अंदाजे वाचन वेळ : २५ मिनिटे
“आ … s s s … आ … s s s … आ … s s s …”
माधुरीच्या किंचाळ्यांनी मोहन दचकून जागा झाला.
“माधुरी… माधुरी… काय झालं?” शेजारीच निजलेल्या माधुरीला घाबऱ्या काळजीच्या स्वरात त्याने हाक दिली. एका हाताने तिच्या खांद्याला हलवत दुसऱ्या हाताने अंधारात भिंतीवर चाचपडत त्याने बोर्डावरची बटन दाबली. अंधुकश्या निळसर झाकाच्या छोट्या ब्लबचा प्रकाश माधुरीच्या चेहऱ्यावर पडला. एका क्षणाच्या किंचाळ्या फोडून ती शांत झोपलेली त्याला दिसली.
“माधुरी… उठ गं. काय झालं? काय झालं? उठ.” तिच्या खांद्याला धरून तो तिला जागं करण्याचा प्रयत्न करत होता.
“ऊं…” काहीसं कण्हत माधुरीने कड पलटला.
मोहनने भीतीने कपाळावर जमलेली घामाची थेबं उलट्या हाताने पुसली. जवळ ठेवलेल्या स्टूल वर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली, झाकण उघडलं आणि घटाघटा पाणी प्यायला. बाटली स्टूलवर ठेवून त्याने जवळच ठेवलेला मोबाईल उचलला. पहाटेचे ४ वाजले होते. त्याने मोबाईल मधला ५ चा अलार्म बंद केला. झोप तशीही परत येणार नव्हतीच. आता परत गादीवर तासभर लोळत पडण्याचं आळसाशिवाय काही दुसरं कारण नव्हतं. पाठमोऱ्या माधुरी कडे कूस पलटत तो तसाच उघड्या डोळ्यांनी बघत राहिला.
त्यांचं लग्न होऊन अर्धा वर्षही झालं नव्हतं एकमेकांना जाणून घेण्याच्या प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली होती. जोडप्यांच्या आयुष्यात होणारं पहिलं भांडण अजूनही झालं नव्हतं. तिच्या पोटात त्यांच्या प्रेमाचा अंकुर मात्र उगवला होता.
काहीश्या गजबजलेल्या वस्तीतून गेल्याच महिन्यात ती दोघं रामनगरमधल्या विस्तृत पण काहीश्या पडक्या घरात शिफ्ट झाली होती. रस्त्याला लागूनच ते घर होतं. कित्येक वर्षांपासून भर टाकून टाकून रस्ता कंपाउंडच्या भिंती बुटक्या करायला लागला होता. दहा फूट रुंदीचं भरभक्कम लोखंडी फाटक प्रशस्त अंगणाचं, त्या घराचं आणि त्यामागच्या परसबागेचं रक्षण करत होता. कम्पाउंडला लागून ओळीने अशोकाची आडवीतिडवी वाढलेली अजस्त्र झाडं होती. कोन असतो तशी ती झाडं वाढली नव्हती. त्यापैकी एकही झाड व्यवस्थित, प्रमाणात वाढली नव्हती. आपापल्या फांद्या दुसऱ्यांत घुसवून त्यांनी अभेद्य भिंत उभारली होती. भर उन्हातही त्यामुळे अंगणात कायम सावली पसरलेली असायची.
सूर्य डोक्यावर असला की अंगणात प्रकाश पडायचा तो ही काही वेळच. तेव्हढ्या वेळात घराच्या वऱ्हांडयाच्या खांबांना सरपटून वेढलेल्या वेली मिळेल तेव्हढा प्रकाश शोषून जिवंत राहण्याचा प्रयास करत राहायची. तपकिरी रंगाच्या सापळ्यांना क्वचित कुठून उगवलेली पानं डकवल्यासारखी दिसायची. बाकी अंगणभर नुसती काळी माती. फाटकापासून घराच्या प्रवेशद्वारापर्यंत फरशी लावलेली होती. दुतर्फा अर्ध्या विटा रांगेने मातीत रोवून माती आणि फरश्या या दोघांत अंतर बनवलेलं होतं. एकीकडे गाड्या लावायला म्हणून चार लोखंडी खांबांवर पत्रे टाकून सावली केली होती. घराच्या वऱ्हांडयापासून दहाफूट अंतरावर तुळशी-वृंदावन उभं होतं खरं पण त्यात मातीशिवाय काहीच नव्हतं.
माधुरी एक आठवडा माहेरी गेली होती तेव्हा मोहनने ही वास्तू शोधून काढली होती. ऐसपैस जागा, आजूबाजूला विरळ वस्ती, वाहनांची वर्दळ कमी म्हणून शुद्ध वातावरण, शिवाय पाचेक महिन्यांनी येणाऱ्या लहानग्या बाळासाठी तिघं मिळून एक छानदार घर बसवण्यास उत्तम जागा म्हणून त्याला ही वास्तू फार आवडली होती.
साधारण ७५-८० वर्षांआधी या घराचं बांधकाम झालेलं असावं. उन्ह-वादळ-पाऊस झेलत इतकी वर्षं झाली तरी बांधकाम भक्कम होतं. कुठे कुठे भिंतींवरची खिपलं निघालेली होती. भिंतींवर दर-पावसाळ्यात शेवाळ उगवायचं आणि नंतर वाळून ते काळं ठिक्कर पडायचं. त्याची थरांवर थरं जमली होती. जमेल तेव्हढी डागडुजी करून देऊन पुढील पाच वर्षे भाडे-वाढही न करण्याची हमी देत त्या वास्तूच्या विश्वस्ताने किल्ल्या मोहनच्या हवाले केल्या.
त्या वास्तूचे मालक त्या घरात ३-४ वर्षे राहून विदेशी स्थायिक झाले होते. त्यांना स्वतःला पैश्या- अडक्याची काही गरज नव्हती. पण शेजार-संबंध म्हणून विश्वासू भागवतांच्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाकडे घराचे हक्क त्यांनी सुपूर्द केले होते. येईल त्या भाड्याने देत कित्येक वर्षं भागवत कुटुंबाने या घरापासून थोडी-फार कमाई केली होती. पुढे म्हातारपणाने कर्ता वारला आणि त्याच्या विधवेकडे घर भाड्याने देण्याचे काम आले. म्हातारीने तिच्या नाकर्त्या लहान्याला सुरेश भागवतला पैश्याअडक्याचा आधार म्हणून भाड्याची कमाई वळती केली आणि तीन गल्ल्या सोडून उभारलेल्या मोठ्याच्या घरी राहायला गेली. सहज म्हणून म्हातारीच्या उपकाराची फेड म्हणून उल्लेख करावा असं म्हणा किंवा गप्पांच्या नादात म्हणा पांढऱ्याशुभ्र शेंडीला पीळ लावत विश्वस्त सुरेश भागवतने एव्हढी माहिती किल्ल्या मोहनच्या हाती टेकवत सांगितली होती.
बेडरूमच्या भिंतींचं प्लास्टर फार उखडून गेल्याने त्याची डागडुजी करतांना त्रास होईल म्हणून तेव्हढी होईपर्यत बंद ठेवण्यासाठी तिला वेगळं मोठं कुलूप लावलं. त्याची वेगळी किल्ली मोहनच्या हाती देऊन भागवतने आठवडाभरात गवंड्यांना पाठवण्याची सोय करण्याचं आश्वासन दिलं होतं.
घराच्या पॅरापेट वॉल वरती डकवलेल्या नावाच्या काही अक्षरांचे तुकडे पडले होते. “मोहन-माधुरी” च्या नव्या घराचं नाव ‘म न-म धुर’ आपसूकच तयार झालं होतं. ते वाचून त्याला मोठी मजा वाटली होती. त्याला या क्षुल्लक माहितीचं काही घेणं-देणं नव्हतं. अगदी स्वस्तात भाड्याने मिळतंय म्हंटल्यावर त्याने सलग पाच वर्षांसाठी ते घर भाड्याने घेतलं होतं.
माहेरून माधुरी वर्ध्याच्या बस-स्टॅन्डवर पोचली तेव्हा तिला घेऊन मोहन थेट नव्या घरीच पोचला. त्या वस्तूची बाह्य अवस्था बघून जरासं विचित्र वाटलं होतं पण मोहनच्या आनंदात का विरजण घाला म्हणून ती त्या वेळी स्तुती करत घर भर फिरली होती. कुठे काय ठेवायचं? भिंती कोणत्या रंगाच्या रंगवायच्या, नव्या मापाचे पडदे केव्हा घ्यायचे वगैरे वगैरे गप्पा मारत तो दिवसभर त्यांनी आनंदात घालवला होता.
दुसऱ्या दिवसापासून दोघांचा संसार सुरु झाला. मोहनला ऑफिसला जावं लागत असल्याने त्याच्या नाश्त्या-जेवणाच्या टिफिनची सोय सकाळी लावून झाली आणि तो ऑफिसला गेला की दिवसभर ती एकटीच त्या वास्तूत असायची. उभार येऊ घातलेल्या पोटाला सावरत घर सजवण्याची, सामान लावण्याची कामं तिने सुरु केली. एखाद दोन तास त्यात घालावी आणि अन्नावरून वासना उडाली असली तरीही पोत्यातल्या गोळ्याला पुरावे म्हणून जेवण करे. सूर्य डोक्यावर येईपर्यंत घरातली सगळी कामं उरकलेली असायची. मग सायंकाळ होईपर्यंत मोहन परतण्याची डोळ्यात आतुरतेने वाट बघत ती वऱ्हांड्यात बसलेली असायची.
पुढल्या आठवड्यात भागवतांनी पाठवलेले गवंडी घराच्या भिंतींची खिपलं बुजवून गेली आणि नंतर गडीमाणसं भिंती रंगवून गेली. घराला आलेली कळा या नव्या सौंदर्याने खुलून गेली. बेडरूमच्या दाराचे टाळे उघडले. भिंतींना नव्याने पुट्टी लावली. माधुरीच्या आवडत्या बेबी पिंक रंगाचं आच्छादन करून झालं. पलंगाच्या पायाकडच्या भिंतीवरची विचित्र आकाराची खिपली खाली पडली होती. तिथल्या भागाला भगदाड पडलं असावं अशी शंका तिला येऊन गेली. पण आता त्यावर गुळगुळीत पुट्टीचे भर घालून रंग लावून ती भिंत नीट नेटकी करण्यात आली होती. मधून मधून गडीमाणसांना चहा-पाणी नाश्त्याच्या बहाण्याने बेडरूम निरखून निरखून तिनं बघितलं. बारा फूट लांबी रुंदीच्या चौरस खोलीत पलंग, कपाट, ड्रेसिंग टेबल लावण्याच्या जागा दाखवून तिने सामानाची लावालाव पण स्वतःच्या मनाने करवून घेतली.
तिन दिवसांनंतर माधुरी-मोहन बेडरूम वापरण्यासारखे नीट झाल्याने रात्री झोपायला गेले खरे पण माधुरीने त्या भिंतीच्या भगदाडाची गोष्ट त्याच्या कडे हो नाही करत काढली. ऑफिसच्या कामाच्या फाईली चाळत, कधी मध्ये कॅल्क्युलेटर वर आकडेमोड करत, फाईलींच्या कागदांवर शेरे लिहत हूं ला हूं लावत मोहन ऐकत राहिला. “आत्ता घर व्यवस्थित दिसतंय नं? मग झालं.” एव्हढं म्हणून तिच्यासोबत प्रेमीयुगुल करतात तश्या कुजबुजी करत, कधी येणाऱ्या बाळाच्या गोष्टी करत दोघांचाही डोळा लागला.
दिवसांमागुन दिवस जाऊ लागले. ती दोघंही त्या घरात स्थिरावली आणि आज माधुरीच्या किंचाळ्यांनी दचकून तो जागा झाला होता. या आधी ती कधीही अशी किंचाळली नव्हती. काहीतरी भयानक स्वप्न दिसलं असेल म्हणून ती किंचाळली असेल असं त्याला वाटलं. पण शांत नीरव वातावरणात ती भयावह तालस्वाराची किंचाळी त्याच्या मानसिक शांततेला छेद करत गेली.
दिवस उजाडला. माधुरी जागी झाली. फ्रेश होऊन तिने त्याला ब्रेकफस्ट समोर दिला आणि त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघत त्याच्या बाजूला खुर्चीवर बसली.
“काय गं? काय बघत आहेस?”
“तुला.”
“लाड येतोय?”
“हो. का? येऊ नये? लग्नाचा नवरा आहेस माझा तू.”
“माझ्याही लग्नाची बायको आहेस तू” म्हणत त्याने फ्लाईंग किस त्याने तळहातावरून तिच्या दिशेनं फुंकरला.
तिने हवेतल्या हवेत मुठीत किस पकडत ओठांना लावत परत त्याच्याकडे पाठवला.
“आज जाऊ नको का ऑफिसला?” लाडात येत त्याने तिच्याकडे बघत म्हंटल.
“नक्को. तू जा.” खुर्चीवरून उठत तिने त्याला खांद्याला हलकासा धक्का म्हंटलं. ती त्याच्या मागून निघाली तसा तिचा हात अलगद धरत त्याने तिला थांबवलं.
“खरंच जाऊ?” उजव्या डोळ्याची भुवई उंचावत त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक विचारलं.
“हो.” लडिवाळपणे उद्गारात, लाजत ती स्वयंपाक खोली कडे वळली.
गालातल्या गालात हसत त्याने जवळची बॅग उचलली आणि “येतो गं” म्हणत तो ऑफिसला निघाला.
आता ती घरात एकटीच होती. कामं उरकली आणि बेडरूम मध्ये पलंगावर हेडरेस्ट ला डोकं लावून बसली. समोरच्या भिंती वर आधी भगदाड असलेल्या जागी किंचितसा उभार आला होता. “गवंड्याने इथलं काम व्यवस्थित केलेलं दिसलं नाहीये वाटतं” म्हणत ती तिने जवळचा मोबाईल उचलला.
“मोहन, ऐक ना. अडीच-तिन फूट लांब आणि दोन-अडीच फूट उंच अशी एखादी फ्रेम आणशील आज? बेडरूममध्ये लावायची आहे. बाळाचं चित्र असेलेली?” एका दमात तिने मोहन ला सांगितलं. त्याने हो म्हंटलं आणि टाटा म्हणत तिने मोबाईल बाजूला ठेवला.
हिरव्या पानांनी ल्यायलेल्या, गुलाबी फुलांनी बहरलेल्या नाजूक लता-वेलींच्या छापाच्या अंथरुण घातलेल्या मऊ उबदार बिछान्यावर तिची पाठ टेकलेली होती. हेडरेस्टला मऊ पिसांनी भरलेल्या उशीवर डोकं ठेवून तिची शांत चर्या पोटातल्या गर्भाने उजळू लागली होती. तिला मुलगाच होणार याची भविष्यवाणी माहेरच्या जाणत्या बायांनी केली होती. म्हणूनच तिच्या चेहऱ्यावरचं तेज अधिकाधिक वाढीस लागलं होतं म्हणे. तिने दीर्घ श्वास घेतला. खिडकीतून येणाऱ्या झुळूकेसोबत मोगरा-जाई-जुईचा मंद सुगंध खोलीत दरवळू लागला. अंगावरचं पांढरीशुभ्र मखमली पांघरून पोटावरून गळ्यापर्यंत ओढलं. एक निश्वास टाकून हलकंसं स्मित दिलं त्यासरशी उजव्या गालावर किंचित खळी पडली. पोटाच्या उभारावर हलके हलके हात फिरवत येणाऱ्या बाळाच्या विचारात ती गुंग झाली. बेडरूमच्या उघड्या खिडकीतून गार हवेच्या झुळूका तिला सुखावत होत्या आणि डोळ्यांच्या पापण्या जड होऊ लागल्या. सुखावल्या वातावरणात मिटलेल्या पापण्यांमागे अंधार पसरू लागला. बुब्बुळांची हालचाल मंदावली आणि हळूहळू गडद होत जाणाऱ्या अंधारात ती प्रवेश करू लागली.
घटका-दोन घटका निघून गेल्या. तिचं शरीर तिला हळूहळू अवजड वाटू लागलं. मऊ बिछाना बोचायला लागला. खांद्याला मान घासत तिनं डोळे किलकिलते उघडे केले आणि अनामिक भीतीच्या असंख्य काट्यांची बोच सर्र्कन आपादमस्तक तिला जाणवली.
अंथरुणावरच्या गुलाबी पाकळ्यांच्या फुलांचा रंग गडद लाल होऊ लागला. लता-वेलींची हिरवी पानं पिवळसर तपकिरी रंगात बदलायला लागली. त्या कोवळ्या हिरव्याकंच वेली सुखून जरड होऊ लागल्या. तिच्या शरीराभोवती असलेल्या वेली हळूहळू तिला गुरफटून घेऊ लागल्या. त्यांच्या बंधातून मुक्त होण्यासाठी तिने हात-पायाला हिसके द्यावे म्हणून प्रयास सुरु केला पण तिचं शरीर अवजड-बोजड झालं होतं. मुसमुसत तिनं झटापटीला सुरुवात केली तसतशी वेलींनी तिला आणखीच आखाडणं सुरु केलं. वेलींच्या काटक्या वाळू लागल्या. त्यातून काटे उगवू लागले आणि वाढत वाढत तिच्या अंगाला बोचू लागले. आता हुंदक्यांच्या सोबत तिच्या डोळ्यांतून आसवांच्या धाराही वाहायला सुरु झाल्या. तिची झटपट, मोकळं होण्याचा प्रवास तिला अधिक थकवू लागला. तिने ओरडा सुरु करण्यासाठी तोंड उघडलं. त्यासरशी तिच्या स्वतःच्या काळ्याभोर लांबसडक केसांत जीव संचारला आणि दोन्ही कानांच्या पाळींच्या बाजूने सरसावत त्या बटांनी स्वतःची वेणी गुंफली आणि तिच्या मुखावरून गच्च गाठ बांधली. आता तिचं सर्वांग निश्चेत झालं होतं.
अंगावरचं पांघरून गळ्यापासून सरसर करत सरायला लागलं आणि जमिनीवर घसरून पडलं. नाकाच्या शेंड्यावरून तिची दृष्टी समोरच्या भिंतीकडे गेली. त्या भिंतीचा उभार हळू हळू धडधडायला लागला होता. तिच्याही छातीची धडधड वाढली आणि वेण्यांनी आवळलेल्या तिच्या मुखातून अस्फुट किंचाळी घुसमटून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली. पोटातल्या कळा वाढायला लागल्या आणि तीव्र वेदनेने तिचं अंग थरथरायला लागलं. तिने डोळे गच्च बंद केले. अनावर वेदनेत तळमळत असताना कुण्या एका क्षणी वेदनेची तीव्रता कमी झाल्यासारखी वाटली. गच्च मिटलेले डोळे तिने उघडले. पोटाची उभारी पिचली होती आणि कमरेपासून पायांपर्यन्त चिकट दुर्गंधी काळपट लाल स्रावाने बिछाना ओला झाला होता. आपलं बाळ? त्या क्षणी बाळाच्या स्मृतीने तिच्या मेंदूत कल्लोळ सुरु केला. तिचा गर्भ नाहीसा झाला होता. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारांनी मानेखालची उशी चिंब भिजून गेली. तिच्या डोळ्यांच्या पापण्या किलकिलल्या. समोरच्या भिंतीच्या उभाराच्या ठिकाणची खिपली तुकडे तुकडे होऊन जमिनीवर पडली होती. त्या उखडलेल्या भागात करड्या काळ्या सिमेंट-लाल विटांच्या आवरणातून “आ S S S …. ई S S S ….” असा किंगरा अस्पष्ट आवाज आला आणि रक्ताळलेल्या विकृत गोलाकार भाग बाहेर येऊ लागला. चिकट रक्त पाझरत तो गोळा जरासा सरकला आणि तिला तो गोळा तिचा गर्भ असल्याचा भास जाणवला. लाल झाकाच्या मिटलेल्या पापण्यांतून बुब्बुळांची होणारी हालचाल तिला जाणवली आणि त्याच सोबत रक्ताचा लोट त्या भगदाडातून वाहायला लागला. भराभर वाहणाऱ्या त्या लोटासकट तो गोळा धडकन खाली पडला.
“आ S S S …. ई S S S …. आ S S S …. ई S S S ….” चा आवाज हळूहळू तीव्र होऊ लागला आणि पलंगावर चढत वेड्या-वाकड्या अर्धविकसित अंगाचा तो जीव तिच्या पायावरून सरपटत वर वर सरकू लागला.
शरीरातला असेल नसेल तेव्हढा जोर एकवटून ती किंचाळली. तिचे डोळे उघडले तेव्हा घाबऱ्या चेहऱ्याचा मोहन दृष्टीसमोर होता.
“चिंता करू नका. होतं असं कधी कधी.” एक अनोळखी आवाज तिला ऐकू आला.
“पण असं कधी झालं नव्हतं. म्हणजे बेशुद्ध वगैरे होणं. हे पहिल्यांदाच…” कापऱ्या आवाजात मोहनने डॉक्टरला विचारलं.
“ब्लड प्रेशर कमी झालं होतं. तरी बरं, तुम्ही लौकर आणलंत दवाखान्यात यांना. काही औषधं लिहून देतो. पौष्टिक आहारासोबत या औषधांची गरज पडेल. हार्ट रेट थोडा वाढला होता. बाकी सगळं नॉर्मल आहे.”
माधुरीनं पडल्यापडल्या पोटाकडे बघितलं. पोटावरचा उभार कायम होता.
“म्हणजे जे दिसलं ते? भयानक स्वप्न होतं? तसंच असेल.” माधुरीने मनातल्या मनात स्वतःला समजावलं.
“मला जरा भीतीच वाटली होती. म्हंटलं काय झालं? मी पोचलो तेव्हा ही पलंगासमोरच्या भिंतीपाशी फरशीवर पडलेली दिसली होती. थँक यु डॉक्टर. आम्ही काळजी घेऊ.” मोहन बोलून गेला.
“मी फरशीवर पडली होती?” तिच्या घाबऱ्या भ्रमिष्ट सुरातली भीती तिलाच माहिती होती.
“हो. पण चिंता नका करू. तुम्ही आणि बाळ दोघंही सुरक्षित आहात.” डॉक्टरांनी सहज म्हंटल.
“थँक यु, अगेन, डॉक्टर!”
माधुरीचं डोकं अजूनही भ्रमात असल्यासारखं वाटत होतं. नेमकं ते तिला दिसलेल्या भयावह स्वप्नामुळे की औषधांच्या गुंगीमुळे ते कळायला तिला मार्ग नव्हता. यथावकाश ती दोघं घरी पोचली. गुंगीच्या अवस्थेतच माधुरीला बेडरूममध्ये पोचवून मोहन दिवाणखोलीत बसला.
पण माधुरीच्या काळजी त्याला क्षणोक्षण अस्वस्थ करत होती. एखाद दोन दिवस ठीक. ऑफिस ला कलावंत येईल, सुट्टी टाकता येईल पण पुढे काय? आई-वडील किंवा सासू-सासरे यांपैकी कुणीही येऊ शकणार नव्हतं. कुण्या नातेवाईकाला विचारावं तर तेही शक्य नव्हतं आणि कुणाला मदतनीस म्हणून ठेवावी तर विश्वासाचा प्रश्न होता. दिवाणखोली ते बेडरूम आणि परत दिवाणखोली अश्या कैक फेऱ्या मारून झाल्या. रात्रीच्या लांबलचक प्रहरा धीम्या गतीने सरू लागल्या आणि पलंगावरती माधुरीच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवत त्याला झोप लागली.
पुढला दिवस उजाडला. सकाळचा गजर वाजून वाजून थांबला. माधुरीची सकाळची लगबग सुरु झाली आणि काही वेळाने मोहन जागा झाला. आदल्या दिवशीच्या घटनेचा काही लवलेशही माधुरीच्या वागण्यातून झळकत नव्हता. तिला आठवण करून विचारण्यापेक्षा ती बोलेन तेव्हा बघू असा विचार करत त्यानेही सुट्टीचा विचार बाजूला सारला. फटाफट अंघोळ करून दिवाणखोलीत बसला. कॉफीचा कप आणि प्लेटमध्ये कांदापोहे घेऊन ती त्याच्या पुढ्यात बसली.
“आज जरा सुट्टी टाकशील का?”
“हं… मी तोच विचार करत होतो.” कॉफीचा घोट घेत त्याने तिच्या कडे बघितलं. “तू ठीक आहेस ना? नाही जात मी ऑफिस ला.”
“बरं.” काही आठवत तिने त्याला विचारलं, “काल एक गोष्ट आणायला सांगितली होती तुला. आणलीस?”
“कोणती? म्म… फ्रेम? आणलीये नं. कालचा दिवस असा गेला की त्या धांदलीत काय सांगणार?”
‘बघू…” तिने उत्सुकतेने इकडे तिकडे बघितलं. “लावून दे ना आता.”
“एव्हढी काय घाई आहे? शनिवारी लावून देईन ना.”
“नक्को! आत्ताच दे. प्लिज… आत्ताच!”
तिचं टुमणं लावण्यामागचं कारण बेडरूमच्या भिंतीवर आलेला फुगवटा दिसायला नकोसा वाटत होता हे खरं पण आदल्या दिवशी दुपारच्या स्वप्नाच्या भीतीचं कारण झाकून टाकण्यासाठी होतं हे त्याला ती सांगूही शकत नव्हती.
“बरं बाबा. देतो करून.”
तो पुढं काही बोलेन त्याआधीच तिने फ्रेमवरचं पेपरचं कव्हर फाडलं. “ए व्वा! मस्त आहे हं बाळ. गुटगुटीत!” तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून त्यालाही बरं वाटलं.
“आपलं ही बाळ असंच गुटगुटीत होणार हं.” बेडरूमच्या बाहेच्या भिंतीशी ठेवलेल्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये हातोडी शोधात तो म्हणाला.
“म्म…! हो…” तिने पोटावरती प्रेमाने हात फिरवला, किंचित मनात खुद्दकन हसली आणि मान त्याच्याकडे वळवली तशी टेबलापाशी वाकलेल्या त्याच्या आडून दरवाज्याच्या उंबरठयापाशी तोच रक्ताळलेला लिबलिबीत जीव वळवळताना तिला दिसला.
“आ … s s s नाही…” तिच्या किंचाळ्यांनी दचकून तो मागे वळला. तिच्या डोळ्यांतून भीती थरथरलेली त्याला जाणवली. हातापायांतले त्राण गेल्यागत ती खाली कोसळली.
“माधुरी… माधुरी… काय झालं? माधुरी…” त्याच्या काळजीयुक्त भयभीत थरारता आवाज तिच्या कानात विरत गेला.
तिचं संपूर्ण शरीर ठणकत होतं. बिछान्यावर कण्हत, चुळबुळ करत असतानां तिची दृष्टी समोरच्या भिंतीवर गेली. फ्रेममधलं ते गोंडस बाळ तिच्याकडे बघत गोड हसत होतं. ते बघून तिला दरवाज्याच्या आडोश्याला असलेला तो मांसाचा गोळा आठवला आणि तिने रडत डोळे परत बंद केले. मोहनने तिचा हात उचलला आणि तिने रडायला सुरुवात केली. हुंदके देत हळूहळू तिने झालेला भास सांगायला सुरुवात केली.
सुशिक्षित आणि विज्ञानवादी मोहनला भूतप्रेताच्या गोष्टी त्याच्याच पत्नीकडून ऐकाव्या लागतील असं कधी त्याला वाटलं नव्हतं. भास झाला असेल. कधीतरी एखादी भयावह धारावाहिक किंवा चित्रपट बघितला असेल आणि मनातल्या कप्प्यात दडलेली तेव्हाची भीती आता उफाळून वर आली असेल अशी काही कारणं त्यानं तिला समजावून सांगितली खरी पण तिची अवस्था बघून ती सहजासहजी परत नॉर्मल होणार नाही हे ही त्याला उमगलं. पुढले तीन दिवस सुट्टी टाकून तो तिचा सांभाळ करत घरीच राहिला. सायंकाळी तिला घेऊन जवळच्या बगिच्यात फिरायला गेला. तिचं मन रमावण्याचा प्रयत्न करत राहिला. त्याची धडपड तिला समजत होती पण राहून राहून तेच ते दृष्य तिला आठवलं की ती एकटक शून्यात बघत राही.
दिवसभर एकटी, रिकाम्या डोक्याने घरात वावरताना त्याच त्या गोष्टी परत आठवतील म्ह्णून बागकामाची काही भाजी पाल्यांची बी-बियाणी आणली. मन रमावं म्हणून अंगणातल्या बागेसाठी काही फुल-झाडं, रोपं आणून त्यांनी फाटकापासून घराच्या वऱ्हांड्यापर्यंत फरशीच्या मार्गाने दुतर्फा पेरली. वृंदावनात तुळशीच्या बिया रोवल्या.
माधुरीच्या गर्भारपणाचं समजेल, तिची मानसिक अवस्था समजून घेईल. माधुरीला आधार आणि सोबतही होईल यासाठी भामाबाई भगवतीला घरी बोलावलं तर? असा त्याचा विचार तिला बोलून दाखवला. म्हातारी म्हणजे जाणकार बाई असेल. काय हवं नको ते बघेल आणि दिवसभर सोबत राहिल्याने डोक्यात विचार येणार नाहीत. सायंकाळी आणि रात्री तो आणि ती असतीलच त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नसेल. ऑफिसला जाणं भाग आहे. माधुरीची काळजी घ्यायला म्हणून मोहनने तात्पुरती मदत मिळण्यासाठी भागवतांच्या म्हातारीला घरी राहण्याची विनंती केली. तसदी देतोय म्हंटल्यावर तिच्या सर्वांत धाकट्या मुलाला, सुरेशला वरचा खर्च भागवायला ज्यादा रुपये दिले. ज्यादा रक्कम मिळतेय म्हणून त्यानेही म्हातारीला एका रविवारी इकडे आणून सोडले. एकमेकांची ओळख झाल्यावर म्हातारी भामाबाई त्या दिवसापासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत माधुरीसोबत राहायला लागली.
तिच्याकडून कामाची अपेक्षा कधीच नव्हती. फक्त माधुरीला सोबत म्हणून तिचं असणं यासाठीच तिचं अस्तित्व घरी असायचं. घरात प्रवेशली की हवं तिथे बसून माधुरीशी गप्पा मारत राहायची. तिच्या बारीक डोळ्यांतून ती सगळं घर न्याहारत बसायची. गोड-गोड बोलून माधुरीशी जवळीक तिनं साधली होती. अंगावरची लुसलुशीत गोऱ्यापान त्वचेवर सुरकुत्यांच्या घड्या पडलेली भामाबाई लुकुलुकू मान हलवत घरभर फिरायची पण बेडरूममध्ये कधी जात नसे. नवरा-बायकोच्या घरात पाहुण्यांनी दिवाण खोलीपर्यंतच असावं. स्वयंपाकघर कर्त्या बाईनेच सांभाळावं आणि बेडरूम नेहमी बंदच असावं अशी आपली मतं ती नेहमी ऐकावीत राही. आपल्या आयुष्याच्या गप्पा-गोष्टी सांगत राही. मुलांची गाऱ्हाणी, सुनांची हेटाळणी कितीही हो-नाही म्हंटलं तरी कधीमधी दुःखाने सांगे आणि “कुणाला सांगू नको बरें.” असं बजावत राही. तिच्यासोबत रंगलेल्या गमती-जमती, कधी बागकाम, तर कधी दिवसभर खारवणी-साठवणीची कामं करण्यात माधुरीचा दिवस जायचा आणि मोहन आला की त्याच्या सोबत दिवसभरात काय काय केलं ते सांगत ती हळूहळू झालेला प्रकार विसरू लागली होती. दोनेक आठवडे मजेत गेले आणि सर्वंच सुरळीत व्हायला लागलं म्हणून दोघंही आनंदात राहू लागली.
रात्रीचं जेवण आटोपून दोघंही अंगणात आली. रात्रीच्या शांत वातावरणात, अशोकाच्या वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांच्या फांद्यांतून वाहणाऱ्या सळसळण्याचा आवाज तेव्हढी शांतता भंग करत होता. आकाशातून चंद्राचा प्रकाश जमीन उजळून टाकत होता. अंगणात हिरवीकंच फुलंझाडांची रोपं येणाऱ्या झुळूकेसोबत डोलू लागली होती. वृंदावनात तुळशीचं एकंच बीज अंगावर मातीची पापडी डोईवर उचलू बघत होतं.
“बघ! तुझी जोपासना! बाग बहरेन आता एखाद दोन महिन्यांत आणि हे रोप बघ तुळशीचं. हे ही उगवलं आहे. आता बाळ ही तुझ्या जोपासण्यानं गुटगुटीत होऊनच येईल बघ.” तिच्या पोटाच्या वाढणाऱ्या उभारावर हलकेच हात फिरवत त्याने कौतुक केलं.
“हॅट. काहीतरीच.” मोहनच्या कौतूकाने माधुरी लाजली. “चला आत. गारठत आहे आता.”
माधुरी मोहनच्या हातात हात टाकून बेडरूममध्ये पोचली. अंगावर गुबगुबीत पांघरून घेऊन तिने जांभई दिली. त्याच्याकडे प्रेमाने बघत तिचा डोळा कधी लागला ते तिलाच कळलं नाही. मोहन लॅपटॉपवर ऑफिसची उरलेली कामं पूर्ण करत होता. रात्री साडे दहाला त्याचा एका विदेशी क्लायंटसोबत ऑनलाईन कॉल झाला. कॉलचं रेकॉर्डिंग कापून त्याने त्याची वेगळी फाईल डेस्कटॉपवर सेव्ह केली. फाईल क्लायंटच्या सर्वरवर अपलोडला लावली आणि बिछान्याबाजूच्या स्टूलवर ठेवून तो उठला. स्वयंपाकघरातून पाणी पिऊन परत बिछान्यावर बसून माधुरीच्या घनदाट केसांवरून मायेने हात फिरवत राहिला. बाजूच्या खिडकीतून चंद्राचा प्रकाश तिरसट येत बिछान्याच्या समोरच्या भिंतीवर पडत होता. भिंतीवरच्या त्या बाळाच्या तस्विरीवरती प्रकाश पडला. त्या बाळाच्या गोंडस हास्याकडे बघत काहीसा लाजत त्याच्या स्वतःच्या येणाऱ्या बाळाची चाहूल कधी येईल याच्या विचाराने मनातल्या मनात आनंद बहरायला लागला होता. आधीच उशिरापर्यंत खेचलेल्या कामाने थकलेल्या पापण्या गार हवेच्या झुळुकांनी जड होऊ लागल्या होत्या. डोळे झाकल्या गेले.
“आ … s s s … आ … s s s … आ … s s s …”
माधुरीच्या किंचाळ्यांनी मोहन दचकून जागा झाला. या महिन्यात दुसऱ्यांदा ती भयावह किंचाळली होती. या वेळी मात्र तिला न जागी करता तिच्या कपाळावर “शांत… शांत … शू S S S …!!!” म्हणत हलके हलके थोपटू लागला. “ऊं…” करत ती निद्रिस्तच होती. त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितला. पहाटेचे ४ वाजले होते. आज परत झोप-मोड झाली होती. स्वतःचे डोळे चोळत त्याने कूस पालटली आणि हेडरेस्टवर उशीचा डोक्याला आधार देऊन टेकला. समोरच्या भिंतीवर हलकासा प्रकाश दिसत होता. भिंत रिकामी दिसली म्हणून त्याने परत डोळे उघडझाप केले. मोठ्ठाले डोळे करून त्याने रोखून बघितलं. भिंतीवर फ्रेम नव्हती. मोबाईलचा टॉर्च सुरु करून त्याने खाली पाय ठेवले.
“फ्रेम पडली वाटते.” हळूहळू पाऊलं टाकत तो भिंतीपर्यंत पोचला.
“आ … आई गं!” पाऊलातली तीव्र बोचरी वेदना एका क्षणात मस्तकात गेली. डावा पाय वर घेत त्याने मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रक्ताळलेल्या पाउलातून बोचलेला फ्रेमच्या काचेचा तुकडा ओढून काढला. “इथेच लावायची होती हिला फ्रेम. कवडीची अक्कल लावायला काय झालं होतं.” झोपलेल्या माधुरीकडे चिडत बघून तो म्हणाला खरा पण त्यालाच वाईट वाटलं. “आपल्या बाळाची आई होणारेय ती. तिची काय चूक? आली असेल जोराची हवा. पडली असेल फ्रेम.” असं पुटपुटला. लंगडत लंगडत जात बेडरूमबाहेर ठेवलेल्या टेबलाच्या ड्रॉवरमधून कापूस-पट्टी काढून जखमेला लावली. बेडरूममध्ये पोचला. बिछान्याबाजूच्या स्टूलवर ठेवलेल्या लॅपटॉपची स्क्रीन कीबोर्डवर पाडली. हातात सुपडं आणि केरसुणी घेऊन त्याने काचेचे तुकडे जमा केले. कचऱ्याच्या डब्ब्यात सुपडं पालटं केलं. केरसुणी ठेवली. बिछान्यापाशी पडलेली फ्रेम उचलली. भिंतीवरचे खिळे शोधण्यासाठी भिंतीवर तळहाताने चाचपडलं. भिंत गार पडली होती. तिच्या उभाऱ्यावर किंचित ओलसरपणा जाणवत होतं. रात्री वाऱ्यासोबत बाष्प बेडरूममध्ये आलं असेल आणि भिंतीवर जमलं असेल असा विचार करत त्याने हात पायजम्याला पुसला. फ्रेम भिंतीवर चढवली आणि डोळे बंद करत बेडवर परत झोपी गेला. पुढला दिवस रविवारचा म्हणून उशिरापर्यंत झोप काढली तरी काही हरकत नव्हती.
सकाळ झाली तीच माधुरीच्या चिडचिडीपासून! तिच्या चिडण्याच्या आवाज ऐकून त्याने डोळे उघडले.
“काय झालं सकाळी सकाळी?” त्याने तेव्हढ्याच चिडक्या स्वरात विचारलं.
“काय झालं काय? माझी फ्रेम पाडलीस ना. धसमुसळ्या!” तिने चिडून उत्तर दिलं.
“मी थोडीच पाडली. पडली असेल हवेच्या झोकाने.”
“मग खिडकी कोण बंद करणार?”
“तूच तर खिडकी नेहमी उघडी ठेवते. तूच तर खिडकी जवळ होती. तूच बंद करायला हवी होती.”
“तुम्हाला माझी काळजीच नाही. तुम्हीच तर रात्रभर काम करत होता नं? मग कामं झालं तेव्हा खिडकी का नाही बंद केली?”
“आता यात माझीच चूक का? ती फ्रेम पडली. काचेचे तुकडे पडले होते जमिनीवर. माझ्या पायाला रुतला आणि जखम झाली त्याचं काहीच नाही तुला.”
“मग कशाला अनवाणी पायाने फिरायचं? दाखवा इकडे पाय.”
“काही गरज नाही. रात्रीच केलं बँडेज माझं मीच.”
“आता तुझं माझं झालं का?”
“हो. तू झोप. झोपेत किंचाळ. माझे टेन्शन्स माझ्याकडेच ठेवून मला शांतपणे झोपू द्यायचं तर नाही. तू किंचाळ!”
तिच्या डोळ्यांतून आसवांच्या धारा गळायला लागल्या.
“तुम्ही मला समजूनच घेत नाही.”
“आणि माझं? मला नसतात का टेन्शन्स. की फक्त मी तुलाच दरवेळी सांभाळून घ्यायचं?”
“हो! तुम्हीच घ्यायचं. लग्न केलंय तुम्ही माझ्याशी.”
आसवांसोबत हुंदकेही बाहेर पडायला लागले.
“आता बस कर रडणं. प्लीज…” त्याच्या आवाजातला चिडका स्वर अजूनही खाली उतरला नव्हता. अंगावरचं पांघरून झटकून त्याने बिछान्यावरून ताडडदिशी पाय खाली आपटले. पाय जमिनीवर टेकताच बोचऱ्या पायाच्या जखमेचं दुखण्याच्या कळा पायात जाणवल्या. त्याही पेक्षा दाम्पत्तिक जीवनाच्या पहिल्यावहिल्या भांडणाच्या कळाच अंगभर जास्त बोचल्या. “राहू दे.” लंगडत लंगडत तो न्हाणीघराकडे जायला लागला. बेडरूमच्या उंबरठ्यापाशी थबकून आश्चर्याच्या दृष्टीने बघत दिसलेल्या भामाबाईकडे बघत तो म्हणाला “अरे तुम्ही? या. या. केव्हा आलात?”
“आत्ताच आले. काय झालं? भांडलात बिंडलात की काय?” डोईवरचा पदर दाताखाली दाबत तिने विचारलं खरं.
“नाही नाही असं काही नाही” म्हणत त्या दोघांनी सारवासारव केली.
मोहन न्हाणीघराकडे गेला आणि माधुरी बेडरूमच्या बाहेर आली. “आज कश्या काय आलात रविवारी?” आता पर्यंत हुंदके सावरून डोळ्यांतल्या आसवांना पुसत तिने म्हातारीला विचारलं. “या नं आत.”
शक्य तेव्हढी दृष्टी बेडरूमकडे जाणार नाही याची खबरदारी घेत नको नको करत म्हातारी खोलीबाहेरच्या टेबलाजवळ घुटमळत उभी राहिली.
बेडरूमच्या दाराच्या चौखटिला खेटून उभ्या माधुरीकडे दुर्लक्ष करत मोहन बेडरूममध्ये परतला. त्याने लॅपटॉप आणि चार्जेर उचलला आणि दिवाणखोलीत चार्जिंगला लावला. हातात पेपर घेऊन उगाच पेपर चाळत बसला. त्याचा संताप किरकोळ कारणावरून झालेला असला तरी आपली चूक नाहीच यावर तो ठाम होता. त्या दोघांमधला दुरावा भामाबाईच्या जाणत्या नजरेतून सुटला नाही.
माधुरी बाहेर आली आणि भामाबाईला जवळच्या खुर्चीवर बसवून स्वयंपाकघरात गेली. भामाबाई आणि माधुरीची कुजबुज सुरु झाली. म्हातारीने तिच्या वयाच्या अधिकाराने माधुरीला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगायला सुरुवात केली. माधुरीलाही उगाच चिडचिड केल्याची जाणीव झाली. मधून मधून मोहन कडे चोरटा कटाक्ष टाकत त्याचं लक्ष आपल्याकडे असेल असं तिला वाटत होतं. आज त्याच्या आवडीचं काहीतरी गोडधोड करून खाऊ घालण्याचं सुचवत म्हातारी मोठ्याच्या घरी जाण्यासाठी उठली खरी पण माधुरीने थांबण्याचा आग्रह करून तिला हात धरून आणखी काही वेळ बसवलं त्यावेळी म्हातारीच्या दृष्टीला तिच्या हाताची नखं ओबडधोबड तुटल्या सारखी दिसली. नीट निरखून बघितल्यावर बोटाची पेरंही खरचटल्यासारखी दिसली. पण माधुरीच्या चेहऱ्यावरून तिला त्याची जाणीव नाही असं दिसलं.
“काय गं? नखं कुरतडून खाल्लीत की काय?” म्हातारीनं जरा अधिकाराच्या चढ्या आवाजात विचारलं. त्या आवाजात काहीशी भीती, काही काळजी आणि बरंच कुतूहल होतं. तिचा आवाज मोहनच्या कानात शिरला आणि त्यानेही त्यांच्या कडे मान वळवली.
“नखं?” माधुरीने हात आलथून-पालथून बघितला. “कुठंय?” तिला तिचे नखं अगदी व्यवस्थित दिसले. तिने सहजपणे म्हंटलं.
“बघू.” म्हातारीने तिचा हात हातात घेऊन तिच्या नखांवरून स्वतःच्या तर्जनीने स्पर्शत घाबऱ्या स्वरात म्हंटलं, “बाई गं! माझ्या बोटाच्या पेरांना कुरतडलेली तुझी कुरतडलेली नखं बोचतात आहेत आणि तू म्हणतेय कुठंय?”
“काय म्हणताय आजी?” मोहन तोवर खुर्चीवरून ताडकन उठून माधुरीजवळ पोचला. त्याच्या डोळ्यांनी तिची थोडीफार तुटलेली नखं आणि लालसर झालेली, सूज येऊ घातलेली बोटांची टोकं दिसली तसा त्यालाही काळजीमिश्रित भीतीचा काटा मेंदूत जाणवला.
“अगं बघ. खरंच तुला दिसत नाहीये का?” त्याने तिला विचारलं.
“मोहनराव.” म्हातारीनं मोहनला हातानंच थांबा म्हंटलं. “काही झालेलं नाहीये. सारवण, झाडलोट करताना, भांडी वगैरे घासताना झालं असेल. आणि अश्या वेळेत होतं असं कधी कधी.” शेवटच्या वाक्याच्या वेळी डोळ्यांनी माधुरीच्या पोटाकडे खूण करत म्हातारीने सारावासावर केली.
“बघ बाई. काळजी घे. काही हवं, नको ते सांग हो. येते मी.” माधुरीचा हात स्वतःच्या हातातून हळूच काढून घेत म्हातारी उठली.
“बरं आजी, सायंकाळी येणार आहात का की आम्ही दोघं जरा फिरून येऊ?”
“मला काम आहे बाई. जमलं की येईन मी हो.” म्हातारी लुकूलुकू हलत मान डुलवत निघाली. “मोहनराव, जरा फाटकापाशी सोडून देता?” तिनं मोहनला विचारलं.
“हो… हो… चला.” त्याने म्हातारीचा काटकुळा हात पकडला आणि हळूहळू पाऊलं टाकत तिला आधार देत तो वऱ्हांड्यात आला.
“मोहनराव मी बोलले नाही. पण माधुरीची काळजी घ्या.” म्हातारी थरथरत्या आवाजात म्हणाली.
माधुरीचं पोट वाढत होतं म्हणून म्हातारी म्हणत असावी. तिला कळतं यातलं असा विचार करत मोहनने किंचित हसत मान डोलावली.
“तुम्हाला तिची बोटं दिसली?” त्याने होकारार्थी मान हलवली.
“मी काहीतरी वेगळा प्रकार आहे. जरा लक्ष द्या.”
“म्हणजे?”
“तुम्हाला तिची बोटं, नखं दिसली ती धुणी-भांडी वगैरेने नाही झालीये. या घरात वास आहे.”
“वास? म्हणजे?”
“फार पूर्वी. सुरेश होण्याआधीची गोष्ट आहे. पाटीलाच्या या घरात एका त्याच्या वारसानं मदननं पापाचरण करून एका तरण्या पोरीला मधुरिकाला गर्भार केलं होतं. मालकाच्या लक्षात आलं तेव्हा त्या बाईला आणि त्या वारसाला घरात आणून डांबलं होतं. तसा पाटील चांगला माणूस होता पण इभ्रतीचा प्रश्न म्हणून ते प्रकरण दाबण्यासाठी गुपचूप त्या दोघांना इथं अडवून ठेवलं होतं. बाळ यायला तीन-चार महिने राहिले होते तेव्हा काहीतरी बिनसलं त्या दोघांत. कुणीतरी भडकावलं त्याच्या पोराला आणि त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडणं केली. गावातल्या सुईणीकडून तिच्यावर अघोरी उपचार केले आणि तिचं बाळ पाडलं त्या बाईचं पोट फाडून. पाटलाला माहिती झालं तेव्हा खूप उशीर झाला होता. कुणाला कळू नये म्हणून त्याने घरातच त्या बाळाला आणि बाईला पुरायचं ठरवलं. बाई कशीबशी नादरद झाली पण पडलेला गर्भ घरातच पुरला. ते प्रकरण बाहेर फारसं फुटलं नाही. त्या वेळची माणसं इकडे तिकडे कालांतरानं निघून गेली आणि पाटलाची बेअब्रू टळली.
पुढे दोनेक वर्षाने रितीरिवाजाने त्याच्या पोराचं लग्न झालं. त्याची बायको गर्भार राहिली पण तिच्या काळात तिला वेड लागलं म्हणे. नवऱ्यासोबत भांड भांड भांडे. दिवस-रात्र अंग खाजवे. डोकं आपटे. झोपण्याच्या खोलीत भिंतींवर ओरबाडे. दिवसभर भ्रमिष्टासारखी वागे. गर्भाला तिच्यापासून धोका असेन म्हणून तिचे हातपाय बिछान्याला बांधून ठेवले जाई. झोपेत किंचाळे, दरदरून घाम फुटे. खूप उपचार केले पण काही फायदा नाही झाला. शेवटी तीन-चार महिने राहिले असतांना तिचा वेडसरपणा फारच वाढला होता. त्यातच तिचा गर्भ गळाला. त्यानंतर ती सुधारली पण गुपचूप राहत असे. घरात काही लक्ष ठेवी नाही. अंगणातली बाग सुखली. परसबाग सुखली. तुळशीही जळून गेली. एखाद वर्ष वाट पाहून तिच्या माहेरी सोडून पाटलाच्या पोरानं दुसरं लग्न केलं. तिचीही गत अशीच झाली.
पुढे त्या पोरालाच वेड लागलं आणि भिंतीवर डोकं आपटू आपटून त्यानं भिंत फोडली म्हणे निजघराची. पाटलाचा एकुलता एक वारस वेडा झाला. घराचा कुणी वारस नाही म्हणून ते लोकं सोडून गेले. पुढे विदेशात गेले. आणि आमचे संबंध चांगले म्हणून ह्यांना विश्वस्त म्हणून आमच्या माथी ही वस्तू देऊन गेले.”
एव्हाना घश्यातला आवंढा गिळत मोहनने विचारलं, “मग?”
“आम्ही घराची शांती केली. उत्पन्नाचं साधन म्हणून भाड्याने घर दिलं. पण ४-५ महिन्यांवर कुणी टिकलं नाही. काही ना काही कारण सांगून एक एक करत सगळे निघून गेले. कुणाला न कुणाला समंधांची बाधा होई. आम्ही परत परत शांती करू पण काही फायदा झाला नाही. बरेच महिने वास्तू रिकामीच राहे. पाहिजे तेव्हढं उत्त्पन्न मिळेना. आम्ही विकूही शकत नव्हतो. मध्ये दोन-चारदा बायका पोरं असलेली कुटुंबं राहायला आली होती. हट्टाने राहिली खरी पण पोरं चीडचीड करायची. नवरा बायकोत भांडणं व्हायची. तीही भुताखेतांची कारणं बोलून सोडून जायची. मग पोरासोरांना देऊन पाहिली. तीही तमाशे करून, भांडणं करून सोडून गेली.
इतकं झालं तरी वास्तूची बेअब्रू, बोभाटा कुठेच झाला नाही म्हणून भाडेकरू अधून मधून येत राहिले. आता तुम्ही आलात. सुरेशला सांगितलं होतं की नको देउ म्हणून तरी पैश्याच्या लोभापायी तुम्हाला त्याने ही वास्तू दिलीच.
तुम्ही मला नातवंडांसारखे म्हणून मी तुम्हाला खरंखरं सांगितलं. तुम्ही नव्या जमान्याची पोरं. तुमचा विश्वास नसेल पण ऐका माझं, विपरीत काही होण्याआधी दुसरीकडे जा. देवाची प्रार्थना करा आणि सगळं व्यवस्थित, सुखरूप होईल अशी अशा करा.” डोळ्याला मधूनमधून पदर लावत थरारत्या आवाजात म्हातारीनं वृत्तांत सांगितला. “आज तुमचं भांडण ऐकलं, तुमच्या प्रेमाच्या संसारात पहिला खडा पडला आज. सावध व्हा.”
म्हातारीनं फाटकाची कडी लावली. तिच्या थरथरत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मोहनने नुकत्याच ऐकलेल्या गोष्टीला काहीश्या थरकापाने क्षणभरात आठवलं. अंगातून भीतीची क्षणभर लहर धावली. एका जागी स्तब्ध राहून त्याने या गोष्टीला उडवून लावलं. तो वळाला. घराच्या पॅरापेटवर गळून तुटलेलं नाव दिसलं. ‘म न-म धुर’. मोहन-माधुरी की मदन-मधुरिका? त्या क्षणभर त्याच्या डोक्याचा पार भुगा झाला. मनात शंका आणि भीती घर करू लागली. गारठलेले पाऊलं जड होऊ लागले. मोट्या प्रयत्नाने त्याने एकेक पाऊल उचललं आणि फारशीवरून तो वऱ्हांड्याकडे चालू लागला. वृंदावनात उगवलेलं तुळशीच्या रोपाने डोईवर धरलेला मातीची खिपली जमिनीत विरली होती आणि ते नाजूक अंकुर मातीत आडवं झालं होतं. मनातली शंका आणखी गडद झाली. त्याने बाजूला जमिनीवर बघितलं. दुतर्फा लावलेली रोपं जळायला सुरुवात झाली होती.
घाबरत तो धावतच घरात घुसला. मठात गडवा डुबवला आणि थेट घश्यात पाणी ओतलं.
“अरे काय झालं, मोहन?” माधुरीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो दचकून ओरडला. त्याच्या ओरडण्याने तीही घाबरली.
“सॉरी … सॉरी … सॉरी …” त्याने अजूनही धडधड करत असलेल्या आवाजात तिला म्हंटलं. “मला जरा शांत बसू देत. तोवर काहीतरी खायला देतेस का?” स्वतःच लक्ष मेंदूत सुरु असलेल्या विचारांतून काढून विचलित होतं तो म्हणाला.
“हो. लगेच. तुझ्यासाठी स्पेशल गोड शिरा बनवतेय.” म्हणत ती स्वयंपाकघरात वळली.
मोहन जरा शांत होत म्हातारी वेडी झालीये असा विचार करत दिवाण खोलीतल्या खुर्चीवर बसला. लक्ष कामात लावावं म्हणून त्याने चार्ज झालेला लॅपटॉप उघडला. आदल्या रात्री क्लायंटला पाठवलेली फाईल रिसेन्ट फाईल्स मध्ये दिसली. त्याने लॅपटॉपमधल्या लोकेशन मधून तिला कट करून ऑफिसच्या फोल्डर मध्ये क्लायण्टचं नाव असलेल्या सब फोल्डर मध्ये पेस्ट केली. वेबकॅमच्या फोल्डरमध्ये आणखी एक फाईलचा थंबनेल दिसला.
“ही कसली फाईल? दोन व्हर्जन्स सेव्ह झालेत वाटतं.” तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्याने ती फाईल प्ले केली.
विडिओ सुरु झाला. काळोख. किट्ट काळोख. पाचेक सेकंदांनंतर भिंतीवर उजेड पडला. चंद्राचा प्रकाश खिडकीतून, अशोकाच्या वेड्या-वाकड्या फांद्यांतून पाझरत बेबी पिंक रंगाच्या बेडरूमच्या भिंतीवर पडला. दोन तीन सेकंदांनंतर तो प्रकाश आकाशातल्या ढगांनी थोडा बहुत झाकोळायला लागला. अंधुक प्रकाश फोटोफ्रेममध्ये असलेल्या गोंडस हसऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर पडला. आकाशात चंद्र ढगांमागे लपंडाव करत होता. कधी उजेड, कधी सावली अशी ती फ्रेम उजळत आणि काळवंडत होती तरी त्या फ्रेममधल्या बाळाचा चेहरा आणि लोभस हसरे भाव प्रेमाचे उधाण आणत होते.
अचानक चुळबूळीचा आवाज झाला. कॅमेराच्या फ्रेममध्ये डावीकडून एक आकृती प्रवेशली. ती माधुरीच. तिने भिंतीवरच्या खिळ्यांत अडकवलेली ती फ्रेम झटक्यासरशी ओढली आणि खाली सोडली. क्षण-दोन क्षण तशीच स्तब्ध राहत तिने मांड्यांशी चिपकवलेले हात काटकोनात वाकवले. ओरबाडण्याच्या मुद्रेने भिंतीला हात लावले आणि परत काळोख लॅपटॉपच्या स्क्रीनवर पसरला. मात्र ओरबाडण्याचा आवाज पडले तीन सेकंद सुरूच राहिला.
विडिओ बंद झाला. त्याच्या अंगातून घामाचे थेंब त्वचेच्या असंख्य रंध्रांतून वाहायला लागले.
त्याने लॅपटॉपची स्क्रीन कीबोर्ड वर झटक्यासरशी आपटली. मान स्वयंपाकघराकडे वळवली. “मा….” तिला आवाज देण्यासाठी तोंड उघडलं तसं बेडरूमच्या उंबरठ्यापाशी रक्ताने माखलेला लिबलिबीत जीव हातपाय फरशीवर टेकवून असलेला दिसला. काही कळण्याच्या आत तो अदृश्य झाला.
“माधुरी… आपण हे घर सोडून जातोय. आत्ताच्या आत्ता!” किंचाळत तो जीवाच्या आकांताने स्वयंपाकघराकडे धावला.
Khuup mast story dada👌👌
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
Mast ch
Nice
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!