
अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे
स्मशानाच्या फाटकाला दशरथानं थरथरत्या हातानं ढकललं. फाटकाच्या गंजलेल्या सांध्यांनी “कर्रर्रर्र… कच्च… SSS ” आवाज केला. आवारातल्या आडव्यातिडव्या वाढलेल्या बोरीच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांनी “कॉ… ऑ … SSS कॉक कांव…” करत कंठ फोडला. काळ्याकभिन्न पंखांची फडफड करत दोन-तीन कावळे होते तिथेच बसले. त्यांच्या कोकलण्याने तिथली शांतता भंगली होती. अधून मधून येणारी मयतीतली माणसं पत्रावळीत अन्न ठेवायची. त्यानं त्यांची क्षुधा भागायची म्हणून कुणाच्या स्मशानात येण्याची वाट बघत जवळपासच कावळ्यांचा जमाव विसावलेला असायचा. कित्येक दिवसांनी इकडे कुणी फिरकलं होतं.
तुंबारलेल्या लाल डोळ्यांनी भिंतीच्या आडोश्याआडून दशरथाकडे बघितलं. उजवा हात वर करून त्याने मस्तकापर्यंत नेला. त्याच्या डोळ्यांत नशेचा अंमल ओसंडून वाहत होता. शिलगलेल्या चिलीमीतून झुरके घेतल्यानं निघालेला पंधराफट्ट धुपट विळाखे घेत त्याच्या मुंडक्याला वेढत होता. अंगाचं चिपाड झालेल्या देहावर फाटका मळकट सदरा टांगलेला आणि खालती जीर्णशीर्ण झालेली विजार कापडाच्या पट्ट्यानं बांधून ठेवली होती. झोकांड्या खात तो दशरथापाशी आला. “का मंग? कोनाले आणलं आज?” त्याने तोंड उघडलं तसा घाण वासाचा भपकारा दशरथाच्या नाकी घुसला. तिथे येणाऱ्यांकडून पाच-दहा रुपयांची मागणी करत झेब्या नशेचं व्यसन आणि भूक भागवत होता. कुणी कीव येते म्हणून, कुणी स्मशानात रखवालदारी करत असेल म्हणून तर कुणी ह्याने अंगाला शिवूही नये म्हणून निव्वळ किळसपायी हाती येतील तेव्हढी चिल्लर खुर्दा त्याच्या पाशी फेकीत.
दशरथाची पंचेंद्रियं बधिर झालेली होती. इस्पितळातल्या प्रेतगृहातून नीलाबाईचा निश्चल, थंड देह गाडीत भरून स्मशानापर्यंत त्यानं एकट्यानं आणला होता. गाडीच्या वाहकानं इथवर शोधून दिलं होतं. तासभर त्या गाडीत एकटा त्या प्रेताशेजारी बसून नाही तर नीलाबाई सोबत घडलेल्या आयुष्याच्या चित्रकथेनं तो बधिर झाला होता. समोरच्या नशेडी तरुणाच्या अंगा-तोंडून निघणारी दुर्गंधीही त्याच्या बधिरतेच छेद करू शकली नव्हती.
दोन क्षण त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघणारा दशरथ आतून हादरला होता. नीलाबाईचा हा वंश? ह्याच्या हातून तिचा अंतिमसंस्कार करून घ्यायचा? त्याच्या मुर्दाड डोळ्यांत कसल्याही भावनेचा अंश असणं शक्य नव्हतं. खिशातून त्याचा चुरगळलेला फोटो उलगडून डोळ्यांसमोर धरत दशरथानं त्याच्याकडे बघितलं. फोटोत दिसणारा सुदृढ चेहरा आणि समोर दिसणारा खप्पड गालांचा, खोबणीत डोळे घुसलेला चेहऱ्यात तफावत असली तरी कुठेतरी साम्य जाणवत होतं.
“झेब्या?” त्यानं त्याला विचारलं.
“हाओ.” डोळ्यांवरच्या भुवया वर घेऊन पापण्या उघडझाप करत त्यानं उत्तर दिलं. प्रश्नार्थक हात समोर उघड केला.
दशरथानं फोटो झेब्याच्या हातात कोंबला. “तुयी माय आलीया आखरी सफराले. घेऊन जाय तिले जाळाले. तूच भेटशीन म्हणे अथी तुयी माय मराच्या आंदी. बाकीचे कुणी येनार न्हायी त तुयातरी हातानं आग लावाले सांगतलं होतं तिनं. बुढीची आखरी विच्छा होती म्हूनशान अथी आनलं.” त्याच्या कानात शब्द पडले पण नशेच्या अमलात असल्यानं त्याच्या ध्यानात यायला उशीर लागला. झिंगलेल्या आवाजात “का?… का?…” करत जागीच उभा राहिला.
दशरथानं त्याचा हात धरला आणि खेचत खेचत त्याला शववाहिकेच्या उघड्या दारापाशी आणलं. “बुढी मेली तुही.” त्याची बधिरलेली गात्रं झेब्याची स्थिती बघून तापायला लागली होती.
त्याच्या कानशिलात लगवण्यासाठी त्याचा हात शिवशिवत होता पण कोणत्या अधिकाराने तो काही करू शकणार होता? झेब्या मात्र गाडीच्या आधारानं टेकून मायच्या प्रेताकडे मुर्दाड नजरेनं निःशब्द बघत राहिला.
ह्यांच्याकडून काडीचीही अपेक्षा ठेवणं अर्थहीन असल्याचं दशरथा स्पष्ट झालं. त्यानं गाडीच्या चालकाला मदतीची हाक दिली. दोघांनी प्रेतभारीत तिरडी वाहनातून खाली काढली. नीलाबाईचं गाठोडं त्यावर ठेवलं आणि तिला घेऊन दाहभूमीकडे जायला लागले. त्या चार अपत्यांच्या माऊलीला स्वकियांचे चार खांदेही लाभले नाहीत. कुणी परकेच तिच्या प्रेताला घेऊन जात होते. या अंताचा अंदाज तिला आधीच आला होता तरी आई मेल्याचं कळताच तिचं शेवटचं लाडाचं लेकरू तरी भडाग्नी देईल आणि तिचा अनंताचा प्रवास सुकर करून देईल अशी तिची भाबडी आशा होती. झोकांड्या देत कष्टानं पाऊलं एकासमोर एक उचलून ठेवत झेब्या त्यांच्या मागे मागे जात होता.
स्मशानाच्या फाटकातून प्रवेश करत दाहभूमीच्या चबुतऱ्यापाशी पोचले. पायऱ्यांवरून चढत चबुतऱ्याच्या काठाशी तात्पुरती तिरडी ठेवून दशरथ झेब्याकडे बघत राहिला. झेब्या पाऊलं मोजत चबुतऱ्यापाशी पोचला. पायऱ्यांवर अडखळत तोल जाऊन पडला. त्याच्या दयनीय अवस्थेवर कीव येऊन शववाहिकेचा चालक त्याला उचलण्यासाठी गेला. त्याच्या आधाराला धरून झेब्या उभा झाला आणि चबुतऱ्यावर येऊन फतकल मांडून बसला. त्याच्या डोळ्यांतून आसवं गळायला लागली होती. ती खऱ्या दुःखाची की नशेने तुंबारलेल्या डोळ्यांचा दाह क्षमवण्यासाठी डोळ्यांनी आपसूक केलेला उपचार ते कळण्यास मार्ग नव्हता. त्याचा ऊहापोह करण्याची दशरथाची इच्छाही नव्हती. दशरथानं चालकाला गाडीपाशी जाण्यासाठी खुणावलं. “तू जा बाबा. यतो मी हिथलं आटोपून.”
दशरथ कामाला होता त्या धर्मदाय इस्पितळाशी संलग्न एका संस्थेनं बेवारस, निनावी, बेदावी प्रेतांच्या दाहकर्माची व्यवस्था केली होती. आतापर्यंत कित्येक प्रेतांना त्याने इथवर आणून स्वहस्ते चिताग्नी दिला होता. शववाहिकेत प्रेताला भरण्यापासून अग्नी देईपर्यंत तो निर्भाव यंत्रवत काम करत होता. बेवारस प्रेतांना अग्नी देऊन थोडं तरी पुण्य गाठीशी जमा करत जाण्याच्या समजेने तो हे काम करत होता. या वेळी मात्र त्याच्या पोटात खड्डा पडला होता. हे शेवटचं दाहकर्म करून तो निवृत्त होणार होता. त्यानं कोपऱ्याशी ठेवलेल्या वाळलेल्या लाकडांकडे बघितलं. एक दृष्टिक्षेप झेब्याकडे टाकून तो लाकडांकडे वळला. त्यानं चिता रचायला सुरुवात केली.
झेब्या सरकत सरकत नीलाबाईच्या तिरडीपाशी पोचला. कित्येक दिवसांनी तो तिला बघत होता. लाडकं लेक व्यसनाधीन होतंय म्हणून तिनं कित्येक उपाय केले होते. प्रेमानं समजावलं होतं. ओरडून बघितलं, मार देऊन, कोंडून ठेवलं. गावातल्या वैद्य- डॉक्टरांकडे नेलं होतं. शेवटचा उपाय म्हणून कुण्या बाबा-मांत्रिकाकडेही नेलं पण झेब्या सुधारला नाही. अखेर दोन वर्षांआधी घरातून पळून गेला. चोऱ्या-माऱ्या करत कुठेही ठाव ठिकाणा न लागू देता कित्येक दिवस तो मिळेल त्यावर जगला. अखेर या स्मशानभूमीत काही काळ आधी त्याचा आवडता अड्डा मिळाला होता. दिवस रात्र नशेत, झिंगत इथेच पडून रहायचा.
तिच्या निश्चल देहाकडे धिम्मपणे बघत असताना अचानक हुंदके देत रडायला लागला. दशरथाने त्याच्याकडे फक्त बघितलं आणि परत चिता रचायला सुरुवात केली. व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती फसवी असते हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. असली कित्येक उदाहरणं त्यानं बघितली होती.
झेब्यानं नीलाबाईच्या गाठोड्याला हात लावला. लुगडं-कापडं, एक ऍल्युमिनमची छोटी पेटी आणि गुंडाळलेली कापडी चंची याशिवाय त्यात काहीही नव्हतं. त्यानं पेटी दोन्ही हातांत घेऊन कानाशी धरली. कसलासा धातूंचा आवाज ऐकू आला. त्यानं पेटी खाली ठेवली. कडी उघडली. आत देवांच्या चांदी-पितळीच्या छोट्या मुर्त्या, वाळलेल्या फुलांच्या पाकळ्या, कसलीशी राख आणि देवांची चित्रं होती. त्यानं कडी लावली आणि पेटी सरकवली. गुंडाळलेली चंची उघडली. त्यात सुपारीची एक दोन खांडं, तंबाखू-चुन्याची डबी सापडली. दुसऱ्या खणात चुरगळलेल्या, घडी-पुडी केलेल्या नोटा होत्या. त्यानं चंची गडबडीनं गुंडाळली, दोरीची गाठ बांधली आणि चंची खिश्यात सरकवली. नीलाबाईच्या देहापाशी जात त्यानं तिचा हात धरला. माथ्याशी लावून डोळ्यांतून आणखी आसवं काढली. वाऱ्याच्या झोतेने तिच्या अंगावरचा कापड सरकला आणि तिच्या पोटावर ताजे काप त्याला दिसले. त्याकडे दुर्लक्ष करून तो तिच्या गळ्याकडे सरकला. गळ्यात एकदाणी माळ दिसली ती ओढून खिशात कोंबली. सरकत सरकत तो पेटीपाशी गेला. काखेत पेटी दाबुन तो उठला आणि मागे न बघताच झोकांड्या देत चबुतऱ्यावरून उडी मारून पळून गेला.
दशरथ हताशपणे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. त्याने नीलाबाईला उचललं आणि चितेवर ठेवलं. तिचं विखुरलेलं गाठोडं नीट बांधून तिच्या छातीशी ठेवलं. तिच्या अंगावर आणखी लाकडं रचली. गवऱ्या पसरून ठेवल्या. एका लाकडाच्या टोकाला चिंध्या गुंडाळून त्याला अंगारपेटीनं आग लावली आणि पेटलेली मशाल चितेशेजारी भुसभशीत जमिनीत उभी रोवली. त्यानं नीलाबाईला हात जोडले. डोळे बंद केले. त्याच्या मेंदूत नीलाबाईने वदलेली चित्तरकथा झरझर सरकू लागली.
नीलाबाई वयात येताच तिचं लग्न थाटून दिलं गेलं होतं. दिल्या घरी सुखी रहा म्हणत माहेरच्यांनी तिला सासरी पाठवलं. पुढे तिचं माहेर तुटलं ते तुटलं. भाऊबंदकीच्या वादात घराचे तुकडे पडले. शेती-जमिनी विकून तिचे भाऊ-भावजयी लांबवर स्थायिक झाले. नीलाबाई तशीही लग्नानंतर माहेरला परकी झालीच होती.
तिचा नवरा माणसाची कातडी पांघरलेला श्वापद होता. लग्नानंतरचे दोन-तीन आठवडे बरे गेले आणि नंतर सुरु झाला नीलाबाईचा सासुरवास आणि नवऱ्याकडून शारीरिक आणि मानसिक छळवाद. पहिल्या महिन्यातच गर्भार राहिलेली नीलाबाई दररात्री होणाऱ्या पाशवी अत्याचाराला थंड शरीराने आणि कोमेजलेल्या मनानं सहन करत राहिली. त्यानंतर नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा उघडकीस आला. आतमध्ये धुसफुसत असलेली नीलाबाई गर्भातल्या बाळासाठी आणि लोकलाजेस्तव मूकपणे कुढत राहिली. आलेला दिवस ढकलीत राहिली. पुढल्या काही वर्षांत एकामागून एक तीन लेकरं तिला झाली आणि चवथ्याला पोटात टाकून नवऱ्यानं क्रौर्याची परिसीमा गाठली. एका भयाण रात्री खुद्द माय-बापाच्या डोक्यात दगड घातला. मनुष्यवधाच्या आरोप सिद्ध होऊन तुरुंगात गेला आणि तुरुंगातल्या भांडणात जीव गमावला. नवऱ्याचा नावापुरता आधार होता तो नाहीसा झालाच पण त्यासोबत खूण्याची बायको म्हणून कुणी हिच्यावरही विश्वास ठेवी ना. आयुष्यभराची अवहेलना आणि कुचंबणा तिच्या पदरी पडली.
नीलाबाई त्या रात्रीनंतर त्या नराधमाच्या तावडीतून सुटली खरी पण आधारासाठी बघावं तरी कुणाकडे? सासुरवास होत असला तरी सासू-सासऱ्याच्या नावाचाही आधार हरवला होता. माहेर केव्हाचंच सुटलं होतं. भाऊ-बहिणीचं नातं निभवावं असले भाऊ नव्हते. पदरीच्या तीन आणि पोटातल्या एका लेकराला कसं पोसावं त्या अडाणी मातेला काही ठाऊक नव्हतं. विषण्णावस्थेत गावातल्या विहिरीत जीव द्यावा म्हणून काठाशी पोचून परत फिरलेल्या तिला केवळ मातृत्वाच्या कर्तव्याने पोरांसकट जीव देण्यापासून अडवलं होतं.
पोटापाण्याची भूक तहान भागवण्यासाठी लेकरांना पाठी-पोटी घेऊन हे विंचवाचं बिऱ्हाड वणवण भटकलं होतं. भर उन्हाळ्यात उष्ण उन्हाचे झोत अंगावर कातडी रापून करपेपर्यंत, पावसाळ्यात झाडाझुडुपांच्या आड धों धों कोसळणाऱ्या सरी अंग चिंब भिजून तापाने फणफणेपर्यंत आणि झोंबणाऱ्या कडाक्याच्या थंडीत अंगभर फाटलेल्या त्वचेचा दाह बोथट होईपर्यंत ह्या गावातून त्या गावात भिरभिर फिरत नीलाबाई तिचं लेंढार घेऊन फिरत होती.
एका गावाच्या वेशिपल्याड माळरानातली जागा साफ करून तिनं काट्या-कमच्या आणि डहाळ्या जमा करून झोपडी बांधली. या अनोळखी गावात तिचा भूतकाळ उखरून काढणारा कुणीच नव्हता. त्या कामचलाऊ झोपडीत तीन लेकरांना कोंडून कधी कुणाच्या शेतावर खुरपणी, निंदणी करू दे, पाटलाकडे, देशमुखांकडे धुणी-भांडी करू दे. मिळेल त्या अन्नावर आणि कुणी देईल तेव्हढ्या पैश्यांवर तिने दिवस काढले. चवथ्याचा जन्म गावातल्या सुईणीकडून करून घेतला आणि व्यायल्यानंतर आठवडाभरातच कामावर जाणं सुरु केलं. अन्यथा तिचे चारही लेकरं भुकेनं तडफडली असती. मेली असती.
स्वतःचं अस्तित्व टिकवण्यात सर्वस्व पणाला लावून अडाणी नीलाबाई लढली, झगडली. एकट्या बाईच्या अंगावर तुटून पडण्यासाठी वखवखलेल्या पुरुषांपासून वाचण्यासाठी तिनं विषारी शब्दांची नांगी आणि त्या पिसाटांना पुरून उरेल एव्हढी ताकद चिमट्यांसारख्या मुठींत एकवटली होती.
कष्टाची भाकरी आणि घामाचं पाणी एक करून तिनं घराला चांगले दिवस आणले. पैसा-अडका जमा केला. डोंगरावरची एक एकर ओसाड का होईना, जमीन घेतली. घाम गाळून सुपीक केली. तिथंच शेणमातीचं घर बांधलं. कष्टाने एक एक पै-पैसा वाचवत तिनं जमेल तसं लेकरांना मोठं केलं. शाळेत पाठवलं. दिवसांमागुन दिवस जात राहिले. विवंचनेचे कित्येक क्षण आले पण तिने ताठ मानेने दिवस निभावून नेले. जीवघेण्या श्रमाचे, आजाराचे, परिस्थितीचे घाव अंगावर झेलत तिने लेकरांना मोठं केलं. त्यांच्यावर येणारी संकटं स्वतः वर घेऊन त्यांना शक्य तेव्हढी झळही रोखली. पुढं तिचे लेकरं छोट्या-मोठ्या कामावर लागली. पहिला पीठ गिरणीवर, दुसरा गवंडीकामात आणि तिसरा गावातल्या दवाखान्यात सफाई कामगार म्हणून लागला. लहाना मात्र व्यसनात गुरफटला आणि दोन वर्षांआधी घर सोडून पळाला.
नीलाबाई वार्धक्याकडे झुकू लागली. आतापर्यंत अविश्रांत झटलेल्या देहाची क्षमता संपुष्टात येऊ लागली होती. मोठ्यानं गावातल्या कुण्या पोरीशी पीठ गिरणीवरच सूत जमवलं. विना नीलाबाईच्या संमतीनं लग्न करून थेट घरीच आणलं. थोरली सून आली म्हणजे हातभार लाभेन, जरा दम घेता येईल या आशेला त्या पोरीनं धुडकावून लावलं. ती आली आणि नीलाबाईचा सासुरवास जणू परत सुरु झाला.
दुसरा मुलगा दुसऱ्यांची घरं बांधून देत होता पण त्याच्या आईचं घर डळमळतंय ह्याचं त्याला काही घेणं देणं नव्हतं. काम मिळेल तिकडे वाट शोधत, पैसा कमावण्याचा नादी आईशी त्याचं नातं दुरावत जात होतं. डोंगरावरची जमीन बळकावून पाटलाच्या जावयाला द्यायची होती. त्याची दगडं फोडून गिट्टी बनवण्याचा धंधा होता आणि त्यानं ह्याच्या मनात ठाम भरवून दिलं होतं की त्या टेकडीला फोडून भागीदारीत अर्धा नफा ह्यालाच मिळणार.
तिसरा दवाखान्यात साफ-सफाई करता करता शहाणा झाला होता. औषधांचा पुरवठा करण्यासाठी सरकारी गाडी यायची तेव्हा खोक्यांतून औषधांच्या बाटल्या आणि डब्या काढून बाहेर परस्पर विकायचा. या कारभारात दवाखान्याची इतर कर्मचारीही गुंतली होती. त्यातच अवयवदानाच्या धंद्यात बरीच मिळकत होते हे ही त्याला ठाऊक होतं. त्याला संधी होती ती एखादं सावज गावण्याची.
चवथा घर सोडून परागंदा झालेलाच होता.
मोठ्याच्या लग्नानंतर छोट्याश्या दोन खोल्यांच्या घरात त्यांना तिची अडचण होऊ लागली. बायकोनं आग लावली आणि एक दिवस भांडणात मोठ्यानं मायवर हात उगारला. कानशिलात जबरी तडाखा बसला तशी म्हातारी जमिनीवर आडवी पडली. त्यानंतर म्हातारी स्वतःच घर सोडून अंगावरच्या कपड्यानिशी, एका गाठोड्यात तिचे कपडे आणि देवं घेऊन निघाली. मोठ्याच्या संसारासाठी हातभार म्हणून मागे तिनं पै-पैसा जमा करून घेतलेलं थोडं-बहुत सोनं घरीच सोडलं. म्हातारपणाची अडगळ लेकरांना नको म्हणून तिनं परत एकदा गाव सोडलं. पाय नेतील तिकडे आणि गावा-रस्त्यांवर आणि रानावनात तिची उतारवयातली भटकंती सुरु झाली.
भर उन्हाळ्यात तळपत्या सूर्याखाली, डांबर वितळवणाऱ्या उन्हाने उष्माघाताचा फटका लागून ती कोसळली. भल्या गावकऱ्यांनी तिला दशरथ कामाला असलेल्या इस्पितळात भरती केलं म्हणून तिचा जीव वाचला होता, तो फार काळ न टिकण्यासाठीच.
ओळखी पाळखीनं नीलाबाईच्या पोरांना संपर्क केला गेला. मोठा आलाच नाही. मायनं मागं सोडलेल्या दाग-दागिन्यांना विकून तो दुसरीकडे बस्तान मांडण्यात व्यस्त होता. दुसरा तो म्हातारीचा जीव जाण्यापूर्वी तिची टेकडीवरची जमीन आपल्या नावी करण्यासाठी कागदपत्रं घेऊनच. जुजबी चौकशी करून तिच्या अंगठ्याला चोपलेली शाई कागदांवर ठसवून तो इस्पितळातून गेला. म्हातारीला काय करायची जमीन? तशीही मेल्यानंतर चौघांपैकी कुणालातरी जाणारच होती म्हणून म्हातारीनं वरवर उसनं हसत त्या कागदांवर ठसे उमटवले होते. काम झाल्यावर तिच्या अंगठ्यांना लागलेली शाईही न पुसताच तो निघून गेला होता म्हंटल्यावर तिसरा लेक तरी आपली काळजी घेईल असं तिला वाटत होतं.
तिसरा पोरगा भेटायला आला म्हंटल्यावर तिला जरा आशा वाटू लागली होती. त्यानं तिची विचारपूस तरी केली होती. काही रिपोर्ट मागायला तो डॉक्टरांच्या खोलीत गेला होता आणि परतला तेव्हा त्याला आईच्या रूपात पहिलं अवयव दान देणारं सावज सापडलं होतं. तिच्या मृत्यूपश्चात तिच्या अवयव दानाची स्वीकृती म्हणून त्यानं कसल्या कसल्या कागदांवर तिच्या संमतीचे अंगठ्यांचे ठसे घेतले होते. काही दिवसांतच संदिग्ध परिस्थितीत नीलाबाई दगावली आणि तिच्या अवयवदानाच्या बदल्यात त्याचा पैसा कमावण्याचा मार्ग सुकर झाला होता.
दशरथच्या वॉर्डात नीलाबाईसारख्या अबला रुग्णांची सोय असल्यानं दशरथ नीलाबाईशी कधी मधी संवाद करत असे. तिच्या दोन लेकरांनी तिचा फायदा घेतलेल्या घटना त्याच्या डोळ्यांसमोरच घडल्या होत्या. कधीतरी बोलता बोलता नीलाबाईनं तिच्या लहान्या मुलाचा फोटो दाखवला होता. दशरथानं त्या चेहऱ्यापट्टीच्या माणसाला धर्मदाय संस्थेने व्यवस्था सांभाळलेल्या स्मशानभूमीत बघितलं होतं. त्याला हिच्या जगात असेपर्यंत शेवटची भेट घालून द्यावी त्याआधीच नीलाबाई वारली होती.
डोळ्यांसमोरून भरभर आठवणी जात असताना त्यानं खिन्न मनानं मशाल उचलली आणि चितेला लावली. असल्या औलादी नकोत. त्यापेक्षा बे-औलाद मेलेलं बरं असा विचार त्याच्या मनात सुरु होता. आज इथून निघून तो त्या इस्पितळातून राजीनामा देणार होता. कित्येकांची दुःखं बघितली होती त्यानं. कळत नकळत तो ही त्यांच्या दुःखात कुण्या न कुण्या कारणानं गुंतत होता. या कामापासून मुक्त होऊन त्याला दूर कुठंतरी निघून जायचं होतं.
चितेला लागलेली आग भयंकर ज्वाळांच्या जीभा काढून नीलाबाईला भस्मीसात करत होती. त्या आगेच्या आचेनं खालच्या लाकडांमधून सुरुसुरु काहीतरी बाहेर पडलं. एक काळी विंचवीण तिच्या पाठुंगळी तिच्या पिल्लांना घेऊन तुरुतुरु पळू लागली. आगीपासून दूर घेऊन जाऊ लागली. दशरथानं ऐकलं होतं की पिल्ल्या विंचवांना जगवण्यासाठी माय विंचवा त्यांना आपलं शरीर खाऊ देतात. मातृप्रेमाचं ते सर्वोच्च उदाहरण असतं म्हणे. स्वतःच्या शरीर भावी पिढीच्या पोषणार्थ ते स्वदेह त्याग करतात.
विषण्ण मनोवस्थेत त्याने विचार केला की त्याच्या डोळ्यासमोर जळत असलेल्या नीलाबाईचं उदाहरण काही फारसं वेगळं नव्हतं.