
(अंदाजे वाचन वेळ : १० मिनिटे)
“नमस्कार! पेढा घ्या, सर.” पार्किंग स्पेसच्या एका पिलरला खेटलेली खुर्ची सरकवत तो सिक्युरिटी गार्ड पुढे येत म्हणाला.
आवश्यक असेल तेव्हाच अनोळखी व्यक्तींशी बोलणारा मी त्याच्या आवाजाने तंद्रीतून बाहेर आलो. हा सिक्युरिटी गार्ड अनोळखी नसला तरी चालता-बोलता नमस्कार करणारा असल्याने तोंडओळखीचा होता. तेव्हढ्यापुरतीच त्याचा आणि माझा संबंध. त्याचा हा “नमस्कार” मनापासून की जवळच्या भिंतीला लावलेल्या नियमावलीच्या पालनासाठी? ते मला कधी गम्य झालं नव्हतं.
मुळात आदर नसेल, त्या लायकीचा व्यक्तीच नसेल तर “नमस्कार” करूच नये अश्या विचारांचा मी. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात असताना सिनिअर्स रॅगिंग घ्यायचे तेव्हा “सॅल्यूट” वगैरे करायला लावायचे. सॅल्यूट करण्यासारखं ह्या लोकांनी अचिव्ह काय केलं होतं कुणास ठाऊक? मी मात्र त्यांना नमस्कार बिमस्कार न करताच जायचो आणि कित्येकदा केवळ ह्या कारणासाठीच मी कानफडीतही खाल्ल्या आहेत. पुढे मी सिनिअर झालो आणि मला कुणी जुनिअर सॅल्यूट करायचा किंवा दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा तेव्हा मला स्वतःच्या लायकीची कीव यायची. कॉलेज मध्ये पडलेल्या कित्येक पायंड्यांपैकी हा माझा सर्वांत नावडता.
निव्वळ वय वाढलं, एका श्रेणीतून पुढल्या श्रेणीत गेलो, आर्थिक कमाई वाढीस लागली, ओळखी पाळखीच्यांत नाव झालं म्हणजे नमस्कारास कुणी पात्र होतो ह्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. नमस्कार मनापासून हवा आणि नमस्कार देणाऱ्या-घेणाऱ्यांत लायकी असावी. ह्या लायकीची परिभाषा मी व्याख्यीत करू शकण्याएव्हढा समंजस झालो नव्हतो आणि कदाचित म्हणूनच मी नमस्कार करण्याच्या आणि कुणी नमस्कार केलाच तर त्यावर उत्तर देण्याच्या भानगडीतही पडत नाही. “हाय” आणि “हॅल्लो” केलं तर चालतं म्हणून आय टी कंपनीत रुळलो. मी बरा. माझं काम बरं. झिरोज आणि वन्स च्या दुनियेत मी ही एक प्रोग्रॅम, एक आज्ञावली बनलो होतो. आहे.
ह्या गृहसंकुलात माझ्या मालकीची, बँकेकडून कर्ज घेऊन घेतलेली का असेना एक सदनिका आहे. ते कर्ज फेडता फेडता माझ्या नाकी नऊ येत आहे आणि सर्वांगावर दरदरून घाम फुटतो आहे, असं असलं तरी उधारीच्या हक्काचं घर आहे. मला ही असली बँकेकडून कर्ज घेऊन इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची सर्कस करावी लागली असली तरी लग्न करायचं तर मुलींकडच्या मंडळींच्या “घर आहे का स्वतःच?” ह्या प्रश्नाला “आहे की. 2 बी एच के विथ स्पेशस गॅलरी आणि ते ही पाचशे फ्लॅट्सच्या सोसायटीत. सगळ्या अमेनिटीज आहेत तिथे. या कधी बघायला.” म्हणत त्यांची तोंडं बंद करणारे सडेतोड उत्तर आत्मविश्वासाने फेकण्यासाठी हिम्मत तरी ह्या कारणाने मिळाली. वरतून स्टेटसला शोभेल अशी चारचाकी घ्यावी लागली होती ती ही कामी येतेच. वरवरचं श्रीमंतीचं, सुख-समृद्धीचं आवरण सदनिकेचं दार उघडल्यावर गळून पडतं.
मुळात एंटरटेनमेंटसाठी घेतलेला लॅपटॉप ऑफिसातली कामं घरी करावी लागत असल्याने अधून मधून बंद पडतो. त्या बहाण्याने सुट्टा ब्रेक मिळतो. दहा मिनिटाचा ब्रेक मिळाला आणि लॅपटॉपचा ताप कमी झाला की तो बेटा परत सुरु होतो आणि मग काम एके काम. त्या दिवशीही लॅपटॉप हँग झाला म्हणून टपरीवर सिगारेट ओढायला गेलो होतो.
परतत होतो तेव्हा त्याने आवाज दिला आणि कधी नव्हे तो मी त्याच्या चेहऱ्याकडे नीट बघितलं. वय साठीच्या जवळपास. अंगावरची कातडी बऱ्यापैकी रापलेली होती. डोक्यावरच्या पांढऱ्या केसांतून एखाद-दुकटी केसंच लपंडाव खेळत दडून बसलेली होती. जाडसर भुवयांच्या मधोमध उभ्या आठ्यांत दोन बोटांच्या चिमटीत बसेल एव्हढा शेंदूराचा बारीक धारदार टिळा आखून रेखून कोरलेला दिसला. बारीक किनारीचा चष्मा फेदरलेल्या नाकपुड्यांच्या फुगवट्यांवर स्थिरावला होता. खप्पड गालांवर मुरुमांचे खड्डे होते आणि चेहऱ्यावरची त्वचा आपली जागा सोडून गुरुत्त्वाकर्षणाने लोंबायला लागली होती. कदाचित वयापेक्षा जास्तच आधी हा माणूस म्हातारा व्हायला लागला होता.
“कसल्या खुशीत?” मी सिगारेटचं पाकीट उजव्या हातातून डाव्या हातात घेतलं. घरापासून कित्येक वर्षं दूर राहून शिक्षण घेतलं असलं तरी प्रसाद उजव्या हातातच घ्यायची सवय आहे.
“गाडी घेतली, सर.” त्याच्या डोळ्यांतून स्वप्नपूर्तीची झळाळी लकाकली. “आजच शोरूम मधून आणली.” अर्ध्या उघडलेल्या लाल-तांबड्या रंगाच्या वेष्टणावर पिवळसर मंडलं छापलेल्या खर्ड्याच्या डब्यातून वनस्पती घी च्या थराने चमकत असलेले कॅरॅमल कलरचे पेढे प्रकट झाले. त्याने त्यातल्या त्यात मोठासा पेढा उचलून माझ्या हातात ठेवला.
“अरे वा! उत्तम! छान आहे.” मी यांत्रिकपणेच बोललो. त्याच्या आनंदाशी मला कसलं आलं घेणं देणं? हाती आलेल्या पेढ्याला मुठीत हलकंच आवळत मी म्हणालो, “कितीला पडली स्कुटर?” सहज विचारलं. मार्केट मधली ती सर्वांत स्वस्त स्कुटर होती.
“तसं सगळं देऊन-घेऊन बहात्तर हजाराला पडली.” त्याच्या उत्तरातून त्याला करावी लागलेली तडजोड अंशतः जाणवत होती.
“बहात्तर हजार?” मला आश्चर्याचा धक्काच बसला. ऑन रोड फार फार तर चाळीस-पंचेचाळीस हजाराला असेल एकरकमी घेतली तर.
“हो सर. थोडं डाऊन पेमेंट केलं. बाकी पाच वर्षांत दर महिन्याला थोडं थोडं करून जाईल ई एम आय मध्ये.”
त्याने कशी बशी डाऊन पेमेंट ची रक्कम जुळवली असणार याचा अंदाज आलाच होता मला. सिक्युरिटी गार्डला जेमतेम दहा बारा हजार दर महिन्याचा पगार असणार. त्यात तो कुटुंबाचं किती करणार आणि गाडीच्या ई एम आय मध्ये किती घालणार? मला त्याच्या हिमतीचं कौतुक वाटलं खरं पण प्रत्यक्षात एखादी प्री ओन्ड स्कुटर घेतली असती तरी भागलं असतं त्याचं. इकडे ऐंशी हजार कमवून महिन्याच्या मध्यातच माझं अकाउंट मधली कमाई तळाला लागलेली असते. मग सुरु होतं क्रेडिट कार्ड वर उधारीचं जगणं. पुढल्या पगारात ती रक्कम मोकळी केली की परत अध्या महिन्यात अकाळ.
“अहो सेकंड हॅन्ड घ्यायची नं. स्वस्तात पडली असती आणि चांगल्या असतात गाडया त्या.” मी तोंड उघडलं आणि नको करायचा तो चोंबडेपणा केलाच. माझ्या बोलण्यावर कसला धरबंध नाहीच. कसं बसं मी पुढचं वाक्य बोलण्यापासून स्वतःला थांबवलं.
“पैसे वाचले असते पण स्वतःच्या मालकीची नवी कोरी स्कुटर घेण्याचं स्वप्न अपुरं राहिलं असतं नं, सर.” माझ्या बोलण्याने तो दुखावला असल्याचं मला स्पष्ट कळालं. “स्वतःच जाऊ द्या हो पण मुलीचं कसं? तिला कॉलेजमध्ये जायला यायला लागते स्कुटर. रोज तीस-पस्तीस किलोमीटर सायकल वर जाणं येणं करते बिचारी. तिला म्हणालो होतो फस्ट क्लास आलीस तर स्कुटर घेऊन देईन म्हणून. पोरीनं चौऱ्यांशी टक्के काढले. चांगल्या कॉलेजमध्ये फ्रीशिप मध्ये नंबर लागला. तेव्हा तर नाही जमलं. गेल्या वर्षभर पैसा पैसा जमवून डाऊन पेमेंटची रक्कम जमवली. आता तीन वर्षांपासून इथेच गार्ड म्हणून आहे तर जरा हिम्मत आली. नोकरी तर पक्कीच आहे. दर महिन्याला ई एम आय भरू शकतो. बायको जमेल तेव्हढी मदत करते. हातभार लावते. मुलगीही कॉलेज मधून आली की भाजीपाला वगैरे विकते. मग या वेळी म्हंटलं नवी कोरीच गाडी घ्यायची. आजच आणली गाडी. आता संध्याकाळी मुलगी येईल कॉलेजमधून सायकल घेऊन इथे. तेव्हा तिला प्रेझेंट. रिबन पण कापली नाही बघा.”
“अरे वा! मग छानच आहे. मी उगाच…” पुढे बोलणं माझा व्यवहारिक शहाणपणा दाखवेल पण सोबतच मी भावनाशून्य असल्याचाही परिचय देईल हे जाणवल्यानं मी थांबलो.
“खा की सर पेढा.” आनंद वाटल्याने द्विगुणित होतो आणि त्याला त्याच्या आनंदात मला सहभागी करायचं होतं. “मुद्दाम आणले पेढे. आपण मराठी माणसं कसं एक तीळ सात जणांत वाटून खाणारे आणि आज तर आनंदाचा दिवस. तुमच्या सोबत, ह्या बिल्डिंगमधल्या लोकांसोबत नमस्कार होत राहतो म्हणून आणले पेढे.”
“हो … हो … नक्कीच! जरा आत्ताच …” नुकताच सुट्टा मारून आलो होतो. डाव्या हातातल्या सिगारेटीच्या पाकिटाला सांभाळत तर्जनी मध्यमा मुठीतून विलग केले आणि तोंडाजवळ नेऊन सिगारेट ओढल्याचा अभिनय केला.
“बरं… बरं…” हसत हसत त्याने हात हलवला. “भेटू उद्या!”
“हो… हो…” मी ही तिथून निघालो. तसा मला स्मॉल टॉक्स करण्यात अजिबात रस नाहीये आणि केवळ ह्याने केलेल्या हसतमुख चर्चेचा मान राखावा म्हणून हाती पेढा घेऊन मी गप्पा मारल्या होत्या. तिथून सटकलो अन हातातला तो तेलकट पेढा मी ऍश ट्रे च्या काठावर ठेवला आणि लॅपटॉपच्या की पॅड च्या बटणा खाट खट खट्ट दाबत कॉपी पेस्ट एडिट करत माझा प्रोजेक्ट डेडलाईन पर्यंत संपवण्याच्या मागे लागलो.
“ट्विन्ग!” लॅपटॉपची बॅटरी २० टक्क्यांवर आली होती आणि अलार्मने माझे डोळे उघडले. प्रोजेक्टचा कोड बॅकग्राउंड मध्ये रन होऊन गेलेला होता. हवं ते परिणाम साध्य झालं होतं. शेगडीवर दुपारचा उरलेला चहा भांड्यात तसाच पडून होता. त्यावर साय जमा झाली होती. एक उकळी आणली. कपमध्ये चहा गाळून घेतला. सिगारेट शिलगावली आणि गॅलरीत आलो. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता. अंधार पडायला सुरुवात झाली होती. बाहेर वातावरण ढगाळलं होतं. गार वारा सुटायला सुरुवात झाली होती. पाऊस पडणार कदाचित!
कप गॅलरीच्या कठड्यावर ठेवून मी एक मारला. खिशातून मोबाईल काढला आणि नोटिफिकेशन्स चाळले. व्हाट्स ऍप ग्रुप वर सोसायटीचा मेंटेनन्स कमी व्हावा म्हणून उपाय योजना सुचवण्याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. त्यातला एक उपाय म्हंणून सिक्युरिटी गार्डस ची संख्या कमी करावी किंवा नवीन व्हेंडर आणावा ह्याकडे रहिवाश्यांचा कल झुकत चालला होता.
मी मोबाईल खिश्यात ठेवला. कप हातात घेऊन चहाचा एक घोट आणि सिगारेटचा एक कश घेतला. रस्त्यावरून त्या सिक्युरिटी गार्डची मुलगी स्कुटर घेऊन समोर निघून गेली. मागून तिचा बाप, तो सिक्युरिटी गार्ड जुनाट सायकलचे पेडल मारत पुढे पुढे सरकत होता.
वीज कडाडली. ढग गडगडले आणि टपोऱ्या थेंबांच्या सरींवर सरी कोसळू लागल्या. मी आत गेलो आणि डोळे बंद केले. झोप केव्हा लागली ते कळलंच नाही.
एक आठवडा मी घरी गेलो. मुली बघितल्या. एक पसंत पडली. तिकडून होकार येण्याची फक्त औपचारिक वाट बघावी लागणार होती. मी परतलो तेव्हा सिक्युरिटी गार्डची खुर्ची रिकामी होती. दुसरा दिवस, तिसरा दिवस… तो सिक्युरिटी गार्ड परत दिसला नाही.
चौथ्या दिवशी एक नवीन गार्ड आला. त्याने नमस्कार केला नाही. त्याचं मला काहीच वाटलं नाही. ते मला कधी अपेक्षितही नव्हतं.
त्याच्या नव्या कोऱ्या स्कुटरचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी किती काळ तो आनंद टिकेल? नसेल त्याला आणखी कुठे नोकरी मिळाली तर बँकेकडे त्या आनंदाचं साधन जप्त व्हायला काही फार असा काळ लागणार नाही. हफ्ते फेडण्यासाठी त्याने स्कुटर विकली तर नसेल? हे प्रश्न राहून राहून मनात घोळत होते. त्या सिक्युरिटी गार्डचं नावही आपल्याला ठाऊक नाही ह्याचं मला वाईट वाटलं. त्याच दिवशी मी त्याला प्रत्युत्तरी किमान नमस्कार तरी करायला हवा होता. त्या दिवशी त्याने केलेला नमस्कार एकतर्फीच राहिला.