चित्रं होती. कठीण शब्दांचे अर्थ आणि त्याचे स्पष्टीकरणे देणारी ती चित्रं बघून तिच्या चेहऱ्यावरचं कुतूहल त्याने ताडलं.
एखाद्या संभाव्य ग्राहकाच्या हाती डिक्शनरी दिली की त्यांना तिची प्रत, गुणवत्ता समजते. त्या क्षणी त्यांना ती विकत घ्यावीशी वाटते. कुणी विकतयं म्हणून घेण्याचा दबाव असतो. त्या दबावाखाली “नको!” हे उत्तर आधीच ठरलेलं असतं. पण हाती घेऊन त्यांना क्षणिक मालकी दिली, त्यांनी ती चाळली की स्वयंस्फूर्तपणे मोल देऊन घेण्याची प्रवृत्ती अधीर करत असते. म्हणूनच संभाव्य ग्राहकाच्या हाती डिक्शनरी थोपवून सेल्स पिच करणं सोपं जातं. अशा व्यक्ती डिक्शनरी घेण्याचा संभव जास्त असतो. हा ही धडा त्याला अनुभवांती आला होता. आज त्याला सलग दोनदा ह्याचा प्रत्यय आला होता. ही म्हातारी तिसरी असणार होती.
“आजी” एका शब्दाने त्याने तिच्या भावनेला स्पर्श केला. भारतीय तसेही भावनिक असतात आणि भावनेच्या भरात काहीही उत्स्फूर्तपणे घेणारी भारतीय मंडळींचा लौकिक. “तुमच्या नातू किंवा नाती साठी घ्या की ही डिक्शनरी. ह्यात चित्रं आहेत शब्दार्थांचे स्पष्टीकरण करणारी. त्यांच्या शाळेच्या प्रोजेक्ट्स साठी फार उपयोगाची आहेत. तुमची परवानगी असेल तर आणखी सांगू का ह्यांच्याबद्दल?” त्याने तिचं कुतूहल बघून विचारलं.
म्हातारीनं लाकडी दरवाजा पूर्ण उघडला आणि “श्यूअर! टेल मी मोर. धिस बुक लूक्स अमेझिंग!” तिने पानं चाळीत म्हंटलं.
“अरे वा!” म्हातारीच्या इंग्रजी बोलण्याचं त्याला कौतूक वाटलं. “इफ यु डोन्ट माईंड, इट विल बी बेटर टू एक्सप्लेन इफ आय कॅन फ्लिप द पेजेस ऑफ द डिक्शनरी अँड टेक यु थ्रू.” त्या दरवाजाची अडचण होत होती म्हणून तिला कसं सांगावं ह्याच्या विचारात तो ‘विचारू की नको’ करत म्हणाला, ” द ग्रिल्ड डोर मेक्स इट डिफिकल्ट तो एक्सप्लेन.”
“ओ येस! व्हेअर आर मे मॅनर्स? प्लिज डू कम!” म्हातारीने त्याला आत बोलावून खुर्चीत बसायला सांगितलं. दुसरी एक अराम खुर्ची ओढली आणि त्यात ती बसली.
पुढचं सेल्स पिच त्याने अस्खलितपणे इंग्रजीतच दिलं. म्हातारीला डिक्शनरी आवडली होतीच शिवाय तो पण तिच्या नातावासारखाच गोड बोलत होता. फक्त तो वयाने मोठा होता. तिने त्याची सेल्स पिच ऐकली. पिशवीतून ५०० रुपये काढले आणि त्याच्या हातात टेकवले. त्याने मागल्याप्रमाणेच एक रुपया परत केला. तिला त्याचं कौतुक वाटलं. त्याला थांबवून विचारपूस केली. थंड पाणी दिलं आणि हातावर एक गोड रव्याचा लाडू टेकवला.
तिथलं आटोपून, म्हातारीला धन्यवाद देत तो निघाला. तीन डिक्शनऱ्या झाल्या. बस एक आणखी आणि पहिल्यांदा त्याचं टारगेट पूर्ण होणार होतं. पुढल्या तीन तासात एक डिक्शनरी कशीही विकल्या गेली असती. आज तो मोठ्या जोशात होता. आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. स्वतःला सिद्ध करू शकणार होता. त्याने त्या माळ्यावरच्या आजूबाजूच्या दरवाज्यांकडे बघितलं. बाकी दारांवर कुलुपं होती. खालच्या माळ्यांवर त्याने प्रयत्न सुरु ठेवले.
तो सहाव्या मजल्यावर पोचला. तो दाराबाहेर उभा होता. पाठीवरची बॅग त्याने उतरवली. दीर्घ श्वास घेतला. शर्ट पॅन्ट खोचली. चेहऱ्यावरुन रुमाल फिरवला आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाची लक्ख झळाळी आल्याचं त्याला जाणवलं. त्याने बेल दाबली. बॅगेतल्या त्या दिवशीच्या टारगेटचं ओझं नेहमी एव्हढं असलं तरी मानसिकदृष्ट्या ते ओझं हलकं वाटत होतं.
दरवाजा उघडला. समोर एक तरुणी उभी होती. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर ताणलेल्या भुवया आणि डोळ्यांतले कोपलेले भावांची त्याच्या मस्तिष्कात नोंद होताच त्याच्या अंगातून आत्मविश्वास गळून पडल्याचा भास त्याला होऊ लागला. तिची बदामाच्या आकाराच्या टपोऱ्या डोळ्यांतून स्फोट होत अग्निवर्षा करणारी तळपती नजर त्याच्या नजरेशी भिडली. तिचा उजवा हात क्षणात त्याच्या गळ्याभोवती कॉलरवरती आवळला. त्याच्या डोळ्यांतून ह्या निमिषार्धात झालेल्या आक्रमणाची पोचपावती मेंदूत झाली. हातातली डिक्शनरी खाली आदळून त्यावर धुळीचा कलप चढला. तिच्या तोंडातून कडाडत ओरडा निघाला, “हाऊ डेअर यू एनक्रॉच माय प्रायव्हसी?”
त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोरून ऑफिसमधल्या सेल्सपर्सन्सनीं कथन केलेली फिल्डवरती त्यांच्याशी घडलेल्या अनुभवांची व्यथा सरकली. एका पदवीधर सेल्समनला एकदा एका सोसायटीत मुतारीशेजारी बसवून सोसायटीच्या चेअरमन कडून ओरडा खावा लागला होता. दुसऱ्याला सिक्युरिटीवाल्याने बेदम झोडपलं होतं. कुणाला रस्तावर सेल्स पिच करताना मुस्काटात बसली होती. कित्येकांना सोसायटींत प्रवेश केल्यानंतर शिव्या खाव्या लागल्या होत्या. कुणाला धमकावलं गेलं होतं. कुणाला चोर म्हणून वागवलं होतं. काहींना “विक्रीच्या कामाआड शरीरविक्रय करणार का?” अशी विचारणा झाली होती. काहींना गुन्हेगार ठरवून पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. काहींच्या अंगावर कुत्री सोडण्यात आली होती. कुणाला पळवून पळवून हाकलण्यात आलं होतं. कुणाच्या कसल्या तर कुणाच्या कसल्या व्यथा सेल्सपर्सन्स कुजबुजत राहायची पण डोळ्यांसमोर पाच वर्षांत ब्रांच हेड बनवण्याचं गाजर तरळत असल्यानं अडकून पडलेली मंडळी अपमानास्पद वागणुकीकडे दुर्लक्ष करत दर दिवशी नव्या जोमानं कामावरती जायची.
एका झटक्यानिशी त्याचा खांदा दरवाज्याला आदळला. ती वेदना झिणझिणत मेंदूत गेली आणि मेंदूने कैकपटीने वृद्धिंगत करून शरीरभर परत धाडली. त्यानंतर लाट उठली ती अपमानित झाल्याच्या भावनेची आणि तिनं आत्मविश्वासावरती आक्रमण केल्याची.
त्याच्या गळ्यावरची पंजाची पकड कसत होती. श्वासनलिकेवरचा दाब वाढत गेल्याने प्राणवायू फुफ्फुसांत जाण्यास अवरोध निर्माण होत होता. श्वासासाठी धडपड करत तो खाली बसला. तिचा हात त्याच्या गळयाशीच होता. त्या अवस्थेतही ती एक मुलगी आहे ह्याचं भान राखत त्याने स्वतःच्या हाताचा किंवा अंगाचा मोकळं होण्यासाठी उपयोग केला नाही.
“अगं सोड त्याला!” दुसऱ्या एका पोक्त बाईचा घाबऱ्या कातर स्वरातला आवाज त्याच्या कानी पडला. “सोड म्हणते ना मी. ही इज जस्ट डुईंग हिज जॉब! लिव्ह हिम अलोन, फॉर गॉड्स सेक! डॅम इट!”
तसा तिने त्याच्या गळ्यावरचा हात सैल केला. “गेट लॉस्ट, यू … इडियट!” ती किंचाळली.
त्याचा श्वास फुफ्फुसांत पोचला. हृदयाची धडधड छातीचा पिंजरा तोडून बाहेर निघेन असं वाटत राहिलं. खाली पडलेली डिक्शनरी उचलून त्यानं धूळ झटकली. बॅग उचलली आणि झपाट्याने उतरून तिथून पसार झाला.
त्या बिल्डिंगमधून उतरून अपमानित मनोवस्थेत तो मुख्य रस्त्यावर लागला. तिथल्या बस स्टॉप वरच्या बाकड्यावर चूप होऊन बसला. डोळ्यांवाटे अपमान अश्रूंच्या रूपात ओघळू पाहत होता. पुरुषांनी रडू नये , आसवं गळू नयेत म्हणून लहानपणापासून बिंबवीत आलेल्या मनाने त्यांना आवार घातला खरा पण घसा मात्र कितीतरी वेळ अवरुद्ध होऊन राहिला. रस्त्यावरती वर्दळ सुरूच होती. बसेस, गाड्या, ऑटो रिक्षा, सायकली, मोटरसायकली, फेरीवाले, प्रवासी कित्येकजणं समोरून निघून गेली. त्याच्या डोक्यात मात्र तेव्हढा प्रसंग वळसे घेत परत परत चित्रफितीसारखा फिरत राहिला. टारगेट पूर्ण करण्यासाठी एकच डिक्शनरी विकायची होती पण तो जागचा उठूही शकला नाही.
हळूहळू सूर्य मावळला. रस्त्यावर मावणाऱ्या सूर्याचा तांबूस प्रकाश हळूहळू गडद होत गेला. रस्त्यांवरचे दिवे लागले. मोबाईलवरती कुणीतरी कॉल करत होतं म्हणून त्याने मोबाईल काढला. आतापर्यंत त्याला त्याचा विसर पडला होता. त्याच्या टिम लिडरचा कॉल होता. त्याने फक्त मोबाईलच्या स्क्रीनकडे बघितलं. कॉल येणं बंद झालं आणि त्याने मोबाईल बंद करून ठेवला.
थोड्या वेळानं त्याची बस आली. खिन्नपणे तो बसमध्ये चढला आणि आतल्या एका खांबाला धरून उभा राहिला. पूर्ण वेळ डोक्यात तोच प्रसंग फिरत राहिला आणि दर वेळी आपल्या सोबत असं का व्हावं ह्याचा तो विचार करत राहिला. ऑफिस समोरच्या स्टॉपवर बस थांबली. तो उतरला आणि थेट ऑफिसमध्ये गेला.
नेहमीप्रमाणे सायंकाळी सगळ्या टिम्स जमा झाल्या होत्या. प्रत्येकाने नेलेल्या डिक्शनऱ्या आणि विकलेल्या डिक्शनऱ्यांचा टाळा रिसेप्शनिस्ट जवळ करून दिला. जमा केलेल्या कमाईचा हिशेब झाला. जास्तीत जास्त डिक्शनऱ्या विकणाऱ्यांची यादी ब्रांच हेडने जाहीर केली. त्याने घोषित केलेल्या जुनिअर सेल्सपर्सन्ससाठीच्या स्पर्धेत यशस्वी झालेल्यांची नावं एका मागून एक जाहीर झाली. प्रत्येक नावासरशी जमलेली मंडळी “ज्यूस… ज्यूस… ज्यूस… ज्यूस… ज्यूस…” चा चित्कार करत जल्लोष साजरा करत होती. नावं जाहीर झालेली व्यक्ती ब्रांच हेड आपल्या बाजूने बोलावत होता. हस्तांदोलन करत होता. चेहऱ्यावर आनंदाने स्मित उमटवीत एकमेकांचे अभिनंदन करणं सुरु होतं.
त्याचं नाव जाहीर झालं तसा तो चपापला. त्याच्या टिम लिडरने हळूच त्याच्या मागे येऊन त्याच्या कानात खुसफूस केली, “काँग्रॅच्युलेशन्स! आखिर कर दिखाया तुने| तुझ्या नावावर तीन लिहिलेलं मी बघितलं. आणि मी आज जिथे गेलो होतो तिथे एकाने सांगितलं की कुणीतरी आधीच येऊन डिक्शनरी बद्दल माहिती देऊन गेला होता. त्यावेळी रोख रक्कम त्याच्याकडे नव्हती म्हणून त्याने त्या दिवशी डिक्शनरी विकत घेतली नव्हती. आज त्याने चेक तयार ठेवला होता. तुझ्या नावावर तो सेल दाखवला मी. आता तू ट्रिट साठी पात्र झालास.” आनंदाने त्याने त्याच्याशी हस्तांदोलन केलं.
तो मात्र मक्ख चेहऱ्याने घडतंय त्याला सामोरे गेला आणि पात्र झालेल्या जुनिअर सेल्सपर्सन्स सोबत जाऊन उभा झाला. ट्रिट साठी ब्रांच हेड त्यांना ऑफिसजवळच असलेल्या हॉटेल वैशालीत घेऊन गेला. त्यांच्या हसण्या-खिदळण्यात, आनंदात, त्यांच्या गर्दीतही तो एकटा होता. कुणाचं लक्ष नाही असं बघून तो सटकला आणि फ्लॅटवर गेला. दरवाजा उघडा होता. आतही गर्दी होती. तिथून कुणीही बघणार नाही असं बघून तो बिल्डिंगच्या सर्वांत वरच्या मजल्यावरच्या छतावर पोचला आणि कोसळला. तिथे आतावर थांबवून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि आकाशातल्या चांदण्यांकडे बघत निशब्द, शांत वातावरणात आतल्या आत धाय मोकलून ओरडू लागला. अपमानाचं शल्य हजारो काट्यांनी त्याच्या मनाला बोचकारून काढत होते, रक्तबंबाळ करू लागले होते. रात्री कधीतरी त्याला त्याला झोप लागली.
सकाळ झाली तेव्हा फ्लॅटमध्ये जाऊन त्याने गुपचूप सुटकेस भरली. त्यातून एक बऱ्यापैकी शर्ट पॅन्ट काढला. दन्तमार्जन, अंघोळ वगैरे करून त्याने कपडे अंगावर चढवले आणि उसनं अवसान आणून आरश्यात बघितलं. डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. सहज बेल्टचं बकल फिट केलं तेव्हा त्याला जाणवलं की ते बेल्टवरच्या बऱ्याच आधीच्या भोकात जाऊन बसलं होतं. रोजच्या श्रमानं त्याचं वजन कमी झालं होतं. तब्येत खालावली होती. अशक्तता वाढली होती. त्यानं चेहऱ्यावर पाणी मारलं आणि फ्लॅटमध्ये एका कोपऱ्यात बसून राहिला.
सिलिंगच्या एका कोपऱ्यात कातिणीनं मोठालं जाळं तयार केलं होतं. त्याला आधी ते कधीच दिसलं नव्हतं. आता फुरसत मिळाली. सहज लक्ष गेलं तेव्हा त्याला ते दिसलं. भिंतीवर तुरुतुरु चालत असलेला एक किटक बागडत, उद्या मारत भटकत होतं. अचानक जाऊन ते त्या कोळिष्टकात अडकलं. तो जितका त्या जाळ्यातून निघण्यासाठी धडपडे तेव्हढा त्या जाळ्याच्या तंतूंतून कंपनं जलद गतीनं कातिणीपर्यंत पोहचे. आठ पायांची ती कातिण एक एक पाऊल त्याच्या जवळ टाकून येऊ लागली. सावज गावलं की त्यांना रेशमी धाग्यांनी त्याच्याभोवती कोष गुंडाळे. त्या मऊ मुलायम कोषात गुरफटून ते सावज बधिर होऊन थकून जाई आणि ती कातिण जिवंतच असलेल्या सावजाचं जीवनरस घटाघट पिऊन टाके. त्यातलं पोषण संपलं की त्याचं पोखरून काढलेलं आवरण ती झाल्यापासून विलग करून टाके. असे कितीतरी कोष त्या जाळ्यात अडकलेले त्याला दिसले.
अडकलेला तो किटक तडफडू लागला. काही वेळाने तो थकला आणि हालचाल करेनासा झाला. ती कातिण त्याच्या जवळ पोचली. त्याचंही आयुष्य त्या कातिणीच्या कोषात गुरफटून जाऊन नष्ट होण्यासाठी झालं असावं असं त्याला वाटलं. एक क्षण, दुसरा क्षण गेला आणि नशिबानं त्या जाळ्याचा तंतू तुटला. तो किटक मोकळा झाला आणि फरशीवर पडण्याआधी पंख पसरून खिडकीतून उडून गेला.
“काय सेठ? कशी झाली पार्टी?” त्याच्या टिम लिडरने त्याला विचारलं. “तू हो पुढे. मी येतोच ऑफिसमध्ये.” घड्याळीत ८.३० झाले होते. त्याने सवयीप्रमाणे बॅग उचलली आणि काहीही न बोलता तो ऑफिसच्या वाटेने लागला.
ऑफिस उघडलं. नेहमीप्रमाणे मिटिंग झाली. प्रोत्साहनपर भाषणं झाली. सेल्स पिच ची तयारी झाली. बॅगा भरून मंडळी फिल्ड वर निघाली. तो ही निघाला. बस स्टॉप वर बस ची वाट बघत तो एकटाच थांबला होता. अर्धा तास निघून गेला आणि त्याची बस आली. तो जागेवरून उठला. पाठीवरची बॅग आणि हातातल्या डिक्शनऱ्या सांभाळत तो बस मध्ये गर्दीत घुसू लागला. डोक्यात आदल्या दिवशीची घटना पुनरावृत्त होत होती. सकाळी बघितलेली कातिणीच्या जाळ्यातून सुटणारा किटकही आठवत होता. मनात द्वंद्वं सुरु झालं. बस सुरु झाली आणि विमनस्क अवस्थेत त्याने चालत्या गाडीतून उडी मारली. रस्त्यावर कोसळता कोसळता तो सावरला. पाठीवरच्या ओझ्याची बॅग आणि हातातल्या डिक्शनऱ्या सावरत तो धावत ऑफिसकडे निघाला. एका दमात पायऱ्या चढून तो ऑफिसमध्ये घुसला. रिसेप्शनिस्टने चमत्कारिक नजरेने त्याच्या कडे बघितलं. तिच्या कडे न बघताच तो आतल्या खोलीत गेला. सगळे सेल्सपर्सन्स फिल्डवर गेल्याने ऑफिस मोकळंच होतं.
तो थेट ब्रांच हेडच्या केबिन मध्ये घुसला. “मी सगळ्या डिक्शनऱ्या जमा करून ठेवतोय. माझे आतापर्यंत जमा झालेली कमाई रिसेप्शनिस्टला द्यायला सांगा, प्लिज!” एव्हढं बोलून तो रोखून ब्रांच हेड कडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावरचा निर्धार आणि एकूणच रागरंग बघून ब्रांच हेड ला काय कळायचं ते कळालं. त्याने रिसेप्शनिस्टला त्याची रक्कम द्यायला सांगितली. त्याच्या कडे बघून डोळ्यांनी “हे काय?” असं प्रश्नार्थक भाव दर्शवला.
“मला हे भविष्य नसलेलं ओझं वाटणारं काम नकोय. पाच वर्षांत ब्रांच हेड होण्याचं गाजरही नकोय. आणि निर्बुद्ध पोपटपंची करून निरर्थक “ज्यूस”ही नकोय.” त्याच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून त्याचं त्यालाच नवल वाटलं. त्या शब्दांत आत्मविश्वासाची, स्वत्वाची, अपमान सहन न करण्याची जाणीव नव्यानेच याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख त्याला स्वतःला करवून देत होती.
त्या ब्रांच हेड नं ड्रॉवर मधून एक डिक्शनरी काढली. त्याच्या आतल्या पहिल्या मोकळ्या पानावर फर्राटेदार स्वाक्षरी केली. त्याच्या हाती देऊन त्याला “ऑल द बेस्ट!” म्हंटलं आणि टेबलावर काहीतरी लिहिण्यासाठी मान वळवली.
तो केबिनचं दार उघडून बाहेर पडणार तोच ब्रांच हेड म्हणाला, “लिव्ह द रूम टुडे. आय होप यु अंडरस्टॅंड! बाकी सेल्सवाल्यांवर तुझ्याबद्दल माहिती नको व्हायला. किल्ल्या फ्लॅटवरच कुणीतरी असेल त्याला देऊन जा. मी फोन करून तसं सांगतो.”
“येस! आय अंडरस्टॅंड!” म्हणत तो रिसेप्शनिस्टकडे गेला. त्याच्या खात्यात आठशे रुपये होते. ते त्याने खिशात भरले आणि थेट फ्लॅटवर गेला. स्वतःची सुटकेस भरली आणि तिथून ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने एका वातानुकूलित सीटची रक्कम भरली. त्या शहरातून तो जाणार होता त्याच्या गावाजवळच्या शहरात. तिथे त्याच्या पदवीच्या वर्गातला एक मित्र राहत होता. त्याच्या सोबत राहून पुढल्या शिक्षणाची तयारी करण्याचा त्याचा मानस होता.
बस स्थानकावरून निघाली आणि त्यांनं पापण्या मिटल्या. कोळिष्टकांतून निसटलेल्या किटकाची खुल्या जगात मारलेली भरारी त्याला राहून राहून आठवत होती.
दुसऱ्या दिवशी त्याच्या टिम लिडरचा त्याला भलं बुरं सुनावण्यासाठी आलेल्या कॉल ला त्यानं शांत स्वरात उत्तर दिलं. त्याची घुसमट सांगितली. टिम लिडरचा उपकाराच्या संधीचा फोलपणा त्याला स्पष्टपणे सांगितला.
त्याच्या टिम लिडरने त्याचा एक चेक न वठल्याचं कारण सांगून त्याच्या कडे रुपये ५०० ची मागणी केली. वस्तुतः त्याने चेक घेणंही बंद केलं होतं. तरीही त्याने त्याच्या बँक खात्यात भरून हिशेब चुकता केला. ओळखीच्या नात्यात दुरावा नको म्हणून समंजसपणे संपर्कात न राहण्याचा त्याचा निर्धार समजावून सांगितला.
पुढे कित्येक दिवस त्या दिवशी झालेल्या अपमानाचं शल्य रात्री बेरात्री त्याला जागं करत होतं पण अनुभवाचे कडवे घोट पचवणं त्याला जीवनाने शिकवायला सुरुवात केली होती.
वर्षं निघून गेली. त्याला बऱ्यापैकी नोकरी लागली आणि कालांतराने तो त्याचा शहरात पुन्हा एकदा परतला. फिरता फिरता त्या ऑफिसच्या पत्त्यावर गेला तेव्हा ते ऑफिस तिथे कधी होतं ते ही कुणाला आठवत नव्हतं. तिथल्या सेल्सपर्सन्सचं पुढे काय झालं असेल असं विचार त्याच्या मनात डोकावरून गेला खरा पण तात्पुरताच! त्याच्या टिम लिडरचाही पुढे बऱ्याच काळानंतर भ्रमनिरास झालेला त्याला कळलं होतं. तो दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर कामाला होता
कधीतरी तो हॉटेल वैशाली जवळ दिसला तेव्हा मागचं विसरून त्याच्याशी तो बोलला, पण काहीसं अंतर ठेवूनच. त्याला ब्रांच हेड नं “ऑल द बेस्ट!” म्हणत दिलेली डिक्शनरीची रक्कम त्याने न वठलेल्या चेकचं कारण देऊन काढायला सांगितली होती, हे ही त्याला कळालं. वैशालीतून बाहेर निघून ती दोघं आपापल्या मार्गानं निघून गेली.
समोर गेल्यावर पुस्तकांचा सेट बगलेत धरलेला खिन्न होऊन त्याच बस स्टॉप वरच्या बाकड्यावर बसलेला एक वीस-बावीस वर्षांचा सेल्समन दिसला आणि त्या दिवशीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यांत पाणी तराळलं. एक बस त्या स्टॉपवर थांबली. त्या सेल्समननं खिशातून मोबाईल काढला, त्याच्या स्क्रिनकडे बघितलं. मोबाईल बंद केला आणि गर्दीतून मार्ग काढत त्या बस मध्ये चढला.
उद्याचा दिवस त्या सेल्समनसाठी स्वत्वाची जाणीव करणारा निघेल की पुढली काही वर्षं कोळिष्टकांत अडकलेल्या किटकासारखी होईल ह्याचा विचार करत तो समोरच्या स्ट्रीट लॅम्पकडे अंधारातून प्रकाशाच्या दिशेने चालत गेला.