अंदाजे वाचन वेळ : २१ मिनिटे
साधारण सव्वाशे वर्षांआधी पालकवाडीच्या दक्षिणेला निमकरांचा वाडा होता. पालकवाडी तेव्हा एक छोटंसं खेडं होतं. मनुष्यवस्ती वाढत गेली. खेड्याचं गाव झालं. गावात निमकरांच्या घराण्याने मूळ धरलं. निमकरांची संपन्नता वाढत गेली तस तशी निमकरांच्या घराण्याचं प्रस्थ मोठं होत गेलं. १९१९ च्या उन्हाळ्यात निमकर घराणं अचानक पालकवाडी सोडून इतरत्र: स्थायिक झालं आणि निमकरांच्या वाड्याला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. त्यांच्या अश्या जाण्याचं कारण काळाच्या ओघात निवासितांच्या विस्मृतीत गेलं. पालकवाडीच्या परंपरागत निवासी काही कुटुंबातल्या वृद्धांखेरीज कुणालाही आता ते माहिती नव्हतं.
कालांतराने पालकवाडी नावाच्या गावाची तहसील झाली आणि पालकवाडी शहर वर्धा झालं. निमकरांचा वाडा आता जीर्ण झाला होता. वाड्याचा जोता भक्कम दगडांनी बांधला असल्याने मजबूत असला म्हणून वाडा उभा होता पण ठिकठिकाणच्या भिंतींना भगदाडं पडायला लागली होती. कुण्या एके काळी श्रीमंतीचं उदाहरण म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला तो वाडा स्मशान-अवदशेने झपाटला गेला.
कुण्याही वारसदाराने आतापर्यंत त्या वाड्यावर मालकी हक्क सांगायला सुरुवात केलेली नव्हती आणि तसंही कुणी वारसदार तिकडे गेल्या छप्पन वर्षांत फिरकला सुद्धा नव्हता. कुणी येईल अशी आशाही नव्हती पण तरी कुणी तो वाडा हडप करण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता.
वाड्याच्या अवतीभवती पिंपळ, चिंचेची वार्धक्याने क्षीण झालेली झाडं अजूनही अस्तित्व टिकवून होती. हळूहळू वस्तीने वाड्याजवळ अतिक्रमण केलं असलं तरी वाड्याच्या दगडी कुंपणापासून पन्नास फूट अंतर ठेवण्यात आलं होती.
साल १९७५, १९ एप्रिल, रात्रीचे ९.२७
काळोख पडला, रात्र झाली तरी लेकरं घरी आली नाहीत म्हणून अंतेश्वर, सुंदर आणि मानिकांत या तिघांच्याही मायांनी आजूबाजूच्या ओळखी पाळखीच्या घरी जाऊन बघितलं. मिसरूड फुटायच्या वयातली ही तिघं पोरं पक्की दोस्तं बनलेली होती. पोलीस लाईन मधल्या मारोतीच्या मंदिराजवळ पोरंसोरं जमण्यासाठी कट्टा होता तिथं जाऊन बघितलं. एक किलोमीटरभर अंतर पालथं घातलं तरी ती पोरं काही सापडली नाही तेव्हा दिसेल त्याला दादा-भाऊ “पोरं दिसली का तुम्हाला?” काकुळतीला येऊन विचारू लागली. हळूहळू अख्ख्या पोलीस लाईन मध्ये पोरं हरवल्याची वार्ता पसरली होती.
बाजार करायला म्हणून ही तिकडी आपापल्या घरी सांगून गेली होती. दुपार मावळतांना निघालेली ही तिघं फार फार तर एक तासाच्या पैदल अंतरावर असलेल्या गोल बाजारातून आली असती. बारदाण्यांच्या शंभरीला टेकलेल्या म्हातारबुवाने सगण्यांच्या अंत्याला, हिवऱ्यांच्या सुंदरला आणि मानकरांच्या मणिकांतला निमकरांच्या वाड्याभोवती घुटमळताना शेवटचं बघितलं होतं.
पोलीस लाईन मधल्या सगळ्या घरांतून पोलीस असतील नसतील ते कपडे अंगावर चढवून हातांत पोलिसी दंडुके आणि टॉर्च घेऊन सायकली काढून गोल बाजार धुंढाळायला निघाले.
तिकडी
अंतेश्वर उर्फ अंत्या सगणे, सुंदर हिवरे आणि मणिकांत मानकर तिघं घनिष्ठ मित्र होते. अंत्या आणि सुंदर अभ्यासात बेताचे असले तरी अंग-पिंडाने जबरी आणि मणिकांत अभ्यासात अत्यंत हुशार! मणिकांतची आई त्याला फार जपायची. अंत्या आणि सुंदर या दोघं टवाळखोर पोरांपासून दूर राहण्याचं कितीही सांगितलं तरी शाळेत त्याला इतर दंगेखोरांपासून त्याला या दोघांनेच वाचवल्याने तो या दोघांच्याच सोबत राहत असे. माय कितीही ओरडली तरी बाप कानाडोळा करायचा.
संगतीचा प्रभाव म्हणून मणिकांत त्या दोघांसोबत राहून या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यापासून जोर बैठका मारायला आखाड्यात जायला लागला होता. अंत्या आणि सुंदर दोघांना अभ्यासात फारसा रस नसला तरी इयत्ता पार करून पुढे जायचं म्हंटलं तरी पास होण्यासाठी अभ्यास करावाच लागणार होता. मणिकांत कडून गणित आणि विज्ञान उन्हाळाभर तास-दिड तास शिकायला म्हणून त्याच्या घरी ते दुपार घालवत. वरून मणिकांतच्या आईची करडी नजर असायचीच त्यांच्यावर.
आज दुपारी तिघांचीही टंगळमंगळ सुरु होती. कसली तरी खलबतं सुरु होती. मणीच्या आईने हटकल्यावर ‘काही नाही काकू. असंच काहीतरी आमचं…” म्हणत त्यांनी खिक खिक करत वेळ मारून नेली होती. मणीच्या बापाने शनिवारची सुट्टी टाकली होती. खुर्चीवर बसल्या बसल्या हातातल्या पेपराआडून मान डोकावत भुवयांनी ‘काय रे?’ म्हणत जरबीचा कटाक्ष टाकला तसा त्या तिघांनी पुस्तकांत आपापल्या माना खुपसल्या. स्वतःला घरचा ‘शेर’ मानून घेण्यात त्याला काय आनंद मिळे!
चार वाजले. मणीच्या मायने मणीला आठवडाभरचा बाजार आणायला म्हणून पिशवी आणि पैसे हातात टेकवले. आता घरून तीन-चार तास सुटका असा विचार करून मणी गालातल्या गालात हसला. आज आपल्या धाडशी योजनेला पार पाडायला पुरेसा वेळ आहे असं डोळ्यांनी खुणावत त्याने अंत्या आणि सुंदरला बाहेर भेटायला सुचवलं. त्या दोघांनी माना डोलावल्या आणि बाहेर पडले.
“जातो गं, आई.” मणी दरवाज्यातून एक पाय बाहेर टाकलं ओरडला आणि धूम पळाला.
नेहमी ‘येतो’ म्हणणारा मणी आज ‘जातो’ म्हणाला म्हणून त्याच्या आईच्या मनात धस्स झालं. त्याच्या बाबाला बोलावं म्हणून उघडलेलं तोंड मिटत तशीच ती देवघराकडे वळली आणि निरंजणीतल्या फडफडणाऱ्या वातीचा गुल झाडण्यासाठी उदबत्तीच्या काडीने ज्योतीजवळ नेला. ज्योत कमी झाली तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली. एका हाताने ज्योतीला एका बाजूने झाकत हलकेच दुसऱ्या हाताने काळजीपूर्वक गुल झाडला आणि निरंजणीत तेल टाकलं. दोन्ही हात जोडून शंकराच्या मूर्तीला नमस्कार केला. हृदयाची धडधड आता स्थिर होत असली तरी चिंतेचं वलय तिच्या कपाळी झळकू लागलं.
नूतन अँग्लो शाळेला वळसा घालून एक मोठा ओढा वाहायचा. याला पावसापाण्यात मोठा जोर होता. गुराढोरं, माणसं-बाया या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले होते. दरवर्षी कुठून न कुठून वाहत येत ओढ्यात कोलमडून पडलेल्या झाड-वृक्षांच्या फांद्यांत अडकून जात. पोहणं येणाऱ्यांना सुद्धा या ओढ्यात पाय ठेवणं अशक्य वाटे. एखादा वाहत वाहत आला आणि फांद्यांना अडकला तरी म्हणे भुतं फांद्यांना त्यांचे पायच अडकवत आणि खाली मुंडी वरती पाय अश्या अवस्थेत नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून लोकांचा मृत्यू होई. मेलेल्यांच्या आत्म्याला शांती म्हणून कुणीतरी तिथे शेंदूर फासून पिशाच्चाच्या नावानं दगड उभा केला. पुढे तिथे लोकांनी फुलं, फळं अर्पण करत मृतात्म्यांनी आणखी कुणास धरू नये म्हणून दर पावसाळ्याच्या सुरुवातीला शांतता समारंभ भरवायला सुरुवात केली. एवढं करूनही पावसाळ्यात वाहून इथे फांद्यांत अडकवून जीव जाणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं नव्हतं. उन्हाळा-हिवाळ्यात एखाद दुसरी बातमी येईच! या कारणांमुळे लोकं या भागात भर दुपारी एकट्या दुकट्याने यायला घाबरे.
या ओढ्यापासून तीस-एक फूट अंतरावर एक मोठी विहीर होती. या विहिरीतही कित्येक जणांनी जीव दिला होता आणि इथल्या परिसरामध्ये पिंपळ-वड, चिंच, खैर, सागवान, शिसम, अर्जुनाची आणि इतरही मोठं मोठाल्या खोडांची आणि उंचीची अशी पुष्कळ झाडं होती. संपूर्ण भूभाग माध्यान्ही आलेल्या सूर्याच्या लक्ख प्रकाशही वाव देत नसे. त्यामुळे सगळीकडे अंधारी अंधारच साम्राज्य पसरलेलं असे. या वनात भुताटकीचा प्रकार चालत असे म्हणे. सूर्य मावळल्यानंतर तिकडे प्रवेश करायला कुणी धजत नसे.
नूतन अँग्लो शाळेच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंकडून दोनशे-सव्वादोनशे मीटर अंतरावर ओढ्यावर बांधलेला जुनाट दगडी पूल या मार्गावरचा ये जा करण्यासाठी एकमेव पर्याय होता. मुख्य रस्त्यापासून शाळेकडे येणार आणखी एक मार्ग तयार होत होता मात्र रस्तेबांधणी सुरु असल्याने तो बंद होता. कुणाला नूतन अँग्लो शाळे पासून गोल बाजारात सायंकाळी ये जा करायची असल्यास मुख्य रस्त्यापासून वळण मार्ग घेत असत.
गोल बाजाराच्या एका टोकाला निमकर वाडा होता. तिथून दूर चार घरांत तिन्हीसांजेला तुळशीपाशी ठेवलेला दिवा पन्नास फूट अंतरावरून दिसत असला तरी त्याचा मिणमिणता प्रकाशही झाडाझुडुपांनी दिसेनासा व्हायचा. अश्या वातावरणात कुणीही निमकर वाड्याकडे सायंकाळी सहानंतर सकाळच्या सात-आठ वाजेपर्यंत जाण्याची हिम्मत करत नसे.
सायंकाळचे साधारण ५ वाजले असतील. पोलीस लाईन पासून थेट निघून ओढ्यावरचा पहिला पूल पार करून शाळेच्या टपरीजवळ ते तिघे थांबले. सुंदर आणि मणिकांतला शाळेच्या कुंपणाच्या आडोश्याला लपायला सांगून अंतेश्वर दुबेच्या पान टपरीवर गेला. त्याची आणि दुबेची ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असं काहीसं संगनमत होतं.
“क्या दुबे भैय्या? कैसा है?”
“सब ठीक| तुमचा माल तयार आहे साहेब.” असं म्हणत त्याने अंत्याच्या हातात कसली तरी पुरचुंडी टेकवली. “ये कडक है| पाहली बार लेते होंगे तो ज्यादा मत लेना| दो-चार कश मारोगे तो भी मस्त चढेंगा|” अंत्याच्या किशोरवयीन चेहऱ्यावरचा या प्रकारचा थरार पहिल्यांदाच करत असल्याचा भाव दुबेने चाणाक्षतेने ओळखले. या खेळातला तो जाणकार होता. या वयातल्या पोरांना नशेची लत एकदा लागली की त्याचे भावी गिऱ्हाईक पक्के!
“ये हुई ना बात|” अंत्यानं फार मोठी कामगिरी फत्ते पाडल्याच्या आविर्भावात दुबेनं दिलेली पुरचुंडी खिशात भरली. एक थरार म्हणून त्या तिघांनी एकत्र बिड्या फुकण्याचा अनुभव घ्यायचं ठरवलं होतं. ओळखीच्या कुणी फुकतांना बघितलं आणि घरी सांगितलं तर बाप लोकं बेदम झोडपतील हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. एक-दोनदा त्याने आणि सुंदर ने घरी आलेल्या पाहुण्यांच्या खिशातून चोरून बिड्या उडवल्या होत्या. घराच्या मागच्या पटांगणात वडाच्या ढोलीमागे लपून त्या दोघांनी बिड्या ओढल्या होत्या आणि गप्पा मारत मारत मणिकांतला त्याच मोठं रंगवून रंगवून वर्णन केलं होतं.
स्कुलजवळ येताच त्याने पॅंटीच्या खिशावर दोन-तीनदा हात मारत माल घेतल्याची मोहीम फत्ते केल्याची खूण दिली. माणिकांत आणि सुंदर एकमेकांना टाळ्या देत त्याच्या कडे गेले. आता पुढला थरार होता मानकारवाड्यात शिरण्याचा!
मावळतीच्या सूर्य प्रकाशात ओढ्यावरचा दुसऱ्या पुलावरुन ती तिघं समोर निघाली. तिथून निमकर वाडा एखादा किलोमीटर दूर असेल. गप्पा टप्पा करत साधारण सव्वा सहाला ती तिघं निमकरवाड्याच्या मुख्य फाटकापाशी पोचले.
बारदाण्यांचा म्हातारा
बारदाण्यांचा म्हातारा गावातलं जुनं खोड होतं. एकदा गावात इंग्रजी ठाण्यावर लिंबू मिरची मारून कुण्या मोठ्या अधिकाऱ्याला करणी करून बिमार पडल्याच्या आरोपावरून याला दोन महिने डांबून ठेवलं होतं. त्या घटनेवरून याची करणी इंग्रजांना कशी बाधली याचे मोठ-मोठे किस्से पंचक्रोशीत पसरले होते.
‘बुडत्याला काडीचा आधार’ शेवटचा पर्याय म्हणून बाया आणि गावातली जुनी लोकं मात्र आताही त्याच्याकडे झाडाफुकीची औषध, विंचू-इंगळीचं विष काढण्याचा उतारा आणि मंत्र-बिंत्र घ्यायला यायची. काहींना गुण आला की ते सगळीकडे म्हाताऱ्याच्या हाताला कसा गुण आहे वगैरे गोष्टी पसरावायच्या. काही जणांना गुण नाही आला की म्हाताऱ्याला थट्टेचा विषय बनवायचे. खरं-खोटं म्हाताऱ्यालाच ठाऊक!
गोल बाजारातल्या शंकराच्या मंदिराला सायंकाळच्या प्रदक्षिणा मारून झाल्या. धोतराच्या खोच्यात बांधलेली चंची म्हाताऱ्याने सोडली. “अह्हा” करत मोठ्याने खोकलून घश्यात आलेला बेडका थुंकून चंचीत हात टाकला. हाताला ना तंबाखू लागला ना सुपारी. नशिबाला दोष देत म्हातारा तोंडातल्या तोंडात पुटपुटत काहीतरी बरळला. म्हातारपण आता त्याला सहन होत नव्हतं. कधी मरण येतं आणि केलेल्या पाप-पुण्याचं खातं घेऊन चित्रगुप्तासमोर बसतो असं झालं होतं त्याला. खंगत-खोकत पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या मोठ्या पोराकडे जाण्यासाठी तो निघाला. जवळचा रस्ता पकडावा म्हणजे मोठ्याची बायको देईल तो भाकरी-मिठाचा तुकडा खाण्यास मिळेल असा त्याने विचार केला. वेळेत पोचलो तर गरम जेवायला तरी मिळेल म्हणून त्याने निमकरवाड्यासमोरून नूतन अँग्लो शाळेसमोर निघणारा रस्ता पकडला.
जरा सामोरे गेल्यावर त्याला वाड्यासमोर तीन पोरं दिसली. तिन्हीसांजेच्या वेळी कोण या अपशकुनी जागेवर भटकतंय म्हणून त्याने तिघांना हटकले तशी ती तिघं तिथून हसत हसत म्हाताऱ्याला वाकुल्या दाखवत सटकली. म्हातारा परत काहीतरी पुटपुटत पोलिसलाईनच्या रस्त्याला लागला.
वाड्यात प्रवेश
साडे पाच वाजले. वाड्याच्या कुंपणाच्या लोखंडी प्रवेशद्वारावरचं गांजलेलं टाळं सुंदरनं हातातल्या दगडानं फोडलं. ‘ढांणण’ आवाज झाला तसं फाटकाच्या शेजारी निपचित पडलेलं कुत्रं ‘क्येई क्येई’ करत पळालं. पळता पळता कुंपणाच्या भिंतीला जाऊन डोक्याच्या भारावर आदळलं आणि वेड लागल्यासारखं परत केकाटत अंधारात गुडूप झालं. दूर गेला तसा त्याच्या केकाटण्याचा आवाज कमी कमी होत जाऊन नाहीसा झाला. अंत्या आणि मणिकांत त्याच्या फजितीवर फिदीफिदी हसले. वाड्याजवळचा परिसर निर्मनुष्य असणार हे त्यांना चांगलं माहिती होतं.
मणिकांतला बारदाने म्हाताऱ्याचं हटकणं राहून राहून आठवत होतं. सुंदर आणि अंत्यासारखी बेडर वृत्ती त्याच्यात नव्हतीच. “अरे म्हाताऱ्याने माझ्या घरी सांगितलं तर आई बाबा चांगले रट्टे देतील मला. जाऊ आपण पट्क्कन!”
“थांब रे दादा! आत्ताच पोहोचलो आपण. तुझ्या साठी स्पेशल आणला आहे. एकदम कडक, कडयांग!” असं म्हणत अंत्यानं दोघांसमोर नाचवत ती पुरचुंडी खिशाबाहेर काढली.
मणिकांतच्या अंगावर रोमांच उभे झाले. त्यालाही सुंदर आणि अंत्याच्या टोळकित सामील व्हायचे होते. एकदा विडी फुकून दाखवली की आपण असलं धाडस करू शकतो हेच त्याला सिद्ध करायचे होते. त्याशिवाय निमकरवाड्यात जाण्याची हिम्मत केलीये हे सुद्धा शाळेत अभिमानाने सांगू शकतोच! शाळा सुरु झाली की बातांवर हवा तयार केली की एखादी पोरगी पटेल सुद्धा आपल्याला. मनातल्या मनात त्याने मांडे भाजणे सुरु केले. “हो थांबतो. मै नहीं डरता किसीसे भी| चल वाडा बघू.”
“ओ हो शेर मेरे!” अंत्या आणि सुंदर दोघांनी एकत्रच मणिला शाबासकी दिली. “जाऊ आपण घरी ७-८ वाजेपर्यंत. आमच्या घरी आम्हाला ओरडतातच नं!” त्यांच्या या उत्तराने त्याला जरा बरं वाटलं. आपलेच समदुःखी मित्र हे शेवटी.
एकमेकांना ‘चल… चल’ म्हणत तिघांनी फाटकातून आत प्रवेश केला. प्रकाश नाहीसा होतोय आणि वाडा तर आताच बघायचा म्हणून अंत्याने जवळच पडलेली जाडसर फांदी उचलली. त्याच्या एका टोकाला मणिच्या पिशवीतून काढलेल्या चिंद्या गुंडाळल्या. त्याची मशाल करून त्याच्या प्रकाशात वाडा फिरायचा त्याचा बेत होता.
कुंपणातून वाड्याच्या मुख्य द्वारापर्यंत दहा बारा फुटांचं अंतर चालून गेल्यावर त्याला सुंदरने “आत मध्ये जाऊन पेटव” म्हंटलं.
सव्वाशे वर्षांनंतर वाड्याच्या आवारात कुण्या मनुष्याचा प्रवेश प्रथमच होत होता. तिघांची पाऊलं पडू लागली तशी वाळक्या, कुजलेल्या पाला-पाचोळ्यांचा चुरगळण्याचा चुर्रर्र चुर्रर्र आवाज तेव्हड्या निरव शांततेचा भंग करू लागली. आवारातल्या जुनाट वडाच्या सरळसोट जाडजूड अजगरासारख्या पारंब्या जमिनीत भिडल्या होत्या. त्याच्याच अगदी समोर पिंपळाची दोन मोठमोठाली झाडं वडाशी स्पर्धा करत अजस्त्र बुंधा वाढवत जमिनीत घट्ट मुळंपाळं रोवून बसली होती. त्या तीन वृक्षांच्या फांद्यांवर एव्हाना वटवाघुळं “चीं चीक चीक” चित्कारत घिरट्या घालत एकमेकांसोबत दाटीवाटीनं लटकू लागली.
“अंत्या, पाहशील जरा. अंगावर घाण पडेल नाहीतर वटवाघळाची.” मणिकांत स्वतः बाजूला सारत अंत्या आणि सुंदरला बाजूला लोटत म्हणाला.
“तुझ्या…” अंत्या तोंडात आलेली शिवी आवरत म्हणाला “माझा पाय पडला नं बे गू वर”.
“मला काय माहिती? मला थोडीच दिसलं?”
“बिट्ट्या बांधा रे.” सुंदर ने तर्जनीवर मध्यमा चढवीत अंत्याला चिडवणीच्या सुरात म्हणाला.
“जाय ना बे.” अंत्या चिडला.
“माहिती आहे का? वटवाघुळं उलटी लटकतात आणि तशीच घाण करतात.” मणिकांत.
“हो का? आणि मग ती घाण कुठे जाते?” सुंदर आणि अंत्या दोघंही खिक खिक करून हसू लागले.
“हसा लेको. पण बारदाने म्हातारा म्हणे कुण्यातरी रग्गड पैसेवाल्याच्या पोरानं कुण्या कुळीन बाईसोबत जबरदस्तीनं “ते” केलं. मरण्याच्या आधी त्या बाईनं म्हणे शाप दिला की तू पुढच्या जन्मी वटवाघूळ होऊन उलटा लटकशीन आणि …” मणिकांतनं मिळालेलं ज्ञान सांगितलं तसं तिघेही हसायला लागले.
“काही काही सांगून राह्यला बे तू. तो बारदाण्याचा बुढा काही फेकते अन तू ऐकतं.” सुंदर त्या म्हाताऱ्याला वेड लागलं आहे असंच समजायचा.
“हाओ नाही त काय? त्याच बुढ्यानं सांगितलं होतं म्हणे की या वाड्यात निमकरांच्या तिघा भावांचं भाऊबंधकीत पटलं नव्हतं तर झगडे करून करून शेवटी एकमेकांना मारलं म्हणे त्यांनी. बाकीचे सगळे घरातले आठवडा भरात सामान गुंडाळून पळाले दुसऱ्या गावात म्हणे. एका भावाले म्हणे जुगार खेळायचा छंद होता आणि मग बाई आणि बाटली. मंग का म्हणता, दर रोज भांडणं. दुसरा भाऊ आजूबाजूच्या गावातल्या लोकांना लुबाडत होता धंद्यात आणि मग इकडून तिकडून लोकं पैसा मागायला येई म्हणे. खजिन्यावर बसलेला नागोबा होता पक्का! लहान भाऊ अक्ख्खं घर सांभाळे तर त्यांच्या बावाजीनं त्याच्या हातात कारभार दिला होता. हे काही त्या दोघांना पटलं नाही म्हणे. बुढा होता तोवर थांबले थांबले आणि मग दे दणा दणा भांडणं. एका रात्री बम्म भांडले म्हणे आणि दुसऱ्या दिवशी मोठ्याचं प्रेत या वडाला टांगलेलं दिसलं, मधला परसबागेत गाडलेला होता म्हणे. लहान गायबच झाला तो कधी दिसलाच नाही म्हणे.” अंत्यानं थोडक्यात बारदाने म्हाताऱ्याने सांगितलेली गोष्ट सांगितली.
हात-पायावर आलेल्या शहाऱ्यांना घालवण्यासाठी मानिकांतने कधी या हातावर तर कधी त्या पायावर तळहातांनी फिरवाफिरव केली तरी त्याच्या मनात भीतीने घर केलं होतं. “मी जातो आता. भूत बंगला आहे हा.” असं म्हणत तो वळला तसं सुंदरने त्याचा हात पकडला. “आई … आई!” करत मणिकांत ओरडला आणि वरमला.
“अब्बे. मीच आहे. एवढा फट्टू निघाला बे तू? टरकली बस्स इतक्यातच? चालला मोठा वाडा पाहायला.” सुंदर हसत हसत चिडवण्याच्या सुरात म्हणाला.
“हाओ नं बे. फट्टू साला.” अंत्या.
“तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. मी चाललो. घरी भाजीपाला घेऊन जायचं आहे. अजून काहीच नाही घेतलं. आई ओरडेन माझ्यावर.” मणिकांतला आता आणखी या वाड्यापाशी थांबायचं नव्हतं.
“अबे, गंमत केली नं बे तुझी. थांब. एव्हडा वाडा पाहू. एक चक्कर मारू आणि बाजार पाचच मिनिटात तं येते.” अंत्या समजावणीच्या सुरात म्हणाला. “आपलं तसं हे सिक्रेट आहे बरं, सांगू नको कोणाला.” त्याला वाटलं की या घाबरट मणिने बोभाटा केला तर चांगलाच मार पडेल आपल्याला.
“मी नाही सांगत कुणाला. फक्त इथून चला. परत कधीतरी येऊ.”
“आता आलो आहे तर दहा मिनिटात चक्कर मारून जाऊ. बस्स?” सुंदर ने कपाळावरच्या त्राग्याला आवर घालत म्हंटलं.
“बरं. दहाच मिनिटं.” दोघांवर विश्वास ठेऊन मणिकांत म्हणाला.
विषय संपला म्हणून दोघांनी निश्वास सोडला आणि अंत्याने तकलादू मशाल पेटवली. उजेड आणि आगीचा शेक लागला असेल तसा भिंतीच्या भगदाडीत अंग चोरून शिरलेल्या एका मोठ्या वटवाघुळंनं
“चीई चीई” चित्कारत कर्णभेदक आवाज काढला. तसं घाबरून त्या तिघांनी “आ SS !” ओरडा केला. त्या सरशी एक दोन पाऊलं मागे टाकत ती तिघे धडपडून खाली पडली. मानिकांतला मशालीच्या उजेडात त्या वटवाघळाच्या तोंडाला लाल रंग लागलेला दिसला. कदाचित रक्त पिपासू वटवाघूळ असावा असं वाटलं तरी विचकटलेल्या ओठ तुटलेल्या तोंडातून पिवळट पांढरे टोकदार दात काढत मणिकांतच्या चेहऱ्यापासून अगदी हातभराच्या अंतरावरून दिसल्याने त्याची बोबडीच वळली. पंखांची फडफड करत ते वटवाघूळ इकडे तिकडे घिरट्या घालत भिंतीवर आदळत तर कधी चुकवत ते वाड्याच्या प्रवेशद्वारातून निघून पिंपळाच्या झाडाकडे रवाना झालं.
शिव्या देत अंत्या आणि सुंदर जमिनीवरून उठले. मणिकांतला हात देत उठवत दोघंही हसले मात्र मणिकांत चांगलाच टरकला होता. अंग झटकत उसणं अवसान आणत कसाबसा हसला.
वाड्याची पहिली खोली मोठी प्रशस्त होती. काळ्याशार दगडाने बांधलेल्या भिंती थंडगार होत्या. भिंती चाचपडत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात त्यांनी वाडा फिरायला सुरुवात केली. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा जिना होता. मशालीच्या उजेडात एकमेकांच्या पाऊलांपाठी पाऊल टाकत भिंतींचा आधार घेत ती तिघं वर चढू लागली.
मशाल इकडे तिकडे लहरावत त्याच्या प्रकाशात एक एक पाउल समोर जाता जाता बाजूनं काहीतरी सरपटलं. त्या वेळी त्यांच्या लक्षात आलं नाही पण पुढल्या क्षणी पायांवरून वजनदार, बुळबुळीत आणि थंडगार पण मऊशीर आणि जाडसर दोरखंड घासत गेल्यासारखं वाटलं म्हणून अंत्यानं मशाल मागे वळवली तशी जागच्या जागीच ते गारठले. मशालीच्या प्रकाशात काळ्याशार सर्पाची लांबलचक काया पायऱ्यांवरून वेगाने सरकत गेली आणि वळवळत पालापाचोळ्याचा दडत अदृश्य झाली.
तिघांच्या तोंडातून भीतीने एक शब्दही निघाला नाही. शेवटी अंत्यानंच हातानेच “वर चला” म्हणत इशारा केला तसे ते तिघं धावतच पायऱ्या चढत छतावर पोचली.
सायंकाळ सरून रात्रीस सुरुवात झाली होती हे त्यांच्या लक्षात आलं. पन्नास फूट अंतरापर्यंत काळोख गुडूप होता. बाजाराच्या दिशेने जरासा उजेड होता. त्याच्या विरुद्ध दिशेने एखाद दोन टिमटिमत्या कंदिलाचा किंवा पणत्यांचा उजेड काळोखाशी झगडत होता. वाड्याच्या वरून तिघंही हे दृश्य न्याहाळत फिरत होती. वाड्याच्या उत्तरेकडच्या भिंतीला मोठं भोक पडलं होतं. सुंदर ने तिथून मुंडकं बाहेर काढून बघितलं. वरती चंद्राचा सौम्य चंदेरी उजेड ढगांच्या अधून लपाछपी करत होता. त्या उजेडात त्याला खाली काहीतरी चकाकत असल्यासारखं दिसलं. हा पट्ठ्या तिथे काय करतोय म्हणून अंत्या आणि मानिकांतही तिथे पोचले. जरा डोळे आणि कान नीट उपयोगी आणले तेव्हा तो ओढा असल्याचा त्यांनी तर्क बांधला.
बाहेर वाढलेल्या वाऱ्यासोबत पिंपळपानांची सळसळ वाढीस लागली होती. गारवा वाढला तसा अंत्यानं खिशात दडवलेल्या पुरचुंडीची आठवण काढली. मशाल खाली ठेवून त्याच्या भोवती ती तिघं ऐसपैस बसली. पुरचुंडीतून अंत्यानं पाच-सहा वाळलेली पानं काढली. त्याची पुंगळी करून त्याच्या एका टोकाला त्याने चिंधी लावली आणि तकलादू चिलीम तयार केली. सुंदरनं तोवर पुरचुंडीत हात टाकला. त्याच्या हाताला कसलीतरी भुकटी लागली.
“हे काय आहे? तू बिड्या आणणार होता नं?” बिड्या आणण्याचं सोडून हे काय आणलं अश्या सुरात त्यानं अंत्याला विचारलं.
“मेरे दोस्त, दुबेने हा स्पेशल कडक माल दिला आहे. बिडी सिगारेट सगळं झक्क मारेल याच्या समोर.” अंत्यानं बेधडक गर्वानं सांगितलं.
“अरे हो पण याला झेपेल का? याची पहिलीच वेळ आहे.” मणिकांतला साधी बिडीसुद्धा झेपणार नाही हे सुंदरला ठाऊक होतं.
“जमेंगा| कसं करायचं तेव्हडं सांग.” काही वेळापूर्वी बघत असलेल्या स्वप्नाची आठवण त्याच्या नजरेसमोरून गेली.
“बरं. ही घे चिलीम.” त्याच्या एका हातात पानांची चिलीम आणि दुसऱ्या हातात पुरचुंडीतली भुकटी टाकत अंत्या म्हणाला. “यात ती भुकटी ठास. पक्की ठास. आणि मग चिलीमीचं टोक तोंडात धरून लाव आग दुसऱ्या टोकाला.”
आज्ञाधारी बालकासारखं मणिकांत ने सूचना ऐकल्या. तोवर त्या दोघांची चिलीम भरून झाली होती. पुढलं कळतं आपल्याला अश्या आविर्भावात त्याने चिलीम पेटवली. तोंडातून पहिला कश ओढला तसा मोठ्ठ्याने तो खो खो करत खोकायला लागला. श्वासनळीत पहिल्यांदाच धूर गेल्याने त्याला चांगलाच ठसका लागला होता. डोळ्यांतून अश्रू आणि नाकातून पाणी यायला सुरुवात झाली तशी डोक्यात झिणझिणी बसली.
सुंदर आणि अंत्या दोघंही त्याच्याकडे बघत हसायला लागले. त्यांनी आपापल्या चिलीमीतून हलके हलके कश घेतले. मणिकांतचं खोकणं हळूहळू कमी झालं आणि त्याने दुसरा कश हळूच घेतला.
“जमलं, जमलं रे!” दोघांनी माना डोलावत मणिकांतच्या पाठीवर हातांनी थोपटलं.
शिलगलेल्या चिलिमी हळूहळू संपत आल्या तसे तिघेजण पाठीवर लेटले वरती आकाशाकडे बघत शांत. हवेतल्या गारव्याने जोर धरला आणि त्या तिघांच्या डोळ्यावर झोपेचा प्रभाव पडला….
वाड्यातला प्रकार : मणिकांत
श्वास-नि:श्वासाची दोन्ही नाकपुड्यांतून होणारी निरंतर पण धीमी ये-जा मणिकांतला जाणवत होती. प्रत्येक श्वासागणिक कसलासा विचित्र जळका वास फुफ्फुसांत प्रवेश करताना त्या सवे मेंदूत बधिरता प्रसरण पावायला लागली होती. निश्वासाद्वारे शरीरातील उष्णता बाहेर निघत रात्रीच्या गार वातावरणात मिसळून जायला आतुर होत होती पण निश्वास नाकपुड्यांतून निघताक्षणीच गारठून जात होता. सर्व शरीर, गात्र बधिर व्हायला सुरुवात झाली होती. पापण्या जड झाल्या तशी पापण्यांची मिनिटाला १५-२० दा होणारी उघडझाप कमी होत होत ५-६ वेळी होऊ लागली. अवजड पापण्या कश्याबश्या उघडून उघडलेल्या डोळ्यांना दूर-वर आकाशातल्या टीम-टीम करणाऱ्या चांदण्या धूसर धूसर दिसू लागल्या. डोळ्यांच्या कोपऱ्यातून गाढ घट्ट अश्रू निघून कानशिलापर्यंत ओघळ पोचले आणि थिजले. डोळ्यांच्या बुब्बुळांनी हालचाल करणं हळूहळू कमी केलं तशी दृष्टीच्या धूसरपणाची तीव्रता वाढत गेली. दृष्टीसमोर आता गडद लाल रंगाची झाक व्यापत गेली. अर्धवट मिटून पापण्यांनी डोळे अर्धे उघडे ठेवले. बुब्बुळं वरती गेली आणि डोळ्यांवर लालीमेने अतिक्रमण केले. फुफ्फुसं प्राणवायूची तडफड करत होती आणि हृदय धडधडीच्या आकांताने जीवनाचा आक्रोश करू लागला. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली तशी हृदय बरगड्यांच्या पिंजरा तोडून बाहेर येईल असं त्याला वाटू लागलं. बधिरतेच अंमल शरीराच्या शिरशिरांतून प्रवास करत मेंदूच्या कानाकोपऱ्यात पोचला आणि त्याचं स्थळ-काळाचं भान लोप पावलं.
असा किती वेळ लोपला कुणास ठाऊक. चेतना परतली तेव्हा शरीरात उष्णतेचा लवलेशही नव्हता. मेंदूच्या पटलावर झरझर चित्रपटल वेड्या-वाकड्या वेगाने, कधी नागमोडी, कधी सरळ, कधी आडवा तर कधी उजवा – दावा धावू लागला. त्या विना आदी-अंताच्या चित्रपटातून एक आकृती रूप घ्यायला लागली. विना रंगाची, कुरूप… चित्रपटलांचा वेग मंदावला तशी त्या आकृतीचे प्रारूप स्पष्ट होऊ लागले.
छिन्न-विच्छिन्न अंगाच्या त्या आकृतीतून गडद तांबडा-लाल रक्त-स्त्राव व्हायला लागला. तिचा उजवा हात ठिकठिकाणाहून तुटलेला होता. डोक्याला मोठाली छिद्रं पडली होती. डावा कान तुटून गालाला लोंबकळत होता. छातीच्या बरगड्यांची हाडं रक्ताच्या रंगानं माखली होती. मांडीपासून पाय जागोजागी तूटला होता तर पाऊलं वेडीवाकडी होती.
अश्या त्या आकृतीनं जीवाच्या आकांताने ओरडत मणिकांतच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी झेप घेतली. त्याच्या निश्चल शरीरात शिरताच तो अंग जमिनीवर घासत, गडाबडा लोळत तो कधी पाठीवर तर कधी पोटावर सरकत सरकत पुढे पुढे गेला. वाड्याच्या उत्तरेकडच्या भिंतीजवळ पोचून त्याच्या आधाराने तो अडखळत उभा झाला. हाताने चाचपडत त्या भिंतीच्या भगदाडात उभा राहिला आणि त्याने स्वत:ला खाली झोकून दिले. उंचावरून पाण्यात मोठा वजनी दगड पडल्यावर जसा धप्पाक आवाज होतो तश्या आवाजासरशी तो ओढ्यात पडला.
वाड्यातला प्रकार : अंतेश्वर
अंतेश्वर लोटलेल्या पाठीवरून फट्टदिशी खडबडुन पाय सरळ ठेवून पण बूड टेकवून बसला. सर्वत्र अंधार असल्याने सुरुवातीला त्याला काहीच दिसलं नाही. अंधाराला त्याचे डोळे हळूहळू सरावले तसे त्याला अंधुक अंधुक दिसायला लागलं.
पोटात एकदम मुरड आल्यानं त्यानं दोन्ही हातांनी पोट दाबून धरलं. दोन तीन क्षणानंतर पोटात भयंकर उष्णता जाणवायला लागली तशी त्याने मान खाली घातली दोन्ही हात दोन्ही बाजूंना छतावर टेकवत त्याने मानेला हिंसकपणे उजवी-डावीकडे, वर-खाली आणि गोल गोल झटके देणं सुरु केलं. घश्यातुन घोघऱ्या आवाजात ओरड काढून त्याने भडाभडा ओकारी केली. त्यासारखी सकाळपासून खाल्लेलं सगळं अन्न आणि पाणी बाहेर निघालं. वांती निघाल्याने डोकं हलकं हलकं वाटू लागलं तसं त्याला पुढ्यात एक लांबसडक मनुष्याकृती आकृती दिसली. तिचे दोन्ही डोळे खोबणीतून स्नायूंना चिपकून हनुवटीपर्यंत निथळले होते. मानेला पीळ पडला होता. तिचं रूप दिसताच अंत्या “आss!” करत ओरडला. अधांतरी हवेत तरंगत ती आकृती त्याच्या दिशेने आली आणि अंत्या मोठ्याने “वाचवा! वाचावा! नाही नाही!” करत मोठयाने ओरडू लागला. त्या आकृतीने विचकट हसत जबडा फाडला आणि त्यातून लाल रक्ताचे ओघळ निघायला सुरुवात झाली. त्या प्रकाराने घाबरून अंत्याने परत ओकारी केली आणि त्यासरशी त्याच्या तोंडातूनही रक्त ओघळायला लागलं. ती आकृती हवेतल्या हवेत तरंगत डोकं खाली वरती पाय करत गोल गोल फिरू लागली आणि काही कळायच्या आतच अंत्यात सामावून गेली.
अंत्या आपोआप उभा झाला आणि झोकांड्या देत पायऱ्यांकडे ठेचकाळत गेला. तोल न सांभाळता आल्याने तिथून तो घसरला आणि उलटा तिलटा पडत वाड्याच्या पहिल्या खोलीत आदळला. त्याचे पाऊलं आणि तळहातं १८० अंशात फिरले आणि धनुरासनासारखा अंग विकृत करून वाड्याच्या उंबरठा ओलांडून अंगणात पोचला. पिंपळाच्या झाडाकडे पाऊलं करून तो उलटा उलटा चढत पहिल्या फांदीवरती पोचला. हात जमिनीकडे खाली लटकत ठेवून पाउलांनी फांदीला पकडून तो उलटा लटकला. मस्तकाकडे रक्त प्रवाह वाहू लागला तसं त्याच्या डोळ्यांत लाल रंग पसरू लागला.
वाड्यातला प्रकार : सुंदर
चिलीमीतून निघणाऱ्या धुराच्या वलयांत सुंदर मोहला होता. चेहऱ्यावर हरखून गेल्याचे भाव, ओठांवर स्मितहास्याची लकेर, डोळ्यांत चमक! धुराची ती वलयं त्याच्या चेहऱ्यापासून फार फार तर हातभराच्या अंतरावर तरंगत होती आणि हवेत हळूहळू विरत होती. त्या वलयांच्या रिंगणांतून दूरवर चांदण्या चंदेरी प्रकाश उधळत होत्या. त्याच्या मनात फक्त आनंदाचा मुक्त संचार वाहत होता. धुराची वलयं वर वर आकाशात जाऊ लागली. आकाशातल्या त्या चांदण्याही दूर दूर जाऊ लागल्या. डोळ्यांच्या १३५ अंशाच्या कोणाच्या प्रसारात दिसणारं सगळं आकाश त्यातल्या ग्रह ताऱ्यांसकट घड्याळकटयाच्या विरुद्ध दिशेने गोलाकार फिरू लागलं. पाठीवर लेटला असूनही त्याला फिरणाऱ्या आकाशाने ग्लानी येऊ लागली. डोकं जड झालं आणि सभोवतालचं भान हरवू लागलं.
सताड उघड्या डोळ्यांनी आकाशातून वेढे घातलेला एक साप त्याच्या कडे झेपावतांना त्याला दिसला तसं त्याच्या मनात भीतीची धडकी भरली. किंचाळण्यासाठी त्याने तोंड उघडलं पण तोंडातून एक शब्दही निघाला नाही. फक्त तोंड आ वासून तो घटनेकडे बघू लागला.
साप जबडा फाडून धप्पकन त्याच्या छाताडावर आदळला. त्याच्या भाराने सुंदर ची छाती दबून गेली आणि नाकातोंडातून श्वास शरीरात प्रवेश करीनासा झाला. मिळेल तेव्हढा प्राणवायू घेण्यासाठी तो तडफडू लागला. छातीच्या हेलकाव्यासोबत त्यावर बसलेला साप वर-खाली होऊ लागला. श्वासोच्छवासाच्या हालचालीने चेतून त्या सापाने मोठ्याने फुत्कार मारला. फुत्काराने निघालेल्या विषमय लाळेने सुंदरच्या डोळ्यात प्रवेश करून दाह करायला सुरुवात केला तसा त्या आगीने सुंदर तडफडू लागला. सापाने जीभ काढून सुंदरच्या तोंडावर फटका मारला आणि पुढल्याच क्षणी सुंदरच्या तोंडात त्याने प्रवेश केला. “आ … आ” करत सुंदर तडफडला पण त्याचं संपूर्ण शरीर ताठरलं होतं. सापाची शेपूट आत सरकताच त्याचं तोंड बंद झालं आणि लगेच किंचित वर उडत पाठीवरून तो पोटावर पलटला. मान उंच करून त्याने तोंड खाली आपटलं आणि सापासारखे वेडेवाकडे अंगविकृत करत तो सपाट्याने मार्ग मिळेल तिकडे फिरू लागला. छताला पडलेल्या छोट्याश्या भगदाडात घुसून तो खाली पडला आणि वाड्याच्या मागच्या दिशेने सरपटत पाला-पाचोळ्याने स्वतःला झाकून तो लपून गेला.
शोध: रात्रीचे ११.३०
पोलिसांच्या तीन तुकड्या पोलिसलाईन मधून निघाल्या. एक तुकडी शहरभर शोधमोहिमेला लागली. तिच्या हाती काही लागणारच नव्हतं. दुसरी तुकडी नूतन अँग्लो शाळेच्या मार्गे निमकर वाड्याकडे निघाली पण तिच्या हातीही निराशाच लागली. तिसरी तुकडी मुख्य रस्त्याच्या मार्गे गोल-बाजारातून निमकर वाड्याजवळ पोचली.
टॉर्च आणि मशालींच्या उजेडात पोलिसांनी वाड्याच्या आवारात प्रवेश केला. डावीकडच्या पिंपळाच्या झाडाला त्यांना अंत्या उलटा लटकलेला दिसला. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती, उलटा लटकून असल्याने मस्तकाकडे आंतरिक अतिरिक्त रक्तप्रवाह वाढला होतं. डोळ्यांतून रक्त ठिबकायला लागलं होतं. तळहात मनगटापासून दुमडून गेले होते. अंगावरच्या कपड्यांवर घाण चिकटलेली होती आणि त्याच्या अंगातून घाणीचा वास येत होता. बेशुद्धावस्थेत त्याला खाली उतरवल्या गेलं.
वाड्याच्या मागच्या बाजूला सुंदर पाला-पाचोळ्याच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपून पहुडलेलेला आढळला. त्याच्या अंगावर खरचटल्याच्या खुणा होत्या आणि अंग थंडगार पडलं होतं. कपडे फाटलेले होते आणि नाका-तोंडातून रक्तप्रवाह होत होता. त्यालाही बेशुद्धावस्थेत पोलिसांनी शोधून काढून वाड्याच्या बाहेर काढलं.
मणिकांत ओढ्यात पडला असावा असा तर्क लावून रात्रीच ओढ्यात शोधकार्य सुरु केलं. त्याचा छिन्नविछिन्न झालेला देह शेवटी पिशाच्चाच्या दगडाच्या खोपटाशेजारी झाडाच्या मुळांत अडकलेला आढळला. नशिबाने त्याच्या जीव वाचला असला तरी त्याला झालेल्या जखमा गंभीर होत्या.
अंत
तिघांनाही तातडीने सरकारी दवाखान्यात भरती केलं गेलं. आठवड्याभरानंतर तिघांनाही शुद्ध आली तरी त्यांना बोलतं व्हायला महिनाभर लागला. त्यानंतर दोन महिने असंबद्ध बडबड करत त्यांनी झालेली घटना पोलिसांना सांगितली. अधिक तपासात दुबेला अमली पदार्थ विकण्याच्या गंभीर आरोपात तुरुंगात धाडल्या गेलं. पण बाकी सगळ्या गोष्टी अतर्क्यच राहिल्या.
दवाखान्यातून घरी आल्यानंतर पोरांना बरं करण्यासाठी वाट्टेल ते करू म्हणणाऱ्या त्यांच्या आयांना बारदाने म्हाताऱ्याने कसलातरी काढा त्यांना पाजायला सांगितला. वाड्यातल्या प्रकारच्या तीन महिन्यानंतर ती तिघंही बरी झाली. झालेला प्रकारचा विसर पडण्यासाठी तिन्ही कुटुंब वर्धा शहर सोडून इतरत्रः स्थायिक झाली.
नूतन अँग्लो शाळा ते निमकर वाडा मार्गावरची बरीच झाडं तोडण्यात आली. निमकर वाडा धोक्याचा म्हणून जाहीर करण्यात येऊन कालांतराने पाडण्यात आला. ओढ्यात ठिकठिकाणी भर टाकून आणि त्यावर पूल आणि ये-जा करण्यासाठी रस्ते बांधण्यात आले. झालेली घटना हळूहळू निवासितांच्या विस्मृतीत गेली.
साल २०२० , १९ एप्रिल, रात्रीचे १०.४५
गोलबाजारापासून १५ पैदल मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नाल्याच्या कठड्यावर कुणीतरी उभं होतं.
“ए बैताडभोंग्या, उतर खाली.” रस्त्यावरून स्कुटरवरून जाणाऱ्या एका माणसाने त्याला हटकलं.
पुढल्याच क्षणी “धप्प” आवाज झाला. कठड्यावर आता कुणीच नव्हतं.
😮 bhayanakch…
फक्त मनोरंजनासाठी लिहिली आहे. कमेंट बद्दल धन्यवाद!