
ढगाळ वातावरण होतं. आळसावलेल्या रविवारच्या सकाळी आकाश त्याच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसून होता. नेहमीपेक्षा जरा उशिराच जाग आली होती त्याला. ब्लॅक कॉफी घेतली, आरामखुर्ची ओढली आणि तो बसला. कधीकाळी त्याला ढगं आणि येणारा पाऊस फार आवडायचा. आता मात्र हे असलं वातावरण आणते ती खिन्नता! ही काळी ढगं पाऊस कमी आणि उदासपणाच्या भावनेतच जास्त भर घालतात असं त्याला वाटायचं.
बराच वेळ तो तसाच बसून राहिला. त्याची बायको आणि मुल अजूनही झोपूनच होते. शेवटी रविवारच नं! गरम कॉफीचा कप ओठी लावला आणि डोक्यात नोकरी सोडण्याच्या विचारांनी गर्दी करणं सुरु केलं. त्याचं नुकताच तिशीत पदार्पण झालं होतं आणि डोक्यात पांढऱ्या केसांनी उगवणं सुरु केलं होतं. कितीही धडपड केली तरी करिअर मध्ये कुठे काय समोर जाण्याची शक्यता धूसरच दिसत होती. त्याच्या अंतर्गत कौशल्याचं मूल्यमापन योग्यपणे होतं नसल्याचं त्याला जाणवत होतं. कितीही मरमर केली तरी अगदी व्यावसायिक कारकिर्द अंतर्बाह्य बदलून टाकणारी कसलीच संधी आतापर्यंतच्या कंपन्यांत त्याला मिळाली नव्हती.
त्याचा स्मार्टफोन गुणगुणला. व्हाट्स ऍप वर एक संदेश आला होता. कसला मेसेज म्हणून त्यानं बघितलं. एक व्हिडीओ क्लिप होती. त्यातल्या गर्भितार्थाने विडंबनाचाच अर्थ त्याला कळवला. त्या व्हिडीओ क्लिपमधल्या माकडापेक्षा त्याची स्थिती कुठे वेगळी होती? मदारी नाचवेल तसं ते माकड नाचायचं, कोलांटउड्या मारायचं. गर्दी चेवून गोंगाट करायची तशी त्या माकडाची आणखी दमछाक व्हायची. नाचणार नाही तर करणार तरी काय बिचारा? दिवसाअंती पुरेशी कमाई झाली नाही तर तो मदारी त्याची उपासमार करायचा, फटके द्यायचा.
बेसावध आणि लुडबुड्या माकडाला पकडणं तसं सोपं असतं. माकडाचा हात जाईल एव्हढी फट ठेवून पिंजरा लावल्या जातो. त्यात शेंगदाणे ठेवल्या जातात आणि माकड पकडणारा झाडाझुडुपामागे लपून बसतो. माहिती असलं आणि माकडानं पिंजरा बघितला तरी उपजत चौकस गुण असतो माकडामध्ये. जातो तो पिंजऱ्याकडे. शेंगदाणे दिसले की टाकतो पिंजऱ्यात हात आणि मुठीत मावतील तेव्हढे शेंगदाणे भरतो. भरलेली मूठ काढावी म्हंटली की पिंजऱ्यात हात अडकून बसतो. मुठीतले शेंगदाणे सोडता सोडण्याची इच्छा होतं नाही त्या माकडाची. मुक्ततेसाठी कितीही ओरडा केला तरी कसला सुटतोय तो? पिंजऱ्यातल्या शेंगदाण्याची हाव नव्हतो तेव्हा मुक्तच तर होता तो. आवडेल ती फळं झाडं उत्पन्न करतील ती हवी तेव्हा खाऊ शकत होता. त्याच्याच अधाशीपणाची ही शिक्षा! हातातल्या शेंगा सोडल्या की मुक्ती मिळणार हे त्याला जाणवतच नाही. मूठ सोडणं काही त्याच्याकडून होतं नाही. मेंदूतल्या मेंदूत तो बंदी होऊन जातो. माकड पकडणारा आता जस जसा झुडुपामागून बाहेर निघतो तस तसा माकड तडफडतो पण मूठ मात्र सोडत नाही. त्या माकड पकडणाऱ्याच्या हाती त्या माकडाचं भविष्य बांधल्या जातं. नाचव, कोलांट्या मार आणि काय काय कसले ते माकडचाळे करवून घेतो तो त्याच्याकडून फक्त गर्दीच्या टाळ्या आणि मिळकतीसाठी.
घर चालवण्यासाठी आकाशला सुद्धा असलेच माकडचाळे करावे लागत होते. ऑफिसमध्ये पात्रतेपेक्षा कमी दर्जाची कामं करावी लागत होती. महिनोंमहिने तीच ती कामं करून कधीही गुलाम बनणार नाही असं विचार करणारा शेवटी तो गुलामच बनला होता.
तीन वर्षांच्या चिमुकल्या हातांनी त्याचे डोळे झाकले तेव्हा तो तंद्रितून बाहेर आला. तिचं खुदखुदणारं हसणं त्याचं हसणं उमलेपर्यंत वाढत गेलं. स्वतःपेक्षा ती छोटी आणि त्याची बायको त्याच्या साठी महत्वाची होती, त्यांचीच काळजी जास्त होती. त्या गोडुल्या मुलीला, साराला त्यानं जवळ ओढलं. करिअरमध्ये कितीही जाच असला, ताण तणाव असले तरी ते सहण्याचं बळ, खिन्नतेतून त्याला खेचून काढण्याची शक्ती तिच्या हास्यात होती.
त्याचा फोन परत गुणगुणला. मोबाईलच्या स्क्रीनवर कॅलेंडरनं नोटिफिकेशन दर्शवलं. एका अति-महत्त्वाच्या प्रेझेंटेशन ची तयारी करायची होती. त्या विषयातलं काही ठाऊक नसलं तरी त्याचा वरिष्ठ ते वरच्या व्यवस्थापनाकडे वाचून सादर करणार होता. आकाशच्या मेहनतीचं कसलं काही चीज होणार नव्हतं. सगळं श्रेय तो वरिष्ठ लाटून आकाशाला परत एकदा बाजूला सरणार होता.
तरी आकाश उठला. लॅपटॉप जवळ केला. सुट्टी, कटुंब आणि स्वतःचा आनंद बाजूला ठेवून त्यानं झराझरा स्लाईड्स वरती टाईप करणं सुरु केलं.