
(अंदाजे वाचन वेळ : १५ मिनिटे)
ऑफिसमधून वेळेतच निघालो होतो. नेहमीप्रमाणे घाईघाईत पायपीट करत, पायांच्या पोटऱ्या दुखवत स्टेशनवर पोहचलो. गर्दी नेहमीप्रमाणे “अबब!”. अशा गर्दीत मोकळा बाकडा मिळणं दुरापास्तच!
स्लो लोकल प्लॅटफॉर्मवर पोचायला फारसा वेळ लागत नाही. पाठोपाठ लोकल्स येत जात राहतात. तसंही अंधेरी ते गोरेगाव फार फार तर १२-१५ मिनिटांच्या अंतरावर. आमच्याकडे अंतर वेळेत मोजतात, किलोमीटर मध्ये नाही. लोकल, बेस्ट, टॅक्सी असो वा बाईक. पैदल चालणाराही माणूस एखादं ठिकाण दहा मिनिटांच्या अंतरावर, पंधरा मिनिटांच्या अंतरावर वगैरे असंच बोलतो. वेळेतच अंतर मोजणारे आम्ही. मिनिट आणि सेकंद काट्यांवर आमच्या जीवनाची घड्याळं धावत असतात.
दरदिवशी लोकल प्लॅटफॉर्मवर लागताच गर्दीत होणारी अंगघाशी सहन करत चढा. “जरा ऍडजस्ट करा” म्हणत गाडीच्या बाकड्यावर वितभराची जरी जागा मिळाली की बूड टेकवा. इंच इंच जागा मिळवा. ज्या दिवशी नशिबात बसण्यासाठी जागा नसेलच मिळायची त्या दिवशी माणसांच्या लोंढ्यांनी गाडीच्या दरवाज्यातून आत ढकललं की रेटारेटी करत सरकत मिळेल तिथे उभं रहायचं. कधी गर्दी फारच असली आणि पाय ठेवायलाही जागा नसली की हलत्या गाडीत आधार म्हणून हात छताला बांधलेल्या हॅण्डल पर्यंत न्यायचा आणि कडी घट्ट धरून ठेवायची. एक पाय दुमडून पार्टीशनच्या भिंतीला लावायचा आणि एका पायावर करकोच्या सारखं ध्यानस्थ उभं राहायचं.
दिवसभराचा अंगातला शीण उभ्या उभ्या डोळे बंद करून घालवण्याचा प्रयत्न असतो. असफल प्रयत्न असतो हा. मनाचं समाधान म्हणून तरी जरा डोळे बंद करून राहिलं तरी बरं वाटतं. ऑफिसमधली ताण-तणाव, डेडलाईन्स पर्यंत कामं संपवण्याची घाई, बॉस सांगेल ती कामं प्राथमिकतेवर घेऊन संपवण्याची घाई, ह्या न त्या असंख्य कटकटींतून जरा दिलासा मिळेल तर शप्पथ! तरी इथे दहा-पंधरा मिनिटांच्या मिळणाऱ्या वेळात एखादी मिनी डुलकी थोडीफार तरी रिलॅक्स व्हायला मदत करते.
“पुढलं स्टेशन …” च्या रेकॉर्डेड घोषणेकडे कान देत आपलं स्टेशन आलं की उतरा. स्टेशन्स वर उतरणारे “आम्हाला पहिले उतरू द्या” म्हणत चढणाऱ्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न करतात आणि चढणारे “ही लोकल सुटायला नको म्हणून” उतरणाऱ्यांना रेटत आत येण्याचा प्रयत्न करतात. या अनागोंदीत शहाणपणाच्या गोष्टी शिकवायच्या नसतात. “पहले आप…पहले आप” किंवा “शिस्तीत चढ उतर करा” असल्या भंपकपणाला अर्थ नसतो.
प्लॅटफॉर्मवरच्या मोठ्या डिजिटल घड्याळीकडे बघितलं. गाडी प्लॅटफॉर्मवर पोचायला पाचेक मिनिटांचा अवकाश होता. अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कधी नव्हे तो मोकळा बाकडा दिसला. आज आपलं नशीब बलवत्तर असावं म्हणून चांगली मोकळी जागा मिळाली, असा विचार चमकून गेला. अगदी ऐसपैस बसलो.
गाडी येईल तशी प्लॅटफॉर्मवर धावपळ होईल. अनाउन्समेंट होईल. क्षणभर विश्रांती मिळेल म्हणून डोळे मिटून घेतले. डोळ्यांसमोर हळूहळू अंधार पसरू लागला. कानांवर पडणारा गोंधळ, गोंगाट कधीतरी अस्पष्टसा होत गेला. काही कळलंच नाही.
डोळे उघडले तेव्हा प्लॅटफॉर्मवरचे दिवे तेव्हढे तेवत होते. सायंकाळ केव्हाचीच सरली होती आणि रात्रीचे प्रहर सुरु झाले होते. सभोवतालची गर्दीही पसार झालेली. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हतं. तुरळक कुठेतरी कुणीतरी दिसलं. एखाद दुसरी आकृती हलली. वटवाघुळं फडफडली आणि अंधारलेल्या आकाशात लुप्त झाली.
“बाप रे! फारच उशीर झालेला दिसतोय.” मी हलकंसं पुटपुटलो.
इतका वेळ झाला डोळे बंदच होते आणि अचानक पापण्या उघडल्या म्हणून असेल कदाचित किंवा दिवसभर किपॅडवरच्या बटनांवर यंत्रवत बोटांच्या पेरांची अग्रभागं खटाखट आदळत स्क्रीनकडे बघत कामं केल्यानं असेल, डोळ्यांसमोर अंधुक-अंधुक दिसत होतं. काळोखामुळेही असेल कदाचित. मी पापण्यांची उघडझाप केली.
अंगठा आणि तर्जनीच्या अग्रांनी चिमटा करत डोळ्यांच्या मधोमध दाबलं. चिमटा डोळ्यांपासून दूर केला आणि त्यांच्या पृष्ठभागावर बघितलं. काळी कळकट्ट चिपडं चिपकलेली होती. त्याच बोटांच्या पेरांना एकमेकांवर गोल गोल फिरवत चिपडाला कुस्करून टाकलं. काहीसा किळसवाणा प्रकार वाटत असला तरी कित्येकांचा हा आवडता टाईमपास असतो. कानातला मळ करंगळीच्या वाढलेल्या नखीनं स्कुप करून काढणं, नाकपुडीतल्या आतल्या भिंतीवर वाळून चिकटलेला मेकुड तर्जनीच्या टोकाने खरडून काढणं वगैरे श्रेणीतला सुखावह अनुभव देणाऱ्या प्रकारांतला एक प्रकार मी ही केला. अर्थात डोळ्यांसमोरचा अंधुकपणा दूर होईल म्हणून केलंय असं सांगता येतंच की. पण इथे काही कुणाला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नव्हती. असो!
पापण्यांची जलद उघडझाप केली आणि पाण्याच्या टाकीजवळ जाऊन डोळ्यांवर पाणी मारलं. खिशातून कोरडा रुमाल काढला आणि डोळे कोरडे केले. तरी फार असा फरक पडला नाही.
रुमाल परत खिशात ठेवला. होईल डोळा बरोबर थोड्या वेळाने म्हणत प्लॅटफॉर्मच्या अगदी काठाशी उभा झालो. मान वाळवून बघितलं. दुरून एक बारीक प्रकाशझोत स्टेशनच्या दिशेने येतांना दिसला.
“अखेर गाडी आली म्हणायची.” निःश्वास टाकत मीच उद्गारलो.
उद्या शनिवारच! सुट्टीचा दिवस. घरी गेलो की सोफ्यावर जाऊन आदळायचं. बायको तिच्या ऑफिसातून घरी परतलेली असेलच. कित्येक दिवसांनंतर निवांत गप्पा मारण्याचा योग जुळून आला होता. मुलगा आई-बाबा बरोबर वीकएंडला पुण्याला गेलेला. आज आम्ही दोघंच असू. एकमेकांच्या सहवासाला कायम आसुसलेले! घर ऑफिस, घर ऑफिस करून गेल्या ८ वर्षांपासून संसारात गुरफटून गेलेले. जीवनचक्रात भरडून जात असलेले. एक एक क्षण निसटतांना हताश होऊन बघत चुकचुकणारे आम्ही दोघं! आज तिला वेळ द्यायचा! क्वालिटी टाइम एकमेकांच्या सहवासात, तिला कुशीत घेऊन घालवायचा. एखादा रोमॅंटिक किंवा हलकाफुलका विनोदी चित्रपट बघायचा. मीच स्वतःला प्रॉमिस करत होतो.
लाऊड स्पीकरवरून घोषणा झाली आणि दहाएक सेकंदांत लोकल प्लॅटफॉर्मला लागली. आतापर्यंत रिकामा, मोकळा असलेला प्लॅटफॉर्म उतरणाऱ्या बाया माणसांनी गजबजला. एरव्ही धक्काबुक्की सहन करत, रेटारेटी करत आत घुसणारा आणि बाहेर पडणारा मी आता मात्र सहज चढलो. चढणारं फारसं कुणी नव्हतंच म्हणा.
आत बाकड्यांवर कुणी नं कुणी बसलेलं होतंच! कितीही रात्र झाली तरी पार शेवटच्या लोकल मध्ये प्रवास करणारेही कमी नसतात. मी त्या बोगीतल्या सर्वांत शेवटच्या बाकड्याकडे गेलो. चांगली दोन हात मोकळी जागा दिसली. अहोभाग्य हमारे! लोकलमधल्या बाकांवर वीतभराची जागा मिळवण्यासाठी साम-दंड-भेद वापरणाऱ्या माणसाला असली मोक्याची जागा मिळणं, ते ही खिडकीपाशी म्हणजे राजयोग! दामाचा प्रयोग करणे नाहीच. गृहकर्जाचे, चारचाकीचे, विम्याचे, सोसायटीच्या मेन्टेनन्सचे वगैरे वगैरे हफ्ते,खरेदी कार्डचे देणे देऊन झालेत आणि मुलाच्या शिक्षणासाठी दर महिन्याला एक्सट्रा ऍक्टिव्हिटीजसाठीची रक्कम वेगळी काढून ठेवली की खिशात नसतो दामाजी. दोघंही कमावते असलो, घर गाडी असली तरी मध्यमवर्गीय म्हणावं स्वतःला असं कितीही वाटत असलं तरी पाकिटातल्या ठणठाणाताला बघून धाडस होत नाही हो.
असो! जागा मिळाली. मी बसलो. बाजूला एक म्हातारा पेपर चाळत बसला होता. समोरच्या बाकड्यांवर माझ्यासारखीच मध्यमवर्गीय मंडळी बसली होती. कुणी माझ्यापेक्षा जरा तरुण आणि कुणी जरा वयस्क. पण एकूण एक माझ्यासारखीच, थोड्या फार फरकाने.
स्वकियांसाठी स्वर्ग निर्माण करण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात मध्यमवर्गीय. स्वतःच्या डोईवर कर्ज घेतात. जमेल तेव्हढ्या बऱ्यापैकी सोसायटीत घर, मुलांसाठी चांगल्या शाळा-कॉलेजच्या फिज्, समाजात मेंटेन कराव्या लागणाऱ्या स्टेटसच्या खोट्या भ्रमापायी इ एम आयज् वर घेतलेला पंधरा हत्ती अर्थात चारचाकी वगैरे वगैरे विलासाची साधनं म्हणजे आमच्या मध्यमवर्गीयांचा स्वर्ग! ऍटलासला झेउसने शिक्षा दिली होती स्वर्गाचा भार सांभाळण्याची. इथे आमचीही अवस्था ऍटलास सारखीच! तो बिचारा एक टोंगळा भुईवर रोवून युगो-न-युगं उठण्याच्या प्रयत्न करतोय. त्याच्या नशिबाने उशिरा का होईना हरकुलीज आला होता. त्यामुळे थोडा वेळ का होईना त्याला उसंत मिळाली होती. आम्ही मात्र म्हातारपण येईपर्यंत कर्ज फेडतच राहतो. आमच्या मदतीला कुणी येत नाही.
मला नेहमी स्वप्नं पडतात की मी बापडा डोक्या-खांद्यावर असला स्वर्गाचा भार घेऊन शक्य तेव्हढा स्वतःला ताठ मानेनं उभा राहतोय. नोकरी लागली तेव्हाच गृहकर्ज घेतलं. एकटाच होतो. नेमका इ एम आय भरायचो. पुढे संसार वाढला आणि डोईवरच्या कर्जाच्या गोळ्यांचं वजन वाढलं. मान झुकली. पुढे खांद्यात झुकलो. मग कमरेत वाकलो. मग एक पाय दुमडून दुसरा काटकोनात ठेवून डोक्यावरच्या भाराला संभाळतोय. पुढे तर पार कंबरडं मोडलं आणि तो गोळा माझ्या पाठीवर मला चिरडून टाकतोय. त्याच वेळी माझी झोपमोड होते. दुःस्वप्न तुटतं आणि मी सुटकेचा निःश्वास टाकतो. डोळा परत लागला तरी झोप येत नाही. सकाळची लोकल पकडायची असते. त्या आधी घरातली धावपळ, ऑफिसची घरी आणलेली कामं… कसलं आयुष्य जगतोय मी?
सहप्रवाशांसोबत गप्पा माराव्या, वेळ काढावा म्हणून काही तरी बोललो मी. स्मॉल टॉक्स पेव वेज टू ग्रेटर डिस्कशन्स! कुणी काही बोललं नाही. मी बडबड करतोय फक्त! जो तो आपापल्या दुनियेत. त्यांचं ही कुठे चुकतंय म्हणा? माझ्यासारखीच त्यांचीही टेन्शन्स असतीलच की. पण औपचारिकता म्हणून “ओ”, “हम्म”, “अच्छा!” काही तरी म्हणावं. मी अस्तित्वात नसल्यासारखेच वागत आहेत. नाही म्हणायला माझ्या बरोबर तिरक्या विरुद्ध जागी बसलेल्या म्हातारबाबाने दोन्ही हाती धरलेलं वर्तमानपत्र उजव्या हाताच्या हलक्या झटक्याने जरासं दुमडलं. मान बाहेर काढत त्याने माझ्या दिशेनं बघितलं. नाकावरचा चष्मा मानेला किंचित झटका देत मागे सरकवला. मी सहज म्हणून स्मित दिलं. तर त्याने तुसडेपणाने परत वर्तमानपत्रात मान खुपसली. हाऊ रुड! माझं काय अडलंय. मी ही खिडकीतून बाहेर बघायला सुरुवात. अंधार असला तरी रुळांच्या आजूबाजूच्या बिल्डिंगांमधले दिवे उजेड देत होते. मधामधात काही नं काही अडथळे येत असल्याने कधी प्रकाश दिसायचा तर कधी अंधार. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करतो तेव्हा क्षणात प्रकाश, क्षणात अंधार तसं दिसत होतं. कदाचित माझ्या डोळ्यांतून अंधुक अंधुक दिसत होतं त्यामुळेही असेल, मला चक्रावल्या सारखं जाणवत होतं. उद्या डोळ्यांची तपासणी करावीच लागेल. चाळीशी लागण्याचं वय झालं होतंच म्हणा.
जोगेश्वरी स्टेशन आलं. काही प्रवाशी उतरले आणि बरेचशे चढले. लोकल एक मिनिट थांबून परत सुरु झाली. त्या चढणाऱ्यांत दोघं तरुणाईच्या उंबरठ्यावर येऊ पाहणारी दोघं जणं पण होती. भडक रंगबिरंगी तंग शर्ट पँट घातलेले ते दोघं.
एकाने चापून चोपून भांग केला होता खरा पण चेहऱ्याच्या उजव्या बाजूचा डोळा पूर्णतः झाकेल अशी त्याची केशरचना. दुसऱ्याच्या डोक्यावर एक भलामोठा पांढरा मशरूम उगवल्यासारखा दिसत होता. दोघंही पक्के ध्यान दिसत होते. मोठ्याने खिदळत, “यो”, “यो” करत त्यांचा गोंधळ सुरु होता. एकाने पँटच्या खिशातून सिगारेट काढली आणि ओठाला लावली. दुसऱ्याने शर्टाच्या पाकिटातून लायटर काढलं आणि ती शिलगावली. पाळीपाळीनं तिचे झुरके घेत त्यांचं समोरच्या कंपार्टमेंट मधल्या लोकांकडे बघत टिका-टिप्पण्या करणं सुरु झालं.
काही लोकल्सच्या एकाच डब्ब्यात स्टीलच्या नळ्यांनी जोडून दोन भाग बनवलेले असतात. पल्याडच्या भागात त्यांच्या पैकीच आणखी तीन-चार जणं होते बहुतेक. मधामधात त्यांचा काहीतरी अश्लिल अश्लाघ्य संवाद सुरु होता. तो त्यांच्या त्यांच्या पुरतीच मर्यादित असता तर वेगळी बाब पण चार चौघांना ऐकू जाईल अशा आवाजातला त्यांचा संवाद आणि हातवारे त्यांच्या संस्कारहीन संगोपनाचे, टवाळखोरीचे प्रमाण देत होते. क्षणांगणिक वाढत जाणारे त्यांचे चाळे मला असह्य होत होते. मी दुरूनच अधूनमधून बघत होतो. ओशिवारा आणि गोरेगाव बस्स आणखी पाच – सात मिनिटं ह्या टपोरी पोरांची टवाळखोर सहन करावी लागणार होती.
ह्या टपोरी टोळ्यांच्या मस्त्या आणि टिंगल टवाळीला आमच्या सारख्या मध्यमवयीन, सुसंकृत गृहस्थांनी कुठवर सहन करावं? ह्यांना समजावून काही होत नाही उलट ह्यांना समजावणाऱ्याला हीच पोरं टारगेट करतात. कमरेखालच्या अवयवाचा उद्धार करणाऱ्या किळसवाण्या शिव्यांनी कुणी सभ्य व्यक्ती स्वतःला का अपमानित करून घेईल? ह्यांच्या नादाला न लागता आपापल्या मोबाईल्स मध्ये, पेपरात किंवा “मुझे क्या करना इन लोगों का?” असा विचार करत शांत बसतात. मी ही कित्येकदा शांतच बसतो. ह्यातली कुणी गुन्हेगारी टोळक्यांशी संबंध ठेवत असतील तर उगाच का आपल्यावर संकट ओढवून घ्या? असा प्रॅक्टिकल विचार करत आम्ही ब्र ही काढत नाही. गप्पा-चर्चांत मात्र आम्ही फुशारक्या तेव्हढ्या झाडतो. एखादा करतो हिम्मत ह्यांच्याशी नडायची. काही जणं गर्दीश, शिवा वगैरेंसारखी आदर्शवादी चित्रपटं बघून नायक होण्याच्या प्रयत्न करतात. आणि मग लोकल मध्ये भांडणं, तमाशे सुरु. कुणी कुणाच्या मधात पडत नाही. आपल्याला धक्का बुक्की होणार नाही ह्याची काळजी घेत, अंग चोरत आमच्यासारखे बघ्यांच्या भूमिका वठवतात. लागलाच एखादा फटका तर मार लागलेला भाग चोळत दूर होतात आणि “उनका वो जाने|” म्हणत पुढल्या स्टेशनवर उतरतात.
ओशिवाराला लोकल थांबली आणि डब्याच्या ह्या भागात तीन तरुणी चढल्या. हातातल्या मोठाल्या पर्सेस आणि बॅग्स समोर लटकावून गर्दीतून वाट काढत त्या डब्यात चढल्या आणि ह्या दोघांच्या ते लक्षात आलं. पलिकडच्या टोळीतल्या एक-दोघांनी ह्या दोघांना कसलेशे इशारे केले बहुतेक आणि ह्या दोघांचे चाळे वाढायला लागले. मशरूमवाला ह्यांच्या जवळ येण्याची, अंगलट करण्याची संधी शोधत होता आणि दुसरा ह्याला टिपा देऊन आणखी चढवत होता.
त्याच्या जवळ येण्याने त्या तिघी सावध झाल्या. तो प्यायलेला असेल कदाचित. एकीने नाकाला रुमाल लावला. छातीशी बॅग्स आणखी घट्ट कवटाळून मेंढरं एकमेकांना सुरक्षेच्या यत्नात खेटून उभी राहतात तश्या त्या एकमेकींजवळ उभ्या राहिल्या.
समोरच्या भागातून त्या दुसऱ्या टोळक्याने त्यांच्या जवळ जवळ राहण्याला “तसल्या” संबंधाचा अश्लिल तर्क जोडला. तिकडून तसला दुहेरी शब्दर्थाचा उल्लेख झाला आणि ही दोघं चवताळली.
मी जागेवर चुळबुळ करू लागलो. व्यावहारिक ज्ञान काहीही सांगू देत पण षंढपणे घडतंय ते बघत राहणं माझ्याकडून आणखी शक्य नव्हतं. मी शेजारी बसलेल्यांना हाका दिल्या. काही जणं तिकडे बघून दुर्लक्ष केल्यासारखी करत असल्याचं मला जाणवत होतं. त्या डब्ब्यात किमान ३०-३५ तरी प्रौढ पुरुषं होती. दोघा तिघांनी विरोध केला तर ह्या टवाळखोरांना अद्दल सहजच घडवता आली असती. नाही अद्दल तर किमान थांबवता तरी आलं असतं. ती दोघं होती तशी काडी किडकिडीत आणि तोंडाच्या पट्ट्याशिवाय आणि समोरच्या भागातल्या उरल्या सुरल्या टोळक्याच्या आधाराशिवाय ह्यांच्या अंगात कसलं असणारेय बळ?
अन्यायाचा विरोध करायला कुणी नायकच हवा असतो असं नाही. सद्सद्विवेकबुद्धी असणारा एखादा आवाजही अशा बंडांना थोपवण्यासाठी पुरेसा असतो. कुणी पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. कदाचित एखादा माणूस ह्यांच्या पुढ्यात ठाकला तर बाकीची येतील समर्थनाला म्हणून कसल्याशा अद्भुत शक्तीने भरून मी ताडकन उठलो. त्या दोघांकडे थेट बघत आवाज चढवून ओरडलो, “काय आहे रे? कसला माजोरडेपणा आहे रे तुमचा?”
त्या आवाजाने ती दोघं चपापली. दोन पाऊलं मागे सरली. त्या तिघी बावचळून तिथेच उभ्या होत्या. ओशिवारा पासून होत असलेल्या प्रकाराला घाबरून त्या नक्कीच हादरल्या असतील.
मी आवाज खाली घेत शेजाऱ्यांकडे बघत म्हणालो, “मी जातोय समोर. एकट्याच्या अंगावर आलीत ती दोघं तर घ्या जरा सांभाळून. इतक्या लोकांत कुठे भिडायचं धाडस करतील ते?”
अंगात ऍड्रेनॅलीन रश संचारला असावा. कुणाच्याच प्रत्युत्तराची वाट न बघता मी झपाझप पाऊलं टाकत पुढे गेलो. डोळ्यांसमोर अचानक चांदण्या लकाकू लागल्या. अंधुकसं दिसायला लागलं. कानात डब्ब्यात असलेल्या उद्घोषकातून आवाज आला, “पुढील स्टेशन गोरेगांव. अगला स्टेशन गोरेगांव. नेक्स्ट स्टेशन गोरेगांव.”
गोरेगाव बस एका मिनिटात येईल. ह्या टग्यांच्या जाचाला तोवर जाब विचारात येईल. मी इतक्या सहजासहजी हे प्रकरण मिटू देणार नव्हतो. गोरेगांव स्टेशनवर गस्तीत असलेल्या पोलिसांकडे ह्यांना देणार. मी त्या दोघांपासून हातभार अंतरावर उभा ठाकलो. त्या नशेडी डोळ्यांत थेट रोखून मी जाब विचारला, “माज आलाय का रे तुला?” माझं अंग गरम होऊ लागलं. मान उष्ण होऊ लागली. डोकं ठणकायला लागलं. सभोवतालचं भान हरपलं आणि निमिषार्धात माझा उजवा हात त्या मशरूम वाल्याच्या डाव्या कानशीलात बसली. डाव्या हाताने त्याच्या शर्टाची कॉलर घट्ट पकडून ठेवली. एका ऑफिस-घर-ऑफिस-घर करणाऱ्या माझ्यासारख्याकडून असली प्रतिक्रिया त्यांना अपेक्षित नसेल. ती दोघंही चपापली. पुढल्या भागातली त्या टोळक्यांपैकी दोघा-तिघांनी अश्लिल शब्दांचा भडीमार सुरु केला.
आपल्या पाठीशी पब्लिक आहे असा माझा पक्का कयास होता. नाहीतर एव्हाना माझा प्रतिकार करायला त्या दोघांनी सुरुवात केली असतीच. तो मशरूम वाला बावचळून वेड्यासारखा माझ्याकडेच बघत होता. त्याचा साथीदारही माझ्यापासून हातभार अंतरावर लोकलच्या टिनाच्या भिंतीला खेटून भेदरून उभा होता. माझ्या डोळ्यांसमोर धूसरपणाची लाट पसरली पण एव्हाना लोकल प्लॅटफॉर्म जवळ येत होता तशी धीमी होत असल्याचं मला जाणवत होतं. ह्याला पोलिसांच्या हवाले केला की मी घरी जाणार होतो. एक सुजाण सजग नागरिक असल्याचा मला सार्थ अभिमान वाटला. मी एक लहान-सहान का होई ना एक संभाव्य गुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. कुणास ठाऊक त्या तिघींपैकी कुणी एखादी ह्या श्वापदांचं भक्ष्य झाली असती तर? छे! असा अमंगळ विचारही येऊ नये.
गाडी प्लॅटफॉर्मवर लागली. अचानक गर्दी वाढली. त्याच्या कॉलरवरचा हात त्या गोंधळात सुटला असावा. मी लोकलमधून उतरलो. त्या टग्याला गर्दीत शोधत मी प्लॅटफॉर्मवर चहुवार बघू लागलो. पुढे पायऱ्यांजवळ एक मोठा घोळका दिसला. कदाचित डब्यातल्या सहप्रवाशांनी त्या दोघांपैकी कुणाला तरी पकडलेलं दिसतंय. मी त्या घोळक्याच्या दिशेनं जाऊ लागलो.
ह्या डोळ्यांचं काहीतरी करावं लागणार. उद्या डॉक्टरकडे जाण्याऐवजी आताच चेक अप करून घ्यावं. डोळ्यांसमोरचा धूसरपणा आणखीच जास्त वाढत असल्याचं मला जाणवलं. काहीसं लालसरही दिसत होतं.
मी त्या घोळक्यात शिरलो. त्याच्या मध्यभागी जाता जाता मी मनगटावरच्या घड्याळीकडे बघितलं. ६.५८ वाजले होते. हे कसं शक्य आहे? घड्याळ बंद पडलं वाटतं माझं. आता सेकंड, मिनिट आणि तासात माझ्या जीवनाचा हिशोब कसा लावणार मी? सहज विचार मेंदूत शिरला.
मी समोर बघितलं आणि डोकं सुन्न झालं. हुबेहूब माझं आहे तसंच शर्ट पँट घातलेला एक चाळिशीतला माणूस रक्ताच्या थारोळ्यात फरशीवर पडलेला दिसला. त्याच्या मनगटावरची घड्याळ नेमकी ६.५८ लाच बंद पडलेली. मला काही सुचेनासं झालं. काय प्रकार आहे हा?
त्या घोळक्यातल्या बोलणाऱ्यांपैकी काहींची वाक्यं कानी पडली. चार पाच १६-१७ वर्षांच्या पोरांनी मिळून ह्या माणसाला मरेस्तोवर बदडून काढलं आणि पसार झालीत म्हणे.
मी त्या घोळक्यातून निसटलो. माझ्या बाजूलाच किरकोळ सामान विक्रीची एक हातगाडी होती. त्याला लटकवलेल्या आरशात माझं प्रतिबिंब दिसत नव्हतं. मी माझं दृष्टी माझ्या खांद्यांकडे, छातीकडे, पायाकडे वळवली. डोळ्यांसमोरचा अंधार गडद होत गेला.
…
…
…
डोळे उघडले तेव्हा प्लॅटफॉर्मवरचे दिवे तेव्हढे तेवत होते. सायंकाळ केव्हाचीच सरली होती आणि रात्रीचे प्रहर सुरु झाले होते. सभोवतालची गर्दीही पसार झालेली. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हतं. तुरळक कुठेतरी कुणीतरी दिसलं. एखाद दुसरी आकृती हलली. वटवाघुळं फडफडली आणि अंधारलेल्या आकाशात लुप्त झाली.
“बाप रे! फारच उशीर झालेला दिसतोय.” मी हलकंसं पुटपुटलो.
OMG…!!