अंदाजे वाचन वेळ : १३ मिनिटे
मी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावली आणि मनगटावरच्या बँडवर टॅप करून किती वाजलेत ते बघितलं. रात्रीचे अडीच वाजले होते. मागच्या सीटवर बसलेल्या मामाने नशिबाला शिव्या देत कितीही त्रागा केला तरी आता त्याकडे लक्ष देण्याच्या पलीकडे मी गेलो होतो. साडे तीन तास आम्ही दोघे त्याच त्या मार्गावरून फिरत होतो आणि तरीही आम्ही थांबलो होतो ते हॉटेल आम्हाला सापडत नव्हतं. आमच्या दोघांच्याही डोक्याचा गोंधळाने पार फज्जा उडला होता. आतावर आमच्याशी काय घडत होतं त्यावर विचार करत आम्ही दोघे एकमेकांशी बडबड करत होतो.
“थांबा हो मामा. एकदम शांत राहू द्या बरं मला. एकतर आधीच काही सुचत नाहीये आणि आपण नुसतेच बडबड करत भटकत आहोत. काही कुणाचं भूत-बित नाही लागलंय आपल्यामागे आणि काही कोणता चकवा-बिकवा घुमवत नाहीये आपल्याला.” मी थोडंसं चिडक्या स्वरातच मामाला सुनावलं. शेवटचं वाक्य बोललो तसं माझ्या अंगावर शिरशिरून सर्र्कन काटे उठले.
माझा या अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता तरी लहानपणापासून या असल्या गोष्टी ऐकून असल्याने माझ्या मेंदूने भीतीची जाळी माझ्यावर टाकली विणली होती. आपल्या जडणघडणीच्या कालावधीत आपण अश्या गोष्टी ऐकतो आणि वाचतो त्यावरून स्मृतीत कुठल्यातरी कप्प्यात त्या साठवल्या जातात आणि त्या गोष्टींसारखा एकदा प्रसंग थोडा जरी घडायला तरी आपलाच मेंदू आपलाच वैरी होतो, भास व्हायला लागतात आणि वेड लागतं.
मी निव्वळ टाईमपास म्हणा किंवा मनोरंजन म्हणून भयकथा अथवा हॉरर थिम वाली पुस्तकं वाचायचो. मुव्हीज पण असल्याच बघायचो पण मनावर कधी असला प्रभाव पडला नव्हता. लॉजिक आणि रिझनींग, सारासार प्रगत विचारधारेचा मी कधी असल्या अंधश्रद्धेला बळी पडणार नव्हतो.
“सॉरी, मामा. मी चिडलो जरा. पण खरंच थांबा हो जरा. साडे तीन तास आपण नुसतेच गोल गोल चक्कर मारत आहोत आणि मला पक्कं माहितीये की आपलं हॉटेल इथेच आहे कुठेतरी. फक्त कुठलीतरी गल्ली मिस होतेय.”
“चिडू नको रे. माझ्या डोक्यात काही घुसत नाही आहे. बैताडांसारखे आपण नुसते चक्कर मारत आहे. त्या वास्कोचं भूत मानगुटी बसलं आहे आपल्या.” मामाने परत नको त्या वेळी नको ती कमेंट मारली.
मी हताशपणे हॅण्डलवरची मूठ घट्ट आवळली, रागावर ताबा आणण्यासाठी एक दीर्घ श्वास घेतला आणि ओठ गोल करून नि:श्वास सोडला. त्या गारठवून टाकणाऱ्या रात्रीच्या वातावरणात ही आपलं अंग तापतंय हे जाणवत होतं. पाच-सहा श्वास-नि:श्वास आवर्तनांनंतर डोक्यात लक्ख प्रकाश पडला. काहीतरी आठवलं आणि मामाला म्हणालो, “या वेळी आपण हॉटेल ला पोचू. मला माहितेय.” मामा काहीच नाही म्हणाले. कदाचित माझ्या चिडण्याचा राग आला असावा. मला त्याची पर्वा नव्हती. आम्ही एकमेकांसाठी रिस्पॉन्सिबल होतो. आम्हा दोघांनाही सुखरूप घरी परतायचं होतं. मी गाडीच्या सेल्फ-स्टार्टर बटणवर बोट दाबलं. गाडी ‘थम्प थम्प थम्प’ चा आवाज करत सुरु झाली. माझ्या डोक्यात विचारशृंखला सुरु झाली.
सकाळी सूर्योदयासच आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. पुरेपूर झोपण्यासाठी वेळ नव्हता. तसंही गेले चार दिवस मोटारसायकलवरून फिरण्यात, समुद्रकिनाऱ्यावर लाटांवर मस्त्या आणि गोंगाट करण्यात घालवले होते. वर्षभर राब राब राबून काढल्यानंतर एन्जॉय करण्यासाठी मी आठवडाभराच्या सुट्ट्या टाकल्या होत्या. मामांनाही सुट्ट्या फार कमी मिळायच्या. या वेळी गोव्यात जाऊन मनसोक्त फिश खायची आणि मौज मजा करायची असं ठरवून आम्ही पुण्याहून गोव्यात मोटारसायकलनेच पोचलो होतो. दिड दिवसांचा मोटारसायकलचा प्रवास, नंतर सतत तीन दिवस घूम-फिर, मौज मस्त्या आणि एन्जॉयमेंट मनसोक्त उपभोगली होती आम्ही. या पायी झोप, आराम याला आम्ही फाटा दिला होता. आज थकवा जाणवत होता. परतीचा दिवस उद्यावर आला. आमच्या पोटात कावळे ओरडत होते. फार भूक लागली होती. बारा वाजता आम्ही शेवटची अस्सल गोवन फिश थाळी रस्त्याकाठच्या खानावळीत खाल्ली. खानावळ तशी जेमतेमच होती. फार अशी गर्दी नव्हती. एका कोपऱ्यात एक मोठं कुटुंब दोन टेबल्स जोडून मोठं मोठ्याने गप्पा मारत जेवीत होते. आमच्या टेबल पासून जवळच एक प्रेमी युगुल बिअर्सच्या बाटल्या किणकिणवत चिअर्स करून ओसंडून वाहणारं प्रेम एकमेकांशी व्यक्त करत होतं. आमच्या अगदी समोरच तिघे जण हार्ड ड्रिंक्स घेत गप्पा मारत बसले होते. आम्ही आमची थाळी खाण्यात गुंग झालो होतो. जेवण संपवून मी हात धुण्यासाठी वॉश बेसिनजवळ गेलो. तोवर समोरच्या तिघांपैकी एकजण माझ्या मागेच रांगेत उभा राहिला. हात धुवून मी वळलो आणि त्याची आणि माझी नजरानजर झाली. तो माझ्याकडे बघून हसला. सहज म्हणून मी पण हसलो आणि माझ्या टेबल कडे वळलो. मामाने तोवर वॉलेट मधून जेवणाचे पैसे भरले होते आणि हात धुण्यासाठीही वॉश बेसिन कडे गेले. मी मोबाईल काढून उगाचंच टिचूक टिचूक सुरु केलं.
“हॅलो! व्हाट्स युअर नेम बडी?” आवाज आला म्हणून मी वरती मान काढली. मागचा तोच व्यक्ती टेबलवर हात ठेवून बोलत होता.
हा कोण उपटशुंभ? माझ्याशी का बोलतोय म्हणून मी विचार केला. नाव सांगायला म्हणून मी माझं नाव सांगितलं खरं पण त्याचाशी बोलण्याची माझी इच्छा नव्हती. त्याला कटवायचं म्हणून तोडकंच उत्तर दिलं. “आकाश.”
“नाईस नेम. व्हेरी कॉमन बट नाईस नेम. व्हेअर आर यु फ्रॉम?” त्याने आणखी विचारपूस करायला सुरवात केली आणि माझ्याकडे झुकला. त्याच्या तोंडातून दारूचा घाणेरडा वास आला. मला शिसारी आली आणि मी नाकाकडे हात लावला.
“कभी आया इधर? टुरिस्ट है ना तूम?”
“हां| घुमने आया इधर| थोडा दूर से बात करो अंकल! दारू का बास आ रहा है|” याला तुसट बोलूनच हाकलावं लागणार याचा अंदाज आलाच होता मला.
“ए मॅन, सॉरी| किधर रुका है?” त्याने विचारलं. मुव्हीज मध्ये गोव्यातले ख्रिश्चन लोकं असं म्हणतात पण खरंच प्रत्यक्षात कुणीतरी आपल्याला असं म्हणतंय म्हणून त्याच्या “ए मॅन” म्हणण्यावर मला हसायला आलं.
“पास में ही है!”
त्यावर त्याने “किधर? पास में किधर? बता|” सात-आठ वेळा म्हणत माझं डोकं खायला सुरुवात केली. काही केल्या तो मी कुठे उतरलोय ते ऐकल्या शिवाय तो काही पिच्छा सोडणार नाही असं मला पक्कं वाटलं.
“सिओलीम. ओके? अभी जाओ| वो उधार आपके दोस्त लोग बुला रहें आपको|” असं म्हणत मी त्याला त्याच्या पाठीमागे वळायला हातबोटांनीं खुणावारा करत सांगितलं. माझ्या कपाळावर चिडचिडेच्या लकेरी पडायला सुरुवात झाली होती. तरीही शक्य तेवढं सभ्य राहून त्याला टाळाटाळ करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो.
“उधर इतनी रात में नक्को जाना| वास्को पकडता उधर|” त्याने दारूने ताठरलेल्या लालवट झालेल्या डोळ्यांनीं माझ्या डोळ्यात बघत इतक्या गंभीरतेने सांगितलं की क्षणभर मी काय म्हणावं तेच मला समजलं नाही. त्याने माझ्या डोळ्यांत एकटक बघणं सुरूच ठेवलं.
“ए पास्कल! कायको परेशान कर रहा रे कस्टमर को? चल निकल वहा से बेवडे|” त्या खाणावळीतली मालकीण असेल ती खेकसली तसा तो मला डोळा मारीत एका हाताने सॅल्यूट करत मागे मागे पाच सहा पाऊल टाकत पलटला. “नहीं जाना| वास्को है उधर, वास्को|” तर्जनीने उजवीकडे दिशानिर्देश करत पास्कलनं बजावलं.
“सॉरी सर! ऊसको समझता नै|” ती म्हणाली. “ऐसेही सस्ती दारू पी के बडबडता है साला|”
“ठीक है|” मी एवढं काय तो बोललो आणि मोबाईल खिशात ठेवला..
तेवढ्यात मामाला पास्कल ने गाठलं आणि त्यांना पकवायला सुरुवात केली. काय तो सिन होता. त्या चक्रम पास्कलने मामला काय काय सांगितलं आणि काय नाही कुणास ठाऊक पण मामाने त्याचं सगळं ऐकलं. जाता जाता त्या दोघांनी हॅन्ड-शेक केला. बस एकमेकांना “अंदाज अपना अपना” मधल्या अमर-प्रेम वालं आलिंगन देणंच तेव्हडं बाकी राहिलं होतं.
मामा टेबल वर हसत हसत पोचले. मी उजव्या हाताच्या तर्जनीने माझ्या डोक्याला “स्क्रू” ढिला केल्याच्या खुणावाऱ्या केल्या आणि मिश्कीलपणे मामांना स्माईल दिली. मामानेही तशीच स्माईल देऊन “चल” म्हंटल.
आम्ही खाणावळीतून बाहेर निघालो. मोटारसायकल वर बसून गाडी सुरु केली. जाता जाता हॅंडलच्या आरशातून मामाने पास्कलला बाय करतांना मी बघितलं. तीन दिवस याच रस्त्याने आम्ही ये-जा केली होती त्यामुळे अंधार असला तरी रस्ता पक्का पाठ झाला होता. हवेत फार गारठा होता. अंगात जॅकेट आणि गळ्याला मफलर असूनही थंडी बोचत होती. वरती आकाशात चंद्र दिसत नव्हता. एक दोन दिवसांवर अमावश्या असेल बहुतेक. मी सहज म्हणून वरती बघितलं. चांदण्या मोठ्या मोहकपणे सौंदर्याची वर्षा करीत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा नारळी-पोफळीची झाडं होती, दोन्ही कडेला शेती होती आणि रस्ता एकदम मोकळा. थंडीने गारठून ना माझ्या, ना मामाच्या तोंडातून आवाज निघत होता. बस्स हा क्षण जगायचा, कायम आठवणीत ठेवायचा. हे ‘ऍडव्हेंचर’ कायम चांगलंच आठवणीत राहणार आहे याची आम्हा दोघांनाही काही कल्पना नव्हती.
थकव्यामुळे मला झोप यायला लागली होती. जांभया देणं सुरु होतं आणि मामाने सहज बोलायचं म्हणून म्हंटलं, “किती वेळ लागेल रे पोचायला? मला झोप येत आहे. परवा सायंकाळची परतीची ट्रेन आहे. उद्यापासून तब्बल दिड दिवस बाईकिंग करत जाऊ. पोचू न रे आपण वेळेत?”
“पोचू की. नॉन स्टॉप गाडी १००-१२० ने पळवली की पोचू. उद्या कुडाळ-कणकवली-राजापूर करून रत्नागिरीला सायंकाळी ७ ला पोचू. तिथून सकाळी चिपळूण-खेड-महाड-भोर करत पुण्यात पोचू दुपारी २-३ पर्यंत. घरी जाऊन फ्रेश झालो की तुम्हाला पुणे स्टेशन ला पोचवतो पाच पर्यंत. पुढल्या सकाळी ९-१० ला तुम्ही वर्ध्याला!” मी म्हणालो खरं पण हा वेळ राखणं होईल का याची मला मुळीच शाश्वती नव्हती.
“बरं. इकडे म्हणे कुण्या वास्कोचं भूत आहे म्हणे शिवलीमला.” मामाने विषय काढला.
मला हसणं असह्य झालं. “त्या पास्कल नं सांगितलं वाटतं तुम्हाला.” मी थट्टेच्या स्वरूपात म्हणालो.
“हो. मजेशीर होता पास्कल. गप्पाड्या माणूस एक नंबरचा”.
“तुमची चांगलीच गट्टी जुळली होती त्याच्याशी. बघितलं मी.”
“मला टाइम पास करायला मिळाला नं. एनीवे, या वेळी फार घाई घाईत फिरणं झालं. पुढल्या वेळी फॅमिली सोबत येऊ धम्माल करायला.” मामाने इथून निघण्याआधीच पुढल्या खेपेचा आराखडा तयार करायला सुरुवात केली.
गप्पा करता करता आम्ही सिओलीमला पोचलो. रस्त्यावर अंधार होता आणि दूर दूर पर्यंत कुणीही नव्हतं. नाही म्हणायला रस्त्यांवरती थोड्या थोड्या अंतरावर स्ट्रीटलॅम्प्स खाली पाच दहा फूट उजेड पडेल एवढा प्रकाश पडत होते. सिओलीमच्या एस बी आय बॅंकेजवळ मी गाडी हळू केली, पाय जमिनीवर टेकवले आणि दुखऱ्या बुडाला आराम म्हणून उभा झालो, पाठ दोन्ही बाजूंना वळवून जरा स्नायूंना ताण दिला. इथून आम्ही थांबलो होतो त्या हॉटेल चा रस्ता पुढल्या एका हार्डवेअरच्या दुकानापासून वळलो की सरळ सरळ होता. कुठेही पलटायची गरज नव्हती. “आपण पोचतो आता ७-८ मिनिटात हॉटेलवर. पोचलो की मी सरळ गादीवर पडून ठार होणार सकाळी ५ वाजेपर्यंत. मग अर्ध्या-पाऊण तासात पुढला प्रवास करू.” मी अगदी विश्वासाने मामाला सांगितलं. त्यांना कदाचित ऐकू नसेल गेलं. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मी परत म्हणालो. तरीही काही उत्तर मिळालं नाही. परत एकदा म्हणूनही उत्तर मिळालं नाही म्हणून मी मागे वळून “मामा” एवढंच म्हणालो.
“आं??!” मामाने अचानक दचकून उत्तर दिलं पण त्यांच्या चेहऱ्यावर मला न ओळखल्याचे भाव जाणवले. कदाचित मला तसा भ्रम झाला असेल असं वाटलं. दोन-तीन सेकंद तसाच चेहरा ठेवल्यानंतर त्यांना भान आलं. “काय?”
“मी म्हंटलं, आपण पोचतो ७-८ मिनिटात हॉटेलवर.” मी हसून म्हणालो.
“बरं. थंडी फार आहे. कान बुजले माझे.” म्हणत मामाने दोन्ही तळहातांनी त्यांचे कान घासले.
मी ऍक्सिलरेटर वाढवला आणि गाडी सरळ सरळ नेली. दहा पंधरा मिनिटं झाले तरी हॉटेल आलं नाही म्हणून मी मामाला म्हणालो, “मामा, गेट दिसलं का?” त्यांनी “लक्ष नाही बुवा!” म्हणत परत थंडीचं नाव काढलं. मला पुढे एक तिठा दिसला. तिथेच एक मोठंसं झाड होतं. आम्ही पुण्याहून येतांना हेच झाड लक्षात ठेवलं होतं. एक दोन छोटे वळणं घेऊन आम्ही हॉटेल ला पोचलो होतो. अर्थात त्या वेळी उजेड होता. आता मात्र बऱ्यापैकी अंधार. आपण पोचलोय, फक्त गेट कडे लक्ष द्यावे लागेल म्हणून मी गाडी हळू हळू समोर नेली. तरी हॉटेलचं गेट दिसलं नाही.
“मामा आपण बहुतेक थोडंसं पुढे निघून आलो आहोत. गेट दिसतंय का बघा इकडे तिकडे.” मामाला गेट शोधायला सांगून गाडी पलटवली. मी सुद्धा गेट शोधू लागलो. असं करता करता आम्ही होली क्रॉस चॅपल पर्यंत पोचलो. मला ठाऊक होतं की हॉटेल मागेच गेलं म्हणून मी गाडी परत फिरवली. परत आम्ही त्याच तिठ्यापाशी पोचलो. मला जरा गोंधळलेल्यासारखं झालं. काहीतरी बोलून मी परत गाडी वळवली. एकमेकांशी बोलत आम्ही कुठल्यातरी वेगळ्याच गल्लीत शिरलो. परत मूळ रस्त्यावर आलो. तिथून परत त्या तिठ्यापाशी पोचलो. परत माघारी वळलो ते थेट होली क्रॉस हायस्कुल पर्यंत पोचलो. आपण त्याच त्याच ठिकाणी पोचतोय आणि परत माघारी येतोय असं तीन-चार दा झाल्यावर मी गमतीने मामाला म्हणालो, “मामा, वास्को चं भूत लागलं. हरवलो आपण.”
मामा पण हसले, “हो. तो म्हणे आपल्या मानगुटीवर बसतो आणि आपल्यासारख्यांना म्हणजे भटक्यांना भटक भटक भटकावतो.” या वेळी मामाच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव नव्हते. त्यात गांभीर्याची भावना होती. मला ते जरा खटकलं पण बोलून दाखवलं नाही. मामानी नंतर मूड चांगला करण्यासाठी गमती जमती सांगायला सुरुवात केली. मी ‘हो’ ला ‘हो’, ‘नाही’ ला ‘नाही’ म्हणत गाडी कधी इकडे तर कधी तिकडे फिरवत होतो. सिओलीमच्या एस बी आय बॅंकेजवळ परत पोचल्यावर मी चिडचिडा झालो पण त्रागा व्यक्त करू शकत नव्हतो. मामा वारंवार अधून मधून ‘वास्को वास्को’ करत होते. माझ्याही डोक्यात दर दोन तीन मिनिटांनी ‘वास्को’चा विचार येत होता. मी गाडी थांबवली. खिश्यातुन मोबाईल काढला आणि ‘करंट लोकेशन’ ते हॉटेल चा मार्ग मॅप वरून शोधला. मामांच्या हातात मोबाईल देऊन कसं-कसं जायचं त्याची सूचना देण्यासाठी सांगितलं.
आता आम्ही हॉटेलवर पोचूच पोचू याची खात्री होती. टेकनॉलॉजी या वास्को च्या भुताला काय समजणार असा मनात विचार करून मी गाडी दहा वीस च्या वेगाने चालवायला सुरु केली. नीट उजवी-डावीकडची लक्षात असलेली ठिकाणं मनातल्या मनात टिक टिक करत आम्ही निघालो. मामाही व्यवस्थित दिशानिर्देश करत होते. असेच दहा पंधरा मिनिटं झाले आणि आम्ही परत त्याच तिठ्यापर्यंत पोचलो. हॉटेलचं गेट परत मिस झालं होतं. मी पुरता कावलो. हेल्मेट काढून कप्पाळावर हात मारला आणि चिडचिड करत बडबड करायला सुरुवात केली. मामाने आतापर्यँत संयम ठेवला होता आता ते ही कातावले. एकमेकांना कधी दोष देत तर कधी धीर देत आम्ही गाडी इकडून तिकडे फिरवली तरी हॉटेलचं गेट नाहीच सापडलं. एका सारख्या दिसणाऱ्या गेटसमोर गाडी थांबवून मामाने आवाज दिला पण काहीच उत्तर मिळालं नाही. हताश होऊन मी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावली आणि मनगटावरच्या बँडवर टॅप करून किती वाजलेत ते बघितलं. रात्रीचे अडीच वाजले होते. मी गाडीच्या सेल्फ-स्टार्टर बटणवर बोट दाबलं. गाडी ‘थम्प थम्प थम्प’ चा आवाज करत सुरु झाली.
तिथून मी एस बी आय बँकेकडे परत जाण्यासाठी गाडी वळवली. मधात श्री आजोबा देवस्थान लागलं. इतक्यांदा चकरा मारतानाही ते देवस्थान दिसलं होतं पण मी फक्त एक लँडमार्क किंवा खूण म्हणूनच ते लक्षात ठेवलं होतं. मनात मी आजोबाला म्हणालो, “आजोबा, या वेळी आम्हाला सुखरूप हॉटेल वर पोचू द्या.” माझं मन शांत होतं गेलं आणि तिथूनच मी गाडी वळवली. सावकाश गाडी चालवत रस्त्याच्या प्रत्येक खाणाखुणा परत परत आठवत, मनातल्या मनात टिक करत आम्ही पुढे पुढे जात होतो. समोरच दोन पुरुष दिसले. त्यांना आम्ही “हॉटेलचा रस्ता दाखवाल का?” अशी विनंती केली. त्यांतल्या एकाने “हे काय, समोरच आहे”. बस्स एव्हढंच म्हणून समोर दिशानिर्देश केला. “थँक यू!” म्हणत मी गाडी पुढे घेतली. पाच-दहा सेकंद झाले असतील. मी गाडीच्या आरशातून बघितलं. मागे त्या दोघांपैकी कुणीही दिसत नव्हतं. थोडा आणखी समोर गेल्यावर स्ट्रीटलॅम्पच्या प्रकाशात धम्मक पिवळया रंगाने रंगविलेल्या घराच्या भिंती दिसल्या. थोडं समोर जाऊन मी सहजच गाडी थांबवली. डावीकडे आमच्या हॉटेलचं गेट दिसलं.
गाडी आतमध्ये पार्किंगला लावून आम्ही गपचूप आमच्या फ्लॅटमध्ये पोचलो. दार उघडून किल्ल्या टेबलावर फेकल्या. सुटकेचा नि:श्वास टाकत आम्ही सोफ्यावर पडलो. क्षण-दोन क्षण कुणीच कुणाशी काही बोललं नाही. मी उठलो. फ्रिजमधून पाण्याच्या दोन बाटल्या काढल्या. मामाच्या हाती एक बाटली देऊन मी माझ्या हातातली बाटली तोंडाला लावली आणि घटाघट पाण्याचे घोट घेऊन अक्खी बाटली रीती केली. मामा माझ्याकडे बघतच राहिले. एव्हाना त्यांच्याही जीवात जीव आला होता. थोडं पाणी पिऊन एकमेकांना ‘गुड नाईट’ एव्हडं म्हणून आम्ही आपापल्या गाद्यांवर पहुडलो ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजताच उठलो.
पुढे आम्ही पुण्याकडे प्रवास सुरु केला. मामा यथावकाश वर्ध्याला पोचले. आम्ही बऱ्याच दिवसांपर्यंत झालेल्या घटनेचे किस्से नातेवाईकांना रंगवून रंगवून सांगितले.
एका रात्री मला या घटनेचं स्वप्न पडलं. त्या खानावळीत मी परत त्या पास्कल ला भेटलो. त्याने सांगितलं की वास्को नावाचा एक स्थानीक गाईड किंवा मार्गदर्शक सिओलीम मध्ये राहायचा. गोव्यात येणाऱ्या प्रवाश्यांना निरनिराळ्या ठिकाणी तो फिरवायला घेऊन जायचा. त्यातून होईल त्या मिळकतीत तो जीवन जगायचा. कालांतराने त्याचा हा उद्योग हळूहळू बंद झाला तशी त्याची खाण्यापिण्याची आबाळ व्हायला लागली. प्रवाश्यांच्या मागे मागे जाऊन तो त्यांना विनवण्या करायचा पण कुणाला त्याच्या सेवेची काही फारशी गरज राहिली नव्हती. एका दिवशी सिओलीमच्या मार्गावर त्याचा मृतदेह सापडला. गावातल्या लोकांनी त्याचा विधी केला. काही दिवसानंतर अधून मधून कुण्या न कुण्या रात्री-बेरात्री भटकणाऱ्या प्रवाश्याना दिशाभ्रम होऊ लागला. मी दचकून जागा झालो. सकाळचे सात वाजले होते.
आज या घटनेला कित्येक वर्षं झालेत. अजूनही आठवण आली की अंगावर काटा येतो. या घटनेचं स्पष्टीकरण अजूनही मला देता येत नाही. वास्कोचं भूत असेल, नसेल किंवा वास्को नावाचं खरंच कुणी असेल वा नसेल मला माहिती नाही. काही लोक म्हणतात तसा चकवा लागला असावा किंवा नसावा, कुणास ठावं? त्या रात्री आजोबाला विनंती केली आणि हॉटेलचा मार्ग सापडून आम्ही सुखरूप पोचलो या मागे काही अनाकलनीय तथ्य होतं किंवा त्या दिशाभ्रम आणि संभ्रमाच्या चक्रव्यूहात मनाच्या विस्मृतीत गेलेल्या कप्प्यातून प्रकट झालेलं, मेंदूने विणलेलं जाळं होतं ते मला आजही समाधानकारकरीत्या समजलेलं नाहीये.
Terrific story.