
अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे
त्याने काहीसं चाचरत दरवाज्याबाजुची बटन दाबली. बोट चटकन मागे घेऊन तो दोन पाऊलं मागे सरला. अंगावरचा मळकट सदरसा काठाला धरून खाली खेचला. चेहऱ्यावरून उजवा हात फिरवला. डोक्यावरच्या चापून-चोपून बनवलेल्या केसांच्या भांगेला हातानेच नीट बसवलं. कसल्याशा इंग्रजी गाण्याच्या सुराचा हलकासा आवाज बाहेर त्याच्या कानात पडला आणि दरवाजा उघडण्याची वाट बघत तो उभा राहिला.
पिपहोलला एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने तिने बघितलं. “बाहेर कुणीतरी ध्यान उभं आहे. तू बोलावलं आहेस का?” तिने नवऱ्याला विचारलं.
“अगं हो. भिंतीवरचा जिप्समचा थर फोडून परत बसवायला म्हणून आपण बिल्डरला कम्प्लेंट केली होती नं. त्याच्या कडून कॉन्ट्रॅक्टरचा कुणी माणूस येणार होता. तोच आला असेल. येऊ दे त्याला आत.” रवी लॅपटॉप मधलं त्याचं काम थांबवत म्हणाला. “आणि ईशा, कम बॅक हिअर, डार्लिंग.”
तिने दरवाज्याच्या दोन टिचक्या आणि कडीला अडकवलेली साखळी काढली. फ्लॅट सिस्टीमवाल्या गृह संकुलात राहणारी मंडळींना सुरक्षा कितीही वाढवली तरी असुरक्षितच वाटत राहतं. २० – २५ वर्षांपूर्वी ईशा आणि रवी जिल्ह्याच्या ठिकाणी राहायचे आणि त्यावेळी घरची परिस्थिती चांगली असली तरी दरवाज्याला एक टिचकी किंवा कडी आतून आणि बाहेर जाणार असतील तर दरवाज्याला बाहेर कुलूप एव्हढ्या सुरक्षेच्या भरवश्यावर लोकं बिनधास्त राहायची. शेजारपाजाऱ्यांना ‘लक्ष द्या जरा.’ एव्हढी विनंती पुरेशी होती. इथे सोसायटीच्या फाटकाशी ४ सिक्युरिटी गार्ड्स, प्रत्येक पार्किंगला एक अधिकचा गार्ड असूनही प्रत्येक घराच्या दरवाज्याच्या आत ३ टिचक्या, एक साखळी, बाहेरून एक लॅच एव्हढं असून काही फ्लॅट्सना लोखंडी जाळीचा ज्यादा दरवाजा, २ कडी कुलुपांसोबत! तरीही असुरक्षिततेची भावना इथल्या रहिवाश्यांच्या मनाला सतत कुरतडत असते.
दरवाजा किंचित किलकिला करत तिने मान बाहेर काढली. नखशिखांत न्याहाळत तिने त्याला काहीशा संदेशाने विचारलं, “हां बोलो. क्या काम है?” रवीने दिलेल्या माहितीची तिने शहानिशा करण्याच्या दृष्टीने त्याला विचारलं.
” मॅडम, मैं मऊआ. वो दिवाल का काम करना है बोले थे सुपरवायजर.” काहीसा भेदरलेलाच होता तो. त्याच्या कापऱ्या आवाजातली थरथर तिला जाणवली.
कुठल्या तरी परप्रांतातल्या खेडेगावातून आलेला दिसतोय वाटतं. बोलण्यावरून तर अडाणीच वाटतो आहे. “अच्छा! आ जाओ|” दरवाजाच्या हॅन्डलला धरून तिनं दरवाजा उघडला. पायाच्या अंगठ्यावर टिकवलेली नजर त्याने तिच्या रोखाने न बघता घरातल्या भिंतीकडे वळवली. त्यानं पायातल्या फाटक्या, भुरकट झालेल्या चपला काढल्या आणि पायानेच भिंतीच्या काठाशी लावल्या. एका हातात औजारांची पिशवी आणि दुसऱ्या हातात एक रिकामं घमेलं आणि जिप्सम प्लास्टरची पिशवी उचलून तो आत शिरला. एक पाऊल घरात टिकवलं तशी तिनं दोन पाऊलं जास्तीची मागे घेऊन दोन हाताचं अंतर ठेवलं. त्याच्या मळकट कपड्यांतून घामाचा आणि सिमेंट, पुट्टी आणि कसल्याश्या रसायनांचा मिश्रित दुर्गंध तिच्या नाकात गेला. नाकाजवळचे स्नायू आखडत तिने नाकपुड्या आकुंचल्या तरी तो तीव्र गंध तिच्या मेंदूपर्यंत गेलाच.
“किधर है दिवार?” त्याने विचारलं तसं तिनं बाथरूमच्या भिंतीकडे अंगुलीनिर्देश केला.
तो थेट भिंतीपाशी गेला. त्यानं एकानंतर दुसरी लांब बाही दुमडली. त्याचा अंगाचा रंग सावळ्यापेक्षा काळ्याकडे जाणारा होता. कोरड्या हातांवर ओरखडे पडलेले होते. कुणास ठाऊक हा अंघोळ तरी करत असेल का? तिच्या मनात विचार चमकून गेला.
“मॅडम, ये दरवाजा बंद कर दो|” त्यानं बेडरूमच्या दरवाज्याकडे बोट दाखवत म्हंटलं.
हा असा कसल्या टोन मध्ये म्हणतोय याचा तिला जरासा राग आला. कोण काय म्हणतोय या पेक्षा तिला प्रत्येकाची बोलण्याची टोनिंग तिला कशी जाणवते ह्यावर ती समोरच्याबद्दल ग्रह करून घायची. ऑफिसमध्ये तिच्या ह्या सवयीमुळे कित्येक सहकारी हिच्याशी वचकूनच असायचे. सिनिअर पोझिशनला असल्याने हिच्या हाताखाली असणाऱ्यांच्या कारकिर्दींवर हिच्या मतांचा प्रभाव वार्षिक वेतनवाढीवर पडायचा.
“दिवार से बारीक पौडर निकलेंगा| सब साफ करना पडेगा काम होने के बाद|” तो पुढे म्हणाला.
“घ्या! आता कामवाली बाई गेल्यावर घर झाडझूड करावं लागणार. सुट्टीचा दिवस ही सुखाचा जाईल असं होणार नाही असं दिसतंय.”
“ये लो| कर दिया बंद|” रवी बेडरूममधून बाहेर येत म्हणाला. “ईशा, तुला बोलावलं होतं नं मी.” त्यानं तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. तिने “काय आहे हे?” अश्या अर्थाने त्याच्याकडे बघितलं. कुण्या परक्यासमोर तिचं नाव का हा माणूस घेतोय? कित्येकदा त्यानं तिला भाजीवाल्यासमोर, कामवाल्या बाईसमोर, दूध टाकणाऱ्यासमोर, गार्डसमोर तिला नावानं बोलावलं तेव्हा तेव्हा तिनं तिचं नाव असं कुणासमोरही नको घेत जाऊ म्हणून कित्येकदा बजावलं होतं. जे नाव ज्या व्यक्तीचं आहे तिला त्या नावाने का बोलावू नये तर हिला हिचं नाव फारंच पवित्र असल्यासारखं वाटायचं. कसल्याश्या श्रेष्ठत्त्वाची भावना हिच्या नावाशी तिनं जोडून घेतली होती. जवळच्यानी आणि आपल्या तोलामोलाच्या व्यक्तींनीच नावाने हाक मारावी, बाकीच्यांना आपलं नावही माहिती नसावं असा तिचं आग्रह असायचा. ह्यामागचं कारण तिच्याशिवाय आणखी कुणाला कधीच समजलं नाही.
“ठक्क… ठक्क… ठक्क…” मऊआ नं ओल आलेली भिंत फोडायला सुरुवात केली. भिंतीवरच्या जिप्समच्या थराचे तुकडे पडायला लागले. आता फरशीवर ते तुकडे पडणार, फारशी घाणेरडी होणार हे क्षणात तिच्या ध्यानात आलं तशी तीनं काहीश्या चिडक्या चेहऱ्याने त्याच्या कडे बघितलं.
त्यानं फरशीवर वर्तमानपत्राचे मोठाली कागदं पसरून ठेवली होती. छिन्नी हातोड्याने भिंतीला घाव घालून पडणारे तुकडे कागदावर पडत होते.
“चला. बरं डोकं लावलं ह्यानं.” ती पुटपुटली.
रवी तिला डोळ्यानेच “काय हे?” म्हणाला. डोळ्यांच्या कोपऱ्यांतून त्याने मऊआ कडे बघितलं. त्याला मराठी समजत नसणारच पण उगाच का त्याला घालून पडून बोलावं?
मऊआ मात्र काय घडतंय या मागे लक्ष न देता काम करत होता. भिंतीचा भाग फोडून झाल्यावर त्यानं खाली पडलेले तुकडे आणि भुगा नीट वेचून एका बाजूला कागदावर जमा करुवून ठेवला. त्याने नीटपणे पिशवीतून जिप्सम प्लास्टर काढलं. घमेल्यात हवं तेव्हढं घेऊन त्याने पिशवी भरून ठेवली.
“पानी ले लूँ?”
“हाँ, ले लो! बकेट और मग बाथरूम में ही है| वहीं ले लो|” रवी त्याच्या कडे बघत म्हणाला.
“जी, काम होने के बाद सब साफ़ कर के वहीं रख दूंगा|” काहीशा घाबऱ्या स्वरात महूआ म्हणाला.
रवीच्या लक्षात त्याचा घाबरा स्वर आला नाही पण ईशाने तो बरोबर ताडाला. पण आपल्याला काय त्याचे म्हणत तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.
“कोई बात नहीं| रख़ दो वैसे ही| बकेट और जार थोड़े ही मैला होने वाला है|” रवी असं म्हणत दिवाण खोलीत आला. हातात टीव्हीचं रिमोट कंट्रोल घेतलं आणि टीव्ही सुरु केला. आवाज बंद करून फक्त चॅनल्स बदलणं सुरु होतं. ईशा ने डोळे वटारले पण रवीचं त्याकडे लक्षच नव्हतं. घसा खाकरल्यासारखा करत तिनं रवीचं ध्यान स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला पण तो कसलं ऐकतोय म्हंटल्यावर ती सहज वाटावं अशी स्वयंपाक खोलीत गेली.
फ्रिजवर हार ठेवून तिनं महूआला विचारलं, “कितना समय लगेगा ये सब पुरा होने में?” खरं तर हा प्रश्न तिनं विचारण्याची काही गरज नव्हती आणि तशी ती अनोळखी व्यक्तींशी स्वतःहून कधी फारशी बोलत सुद्धा नव्हती. रवीनं मान तिच्याकडे वळवली. तिनं बेमालूमपणे फ्रिज वरती ठेवलेलं वॉलेट हातानं झाकून खिश्यात सरकवलं.
“दस मिनट में प्लास्टर कर दूंगा| दिवाल सुखते सुखते तिन चार दिन लाग जायेंगे| एकदम ठीक काम कर दूंगा मॅडम| कोई चिंता कि बात नहीं|” त्यानं पहिल्यांदा मान वर करून तिच्याकडे बघितलं. घमेल्यात मिश्रण फेटणं सुरूच होतं. चर्येवर तणावाच्या रेषा झर्रकन उमटल्या. “बाद में बाथरूम के टाईल्स और कार्नर कार्नर में फिलिंग कर देंगे| फिर पानी नहीं जायेगा दिवाल में| एकदम ठीकठाक काम कर दूंगा|” त्यानं “ठीक” वर भर देत परत आश्वस्त केलं.
“अच्छा!” तिनं बोलणं त्रोटकपणे कापलं आणि ती दिवाणखोलीत परतली. तो काय करतोय ह्याकडे लक्ष देता येईल अशा ठिकाणी खूर्ची सरकवून ती बसली.
“यु शुड बी केअरफूल!” तिनं रवीला म्हंटलं आणि त्याच्या दिशेनं त्याचं वॉलेट फेकलं. कडेला डोळे फिरवत तिनं “काय हे? तिथे भरलेलं पाकीट आहे आणि तसंच ठेवून आलास तू.” अशा अर्थाने रवीला सुनावलं. शारीरिक श्रम करणारी किंवा लहान सहान कामं करणारी मदतनीस ह्यांच्यावर तिचा कधीच विश्वास नसायचा. ऑफिसमधल्या ऑफिस बॉय किंवा हाऊसकिपींग वाली बाई कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे कामं करून कित्येक वर्षांपासून टिकली होती. त्यांच्यावरही हिचा संशय असायचा. इथे महुआ तर दहा-पंधरा मिनिटांचं काम करण्यासाठी आला होता. त्यानं पाकीट नाही तर एखादी नोट लंपास केली असती म्हणजे? असा विचार तिच्या डोक्यात घोळत होता. तसं बघता वर्तमानपत्रात अशा घटना प्रसिद्ध व्हायच्या अधूनमधून. न्यूजचॅनेल्स वर कित्येकदा असल्या बातम्याही तिनं ऐकल्या, बघितल्या होत्या.
“ही हॅज कम टू फिनिश हिज टास्क. लेट हिम डू इट अँड चिल|” रवी चॅनल्स बदलून कंटाळला आणि सोफ्यावरून उठला. “चहा पिणारेस?” त्यानं ईशाला विचारलं. तिनं मानेनंच हो म्हंटलं.
रवीला चहा पिण्याची आणि पाजण्याची फार हौस! स्वयंपाकखोलीत जाऊन त्याने गॅस शेगडीवर भांडं चढवलं. तीन कप दूध, दोन चमचे साखर भांड्यात टाकली. दूध गरम होईस्तो वेळ काढायचा म्हणून त्यानं विचारलं, “क्या नाम है तुम्हारा? भूल गया मैं|”
“जी, मऊआ|” भिंतीवर प्लास्टर लावत तो म्हणाला.
“मऊआ| मतलब?” कुणाच्या नावाचा अर्थ जाणून घायला रवीला आवडायचं. ईशा मात्र हा का बोलणं वाढवतोय? म्हणून तिच्या कपाळावरच्या आठ्या पाडीत मोबाईल मध्ये कँडी क्रश खेळत होती. तासनतास कँडी क्रश खेळून ती निष्णात पातळीवर पोचली होती. कोणतीही लेव्हल ती फारशी मन न लावता सुद्धा जिंकायची.
“हमारे यहाँ एक पेड़ का नाम है मऊआ|” त्याला याआधी कुणी नावाचा अर्थ विचारला नव्हता. काहीशा आश्चर्याने आणि आनंदाने त्याने सांगितलं.
“अच्छा! बढ़िया नाम है| मैने पहली बार सुना है|” पातेल्यातलं दूध उकळलं होतं. त्यात तीन छोटे चमचे चहापूड टाकून त्यानं चिमूटभर विलायची ची पूड टाकली. चहा मसाल्याच्या बरणीतून अर्धा चमचा मसाला टाकला. आच मंद केली आणि आता आणखी पाच-सात मिनिटं ते मिश्रण त्याने उकळायला ठेवलं.
“जी, गाँव में ऐसेही नाम रख़ते हैं| कुछ खास मतलब तो होता है नहीं|” महुआ वेगाने भिंत प्लास्टर करत होता. पहिलेचा घाबरा, कातर स्वर काहीसा नाहीसा झाला होता.
रवीनं मोबाईल मध्ये महुआ टाईप केलं. विकिपीडिया वर त्याला माहिती मिळाली की महुआ किंवा मोहाचं झाड आदिवासींसाठी एक महत्त्वाचं झाड आहे. त्याच्या फुला-फळांचा उपयोग गोडासारखा करतात आणि त्याची दारूची झिंग काही औरच म्हणून पारंपरिक संस्कृतीत त्याला वेगळं महत्त्व आहे. त्यानं ही माहिती त्याला सांगितली आणि तो ही हसत हसत “हाँ…हाँ…” करत राहिला. त्याच्या पिवळसर लाल दातांची मंडळी झळकली आणि त्याचं त्यालाच कसंतरी वाटलं म्हणून त्यानं तोंड बंद केलं. ईशा मधून मधून त्याच्या कडे लक्ष ठेवून होतीच.
रवीची ही कुणालाही बोलतं करण्याची, मोकळं करण्याची कला तिला कधीच नीटशी कळली नव्हती. तिला कौतुक मात्र वाटायचं. पण अशा ध्यानावरती ही कला का वापरा?
महुआ बाथरूममध्ये टाइल्सच्या दरम्यान फिलिंग भरायला गेला आणि रवीच्या ओठांतून
“किसी की मुस्कुराहटों पे हो निसार…
किसीका दर्द मिल सके तो ले उधार…
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार…
जीना इसी का नाम है|”
गाण्याची शीळ सुरु झाली.
चहा एव्हाना उकळला होता. गाळणीतून त्यानं तीन कपांमध्ये ओतला. ट्रे मध्ये तीन कप ठेवले. पाच-सहा बिस्किटं आणि पाण्याचे तीन प्याले ठेवले. दिवाण खोलीत टी-पॉय वर नीट मांडून ठेवले आणि महुआच्या काम संपवून येईस्तोवर सहज मॅगझीन चाळत राहिला.
“सर, अभी पाँच-छै घंटे बाथरूम फिलिंग को पक्का होने तक में पानी मत बहाईये|” एव्हढं म्हणत त्यानं त्याच्या सामानाची सारवा-सारव सुरु केली. औजारं पिशवीत भरली. घमेलं वर्तमान पत्रानं पुसून कोरडं केलं. “हो गया सर| देख लिजिए| कुछ बचा हो तो बताइए|”
“अरे ठीक है| इधर आओ| चाय पानी पि लो|” रवी मॅगझीन मधून मान न काढताच म्हणाला.
“नहीं सर|… मैं… मैं… जाता हूँ| आप काम देख लें|” त्याच्या आवाजातली थरथर परतली. तो सूक्ष्म बदल ईशाला जाणवला तशी तिनं त्याच्या कडे बघितलं.
“अरे| ऐसा कैसे? इतना काम किया| चाय तो ले लो भाई|” रवी म्हणाला.
“सर, ये हाथ सिंक में धो लूँ?” हो नाही… हो नाही करत शेवट त्यानं विचारलं.
“धो लो| कोई बात नहीं| वहाँ हैंड वाश भी है| यूज़ कर लो|” ईशा त्याला म्हणाली.
महुआ ने पहिले पिशवी आणि घमेलं हाती घेतलं. दिवाण खोलीत आला. “सर जरा दरवाजा…”
“ओ| हाँ!” म्हणत रवीनं दरवाजा उघडला. महुआ नं सामान बाहेर भिंतीला टेकणार नाही अशाप्रकारे ठेवलं. परत आत आला.
“अभी हाथ धो लेता हूँ|” तो सिंक कडे गेला. हात व्यवस्थित धुतले आणि दिवाणखोलीत परतला. वर केलेल्या बाह्या त्यानं उलगडल्या. मनगटापर्यंत लांबवल्या. बटणं लावलीत. ईशाची नजर त्याच्या हातांवर तोवर गेली होती. कोरड्या त्वचेवरची ओरखडे पाण्याने मिटली होती. आणखी कुठल्या फ्लॅट मध्ये जाईल तो परत त्याच्या हातांवरती ओघळ आणि ओरखडे दिसतील. तिला वाटलं.
रवीनं त्याला स्टूल दिला, “लो|”
तो स्टूलवर बसला. काहीसा अवघडुनच. त्यानं काचेच्या प्याल्यातलं पानी वरूनच प्यायलं. चहाचा कप ओठांना लावला आणि “फूं S S S … फूं S S S …” करत त्यानं सुरका मारला. चहा तसा गरमच होता. जीभ पोळली असेल तरी “सुरर … सुरर…” करत त्यानं चहा प्यायला सुरुवात केली.
त्याच्या “फूं S S S … फूं S S S …” आणि “सुरर … सुरर…” च्या आवाजाने ईशाला कसंतरी वाटत होतं आणि तिच्या चेहऱ्यावरच्या आठ्या आणि भाव झरझर बदलत होते. तिला किळस यायला लागला होता.
शेवटी चहा संपवला आणि “बढ़िया बनी चाय, सर|” म्हणत त्यानं तृप्ततेची ग्वाही दिली.
“और चार- पाँच दिन के बाद कुछ गिलावा वगैरह दिखा तो सुपरवाईजर सर को बोलियेगा| वैसे कुछ होगा तो नहीं| अच्छा ही काम किया है|” एव्हढं बोलून तो दरवाज्याकडे निघाला. रवीनं दरवाजा उघडला आणि “थँक यू|” म्हंटलं.
पायात वहाणा सरकवत, हातात पिशवी आणि घमेलं घेत तो लिफ्ट पाशी गेला आणि रवीनं दरवाजा लावला.
टी-पॉय वरचा चहाचा कप हाती घेऊन त्यानं महुआची नक्कल करत सुरकी मारली, “सुरर … सुरर…”
“स्टॉप इट! यू नो आय हेट इट!” ईशा नं रवीकडे रागानं बघितलं आणि मोबाईल बाजूला ठेवून त्याला विचारलं, “अँड हू विल क्लीन धिस मेस नाऊ?”
“व्हॉट मेस? बघ त्यानं अगदी प्रोफेशनल काम केलंय. जराही प्लास्टर किंवा पावडर वगैरे मागे ठेवली नाहीये.” रवीने तिला वस्तुस्थिती दाखवत म्हंटलं आणि परत एकदा “सुरर … सुरर…” करत चहाचा घोट घेतला. यावेळी मात्र ती लटक्या रागात हसली आणि चहाचा कप ओठांना लावला. “ओये. इट्स पिपींग हॉट. कसा काय प्यायला तो घटाघटा कुणास ठाऊक?”
“डार्लिंग! चहाची चवच तशी आहे आपली.” स्वतःची प्रशंसा करत त्यानं म्हंटलं.
काही वेळ तसाच गेला आणि रवीच्या मोबाईल ची रिंग वाजली. त्यानं फोन उचलला आणि कुणाशी तरी बोलू लागला. सुपरवायझर असावा बहुतेक… रवीच्या बोलण्यावरून वाटत होतं. तोवर ईशाने ट्रे आणि कपं स्वयंपाकघराच्या सिंक मध्ये ठेवली. महुआ नं हात लावलेला प्याला आणि कप तिनं सिंकच्या एका कोपऱ्यात ठेवला. कामवाली बाई आली की तिच्या हातानं ती धुवून घेणार होती. बाकी दोन प्याले आणि कपं तिनं विसळून ठेवली.
पाचेक मिनिटं झाली असतील. रवीनं फोन ठेवला.
“अगं ऐकतेस का? सुपरवायझरचा फोन होता. काम कसं झालं ते विचारत होता.”
“ओके! मग?”
“मग काय? काम छानच झालंय. म्हणजे आठवडा भरानं स्थिती काय होते सीपेज ची आणि भिंतीची ते कळेल तेव्हा सांगू. बरं. तो आला होता त्याचा रिव्यू मागितला त्यानं. मी सरळ फाईव्ह स्टार्स दिलेत. उत्तम! मग तो म्हणाला की आपण त्याला चांगली वागणूक दिली वगैरे! तर सुपरवायझर म्हणाला की आपल्याच सोसायटीत कुणाकडे तरी असलंच काम करायला गेला होता म्हणे तो तर त्याला त्या कामाशिवाय जास्तिची कामं करायला लावलीत म्हणे. वरून टॉयलेट रूमसुद्धा साफ करून घेतली म्हणे. का? तर प्लास्टर ची थोडीशी पेस्ट फ्लोर ला तशीच राहिली होती म्हणून.”
“व्हॉट?” तिनं अविश्वासानं विचारलं. “हे म्हणजे फारच झालं.”
“हो नं. हा म्हणे पार प्रांतातून, आदिवासी भागातून अशिक्षित, अकुशल कामगार म्हणून शहरात आलेला. गवंडीकामात रस म्हणून याला सुपरवायझरनं त्याच्या टीम मध्ये भरती करून घेतलं. तर त्या घरी म्हणे त्याच्या सोबत हे असं घडलं. त्यावरही कहर म्हणजे तो जेव्हा जात होतं तेव्हा त्यानं हात लावलेली प्लास्टिक ची बकेट, मग आणि फ्लोर साफ करण्याचा कापड पण त्याला घेऊन जायला सांगितला होतं म्हणे. वॉशरूम पासून त्याला उलटं चालत जाऊन, त्याचं पाऊल फडक्यानं साफ करायला लावून त्याला बाहेर काढलं होतं म्हणे. बाय द वे, हा त्या कॉन्ट्रॅक्टर कडचा सर्वांत आज्ञाधारक कामगार आहे म्हणे.” रवीनं सांगितलं तसं त्याच्या अवघडलेपणाचं, घाबरण्याचं आणि कापऱ्या आवाजाचं गुपित हळूहळू उलगडायला लागलं होतं.
“टू-थ्री बी एच के वाल्या शिकलेल्या, आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्यांची बौद्धिक, भावनिक कोरडेपणाची आणि वैचारिक बुरसटलेपणाची किती कीव करावी? असा अनुभव आताच्या काळात लोकांनी त्याला द्यावा याशिवाय मागासलेपणाचं आणखी लक्षण ते दुसरं काय?” रवी चुकचुकला आणि इकडे ईशा मनात महुआ दाराशी आला तेव्हापासून आपण त्याच्या विषयी काय काय समज बाळगून होतो त्याबद्दल ओशाळत होती. आपसूकच तिचा हात सिंकच्या कोपऱ्यापाशी ठेवलेल्या त्याच्या प्याल्या आणि कप कडे गेला. सिंक मधला नळ सुरु करून तिनं कप आणि प्याला स्वतः धुवायला सुरुवात केली. त्यासोबतच तिच्या मनातला तिच्या वागणुकीचा मळही धुतला जात होता. रवीनं त्याच्या आवडत्या ओळी गुणगुणायला सुरुवात केली.
“किसी की मुस्कुराहटों पे हो निसार…
किसीका दर्द मिल सके तो ले उधार…
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार…
जीना इसी का नाम है|”