
अंदाजे वाचन वेळ : ९ मिनिटे
व्हिलचेअरची चाकं फरशीवरून कच SS कच SS आवाज करत पुढं सरकत होती. खुर्चीवर बसलेल्या माणिकरावच्या लेच्यापेच्या मानेला एका हाताने आधार देत नर्सने दुसऱ्या हाताने काचेच्या दाराला धक्का दिला. दारं उघडली पण व्हिलचेअर उतारापाशी नीट सांभाळती न झाल्याने हळूहळू घरंगळायला लागली. इस्पितळाच्या दरवाज्याजवळच्या पायऱ्यांबाजूच्या रॅम्पच्या उंबरठ्यावर पोचली आणि लगबगीने पळत व्हिलचेअरचं हॅन्डल नर्सनं कसंबसं पकडलं. ऐन वेळेत हॅन्डल हाती लागलं आणि व्हिलचेअर थांबली म्हणून “हाश्श SS हुश्श SS” करत धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून नर्सनं डोळे बंद केले.
“वाचली बाई.” तिच्या हृदयाचे ठोके अजूनही वेगातच पडत होते. मनातल्या मनात कुण्या बाबाला धन्यवाद देत बाई पुटपुटली. इकडे तिकडे बघत आत्ताच काही क्षणांपूर्वी झालेली धांदल कुणी बघितली नव्हती याची खात्री तिने करून घेतली. तरी बरं हेड नर्स किंवा डॉक्टर जवळपास नव्हते. नाहीतर नुकतीच लागलेली नोकरी तिच्या अश्या धांदरटपणामुळे जायची.
माणिकरावाच्या उजवीकडे कललेल्या मानेला सरळ करत तिने डोळयांच्या कोपऱ्यातून “ह्याला काही कळालं का आत्ता काय झालं ते?” याचा अंदाज घेत तिने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या अर्धवट मिटलेल्या निस्तेज डोळ्यांतून पाण्याचा थेंब तेव्हढा उजव्या कानाच्या पाळीपाशी जाऊन थबकला होता. हा पेशंट कसला काय बोलतो. वाचा तर गेलीच आहे आणि हातापायात जाणिवा तर नाहीच. गेल्या चार-पाच महिन्यापासून लखव्याने ग्रासलेला हा म्हातारा जीव जगतो तेवढा काळ जगेल. जगला तर नेतील ह्याच्या घरचे. मेला तरी बरंच, सुटेल बिचारा आणि आपल्या पाठची पीडा टळेल. असा विचार करत नर्स त्याच्या कडे बघत होती.
उतारावरून व्हिलचेअर ढकलत नर्सने माणिकरावला इस्पितळाच्या मागच्या मैदानात नेलं. तिथल्या कडुनिंबाच्या झाडाखाली चबुतऱ्यापाशी व्हिलचेअर थांबवली. “बावाजी, बस इथं उन्हात काही वेळ. सकाळची उन्ह चांगली असते. मी येते पट्टकन. घाबरू नको.” तिनं खाली झुकलेल्या माणिकरावाच्या मानेला एका हातानं नीट उभं करत त्याच्या डोळ्यात बघत म्हंटलं. त्या उद्गारांत कसलीही आत्मियता किंवा सुश्रुषेचा भाव नव्हता. तुटपुंज्या पगाराच्या या नोकरीत सांगितलं तेव्हढं काम करायचं. नोकरीवर गदा येणार नाही ते सांभाळून रुग्णांना काय हवं नको ते डॉक्टरने किंवा हेड नर्सने सांगितलं तेव्हढं बघायचं. दिवस संपला की निमूट घरी जायचं. आपल्या या वागण्याने कुणाच्या तब्येतीचं नुकसान होत नाही. नुकसान होतो ते त्या त्या पेशंटच्या रोगानं असा विचार मनात घट्ट रोवून निब्बर बनलेल्या नर्सनं माणिकरावकडे जाताजाता परत एक नजर टाकली आणि तरातरा इस्पितळाच्या इमारतीकडे निघून गेली.
सकाळच्या कोवळ्या उन्हाने माणिकरावाच्या शरीराला उब द्यायला सुरुवात केली. गेल्या पाच महिन्यांपासून या इस्पितळात टाकलेल्या म्हाताऱ्या माणिकरावाला भेटायला येणारे सख्खे नातेवाईक नावापुरती चौकशी करून जायचे. काळजीने सेवा करणारं त्याचं असं कुणी जगात राहिलं नव्हतं. बायकोला जाऊन वर्षभर झालं होतं. मुलगा कधीमधी भेटायला आला तरी फार काळ बसत नव्हतं आणि मुलीचा तर लग्न करून दिल्यानंतर फारसा संबंधच राहिला नव्हता. वर्षभरातून एखाद्या वेळी आली तरी आली नाहीतर पुढल्या वर्षी येईल या आशेवर तो वाट बघायचा. बायको गेल्यानंतर ती येऊनही काय करणार म्हणा. बापापेक्षा माय तिला जवळची होती. मुलाचा किंवा मुलीचा कधी-मधी फोन येई पण संभाषणाचा ओघ शेवटी काही ना काही मागण्यांकडे वळायचा. जन्मल्यापासून त्यांचे लाड पुरवण्यासाठी इकडून तिकडून कमावलेला पैसे अडका कुठवर पुरणार होता?
पक्षाघाताचा झटका आल्यानंतर पोरानं बापाला इस्पितळात आणून टाकलं खरं पण ‘सोय करायला स्वत:च्या खिश्यातुन दामा काढू नको’ असं त्याच्या बायकोनं बजावल्यानंतरही जनाच्या लाजेखातीर त्याने माणिकरावाला इस्पितळात भरती केलं. उपचाराचा खर्च माणिकरावाच्या पेन्शनवर आणि फंडात असलेल्या रकमेतून होऊ लागला. बापाची जबाबदारी घायला म्हणून ह्याची हाती रक्कम पडायची आणि दवादारूचा फार खर्च होतो म्हणत प्रत्येक वेळी जमेल तेव्हडी रकमेवर ह्याचा डल्ला पडायचा. एका एका पैश्याचा हिशोब मागणाऱ्या माणिकरावाकडे पै पै जमा करून ठेवलेली संपत्ती स्वतःच्या नजरेदेखत सरत जात होती.
उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि उबदार वाटणारी उन्ह त्याच्या उघड्या अंगाला चटके देऊ लागली. डोळ्यांत सूर्याची किरणं हळूहळू थेट शिरायला सुरुवात झाली. आजाराच्या अगतिकतेने आणि शारीरिक-मानसिक असमर्थतेने त्याचा जीव कंटाळला होता. डोळ्यांतून पाण्याची धार वाहू लागली आणि डोळ्यांच्या खोबणीतल्या बुब्बुळांची महत्प्रयासे हालचाल करत त्याची दृष्टी जमिनीकडे वळली.
क्षण-दोन क्षण तसेच गेले आणि थप्पकन आवाज आला. त्याच्या पुढ्यात अर्धमेल्या उंदराचं धूड पडलं. निपचित. सुन्न. काही क्षण तसेच गेले. अंगावरच्या जखमांतून रक्त निघत होतं. उंचावरून आदळल्यानं सुन्न झालेला तो जीव डोक्याच्या आधारानं जमिनीला टेकत हळूहळू गोल-गोल फिरू लागला. मग बिचारा अर्धमेला जीव तडफडत हात पाय झाडत, लोटांगण घालत, कोलमडत कसाबसा सरकायला लागला.
“कांव S S कां S S व” कर्कश आवाज करत दोन डोमकावळे घिरट्या घालत जमिनीवर उतरले. एकमेकांशी भांडत झगडत त्याच्या आजूबाजूला भुकेल्या नजरेने बघत मृत्यूच्या काळ्या आकृत्या उड्या मारायला लागल्या. एकाने त्या उंदराच्या लुसलुशीत पोटात चोच मारली आणि एका झटक्यासह त्याला घेऊन तो उडणार तोच दुसऱ्या कावळ्याने पंज्यांनी उंदराचे मागचे पाय पकडले. दोघांच्या त्या ओढाताणीत तो असहाय उंदीर प्राणांतिक चित्कारला. शरीराची होईल तेव्हढी धडपड करत त्यांच्या तावडीतून सुटण्याचे केविलवाणे प्रयत्न करू लागला.
चोचीतून सुटून उंदीर जमिनीवर परत आदळला. पोटात घुसलेल्या चोचीने कोथळा बाहेर काढला होता. आतडे पोट फाडून बाहेर निघाले होते. आता त्याची धडपड मंदावली. शेवटचे आचके देत त्याने त्या दोन कावळ्यांच्या भुकेपायी जीव टाकला. जमिनीवरच्या हिरव्याकंच गवतावर तांबड्या रक्ताच्या थेंबांचा सडा पडला. निश्चेष्ट मढ्यावर त्या दोन्ही डोमकावळ्यांनी ताव मारणं सुरु केली. मृताच्या शरीरावर लोभी, हावरट स्वार्थाचं किळसवाणं थैमान सुरु झालं.
माणिकराव खिन्न दृष्टीने या प्रसंगाकडे असहाय दृष्टीने बघत होता. पोटाच्या खड्ड्यातून अनिवार उबळ आली आणि घाणेरड्या वासाची पिवळी ओकारी त्याच्या मुखातून ओघळत छातीवर, पोटावर, मांड्यांवरून पाऊलापर्यंत वाहिली. त्या किळसवाण्या स्थितीत दहा-पंधरा मिनिटं गेली.
“बाई S बाई S बाई S … कायंच करावं या पेशंटचं? वंगळपणाची कळस घातली बाई” म्हणत नर्स माणिकरावापाशी पोचली. तिच्या स्वरात त्याच्याबद्दलची चीड त्या किळसामुळे आणखीच तीव्र झाली. “एक मिनिट दम खाऊ देत नाही हा माणूस. किती करावं या माणसाचं अन करून करून पैसे मिळतो दमडीभर. मी नाही बाई करत याचं काही.” माणिकरावाला त्याच्या घाणीत तसाच ठेवून तण तण करत ती नर्स हेड नर्सकडे फणफणत निघून गेली.
एव्हढा पाण्यासारखा पैसा खर्चूनही इथे मिळणारी तुच्छ वागणूक त्याला असह्य झाली होती. पण त्याहीपेक्षा असहनीय झाली होती भूतकाळातली ती एक आठवण. कितीदातरी दरदरून घाम फुटल्याने रात्री – मध्यरात्री, वेळी – यावेळी त्याला झोपेतून जाग येई. हाफा टाकत, ह्रदयाची वाढलेली धडधड कशीबशी शांत करत बायको मुलांच्या भल्यासाठीच आपण ते कृत्य करतो आहोत असं खोटं समाधान स्वतःच्या मनाला पटवून देत तो परत झोपी जाई. निवृत्ती घेऊन दहा वर्षं झाली होती पण अर्धनिद्रेतल्या मनाला क्षणोक्षणी बोच देणारी कृत्यं आजही त्याला स्वस्थपणे झोपू देत नव्हती.
“काय हे माणिकराव? अरे अरे…” हेडनर्स माणिकरावांपाशी पोचली होती. माणिकराव इस्पितळात दाखल झाला होता तेव्हा त्यांची सुश्रुषा, देखरेख, औषधपाण्याच्या वेळा पाळणे वगैरे हेडनर्सने मोठ्या काळजीने केलं होतं. शिवाय कधीमधी येणाऱ्या माणिकरावच्या मुलाच्या बोलण्यातून त्यांच्या संबंधाबद्दल काहीसा अंदाज त्यांना आलाच होता. पेशंट शेवटच्या स्थितीत असला आणि बरा होण्याच्या पार गेला असला तरी माणुसकीच्या आंतरिक आवाजाने त्या होईल तेव्हढं करायच्या. शिवाय आरोग्यपरिचारिकेच्या प्रातिज्ञांचे कसोशीने सतत पालन करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रण होता.
हातातल्या फडक्याने माणिकरावाच्या पिवळया-चिकट वांतीला साफ करून त्यांनी फडका वेगळ्या पिशवीत टाकला. दुसऱ्या फडक्याने त्याच्या अंगावरती ओघळलेल्या द्रव्याला साफ करण्यासाठी हात लावतील तोच त्यांच्या पाठीशी उभी असलेली दुसरी नर्स म्हणाली, “हेडबाई, राहू द्या! मी करते.” बारीक अंगकाठीची, गडद रंगाची ही नर्सही नुकतीच रुजू झाली होती. तिच्या कडे कौतुकाची नजर टाकत हेडनर्सने फडका तिच्या हाती दिला. तिला आवश्यक त्या सूचना देऊन त्यांनी माणिकरावाला सांगितलं, “ही निमा पेंदाम. आजपासून तुमची काळजी ही घेणार. तुमच्याच गावाकडची आहे. हुशार नर्स आहे. काही हवं नको ते बघेन ही.” एव्हढं म्हणून हेडनर्स इस्पितळाकडे वळल्या.
निमाने माणिकरावाकडे एक हसरी नजर टाकली. त्यात तुच्छता, किळस, कीव असल्या काही भावना नव्हत्या. होती ती सेवाभावेची भावना. आदिवासी पाड्यात वाढता वाढता स्वतःच्या कर्तृत्वाने निमा नर्स झालेली होती.
“पेंदाम?” नाव ऐकल्यासारखं वाटत होतं. कुठे ऐकलं होतं? वीस वर्षांआधी कुणीतरी “पेंदाम” शेतजमिनीच्या कामासाठी आपल्याकडे आल्याचं माणिकरावाला आठवलं. निमाच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर त्या “पेंदाम”ची झलक त्याला दिसली. त्याच्यासारखाच तोंडावळा दिसतोय. त्याचीच ही मुलगी असावी.
काळ्याकभिन्न किडकिडीत अंगाची मुटकुळी सरळ करत घोंघावत्या वादळात, धों धों कोसळणारा पाऊस अंगावर झेलत पेंदाम ऑफिसमध्ये आला होता. कागदपत्रांच्या पटावर नोकरशाहीचे खेळ पांढरपेश्यांच्या चांगलेच अंगवळणी पडलेले होते. माणिकरावही त्यातलेच. दीनवाण्या चेहऱ्याच्या अशिक्षित पेंदामला सरकारी कागदपत्रं कधीच समजले नव्हते. आपण चांगले असू म्हणजे सभोवतालचं जगही आपल्याशी चांगलंच वागेल असा सरळसोट साधा भोळा पेंदाम माणिकरावाच्या टेबलापुढे जमिनीचे कागदपत्रं धरून उभा होता. सावज आयतं हाती गावलं होतं. याच्या जमिनीतला थोडा भाग काहीतरी गौडबंगाल करून स्वतःच्या नावाखाली करून घेणं माणिकरावाला सहजसाध्य होतं. त्या दिवसापासून पेंदामशी त्याला अगम्य, क्लिष्ट पण गोड भाषेत बोलत त्याचा विश्वास संपादन करून माणिकरावाने गळ टाकला होता. आधीच दरिद्री पेंदामच्या हक्काच्या जमीनीचे या न त्या कारणाने कागदोपत्री घोळ करून, ऑफिसमधल्या सहाय्यकांच्या साथीने लचके तोडले होते. सरतेशेवटी लाथा हाणून, धक्के मारत त्याला हाकलून दिलं होतं. या लाटलेल्या जमिनीच्या तुकड्याची पुढे माणिकरावाने विल्हेवाट लावून रोख रक्कमी बँकेत जमा करून ठेवली. त्या ठेवीवर वर्षोनवर्षं व्याज चढत गेलं आणि माणिकरावाची संपत्ती वाढीस लागली. आपण केलेल्या कांडाचा बोभाटा कधीच होणार नाही याची व्यवस्था पुढे कधीतरी रस्त्यावर चेंगरल्या गेलेल्या पेंदामने केली.
ही घटना काळामुळे माणिकरावाच्या स्मृतिपल्याड गेली खरी पण असहाय्य्य, निरक्षर जनांशी सतत केलेल्या लोभ-स्वार्थाने बरबटलेल्या खेळाची परिणीती त्याच्या निद्रानाशात झाली होती. त्याकाळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपणही डोमकावळ्यांसारखं वागलो होतो. बिचाऱ्या गोरगरिबांचे लचके तोडून आपली क्षुधा भागवली होती. तेव्हा आज दिसलेली किळस कुठे गेली होती? त्याचवेळी का नाही घाणेची ओकारी झाली आपल्याला? हिच्या बापाच्या मृत्यूस आपण कारणीभूत आहोत ही बाब कदाचित हिला कधीच कळणार नाही, कधीच सांगू शकणार नाही आणि केलेलं पाप आतल्याआत आपल्याला खात राहील. दरदिवशी हि आपलं करायला येईल आणि त्यातून केविलवाणा, असहाय्य्य, मरणोन्मुख पेंदाम दिसत राहील. त्याच्या आतड्यांचे लचके तोडणारे आपण शिसारी येऊन ओकत राहू. या घाणीचा वास मरण येईस्तोवर सहन करणं हीच माणिकरावाची शिक्षा!
तोवर निमाने मोठ्या काळजीने माणिकरावाच्या मानेला आधार देऊन नीट केलं. त्याच्या अंगावरची सगळी ओकारी साफ केलेली होती. तिच्या वात्सल्यपूर्ण टपोऱ्या पाणेरी डोळ्यांत बघण्याची माणिकरावाची हिम्मत झाली नाही. त्याच्या उघड्या डोळ्यासमोर त्या उंदराच्या देहाची चिरफाड करणारे डोमकावळे परत परत दिसत राहिले.