अंदाजे वाचन वेळ : ९ मिनिटे
एके काळी विशाल रोमन साम्राज्य संपन्नतेच्या भरात असतांना ही घटना घडली होती. रोमन साम्राज्याचा अंमल युरोप पासून मध्य-पूर्वे कडे आणि उत्तर आफ्रिकेच्या प्रदेशात वाढत चाललेला होता. त्यावेळी मोठं-मोठ्या साम्राज्याखाली छोटी-मोठी सामंतशाही असलेली घराणी रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली फोफावत होती. या सामंतांकडे रोमन सम्राट कधी मधी आपले सरदार अधिकारी धाडीत असे.
अश्याच एका अधिकाऱ्याकडे अँड्रोक्लस नावाचा एक गुलाम होता. त्याच्या मालकाची जी-हुजुरी करत, सांगेल ती कामं करत तो दिवसामागून दिवस काढत होता. जन्मभर जरी आपण प्रामाणिक पणे काम केलं तरी मालक त्याला गुलामगिरीतून मुक्त करणारच नाही हे ही त्याला पक्कं ठाऊक होतं. मृत्युशिवाय गुलामगिरीतून सुटका नाहीच अशी त्या गुलामाची पक्की समजूत. मनातून मात्र त्याला रोमचा स्वतंत्र नागरीक म्हणून मानाने जगायचं होतं.
रोममधून उत्तर आफ्रिकेच्या एका सामंतांकडे त्याच्या मालकाला जाण्याचा रोमच्या सम्राटाने, टायबेरीअसने हुकूम सोडला होता. आपल्या वैभवाचा थाट दाखवत फिरण्याची या मालकाला मोठी मजा वाटायची. वाजत गाजत, रमत गमत, मजल दरमजल करीत स्वारी सामंताच्या प्रदेशात दाखल झाली. मोठ्या धामधुमीत एकमेकांचा स्वागत सत्कार केला गेला, मेजवान्या झाल्या. या सगळ्या गोंधळात संधी शोधून अँड्रोक्लस कुणालाही कळू न देता हळूच पसार झाला.
तीन दिवस आणि तीन रात्री पळत, चालत, धडपडत अँड्रोक्लस शेवटी एका जंगलात शिरला. पार दमला होता तो आणि जरा मोकळी जागा शोधून एका झाडाच्या ढोलीत शिरून झोपी गेला. सकाळी जाग येताच बाजूच्या ओहळातलं पाणी प्यायला आणि जमिनीवर पडलेली फळं खाल्ली. तीन दिवसानंतर पोटात अन्न पडल्याने त्याला जरा हुशारी अली असली तरी चालून चालून त्याचे पाय दुखत होतेच. आपण आफ्रिकेतील सामंताच्या राजधानीतून दूर आलो असलो तरी आपल्या मालकाच्या ध्यानात आलं असेलच की आपण बाकी गुलामांसोबत दिसत नाहीये ते म्हणून. मालकाने त्याच्या खाश्या मार्जीतली गुलामं आपल्याला शोधायला पाठवली असणार याची त्याला खात्री होतीच. स्वातंत्र्य काही एवढ्या सहजासहजी मिळणार नव्हतंच. तरीही आज आपल्या मर्जीने आपल्याला हवं ते आपण करतो आहोत, थोडं का होईना स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय हे ही काही कमी नाही, असं त्याने स्वतःलाच समजावलं.
अँड्रोक्लस रोज थोडी थोडी पायदळ करायचा. मिळेल तो रान-मेवा खात, झऱ्यांचं पाणी पीत, रमत गमत मनाला आनंद देईल अशी गाणी गात यथेच्छ फिरायचा. काही काळानंतर तो फार लांब, घनदाट जंगलात पोचला. एका ठिकाणी त्याला मनाला भावेल अशी मोक्याची जागा दिसली. आता आपण इथेच वास्तव्य करायचं असं त्याने ठरवलं. गुलामीचे दिवस मागे पडलेच होते. जंगलातच खाण्यापिण्याचं मुबलक मिळत असल्याने मानवी वस्ती गाठावी असं काही त्याला वाटत नव्हतं. रिकाम्या डोक्याला चालना म्हणून कधी चित्र कधी, कधी एकटाच खेळ, कधी मोठ्याने गाणी म्हण असं करत करत तो दिवस काढू लागला. एवढ्या आत जंगलात कोण येणारे आपल्याला शोधायला? याची खात्री असल्याने तो अगदी निश्चिन्त होता.
कधी मधी जंगतली हिंस्त्र श्वापदं त्याला दिसायची पण अँड्रोक्लस अगदी हुशारीने त्यांच्या पासून लांब राहायचा. आपण कुणाची खोडी काढली नाही किंवा कुणाच्या शिकारीत अथवा कुणाच्या मार्गात आलं नाही तर प्राणीही आपल्याला काही करत नाहीत हे त्याला समजलं. निसर्गच त्याला येणाऱ्या जंगलात धोक्यांपासून सावध करायचा.
एक दिवस फिरता फिरता अँड्रोक्लस एका झऱ्यापाशी पाणी पिण्यासाठी आला. सायंकाळची वेळ होती, सूर्य मावळतीस आला होता म्हणून असेल किंवा काहीश्या निष्काळजीपणाने सावध न होताच तो झऱ्यापाशी आला होता. पाणी प्यायला वाकताच त्याला गुरगुरण्याचा आवाज आला. घाबरतच त्याने इकडे तिकडे बघितलं. जवळच्या गार्ड काटेरी झाडीत काहीशी हालचाल होतांना त्याला दिसली. काही कळण्याचा आताच त्याच्या समोर एक अजस्त्र आकाराचा सिंह उभा ठाकला. अँड्रोक्लस ची पंढरी दणाणली. आता आपली काही खैर नाही. भरले आपले दिवस आज. मरण प्रत्यक्ष समोर! अँड्रोक्लस चा चेहरा पांढरा फट्ट पडला. त्याचे पाय लटपटायला लागले. सिंह हळू हळू समोर येऊ लागला. आता कोणत्याही क्षणी झडप अंगी येऊन आपण मरणार हे अँड्रोक्लसला स्पष्टपणे दिसायला लागले. भीतीने त्याने डोळे बंद केले. गुरगुरण्याचा आवाज हळू हळू तीव्र होतं गेला. एक एक क्षण पळासारखा दीर्घ भासू लागला. त्याने मृत्यूचे दर्शन घेण्यासाठी डोळे उघडले तोच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या सिंहाचे गुरगुरणे सुरूच असले तरी एक पाऊल पुढे टाकताच वेदेनने त्याचे गुरगुरणे वाढायचे.
आता आपल्याला एक संधी आहे असं समजून अँड्रोक्लस मिळेल तास धूम ठोकीत वेडा वाकडा पळू लागला. गुरगुरणे आणि डरकाळ्यांचा आवाज अजूनही येत असला तरी मागे वळून बघावं म्हणून त्याने धावत धावतच एक गिरकी घेतली. बघतो तर काय, सिंह होता तिथेच! अँड्रोक्लसला काही कळलंच नाही.
आता जराशी हिम्मत बांधून अँड्रोक्लस सावधपणे परत त्या झऱ्याकडे जायला निघाला. उत्सुकता असेल म्हणा किंवा या अजस्त्र श्वापदाला अगदी जवळून बघायला मिळेल म्हणून म्हणा तो मनाचा हिय्या करून झऱ्यापाशी आला. एव्हाना अंधार पडायला लागला होता. जवळपासच्या वाळलेल्या काड्या आणि पाला पाचोळा जमा करून चकमकीच्या दगडाने त्याने ठिणगी पाडून आग पेटवली. थोडा वेळ जाऊ का नको करीत शेवटी तो सिंहाच्या जवळ जाऊन बसला. सिंहाने आता गुरगुरणे कमी केलं आणि तो ही बसला. अँड्रोक्लसच्या लक्षात आलं की सिंहाच्या पायाला काहीतरी जखम झाली आहे आणि म्हणून तो आपला पाठलाग करू शकला नव्हता. आता अँड्रोक्लसच्या मनातली जुनी सेवा करण्याची भावना उफाळून आली. आपल्या पूर्वीच्या मालकाची सेवा तो गुलामीमुळे करीत असला तरी सेवा करणे हा त्याचा जुना गुण होता.
सावधपणे त्याने सिंहाच्या पंज्याला हात लावला. कमाल म्हणजे सिंहाला मदतीची गरज होतीच. त्यानेही अँड्रोक्लसला काही केले नाही. अँड्रोक्लसने मग सिंहाच्या पंज्याला नीट न्याहाळले. त्यात एक मोठा काटा रुतला होता. तो त्याने अलगदपणे काढला. झऱ्याजवळची एक औषधी वनस्पती शोधून त्याने त्याचा लेप सिंहाच्या पंज्याला लावला आणि स्वतःजवळची एक कापडी चिंधी सिंहाच्या पंज्याला बांधून दिली. सिंहाला कदाचित बरे वाटले असेल. सिंह तसाच पहुडला. अँड्रोक्लसला वाटलं की कितीही म्हंटलं तरी हा जंगलाचा राजा. याच्या तावडीत पडलो तर जीव गमावू आपण. म्हणून थोड्या दूरच्या झाडावर चालून अँड्रोक्लस फांद्यांमध्ये निजायला गेला.
पहाट झाली. अँड्रोक्लस जागा झाला. झाडावरून उतरला आणि झऱ्याकडे जाण्यासाठी अगदी सावधपणे जायला निघाला. तिथे त्याला सिंह दिसला नाही. म्हणजे रात्री सिंह आपल्या मार्गाने निघून गेला असावा असं त्याला वाटलं. आपणही आपल्या ठिकाणी जावं असं अँड्रोक्लसला वाटलं आणि तो माघारी निघू लागला. थोडा वेळ जाताच त्याला गुरगुरणं ऐकू आलं. तो जागीच थबकला. त्या सिंहाने लंगडत लंगडत का होईना एक छोटीशी शिकार केली होती. त्यातला काही भाग त्याने अँड्रोक्लस समोर टाकला आणि डोळे मिचकावीत अँड्रोक्लस कडे बघितलं.
अँड्रोक्लसला ही घटना मोठी विस्मयकारी वाटली. आपल्याला सिंह काही भेट देतोय हे त्याच्यासाठी मोठं आश्चर्यकारीक होतं. हवं तेवढं घेऊन अँड्रोक्लस समोर निघाला.
पुढे दिवसांमागुन दिवस गेले. ऋतू पालटत गेले. अँड्रोक्लसला या जंगलात राहून आता तीन वर्ष होऊन गेले होते. एकटं राहण्याचा त्याला कंटाळा आला होता. त्याने जंगलातून निघून एखाद्या मानवी वस्तीकडे जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो एका छोट्याश्या गावात पोचला. इथे त्याला ओळखणारं कुणीच नव्हतं. जंगलातील फळं आणि शिकारी वगैरे करून तब्येतीने तो चांगलाच सुधारला होता. ओळख होऊ नये म्हणून त्याने दाढी मिशी वाढवली होतीच. त्याला स्वतःलाही आपण पूर्वाश्रमीचे गुलाम असण्याचं आठवत नव्हतं. आता आपण स्वतंत्र नागरीक आहोत असा भासवून नवीन आयुष्याला सुरुवात करायची, लग्न करायचं, कुटुंब वाढवायचं, व्यापार करावा असा त्याला नवा ध्यास लागला होता.
गावातील एका व्यापाऱ्याच्या हाताखाली राहून धंद्यातले बारकावे शिकायला सुरुवात केली. त्याला मदत म्हणून छोटी मोठी कामं करीत, कधी मधी तो नगरांत आणि महानगरांत व्यापारानिमित्त्य जाऊ येऊ लागला. असाच एकदा एका नगरात फिरता फिरता तो एका खानावळीत शिरला. बाजूला बसलेल्यांशी त्याने सहज म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली. त्याच्या दुर्दैवाने त्यातल्या एक जण अँड्रोक्लसच्या मालकाच्या शिपायांच्या तुकडीत नोकरीला होता. आणि अँड्रोक्लस हरवल्यानंतर त्याच्या शोधकार्यासाठी पाठवलेल्या तुकडीचा हा नायक होता. अँड्रोक्लस मद्याच्या अमलात असल्याने काहीसा बरळला आणि त्यातच घात झाला. अँड्रोक्लसच्या पेल्यात गुंगीचं औषध मिसळून हा शिपाई अँड्रोक्लस ला पकडून आणल्याने स्वतःला बढती मिळणार असे मनात मांडे खात अँड्रोक्लस बेशुद्ध होण्याची वाट पाहू लागला.
अँड्रोक्लसला जाग आली. किलकिलत्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा त्याला आजू बाजूला फक्त गुलाम बसलेले, पहुडलेले दिसत होते. आपल्याला परत गुलाम बनवण्यात येणार हे त्याच्या लक्षात आलं. तीन वर्ष स्वतंत्र जगल्यानंतर ही गुलामी परत आपल्या नशिबी आल्याने तो नशिबाला दोष देत बसला. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या जुन्याच मालकाकडे त्याला रुजू व्हावं लागणार होतं. पळाल्यामुळे आता फटाक्यांवर फटके बसणार आणि कामही जास्त करावं लागणार, शिवाय मालक आपल्यावर डूख धरून असल्याने आपली चांगलीच खोड मोडणार हे त्याला समजलं.
त्याच्या मालकाच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. अँड्रोक्लसला यथेच्छ बडवून काढल्यानंतर, त्याला उपाशी ठेवण्यात आलं. त्याचे हाल हाल करण्यात आले आणि उन्हं तान्हात त्याला दगड फोडण्याच्या कामाला लावलं गेलं.
त्या काळी पळून गेलेल्या गुलांमांना राजधानीत एका अँफिथीएटर म्हणजे छत नसलेल्या पण सर्व बाजूंनी बंदिस्त अश्या मैदानात एकमेकांशी अथवा प्राण्यांशी लढण्यासाठी पाठविल्या जायचं. एकूण एक गुलामांची कत्तल तिथे व्हायची. आणि हा सगळा खेळ नागरिकांच्या मनोरंजनाच्या नावाखाली खपविला जायचा. अँड्रोक्लस चा शेवटी ही तसाच करायचा त्याच्या मालक अधिकाऱ्याने ठरविला. पुढल्या आठवड्यामध्ये रोमन सम्राट टायबेरीअसच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ एक जंगी कार्यक्रम ठरविल्या गेला होता. अँफिथीएटरमध्ये एक निराळाच कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
लढणाऱ्या गुलामांना एकमेकांशी न लढविता उपाशी आणि चवताळलेल्या हिंस्त्र श्वापदांशी लढविल्या जायचं. काही महिन्यांआधीच एका प्राण्यांच्या व्यापाऱ्याने आफ्रिकेच्या जंगलातून पकडून आणलेला एक सिंह सम्राटाच्या मनोरंजनासाठी भेट दिला होता. या भेटीसाठी बक्कळ संपत्तीही सम्राटाने त्या व्यापाऱ्याला दिली होती. हा सिंह मोठाच चवताळलेला असायचा. जंगलाच्या राजाला अश्या प्रकारे बंदिस्त असायची सवय नव्हती आणि म्हणून दिसेल त्यावर तो तुटून पडायचा. या सिंहाची अशी ख्याती ऐकून रोमन नागरिक मोठ्या संख्येने अँफिथीएटरमधल्या खेळांना हजेरी लावायचे.
कार्यक्रमाचा दिवस उगवला. टायबेरीअसला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुलामांना मोकळ्या मैदानात हजार केलं गेलं. प्राथमिक औपचारिकता पूर्ण झाल्यावर पहिल्या गुलामाला अँड्रोक्लसलाच मैदानात एकटं उभं केलं गेलं. हाती शास्त्र बिस्त्र काही नाही. लढण्याचा काही अनुभव नाही अश्या अँड्रोक्लसला सिंह फाडून खाणार आणि हा रक्ताचा विभित्स खेळ पाहणारे जल्लोष करणार.
मैदानाच्या एका बाजूचा दरवाजा किरकिरला आणि प्रकाशाची तिरीप सिंहाच्या डोळ्यावर पडली तसाच तो चवताळलेल्या सिंहाने मोठ्याने गर्जना केली. त्याच्या डरकाळीने संपूर्ण मैदान दणाणलं. सगळी उपस्थित मंडळी चिडीचूप झाली. आता त्या गुलामाची काही खैर नाही. हा सिंह त्याला फाडून फाडून खाणार या विचाराने काहींच्या अंगावर शहरे आले, काहींना या थरकाप उडवणाऱ्या प्रकाराची चीड आली.
डरकाळ्या फोडीत सिंह हळूहळू अँड्रोक्लस च्या जसा जसा जवळ जवळ यायला लागला तसा तसा अँड्रोक्लस भीतीने थरथरू लागला. आता सिंह अँड्रोक्लस च्या अगदी इंचभराच्या अंतरावर येऊन थांबला. प्रेक्षकांचे श्वास क्षणभर थांबले. एका पंजात आता अँड्रोक्लस जमिनीवर लोळणार, तो क्षण आला तोच अविश्वसनीय प्रसंग घडला. अँड्रोक्लसचे हात तो सिंह एखाद्या मांजरीसारखे चाटू लागला. सम्राट टायबेरीअस सकट सगळे प्रेक्षक अचंभित! कुणाचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. खुद्द अँड्रोक्लस सुद्धा अचंभित झाला होता. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं, काही वर्षांपूर्वी जंगलात ज्या सिंहाच्या पंज्यातून आपण रुतलेला काटा काढला होता तोच हा सिंह असावा. त्या सेवेच्या ऋणातून सिंहाने अँड्रोक्लसला न मारण्याचे ठरविले होते. तो सिंह अँड्रोक्लसच्या पायाशी लोळण घेत पडला. अँड्रोक्लस व्यतिरिक्त ही घटना कुणालाच माहिती नसल्याने सगळे जण आश्चर्य व्यक्त करीत अँड्रोक्लस च्या नावाने जयघोष करीत उभे झाले. सम्राट टायबेरीअस सुद्धा टाळ्या पिटत उभा झाला. हे सगळं एखाद्या चमत्कारासारखंच होतं.
या चमत्काराने प्रभावित होऊन टायबेरीअस ने अँड्रोक्लसला त्याला हवं ते देण्याचं आश्वासन दिलं. अँड्रोक्लस ने प्रशंसेत वाहवत न जाता प्रसंगावधान राखत स्वतः साठी आणि सिंहासाठी स्वातंत्र्य मागितलं. सम्राट टायबेरीअसनेही वाचन राखून अँड्रोक्लसला गुलामगिरीतून त्वरित मुक्त केले. पुढील आयुष्यासाठी मदत म्हणून काही मालमत्ताही त्याला भेट दिली आणि सिंहाची त्याच्या मूळच्या जंगलात रवानगी करविली. अश्याप्रकारे अँड्रोक्लसचे रोमन साम्राज्याचा एक स्वतंत्र नागरिक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
ही इसापच्या कथांपैकीच एक आहे असं मानल्या जातं. या कथेतून कृतज्ञतेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.