अंदाजे वाचन वेळ : ७ मिनिटे
कुण्या एके काळी टुमदार घरं असलेली एक गाव होतं. गावातील मुख्य व्यवसाय शेती! पाण्याची मुबलकता आणि शेतकरी कामसू असल्याने त्यांच्या श्रमांना भरभरून फळ यायचं. शेतकरी, व्यापारी आणि शासन एकमेकांच्या हिताची जोपासना करायची. त्यामुळे संपन्नता म्हंटल की पंचक्रोशीतली बाकीची गावं याच गावाचा आदर्श ठेवायची. बरं, पुरुषमंडळींच्या खांद्यांना खांदा लावून बाईमाणसं सुद्धा सदानकदा काही ना काही कामं करत राहायची. प्रत्येकाच्या घरी गाई-म्हशी आणि कोंबड्या वगैरे. त्यामुळे धनधान्यासोबत दूध-अंडी वर्षभर मिळत राहायची. दिवस उजाडताच शेतकरी शेतावर निघून जायचे ते थेट सूर्य मावळताच घरी परतायचे. बाया घरी राहून दूध काढणं, दही लावणं आणि पंचक्रोशीत विकून अर्थाजन करीत. घरी परतताच मुलं बाळांची सांभाळ करणं, त्यांचा अभ्यास घेणं, परसबाग बघणं, हस्तकलेच्या वस्तू तयार करणं अशी काम करीत. दिवसभराचा क्षीण असल्याने साधारण ८ वाजताच जेवण करून झोपी जाणं असाच त्यांचा रोजचा दिनक्रम. त्यात चूकीनेही काही खंड नाही. बारभाईंचा सुद्धा साधारण असाच दिनक्रम! कुणीही क्षणभर सुद्धा टंगळमंगळ करीत नसत.
असं असलं तरी सगळं काही आलबेल नव्हतं. वरवर संपन्नता असली तरी सगळ्यांचे चेहरे लोंबलेली. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कमी असावं असं असेल. कुणाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता, आनंद असेल असा व्यक्ती शोधावा लागायचा. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असायचा. व्यवसायापुरती कुणाशी काय संबंध आला तर तेवढाच, तेवढ्या वेळापुरतीच!
एका वेळी नुकतीच हिवाळ्याची सुरुवात झाली होती तेव्हाची गोष्ट. पहाट होतं होती. क्षितिजावर उगवत्या सूर्याची लाल-केशरी किरणं आसमंत उजळीत, नभाचं रंगपटल चितरित होती. झाडांवरील पक्ष्यांनी चिवचिवाट सुरु करायला सुरुवात केली आणि त्याच सुमारास एक सुरस शीळ वातावरणात घुमू लागली. नेहमीच्या पक्ष्यांच्या किलबिलाटासमवेत येणारी ही नवी तान ऐकून गाव हळूहळू जागा व्हायला लागला. जो तो ‘कुठून हा नवा स्वर येतोय?’ असं कुजबुजत आवाजाच्या दिशेने जायला लागला. गावाच्या वेशीवरच्या एका वडाच्या झाडाखाली उगवत्या सूर्याकडे बघीत एक आकृती आनंदात गाणं गात होती. या आधी कुणी अशी वल्ली या गावात बघितली नव्हती. ‘कोण हे बुवा?’, ‘कुठल्या गावाहून आलेले हे?, ‘कधी आलाय हा?’, ‘आणि काय म्हणून हा असं गाणं- बीणं गातोय?’ असं एकमेकांना विचारीत लोकं वेशीपाशी एव्हाना जमा व्हायला लागली होती.
शेतांकडे, बाजाराकडे वा गावाबाहेर जाण्यासाठी वेशीवरूनच जावं लागत असे. तशीही वेळ शेताकडे जाण्याची असल्याने बरीच मंडळी घटकेत त्या वडाच्या झाडाजवळ जमा झाली. या नव्या पाहुण्याचा राग रंगच वेगळा होता. जवळ स्वतःच असं काहीच नाही. अंगावरचे कपडेही हवे तेवढेच. सामान बिमान काहीच नाही. एकदम कफल्लक अशी ही वल्ली… मात्र आनंदी, स्वच्छंदी आणि मुक्त!
गावातली लोकं जशी जमली, थोडा वेळ थांबली आणि लगेच पांगली. कुणापाशीही क्षणभरही वेळ नव्हता. प्रत्येकाला आपापल्या कामावर जाण्याची घाई! हा वेडा मात्र त्या वडाच्या झाडापाशी बराच वेळ गात बसला. नाही म्हणायला काही चिल्ली पिल्ली त्याच्या पाशी रमत गमत बसली, त्याचा तानेसोबत सूर मिसळत, जमेल तसं गात. कित्येक वर्षांतला हा एवढा अपवाद!
सकाळ सरुन मध्यान्ह झाली. सकाळीची गार हवा मध्यान्हेपर्यंत उबदार झाली. सोबतची पोरं सोरं आपापल्या मायांसोबत घरी पोचली. आपला हा वेडा वडाच्या विस्तृत सावलीत निश्चित पहुडला जमिनीवरच! साधी सतरंजी सुद्धा नव्हती त्याच्याकडे. पण या पट्ठ्याला काही उणीव जाणवली नाही. दोन-तीन घटका सरताच मान डोलावीत जवळच्या झऱ्याचं पाणी प्यायला. मग रानात रानमेवा शोधीत फिरला. रानातही फळं आणि कंद-मूळं मुबलक! पोटभर खाऊन परत त्याच्या आवडत्या वडाच्या झाडाखाली बसला. आनंद आणि तृप्तता त्याच्या चर्येवर झळकत होती. झाडाखाली बसल्या बसल्या काहीतरी उद्योग हवा म्हणून गुणगुणत जमिनीवर रेघोट्या मारत बसला. किती वेळ झाला असेल आणि किती नाही, याचं गुणगुणणं आणि रेघोट्या मारणं सुरूच होतं. कुणीतरी मुद्दामहून खाकारलं तेव्हाकुठे याची तंद्री तुटली. मान वरती करून बघतो तर काय, आजूबाजूला कामातून परत येणारी माणसं-बाया त्या वडाच्या झाडापाशी जमली होती. हा फक्त हलकासा हसला, जरासं अवघडूनच! आतापर्यंत याच्या अवताराकडे बघून इतर ठिकाणची लोकं फटकूनच, अंतर ठेऊन वागीत.
जमलेली लोकं याने काढलेल्या रेघांकडे अचंभित होऊन कौतुक करीत होती. एका विस्तृत झाडाच्या सावलीत एक भलंमोठं कुटुंब चितारलं होतं त्याने. कुणी हसतंय, कुणी पोरगं भावंडासोबत खेळतंय, कुणी जेवतंय. आणि सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळलेली.
“वाह! छान काढलंय चित्र.”
“उत्तम!”
“आवाजपण छान आहे तुमचा.”
“कुठून आलात तुम्ही?”
“कोणत्या गावाचे आहेत तुम्ही?”
“हे सगळं कुठून शिकलात?”
वगैरे वगैरे स्तुती करून झाली. विचारणा करून झाली.
सायंकाळी सूर्य पहाडाच्या मागे अस्तास गेला. उशीर होतं आहे म्हणित लोकं आपापल्या घरी निघू लागली.
हा मात्र तिथेच राहिला. रात्र झाली. टिमटिमत्या चांदण्या मोजीत हा झोपी गेला. लोकांनी केलेलं कौतुक आठवीत समाधानानं निजला.
सकाळ झाली. आदल्या सकाळसारखीच ही सकाळ सुद्धा उगवली ती याच्या तानेने. मंजुळ स्वर आसमंती निनादला. लोकं परत वेशीवर जमली, आपापल्या शेतांकडे, कामानिमित्त्य निघून गेली. आदल्या दिवसाप्रमाणेच हा दिवस सुद्धा या वेड्या वक्तीने समाधानाने, आनंदाने घालविला. सायंकाळी लोकं परतली आणि पाहतात ते काय, आज याने नावं चित्र रेघाटलेलं. परत कौतुक करीत सगळी घरी पोचली.
वडाच्या झाडाखालच्या या वल्लीचा दिनक्रम वेगवेगळा असायचा. इतरांप्रमाणे हा कधी शेतात राबायला अथवा बाजारात काही विकटाक करायला जायचा नाही. आनंदात गायचं, कधी कधी गावात फेरफटका मारायचा. कधी रानात भटकायचा तर काही कुणाच्या शेतावर फिरायचा. सूर फिरवीत, चित्र चितरित, कथा कहाण्या सांगीत, लोकांचं मनोरंजन करीत. मिळेल ते रानावनातून खायचा. चिंता अगदी काहीच नव्हती त्याला. जगाचा व्यवहार त्याला समजेच ना. पै-पैसे कमवायचेच का? घर बांधून राहायचेच का? इतकी सगळी मंडळी असताना कुटुंबातच राहिल्यासारखं ना? पोट भरण्यासाठी मुबलक अन्न, मग उगाच का साठवणूक करा? असा त्याचा विचार. त्याचे हे विचार मात्र कुणालाच पटेना. प्रत्येकाने ठरलेली श्रमाची कामं केलीच पाहिजेत. वेळ वाया घालवूच नये. परंपरेने ठरलेले रीतिरिवाज पाळायचेच. चौकट सोडून जायचं नाहीच. हा कितीही गुणवान असू दे, अंगी कला असू दे मात्र पोट भरण्यासाठी, उदरभरणासाठी श्रमच करायला पाहिजे. असे त्या गावातल्या रहिवाश्यांचे विचार.
गावातील काही लोकांनी याला समजावून पाहिलं. कुणी त्याला स्वःच्या शेतीवर काम करायला नेऊ दे, कुणी त्याला हाताशी धरून दुकानावर हिशेब समजावून सांगू दे, कुणी बाजारहाट करायला सोबत नेऊ दे… असं सगळं करून पाहिलं. पण हा मात्र आपल्याच तालात.
“अहो, मी तुमचं मनोरंजन करतो. दिवसभर माझा वेळ अगदी आनंदात जातो. तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसला की मला माझं जीवन सार्थकी लागल्यासारखं होतं. तुम्हीच बघा ना, आता सगळ्या जणांचं आनंदी असणं, सतत स्मित हास्य मुखमंडळी आणि घरात सुद्धा मुलं बाळांशी खेळायला लागलात ना. ती येतात माझ्या कडून काही ना काही शिकायला. मी ही त्यांना त्यांच्या कले कलेने शिकवितो. घरी ती तुमचं मनोरंजन करतातच की! तुम्हाला जाणवत असेलच की कलेने तुमच्या जीवनात रंग भरायला सुरुवात केलीये.” याचं उत्तर ठरलेलं.
“अरे, मान्य! पण मला एक सांग. आत्ता ठीक आहे पण पुढे उन्हाळा आहे, पावसाळा आहे. तुझ्या कडे ना राहायला घर ना साठवलेलं अन्न. आत्ता रानावनात भटकून मिळेल तो रान मेवा तू खातोस. मात्र पुढे हंगाम गेला की काही मिळणार नाही. आम्ही बघ, भविष्याचा विचार करून साठवून ठेवतो. भरपूर अन्न. खायला काही कमी नाही. छान छान वस्त्र आणि टुमदार बंगालीत राहतो आम्ही. तू पण काम कर आणि आमच्या सारखा श्रीमंत हो.” कुणीतरी समजवायचं.
“मला तर बुवा वाटतं, नको भविष्याची चिंता. आजचा दिवस आनंदात घालवा. जीवन क्षण दोन क्षणांचं! आज आहे, उद्या नाही. आहे तोवर यथेच्छ उपभोगा. जग सोडून जातांना जमा केलेलं मला ते काय कामाचं? आणि मी तुमच्या जीवनात मला जमेल तसा माझ्या कलेने आनंद देतोच की. तेही एक कामच गरज पडेल तेव्हा तुम्हीही मदत करालच. एकमेका करू सहाय्य्य, अवघे धरू सुपंथ!” याची विचारधारा अगदीच अव्यवहारी.
“कर बाबा, कर. तुला हवं ते कर.” समोरचा थकून म्हणायचा.
दिवसांमागुन दिवस सरत गेले. ऋतू बदलायला लागले. हिवाळा सरून उन्हाळ्याची चाहूल लागली. रान वाळायला सुरुवात झाली. झाडांवरची फळं मोजकीच राहिली. रानमेवा संपत आला. वडाखालच्या या भटक्याला उन्हाळ्याची झळ पोचायला लागली. मात्र दिवसभर चित्र काढणं, गाणं गात लोकांचं मनोरंजन करणं आणि पोरासोरांसोबत खेळत राहण्यात याचा दिवस जात असायचा. लोकांनी याला समजावणं हळू हळू बंद केलं.
उन्हाळा कसाबसा याने वडाखाली सावलीत काढला. सहा आठ महिन्यांआधी या कामकऱ्यांच्या संपन्न गावी येऊनही पैसे अडका याच्या गाठी जमला नाही. कौतुकाने पोट भरणं कठीण आहे हे याला जाणवायला लागलं होतं. याच्या अंगाची पार काडी झाली होती. आणि काबाडकष्ट करणं याच्या अंगी मुळातच नव्हतं आणि आता ते शक्य ही नव्हतं. रानावनात कधी खायला मिळालं नाही तर गावात कुणी खायला देईल, कुणाला तरी दया येईल आणि दिवसापूरतीतरी भूक भागेल या आशेने हा घरोघर फिरायचा. लोकांची करमणूक करून, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणं याला गावातल्या कष्टकऱ्या लोकांनी काम कधी समजलंच नव्हतं. मोठ्या कष्टाने जमावलेलं धान्य कुण्या सड्याफटिंग्याच्या हाती का द्या? पडेल पोटाला ताण तेव्हाच करेल हा काम असं म्हणत लोकं याच्या मूक दीन याचनेकडे दुर्लक्ष करू लागली.
उन्हाळ्याच्या अंती एका दिवशी वावटळ उठली. आकाशात ढगांनी गर्दी केली आणि सो-सो घोंघावणाऱ्या वाऱ्यासोबत धो-धो पाऊस पडू लागला. वडाखाली असला तरी थेंब थेंब पाणी याच्या अंगावर पडू लागलं. दिवसभर पाऊस पडला. लोकांची कामं खोळंबली. शेतात कुणी जाऊ शकलं नाही. घरीच तोंड लांबती ठेऊन लोकं निमूट बसली. रात्र झाली तरीही पाऊस सुरूच होता. थंडीने गाव गारठलं.
दुसऱ्या दिवशी गाव जागं झालं पण गेल्या दोन ऋतूंत ऐकू येणाऱ्या गाण्याने नव्हे तर भयाण शांततेने! वेशीपाशीच्या वडाखाली निपचित पडलेला एक आकार थंडीने गारठून गेला होता. हळू हळू लोकं अवतीभवती जमा झाली. “अरेरे!” म्हणत चुकचुकत, हळहळत काही वेळ थांबली. पण आता पावसाचे दिवस परतल्याने शेतात राबण्याचे होते. बाजार व्यवहार परत सुरु होण्याचे होते. सगळ्यांना कामं करायची होती. घटकेत सगळी मंडळी पांगली. वडाच्या झाडाखाली त्या भटक्याचा प्रेताला विचारणारंही कुणी राहीलं नाही. प्रेत होतं तसंच पडून राहीलं. कुणीतरी स्मशानातून आलं, प्रेताला चितेवर ठेवलं आणि निघून गेलं.
दुसरा दिवस उजाडला. लोकं जागी झाली आणि आपापल्या कामाला निघून गेली. कुणाला काही चुकचुकलं नाही. कुणाला काही फरक पडला नाही. कामकऱ्यांच्या गावात कष्टाने संपन्नता वाढतच राहिली पण त्या गावात परत कुणी गाणारा वेडा फिरकला नाही.