(अंदाजे वाचन वेळ : १५ मिनिटे)
शंभूदास शास्त्री पालकवाडी गावातले जुणे बुवा होते. पिढ्यानपिढ्या त्यांचं घराणे पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडे धार्मिक विधी संपन्न करायचे. कालांतराने त्यांचे नातेवाईक इतरत्र स्थायिक झाले आणि शंभूदास पालकवाडीचे एकुलते शास्त्रीबुवा उरले. साठीकडे झुकलेले शास्त्रीबुवा स्वभावे मवाळ आणि पापभिरू! अंगाची अगदी काडी झालेली असली तरी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून पूजा प्रार्थना आटोपून गावच्या मध्यास असलेल्या शिवाच्या मंदिरात भाविकांची सेवा करण्यात त्यांचा दिवस जायचा. कधी कुणाच्या घरून पूजाविधी वगैरे करण्यासाठी बोलावणं आलं तर तेवढा वेळ मंदिरातून बाहेर पडायचं आणि परत लगबगीने परतायचं हाच शास्त्रीबुवा चा दिनक्रम! त्यात व्यत्यय नाही. उन्ह, पाऊस, हिव कशाचीच कधी तमा नव्हती. धर्म हाच त्यांचा जीव आणि तोच प्राण! पैसा अडका, जमीन जुमला यांपैकी कशाचाच मोह नसला तरी जीवन जगण्यापुरती तरी अर्थार्जन करावे येवढे व्यवहारी नक्कीच होते आणि अविवाहित असल्याने पुढल्या पिढीसाठी काही द्रव्य कमवावे अशीही बाब नव्हती. काळाच्या गरजेनुसार बदल होत गेला तरी मूळचे बुवा होते तसेच ‘देवाने दिधले, तैसेचि!’ राहीले.
पालकवाडी गावामध्ये दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात पंचक्रोशीतील गावकरी मंडळी बाजारहाट करायला यायची. छोटी मोठी व्यापारी, दुकानदारं त्यांची दुकानं थाटायची. बाजारहाट झाली की फिरत फिरत गावकरी मंदिरात दर्शनाला यायची.
एका छोट्याश्या उंच टेकडीवर हे शिवाचं मंदिर वसलेलं होतं. शिवाच्या मंदिरा भोवताली हा बाजार भरायचा. टेकडीच्या पायथ्याशी थाटलेल्या बाजारात काय घडतंय ते दिसायचं. लोकं जमली की तो जनप्रवाह एखाद्या नदीप्रवाहा समान भासे. शास्त्रीबुवा कधीमधी मंदिराबाहेर बहरलेल्या बेलाच्या वृक्षाखाली शंभूनामाचा जप करीत बसायचे.
एका दुपारी नामस्मरण करून बुवा मंदिराला प्रदक्षिणा मारत असताना त्यांचं लक्ष एका छोट्या ठेल्याजवळ होत असलेल्या घटनेकडे गेलं.
टपोऱ्या डोळ्यांत मोती सारखे चमचमणारे अश्रूंचे थेंब पुसित तो एका दुकानाच्या कोपऱ्यात थरथरत उभा होता. सभोवताली रागीट माणसांच्या घोळक्यात तो पांच- सहा वर्षांचा पोर हुंदके देत मान खाली घालून उभा होता.
“काय रे चोरा, लाज वाटत नाही होय रे चोरी करायला.”
“दे दणके त्याला.”
“हाण एक मुस्काटात.”
“नको, पोलिसात दे.”
“एवढासा आहे, पण चोरीची हिम्मत बघा त्याची.”
“मायबापाने हेच शिकवलं दिसतंय.”
एकामागून एक शिव्याशाप देणं सुरू होतं.
एकाने हात उगारला.
त्याची थरथरती बारीक अंगकाठी कधीही कोलमडून पडेल अश्या अवस्थेत तो घाबऱ्या चर्येचा पोर कोणत्याही क्षणी मार पडणार या भीतीने किंचाळला.
मार देणारा हात वरचेवर अडला आणि दुसऱ्या एका थरथरत्या हाताने त्या पोराला पोटाशी कवटाळलं.
“शास्त्रीबुवा, बाजूला व्हा! या चोराला शिक्षा मिळू द्या.” एक दुकानदार रागा रागाने ओरडला.
“नाही!” शंभुदासांच्या आवाजातील तो ठाम स्वर ऐकून तो दुकानदार जरासा थबकला. “काय झालं? अरे, एवढासा पोर तो. त्याच्या अंगावर एवढी सगळी जणं धावून आली आहात. घाबरला य किती तो. बघा जरा.”
“अस्सल चोर आहे तो. देवाला वाहायचा प्रसाद म्हणून काढून ठेवलेला प्रसाद चोरलाय त्याने.” त्या दुकानदाराचा स्वर वाढला.
“बरं बरं, अरे जाऊ दे रे. मुले देवघरीची फुले. अजाण बाळ म्हणून सोडून दे.” शास्त्रीबुवा समजवणीच्या स्वरात त्या पोराला आणखी जास्त कवटाळून म्हणाले.
“तुमच्या वयाचा आदर म्हणून एकवेळ मानेल तरी…”
शास्त्रीबुवानीं हातानेच ‘थांबा’ करीत खाली बसत त्या पोराच्या हनुवटीला उंचावून विचारलं, “कोणाचा रे तू? कुठून आलास? कोण मायबाप तुझे?”
तो बोलेच ना. त्याचे काय हुंदके आणखी वाढले.
“अरे बाळा, मी आहे इथे. कुणी नाही काही करणार.” त्यांनी त्याला धीर देत त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.
कुणास ठाऊक, त्या पोराला या म्हाताऱ्या किडकिडीत अंगाच्या माणसावर विश्वास ठेवावासा वाटला.
“शब्बीर.”
एवढं म्हणताच एव्हाना शांत होत असलेली गर्दी आणखी चिडली.
“बघा. आणखी काय अपेक्षा करणार. आमच्या देवाच्या प्रसदावर टिपलाय. आणखी किती धर्म भ्रष्ट करणार. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता याला चांगला चोप देऊन धाडा पोलिसांकडे.”
जमलेल्या घोळक्याने एकच गोंगाट केला.
“नहीं! नहीं! मुआफि. अल्लाह! मुआफि!” शब्बीर परत रडकुंडीला आला.
“कुणी हात लावणार नाही याला.” शास्त्रीबुवा च्या आवाजात धार आली. “खबरदार!”
बुवांचा हा स्वर ऐकून गर्दी पार चपापली.
“पण, आपल्या देवाचा प्रसाद पळवतोय तो. त्याला शिक्षा द्यायलाच हवी. आम्ही नको तर पोलिसांच्या हवाले करा. पण असा त्याला सोडायचा नाही.” दात ओठ खात दुकानदार म्हणाला.
“नाही. हा निरागस पोर आहे. मी याला आश्रय देतोय. कुणीही याला हात लावणार नाही.”
“अहो बुवा, राहू द्या की! याला अद्दल घडायची आहे अजून.”
“याच्या जागी तुमचं पोर असतं तर तुम्ही त्यालाही असंच वागवलं असतं का? आणि त्याने काही जाणून केलं नसेल. लागली असेल भूक त्याला, घेतला असेल प्रसाद त्याने, म्हणून काय झालं? क्षमा करा आणि जाऊ द्या. हवे तर हे घ्या प्रसादाचे पैसे…” असं म्हणत बुवांनी दुपट्टयाच्या टोकाला गुंडाळलेले नाणे काढले.
“बुवा, राहू द्या. तुमच्या कडून नको हे पैसे. काय योग्य आणि न्याय्य ते धर्मानुसार तुम्ही ठरवा. आमच्या अंगाला नको पाप लागायला.” असं म्हणत तो दुकानदार मागे सरला. जाता जाता राग काढावा म्हणून दातांखाली ओठ दाबित हाताचा पंजा त्या पोराला उगीचच धमकावावा म्हणून दाखवायला.
“हं!” शंभुदासंनी विरोध दर्शवला.
हळूहळू बघ्यांची गर्दी पांगायला लागली.
शब्बीर अजूनही भेदरलेल्या नजरेने सभोवताल बघत होता. आपण वाचलोय यावर त्याला अजूनही विश्वास बसला नव्हता. टपोऱ्या डोळ्यात पाणी आणून त्याचं सत्य तो बोलायचा प्रयत्न करत होता. हुंदके देत देत म्हणाला, “मैं … परशाद नाही चुराया। बाजार में खो गया… अम्मी अब्बू चाहिए।” हुंदके अनावर झाल्याने तो परत मान खाली घालून रडू लागला.
“उगी उगी, बाळा. कुणी काही नाही करणार तुला. आहे नं मी इथे.” शंभू दास बुवा समाजवणीच्या सूरात म्हणाले. “हरवलायस तू कधीपासून? तुला भूक तहान लागली असेल नं बाळा.” स्वतः जवळच्या पिशवीतून एक लाडू काढून त्यांनी शब्बीरच्या हाती ठेवला.
शब्बीरच्या टपोऱ्या डोळ्यात परत पाणी तराळले. हरवलेला असला, तहान भूक लागली असली तरी कुण्याचे उपकार घ्यायचे नाही असं त्याच्या अम्मी अब्बू ने शिकवलं होतं. त्या दुकानाच्या पाटी वरून जमिनीवरून पडलेल्या प्रसादाच्या पुड्याला उचलून परत ठेवावे आणि अम्मी अब्बू येईपर्यंत एखाद्या ठिकाणी शांत बसून राहावे असा विचार करून त्याने तो प्रसादाचा पुडा उचलला होता. नेमका त्याच वेळी त्या दुकानदाराने त्याला चोर ठरवलं. त्याला स्वतःला सिद्ध करायला सुद्धा वेळ दिला नव्हता. इतरांच्या नजरेत आपण चोर ठरतोय आणि अम्मी अब्बू च्या इज्जतीला आपण डाग लावला असं त्याला वाटत होतं. बुवांनी हाती ठेवलेला प्रसादाचा लाडू बघून याचा अर्थ काय लावावा त्याला समजत नव्हतं. भूक तर लागलेली, शिवाय हरवून फार उशीर झाला होता.
त्याच्या द्विधा मनस्थितीला बघून बुवांनी त्याला गोंजारत म्हटलं, “हा बघ हां लाडू खाऊन घे. तुझ्या आजोबा सारखा न मी, असं समजून खाऊ म्हणून खा. पाणी पी आणि मग आपण तुझ्या आई बाबांना शोधू.” आणि मायेने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. रडून रडून सुजून लाल झालेल्या डोळ्यांनी शब्बीर ने बुवांकडे बघितलं आणि लाडूचा घास घेतला.
थोडा वेळ झाला असेल. शब्बीर चे अम्मी अब्बू त्याला शोधत शोधत तिथे आले. त्याच्या अम्मी ने शब्बीर चे पटापट मुके घेऊन त्याला पोटाशी घेतलं. त्याच्या अब्बूला आजू बाजूच्या दोघा-तिघांनी झालेली घटना सांगितली. शंभुदासांनी त्याला बाजूला घेऊन काही सांगण्याच्या आधीच त्याच्या अब्बूने शंभूदासांचे आभार मानले. “शुक्रिया! शुक्रिया!” कित्येकदा म्हणत ते कुटुंब तिथून परतीला निघालं. शंभू दास शिवनामाचा जप करीत मंदिराकडे फिरले. हातातला उरला सुरला प्रसादाचा लाडू तोंडात भरून आकाशाकडे बघत बुवां च्या दीर्घायू साठी दुवा मागित अब्बूच्या खांद्यावर बसून शब्बीर मान वळवून बुवांची काटकी शरीरयष्टी अदृष्य होईपर्यंत बघत राहिला.
वर्षां मागून वर्ष सरीत गेले. पालकवाडी वाढत गेली. बाजारपेठ वाढत गेली. आणि शंभूदास शास्त्री वार्धक्याने झुकत गेले.
ऐंशी कडे झुकलेल्या शरीराचं ओढणं खेचत शास्त्रीबुवा पालकवाडीची वेस ओलांडून निघाले. आपली शिवाची शेवटची साधना मध्यप्रदेशीच्या पशुपतीनाथ मंदिरात व्हावी असा मानस धरून त्यांनी पालकवाडीचा निरोप घेतला.
सूर्य मावळल्यानंतर दोनेक तासाने बस अचानक बंद पडली म्हणून प्रवासी खाली उतरले. पशुपतीनाथ मंदिर इथून १०-१२ किलोमीटर अंतरावर असेल पण बस बंद पडली तेही रानात. जवळच्या धर्मशाळेत सर्वांना विश्रांती करायची आणि सकाळी मंदिरा कडे कूच करायचं सगळ्या प्रवाश्यांचं एकमत झालं. शास्त्रीबुवा अंगाच्या वळकटीला सरळ करून कन्हत बस मधून उतरू लागले. वार्धक्याने थकलेल्या शरीराला प्रवास झेपत नसला तरी आयुष्याच्या शेवटी शिवाच्या चरणी प्राण जावा हीच एकुलती एक इच्छा धरून केलेला प्रण संपूर्ण करावा यासाठी त्यांनी थरथरलेल्या पायांनी सहप्रवाशांसोबत पैदल प्रवास सुरू केला.
कधी कुणाचा आधार घेत, कधी धापा लागलेलं शरीर मार्गा च्या कडेला असलेल्या झाडाला टेकत तर कधी अडखल अडखळत त्यांनी सुरुवात केली. काही अंतर चालून गेल्यावर थकल्याने बुवा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली बसले. कण्हत, “शिव, शिव” म्हणत डोळे मिटले. किती वेळ सरला त्याच भान नाहीसं झालं.
डोळे उघडले तेव्हा समोर काहीच दिसेना. सर्वत्र काळोख. आकाशी नभाआड चंद्राच्या उजेडात जेवढं दिसेल तेवढाच काय तो प्रकाश. दाट रानावनात उंचच उंच वाढलेल्या वृक्षांच्या शाखांनी पांघरून घातलेलं, त्यामुळे रस्ताही नीट दिसेना. वार्धक्यामुळे बुवांची दृष्टी अशक्त झालेली. अशा परिस्थितीमध्ये मानसिक आधारासाठी शिवनामाचा जप करीत चाचपडत, हळू हळू, बुवांनी एक एक पाऊल टाकत मार्गक्रमण करायला सुरुवात केली.
काळोखात झुडुपाचा आधार घेऊन लपलेल्या भुरट्या चोरांचे डोळे चमकले. एकटं सावज, ते ही म्हातारं. अशी आयती शिकार गवसल्यानं त्या तीन चोरटयांनी बुवांना गाठायला डाव रचायला सुरुवात केली.
“गभण्या, तू तिकडून जाय. बारक्या तू कोयता सोबत ठीव. बुडगं शायनेपना करन न्हाई, तरीबी कोयता दिसला तं तसंच टरकन.” डुबऱ्यानं फटाफट निर्देश द्यायला सुरुवात केली.
“अबे, थे बुडा आपल्याले पाहीन तं चिल्लावन नं. समोरचे लोक गेले त्यायच्या पैकी कोणी येईन तं आपले तं वांधे होतीन.” गभण्याने आपला विचार मांडला.
“हे पाय, ते लोक लै म्होरं गेली. आता काई कुनी येनार बिनार न्हाई. आलंच तं हे जंगल आपलंच व्हय. कोणाच्या बा च्या बी हातात आपण लागत नाही.” डुबऱ्याला पक्का विश्वास होता की हा सहज साधा डाव आहे आणि कुणाला काही कळण्याच्या आधीच आपण मोकळे होऊ. “बरं, मी असं करतो. मी त्या बुढ्याले सरळ जाऊन भेटतो. जरा गोड बोलुनशान इस्वासात घेतो. सांगतो का म्होरं गेलेल्या लोकाईनं धाडलं मले म्हूनशान. तवारीक गभण्या तू मागून दांडा घेऊन ये. बारक्या कोयता घेऊन तयार राह्यजो. थोडे आसपास या बुढ्याच्या.”
“हाव रे! थो बुडा एका उलट्या हातात मरन. कायले एवढे नाटकं करा लागते बे? जाऊन कापलं त्याले तरी कोनाले का फरक पडून रायला? आज नाय तं उद्या असंच मरन थे. आपल्याले का आज रातीले दारू प्याले पैसे भेटले तरी होते. कायले एवढा विचार करा लागते?” बारक्या ने सरळ मार्ग सांगितला.
“मले तं पटलं. तू सांग येऊन ऱ्हायला का?” गभण्याने बारक्याच्या हो त हो मिळवला.
“बरं, चला तं मंग.” म्हणत तो ही तयार झाला. “आता जाऊन राह्यलो तं कापलं त्याले तं बी का फरक पडत न्हाई तं वरतीच धाडू त्या बुड्याले.” डुबऱ्यातला क्रूर हिंस्त्र प्राणी जागृत व्हायला लागला.
“शिव, शिव.” नामजप करणाऱ्या शंभूदासांना त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय त्याची ध्यानी मनी काही कल्पना नव्हती. शिवाची उपासना करीत आयुष्य व्यतीत केलेल्या बुवांना केवळ त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती.
मानवी लांडग्यांची टोळी त्यांना चहू बाजूने घेरीत जवळ जवळ येत होती. आकाशात काळ्या नभांनी चंद्र झाकोळू लागला. अंधुक दृष्टीत धीमे धीमे चालणाऱ्या बुवांच्या मनी क्षणागणिक शांतता आणि शिवनामाचा तल्लीनता व्यापू लागली. त्यांचा मागे बारक्या, गभण्या आणि डुबऱ्या दबल्या पावलांनी पाठलाग करीत होती. आता केवळ रातकिड्यांचा किर्रर्र किर्रर्र आवाज तेवढा शांततेला आणखी भयाण करीत होता. दम लागला म्हणून, शिवदास निश्वास टाकीत एका जागी थबकले. दोन – तीन वेळा धापा टाकीत “शिव, शिव…” म्हणायला लागले. त्यांना थांबलेला बघून तिन्ही भुरट्यांनी हीच ती वेळ समजून घाट करायचा ठरवला.
गभण्याने एका हातातला दांडा स्वतः समोर धरला. दोन्ही हातांनी त्या दांड्याच्या टोकाला घट्ट आवळून त्याला जमेल तेवढा डोक्या मागे नेला. दांड्याच्या एका फटक्यात म्हाताऱ्याचा कपाळमोक्ष करायचा. म्हातारा लगेच जमिनीवर कोसळेल. बारक्याने कमरेला लटकवलेला कोयता मोकळा केला. डाव्या हातात कोयत्याची मूठ पकडून त्याच्या परजलेल्या धारेवरून उजव्या हात फिरवला. डुबऱ्याने गळ्याशी बांधलेला दुपट्टा काढून त्याची गुंडाळी केली. बुवा ओरडलेच तर बुवांच्या तोंडात कोंबण्यासाठी ती कामात पडेन अशी ती उपाय योजना होती. बुवांच्या नकळत ती तिघे त्यांना मागून घेराव घालून होती. गभण्या बुवांच्या टाळक्यात दांडा घालणार तोच गभण्याच्या पाठीत सोटा बसला. “अयाई गं!” गभण्या कळवळून ओरडला. इतर दोघांनी काही करायच्या आत “धाय” असा बंदुकीच्या बारीचा आवाज आला. आणि गाड्यांच्या दिव्यांनी ते स्थान प्रकाशित झाले. बुवा कानठळ्या बुजल्याने आणि भीतीने कानांना दोन्ही हातांनी दाबीत मट्कन खाली बसले. पुढ्यात खाकी कपडे घातलेली चार लोकं दिसली आणि तिन्ही चोरं वाट मिळेल तिकडे पळायला लागली. हाती बंदूक घेतलेला एक जण बुवांना उचलू लागला. थरथरलेल्या अंगाने बुवा उभे झाले. भीतीने त्यांच्या तोंडातून आवाजही निघे ना.
“आप ठीक तो हो?”
“कोण?” अचानक उजेडाने दिपलेले डोळ्यांची किलकिलती उघड झाप करीत बुवा कान चोळीत उद्गारले.
“मैं फॉरेस्ट गार्ड हूँ| आप अभी मेहफूझ हो|”
“धन्यवाद बाळा.” बुवांनी अजूनही किलकिलत असेलेल्या डोळ्यांनी त्या रक्षक कडे बघितलं.
त्या फॉरेस्ट गार्ड ने बुवांकडे निरखून बघीत म्हंटल, “पालकवाडीवाले पंडित जी? बरोबर का?”
“होय. मी पालकवाडीचा. तू?” शंभूदासांनी त्या रक्षकाकडे न्याहाळत विचारलं.
तो स्मितहास्य करीत बुवांकडे बघत होता. थोडा वेळ त्याच्या टपोऱ्या डोळ्यांकडे बघत शंभूदासांनी किंचित अनिश्चितपणेच म्हटलं, “शब्बीर?”
“जी, पंडितजी| मैं शब्बीर|” एव्हडं म्हणीत त्याने बुवांना आलिंगण घातलं आणि शंभूदासांच्या डोळ्यांत पाणी तराळलं.
एव्हाना त्या तिघा चोरांच्या मुसक्या बांधीत बाकीच्या रक्षकांनी त्यांना गाडीमध्ये कोंबलं होतं.
“आम्हाला जंगलात एक गाडी बंद पडल्याची सूचना मिळाली होती. या भागात चोर-उचक्के परेशान करतात म्हणून आम्ही या भागात अधून मधून रात्रीची गश्त घालायला शुरुआत केली. किस्मत से आपसे मुलकात हुई|”
“नशीब बलवंत! शिवाची कृपा!”
“इन्शाअल्लाह!”
“बराच मोठा झालास रे बाळा!”
“तुमची रहमत! वीस वर्षांआधी तुम्ही मला वाचवलं होतं. याद आया?”
“तुला कसं विसरेन? तो गोंडस निरागस चेहरा आजही आठवतोय मला. ते टपोरे डोळे आजही तसेच तेजस्वी आहेत. मोठा तेवढा शूर झालास!” बुवांना गतकाळातील तो लहानगा शब्बीर आठवला.
“त्या दिवशी तुम्ही माझं सच ऐकून घेतलंत. मला आसरा दिला. आप मेरे लिये अमन के परिंदे जैसे आये थे| तुमच्या त्या कृतीने मला मोठी शिकवण दिली. नफ़रत ने घेरलेल्या दुनियेत सच्चाई आणि मुहोब्बत शिकवलंत. नाही तर शायद जिंदगीभर मी नफ़रतचं जहर पाळत राहिलो असतो.” शब्बीरचे डोले पाणवलेत. “तुम्ही मला शैतानच्या जालातून वाचवलंत.” शब्बीर म्हणाला, “इथे जवळच एक शिव भगवानचं मंदिर आहे, पशुपतीनाथ! चला तुम्हाला तिथवर सोडून देतो.”
गतकाळी केलेल्या दयेच्या एका छोट्याश्या कृतीने आज त्यांचा जीव वाचवला होता. जीवदया भावनिक सामर्थ्याचं प्रबळ उद्देश असेल तर कित्येक पटीने आज न उद्या त्याची परतफेड होते असा विचार मणी घोळत शंभूदास शब्बीरसोबत पशुपतिनाथाच्या मंदिराकडे जाण्यासाठी गाडीत बसले.