
अंदाजे वाचन वेळ : १८ मिनिटे
सायंकाळ झाली. सूर्य मावळतीला लागला आणि गावात अंधार पसरला. दाटीवाटीने वाढलेल्या वृक्षराजींने संपूर्ण गाव कुशीत घेतलं. जागोजागी खळगे पडलेल्या रस्त्यांच्या बाजूला विजेची खांबं उभारली होती, पण ती निव्वळ देखाव्यासाठी. रस्त्यावरून जायचं म्हणजे हाती विजेरी किंवा कंदील हवाच त्याशिवाय फूट दिड अंतरावर काय आहे ते सुद्धा दिसणं दुरापास्त. गावातले रहिवासीसुद्धा उजेडाविना रस्ता हरवायचे त्यामुळे अंधारात कुणी घराबाहेर शक्यतो पडायचे नाहीत.
अशातच त्या दिवशी वीज गेली. एकदा वीज गेली की तासनतास परत येणार नाही हे ठरलेलं. लगबगीनं गावातली घरं उजळली ती पणत्यांच्या मिणमिणत्या प्रकाशाने आणि टेंभ्याच्या भगभगणाऱ्या ज्योतीने.
त्या रात्री सुहास आणि त्याचे आजोबा घराच्या वऱ्हांड्यात बसले होते. औषधाच्या रिकाम्या काचेच्या बाटलीत केरोसीन तुडुंब भरलेलं. जुन्या सुती कापडाची चिंधी पीळ देऊन झाकणाच्या छिद्रातून काढून त्याची वात बनवली होती. त्या टेंभ्याच्या उजेडात गायीचं दूध काढत आजोबा बसले होते. गोठ्यात एक टेंभा आणि सुहास बसला होता तिथे वऱ्हांड्यात दुसरा टेंभा. फूट-दोन फूट अंतरावरची जमीन तेवढी दिसेल एव्हढाच प्रकाश. आजोबा गायीचं दूध काढत होते. रातकिड्यांची किर्रर्र किर्रर्र आणि पितळेच्या बादलीत दुधाच्या धारा पडण्याची चिर्रर्र चिर्रर्र हे दोनच ध्वनी एकमेकांशी लढाई करत होते. तू सरस की मी? दोन्ही आवाजांची एकमेकांवर कुरघोडी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
नारळीच्या दोऱ्यांनी विणलेल्या खाटेवर चादर न टाकताच सुहास पहुडला होता. दोरीचे बोच पाठीला, उघडया अंगाला होत असले तरी दुर्लक्ष करत काळ्याशार आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या न्याहाळण्याची मजा परत त्याला कधी मिळणार? म्हणून तो ते सगळं सौंदर्य डोळ्यांत भरून घेत होता. रविवारी सकाळ होताच त्याला वर्ध्याला परतायचं होतं.
आजी शेजारणीकडे काहीतरी कामानिमित्त गेली होती. ती जाऊन साधारण अर्धा तास झाला होता. पोटात भुकेने ओरडणाऱ्या कावळ्यांना शमवण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागणार होता. ताकाचं पिठलं, ज्वारीची भाकरी आणि लाल मिरचीचा खर्डा असला बेत असणार होता. कित्येक वर्षांनी आजीच्या हातचा असला बेत खायला मिळणार तर थोडी कळ सोसायचीच म्हणून आकाशातल्या चांदण्या मोजण्याशिवाय त्याच्याकडे दुसरं कसलंही काम नव्हतं. आजोबा दूध काढत असतांना बोललं तर गाय दचकेल म्हणून त्यांच्याशीही तो बोलू शकत नव्हता. ह्या गायींचंही मोठं विचित्र काम होतं. जरा कुठे खुट्ट झालं की लगेच दूध चोरणार आणि मग कितीही विनंत्या करा परत दुधाची धार मोकळी होणारच नाही. मग वासरू पान्ह्याला लावलं की ते तिचं दूध संपेपर्यंत पिणार. त्याची मौज व्हायची आणि आजोबांची चीड चीड. मग सकाळसाठी चहाला दूध कमी पडायचं आणि आजोबांना घट्ट दुधाचा चहा नसला की झालं… सकाळची मध्यान्ह होईपर्यंत चीड चीड करून आज्जीला डोक्याला ताप देणार.
उन्हाळा या वर्षी कडक होता. पण सायंकाळपासून रात्र आणि सकाळ होईपर्यंत गावात गार वारा फिरायचा. त्यामुळे दिवसभर काहिली झालेला जीव सायंकाळची वाट बघायचा. वाऱ्याच्या झोतांनी वाहायला सुरुवात केली आणि झुळुकेने सुहासच्या पापण्यांवर हळुवार फुंकर घालायला सुरुवात केली. आधीच चांदणे मोजता मोजता त्याचा मेंदू शिणला होता आणि आता गार वारा सोबतीला निद्रादेवीला पाचारण करत होता. गावालगतच्या वृक्षांतून, फांद्याफांद्यांतून झुळूझुळू वाहणारा वारा वाढीस लागला होता आणि अर्ध्याअधिक उघड्या बोडक्या पडलेल्या झाडांच्या फांद्यांतून “सूं… सूं…” आवाज वाहू लागला.
धारेची चुर्रर्र चुर्रर्र ध्वनी अजूनही सुहासच्या कानी पडत होती पण धीमे धीमे. अर्धोन्मीलित डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला आणि निद्रेच्या खोल गर्तेत तो जाऊ लागला.
“सु … हा… स… S S S … सु … हा… स… S S S …” त्याने डोळे किलकिलत उघडले. समोरच घराच्या वऱ्हांड्याच्या भिंतीत बसवलेल्या दाराकडे त्याने बघितलं. आजी आली असेल. आजीच आवाज देत असेल म्हणून तो डोळे चोळत उठला. पाय खाटेखाली टेकवले. पायात हळूच पादत्राणं सरकवली आणि खाटेवरून हलकेच उठला. परत त्याला आजीने आवाज दिला, “सु … हा… स… S S S … सु … हा… स… S S S …” आजीला फारच घाई झालेली दिसतेय. जोरात आवाज ऐकून गाय दचकून दूध चोरणार म्हणून कदाचित आजी हळू आवाजात आपल्याला बोलावत असेल असा विचार त्याच्या डोक्यात आला. हळू हळू तो वऱ्हांड्याच्या भिंतीच्या दारापाशी पोचला. कडीला हात लावणार तोच आजोबा ओरडले, “ए पोरा. बाहेर कुठं चाल्ला बे? रात झाली. अंधार झाला. समजत नाही का तुले?”
सुहासने वळून बघितलं. आजोबाने उंबरठ्यापाशी दुधाने भरलेली बकेट ठेवली होती. गायीचं वासरू तिला ठोसे मारत होतं आणि गाय निवांत कडबा खात होती.
“दूध झालं काढून? मला वाटलं गाय बुजाडेन म्हणून आजीनं हळूच हाक मारली असेल.” त्याने कडीला हात लावला.
“थांब पोट्ट्या! बुडी तर केव्हाचीच घरी आली आहे. तुले कुठून आवाज आयकू आला.” कडी अडकणीतून निघणार तोच आजोबा आश्चर्याने ओरडले. एक दोन पाऊलं समोर टाकले आणि परत म्हणाले, “कडी नको काढू.”
सुहास तिथेच थबकला. आजोबा अचानक असे का म्हणत आहेत त्याला समजलं नाही.
“तुले काय… कसा आवाज आला म्हणतो?” आजोबा टेंभा घेऊन समोर चालत आले.
“आजी आवाज देते तसा. सु… हा… स…” स्वतःचं नाव एक एक अक्षर उच्चारून तो म्हणाला.
“थांब! दरवाजा नको उघडू.” काहीश्या चिंतेच्या सुरत आजोबांनी म्हंटलं. डावा पाय मागे दुमटुन त्यांनी डाव्या हाताने चामड्याची चप्पल हाती धरली. “विचार कोण आहे ते. जोरात विचार.” ते जोरात ओरडले.
सुहास बुचकाळ्यात पडला. त्याने आजीचाच आवाज ऐकला होता. आजोबा असं का म्हणत आहेत त्याला समजेना. “कोण आहे?” तरीही मोठा आवाज चढवून त्यानं विचारलं.
क्षण… दोन क्षण गेले. प्रत्युत्तर आलं नाही.
“परत विचार.” आजोबा म्हणाले.
सुहास ने परत एकदा “कोण आहे?” विचारलं, या वेळी आणखी मोठ्यानं.
प्रत्युत्तर नाहीच.
आजोबांनी हाती धरलेली चप्पल सरळ दरवाज्याला बसेल अशी वेगाने फेकली. सुहासच्या नाकापासून दोन इंच दुरून हवेला कापत सर्र्कन ती दरवाज्याला बसली. त्यासरशी फट्टकन आवाज निघाला आणि सुहासचे कान वाजले. “ओ… वाचलो! आजोबा. काय हे?” तो जोराने ओरडला.
“हाव. वाचलाच तू. हट्ट तिथून.” आजोबा ओरडत तिथवर पोचले. दरवाज्याकडे तोंड करून ओरडले, “कोण हाये तू? लौकर सांग नाही तं भग इथून.”
ते असे का वागत होते त्याला समजेच ना. “काय झालं?”
“चल पळ इथून…” त्यांनी खाली पडलेली चप्पल उचलली आणि तीनदा दरवाज्यावर दन्न दन्न वाजवली. काही आवाज आला नाही.
“चल परत घरात चल. आणि असा काही आवाज दिला तरी दरवाजा उघडायचा नाही. कोण आहे ह्याचं उत्तर आल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही.” आजोबाचा स्वर काहीसा समजावणीचा, काहीसा काळजीचा आणि काहीसा रागाचा होता.
“काय झालं? सांगाल तरी.” सुहासनं त्यांना विचारलं.
पायात चप्पल सरकवत त्यांनी सांगितलं, “गावात एक फसवी लावडीन आहे. ती भुलवून नेते पोरा-पोरींना आणि डोहात नेऊन डुबवते. फसवे आवाज काढते आणि घेऊन जाते तंद्रीत टाकून.”
“ह्या… काहीही. अंधश्रद्धा.” सुभाषनं वरवर हसत म्हंटलं. गावातल्या भुताखेतांच्या आणि वेताळाच्या गोष्टी लहानपणापासून तो ऐकत होता. त्याला अशा गोष्टी ऐकायला मजा यायची. लहानपणी घाबरायचा तरी परत परत त्याच त्या गोष्टी ऐकायचा. त्या वेळी आजूबाजूला त्याच्या वयाची बरीच लहान मोठी मुलं असल्या गप्पा गोष्टी हाकाटून एकमेकांना घाबरवायची. आता त्याचा विश्वास नसला तरी मनात या गोष्टी लहानपणीच्या आठवणी म्हणून अगदी घट्ट बसल्या होत्या. इतक्या की आत्ताही त्या आठवणींनी अंगावर काटा उभा राहायचा. आता फरक फक्त एव्हढाच होता की वयानं वाढल्यानं आणि बारावीत विज्ञान विषय घेतल्यानं, सायन्स रिपोर्टर आणि मानसशास्त्राची पुस्तकं छंद जोपासावा म्हणून वाचल्यानं त्याला ह्या गोष्टी केवळ मनोरंजनासाठी थरार अनुभवण्याची थिल्लर साधनं वाटायची.
“असं. आंगावर आलं म्हणजे समजते. चाल घरात.” आजोबांनी त्याचा गमतीनं कान पिरगाळला आणि ती दोघं दरवाज्याकडे पाठ करून वळली. समोर आजी उंबरठ्यावर दुधाची बकेट उचलत असतांना दिसली.
“तो आवाज, ती हाक, ती साद … कुणाची होती? की मनाचा खेळ, एक भास असेल? की आजोबा म्हणत आहेत तशी काही लावडीन खरंच असेल?” त्याच्या मनात विचार उमटला आणि लहानपणी व्हायचे तसे अंगावरचे केसं उभे राहिले.
आजीनं रात्रीचा पिठलं भाकरीचा सैपाक तयार केला. अंगणात दोघांसाठी स्टूल वर ताटं थाटली. खुर्च्या मांडल्या आणि कंदिलाच्या उजेडात रात्रीचं जेवण सुरु झालं. सैपाकघरातून आजी मधामधात वाढणं करायला परतत होती. काय हवं नको ते विचारात होती. दरम्यान आजोबा आणि सुहासच्या गप्पा सुरु होत्या. गावात बरेच बदल होत होते. रात्रीची वीज मात्र न चुकता रोज जायची. गावाची वेस पूर्वीपेक्षा कितीतरी वाढली होती. जनसंख्या वाढली होती. सुहासच्या लहानपणीच्या आठवणी आणि नातलगांच्या आठवणी निघाल्या. गप्पांचा ओघ एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे वाहत गेला.
सुहासला त्याला ऐकू आलेल्या सादेबद्दल ऐकायचं होतं. हात धुता धुता त्यानं विषय काढला. तोवर आजी अंगणात आली होती. आजोबांनी विषयाला सुरुवात केली.
असं म्हणतात की गावात अतिमानवीय शक्तीचा वावर आहे. काही लोकं तिला लावडीन म्हणतात तर काही तिचं नावच घेत नाहीत. गावातल्या दंतकथांमधलं हे एक पात्र. हिची नेमकी उत्पत्ती केव्हांची ते कुणाला पक्कं ठाऊक नाही पण कित्येक पिढ्यांपासून हिच्या गोष्टी गावात ऐकिवात येतात. तिचा छळवाद किंवा बाधा कधी कुणाला कशी होईल ते सांगता येणार नाही. त्याचा अंदाज बांधता येणार नाही. पण तिचं अस्तित्त्व तिने ठार मारलेल्या रहिवाश्यांचे जवळचे नातेवाईक सांगतात. तिच्या बद्दलचे बरेच अनुभव काल्पनिकतेची सरमिसळ हत्येच्या घटनेत केल्याने खोटे वाटत असले तरी गावातली जाणती म्हातारी माणसं तिच्या असण्याबद्दल ठाम मताची आहेत. गावात अंधार पडायला लागला की गावाची वेस बंद करण्यात येते. आता गावात रस्त्यांच्या कडेने दिवाबत्ती केलेली असली तरी सायंकाळी ८ नंतर कुणीच घराबाहेर पडत नाहीत. बाहेरगावाहून परतणारे आदल्या गावीच रात्रीची राहण्याची सोय करतात. गुडूप अंधारात जिथे फूट दिड फूट अंतरावरचं मानवी डोळ्यांना दिसत नाही तिथे हिने झपाटलेली बाई-माणूस झपाझप पाऊलं टाकत समोर जात राहतो आणि त्याच्या प्रेत दुसऱ्या दिवशी नदी-काठच्या झाडाझुडूपात चिरफाड केलेलं आढळतं.
आजोबा जशी जशी गोष्ट सांगत होते तशी तशी सुहासच्या मनात ह्या अति मानवी प्रकाराबद्दल उत्सुकता जागी होत गेली. ह्या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी असल्या तरी ऐकायला सुरस आणि मनोरंजनासाठी चमत्कारिक होत्या. मानसशास्त्राच्या पुस्तकांत असल्या घटनांचा संदर्भ त्याने फार आधी वाचला होता. कधीतरी कुणीतरी अगदी ठामपणे असल्या अति मानवी शक्तीचा विचार करतो. एखादा मानसिकदृष्ट्या सबळ असणारा व्यक्ती कुण्या मानसिक तोल दोलायमान असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येतो. त्याच्या वागण्या-बोलण्यातून, त्याला होत असलेल्या संभ्रमाचं विस्तारण आणि प्रसारण ह्या निरोगी, सामान्य माणसाच्या मेंदूत होतं आणि त्याचा मेंदू समांतर भ्रमाचं जाळं विणायला सुरुवात करतं. हा सामान्य व्यक्ती मग त्या मानसिकरित्या अस्थिर असणाऱ्या व्यक्तीचे विचार, भ्रम आणि संकल्पना आत्मसात करतो. एकदा का ती संकल्पना ह्या निरोगी मेंदूत ठाण मांडून बसली की मग हळूहळू निरनिराळ्या मार्गाने कल्पकतेने तिचं प्रसारण इतरांमध्ये करायला त्याला चेतना देते. एका पासून दुसऱ्याकडे ती संकल्पना वाढीस लागते. मूळ धरते आणि फोफावत जाते. त्यातच काही घटना अशा घडतात की त्याचा संबंध असल्या संकल्पनांना लावल्या जातो आणि असल्या संकल्पनाच अति मानवीय प्रकार जन्माला घालतो. पण हे सगळं इतक्या सहज सहजी घडत नाही. मनुष्यप्राणी विचार करतो, प्रश्न करतो आणि असल्या घटनांचं उत्तर शोधून काढतो. केवळ दुर्बल मेंदूच असल्या संकल्पनांना खरं मानतो. पिढ्यानपिढ्या ऐकीव गोष्टींचा उहापोह करण्याच्या गावातली लोकं काय प्रयत्न करत असतील? असा विचार सुहासच्या मनात सुरु होता.
“कायले त्याले भेवाडून ऱ्हायले जी तुम्ही?” आजी आजोबांना जरासं दटावतच म्हणाली आणि सुहासकडे बघून काळजीच्या सुरात म्हणाली, “तू जास्त विचार नको करू. रातीचा भाईर नको निंघू म्हंजे झालं.” त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि स्टूलावरचं सावरासावर करू लागली.
“मी कायले त्याले भेवाडतो? त्याले मालूम पाहिजे. आज त्याले आवाज आला ऐकू म्हणे. त्याले वाटलं का तूच व्हय तं गेल्ता दरवाजा उघडाले.” आजोबा म्हातारीवर डाफरले. “लहान होता तवा राधाच्या वक्ताले होता न तो गावात. त्याले बी तं आवाज आला होता तवा आयकू.”
“काय म्हंता? थांबा बाप्पा येतो मी.” आजीच्या स्वरात कसलीशी भीती होती. ती लगबगीनं घरात गेली. आजी अंगणात परतली ती धुपाटणं घेऊन. तिनं सुहासच्या अंगावरून तीनदा आलटून पालटून ओवाळलं आणि काही तरी पुटपुटत धुपाटणं अंगणभर फिरवलं. सगळीकडे धूरच धूर झाला. “बाबू, तुला हाक आली तरी दरवाजा नको उघडू सोन्या. तू, आजोबा अन मी आपल्या तिघांशिवाय कुणीच आपल्या घरी येणार नाही. अन रात्री घरातच झोप.” तिनं असं म्हणत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्वतःच्या कानपाळीशी नेवून बोटं कडाकडा मोडली. आतून काडी कुलूप लावून ती तिघं घरातच झोपली.
सुहास च्या डोक्यात ती बारा वर्षांआधीची घटना अस्पष्टशी घोळत होती. राधा सुहासच्या आजोळच्या घराशेजारीच तिच्या आई-वडिलांसोबत राहायची. सुहास आणि राधा दोघंही तेव्हा बरेच लहान होते. एखाद दोन वर्षांनी राधा सुहासपेक्षा मोठी होती. उन्हाळ्याच्या एका सायंकाळी ती दोघंही अंगणात खेळत होती.
नेहमीप्रमाणे खेळात बसलेले म्हणून काही नं काही कामं करायला त्यांच्या आया-आज्या घरात गेले. राधाच्या घरच्या अंगणात दोघं खेळत होते. नेहमीप्रमाणे वीज गेली पण काही क्षणांसाठीच. पोरं घाबरतील म्हणून राधाची आई लगबगीनं अंगणात आली. वीज परतली तेव्हा राधा अंगणातून दिसेनाशी झाली होती. सैरभैर झालेली तिची आई तिला जीवाच्या आकांतानं आवाज देऊ लागली. आरडा-ओरडा ऐकून शेजारी-पाजारी जमा झाली. सुहास पाचेक वर्षांचा असेल. त्या वेळी ती दोघंच होती म्हणून सहाजिकच पहिली विचारपूस त्याच्याकडेच झाली. भोवतीच्या गोंधळाने बावचळलेला सुहास आधीच रडवेला झाला होता. रडत रडत त्याने सांगितलं होतं की “राधा… राधा… अशी मावशीची हाक आली म्हणून तिनं कुंपणाचं फाटक उघडलं.” राधाच्या आईला काही उमजेच ना. ती तर घरातच होती आणि ते त्या दोघांनाही माहिती होतं. मग राधेला हाक कुणी दिली? राधा दिसेनाशी होऊन जराच वेळ झाला होता. तिच्या लहानग्या पावलांनी ती फार दूरवर नसेलच गेली. तिची आई भोवतीच्या जमावाला न जुमानता तिच्या शोधार्थ बाहेर पडली आणि अंधारात गुडूप झाली. शेजारपाजारच्या माणसांनी काठ्या कंदीलं हाती घेतली आणि त्या दोघींना शोधायला बाहेर पडले. गावातली जाणती म्हातारी त्या हाक मारणाऱ्या लावडीनीच्या गोष्टी आपापसांत फुसफुसत होते.
रात्रभर त्या दोघींसाठी गावाच्या कानाकोपऱ्यापासून वेशीपर्यंत आणि शेता-मळ्यांपासून नदीकाठच्या जंगलापर्यंत शोधकार्य सुरु होतं. चिखलाने माखलेली राधा नदीच्याकाठी भेदरलेल्या अवस्थेत सापडली. तिच्या अंगभर ओरबाडल्याच्या खुणा होत्या. तिची आई दहा-बारा फुटांवर मृतावस्थेत आढळली होती. तिच्याही अंगावरही ओरबाडल्याच्या खुणा होत्या. अंगावरच्या जखमांतून वाहणारं रक्त साकळलं होतं. अवयवांची चिरफाड झालेली होती आणि भोवताली रक्ताचा चिखल साचला होता. त्या दोघींनाही गावात आणल्या गेलं.
कुणी म्हणे तिला लावडीनीनं त्या रात्री बाधलं. सुहासच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा तर तिच्या आईच्या हाकेच्या साद घातली आणि तिला भुलवलं. तिच्या आईनं त्या लावडीनीला पोरीच्या जीवाच्या बदल्यात स्वतःचा जीव बळी देऊ केला. कुणी म्हणे जंगलात एखाद्या प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि राधेला वाचवण्यासाठी तिची आई लढली आणि प्राणांतिक जखमांनी मेली. तरी राधा त्या रात्री अंगणातून का बाहेर पडली त्याचं नेमकं उत्तर कुणाकडेच नव्हतं. शेवटी एखादी अति मानवी शक्तीचा हा खेळ आहे अशा समजुतीत या घटनेवर तात्पुरता पडदा पडला.
त्या रात्री नेमकं काय घडलं ते दोघींनाच ठाऊक. त्यापैकी तिची आई वारली. राधा त्या रात्रीच्या घटनेच्या धक्क्यातून पुढे कधीच सावरली नाही. राधा त्या दिवसानंतर भ्रमिष्टासारखी झाली. केकाळात हसायची आणि क्षणात रडायची. भूक तहान एखाद्या जंगली श्वापदासारखी भागवायची. औषधं झाली. झाड फुंक झाली. मांत्रिकांचा उपचार झाला. पण कशाचा गुण लागला नाही. गावभर ती वेड्यागत फिरायची. तिला तिच्या नशिबावर सोडून देण्यात आलं. तिची काळजी घ्यायला, खाऊ पिऊ घालायला, राहण्यासाठी आणि अंगावरच्या कपड्यांसाठी तिची म्हातारी विधवा आजी तेव्हढी त्या घरात तिच्यासाठी गावात राहिली. तिचे वडील गाव सोडून इतरत्र स्थायिक झाले.
पुढे आणखीही काही प्रसंगी नदीकाठी छिन्नविछिन्न झालेली प्रेतं आढळली. त्या प्रकारांचा साक्षीदार कुणीच सापडलं नव्हतं आणि गावातल्या लोकांनी या प्रकारांचा कर्ता कुण्या अमानवी शक्ती आहे ह्यावर एकमत केलं. अंधार पडण्याआधी घरी यायचं. त्यानंतर काहीही झालं तरी घराबाहेर पडायचं नाही असा शिरस्ता पडला.
“सु … हा… स… S S S … सु … हा… स… S S S …”
मध्यरात्री तीच साद त्याला परत ऐकू आली. कुणीतरी काकुळतीने त्याला बोलावत असल्याची ती आर्त साद होती. अर्धनिद्रावस्थेत तो जागा झाला. खोलीच्या कोपऱ्यातली पणती मिणमिणती होती. डोळे चोळत तो सतरंजीवर उठून बसला. शेजारी आजोबा आणि दारापाशी आजी गाढ झोपेत होती. कदाचित भ्रम असेल, मध्यरात्री झोप तुटली असेल म्हणून त्याने पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. दोन तीन मिनिटं शांततेत गेली आणि परत तीच साद ऐकू आली. यावेळी आणखी काकुळतीने त्या आवाजाने हाक मारली.
सुहासच्या डोक्यात सायंकाळी अंगणात झालेल्या गोष्टी परत फिरत होत्या. हळूहळू त्याची हृदयाची धडधड वाढीस लागली. श्वास-उच्छवास वेगाने होऊ लागला. कवटीत ती हाक, ती साद कानावाटे आत शिरली आणि कवटीच्या भिंतींवरून उसळून मेंदू छेदू लागली.
“सु … हा… स… S S S … सु … हा… स… S S S …”
त्याने डोकं धरलं. मानसशास्त्राच्या पुस्तकात वाचलं होतं की अर्धनिद्रावस्थेत संभ्रम होऊ शकतो. काही जणं झोपेत बडबडतात. काही जणं झोपेत चालतात. सामूहिक संमोहन… अस्थीपिंजर… भौतिकाची परीक्षा… दंगेखोर पोरांनी बेशरमाच्या ओल्या काडीनं पाठीवर सूड ओढणं… हिंदीच्या मास्तरीननं शिव्या देणं… धावत्या बसच्या टायरखाली कुत्रं चिरडलं जाणं… सापाचं फुत्कारणं…
हळूहळू असंबद्ध आठवणी त्याच्या मेंदूत जाग्या झाल्या. हृदयाची धडाधड आता हृदय स्फोट करून विलीन होणार. तीव्र श्वासोच्छवासाने त्याच्या मेंदूत झिणझिण्या आणल्या.
तो सतरंजीवरून उठला. झपाझप पाऊलं टाकत दारापाशी आला. कडीला लावलेल्या कुलुपाला मुठीत धरलं आणि दाबलं. कुलूप तुटलं. कडी अडकणीतून काढली. दरवाजा उघडला आणि उंबरठा ओलांडून तो अंगणात आला. उंबरठ्यापासून आवाराच्या दारापर्यंत झपाझप पाऊलं उचलीत गेला. आवाराचा दरवाजा उघडला आणि पायऱ्या उतरून त्या सादेच्या दिशेनं जाऊ लागला.
एका अनामिक ओढीनं तो भारला होता. गुडूप काळ्या भोर अंधारात एक फूट अंतरावरचंही जिथं काही दिसत नव्हतं तिथं तो अनवाणी पायांनी चालत होता. रातकिड्यांची किर्रर्र किर्रर्र वाढीस लागली होती. रस्ता सोडून तो काट्या झुडुपांतून जाऊ लागला. तळपायाला दगडं-खडे बोचू लागले होते. अंगावरच्या कापडांना झाडी-झुडुपांनी ओरबाडून फाडलं. त्वचेला झुडुपाच्या फांद्या काटे घासून जाऊ लागले, ओरबाडून काढू लागले.
“सु … हा… स… S S S … सु … हा… स… S S S …”
त्या सादेची दिशा शोधत तो जसा जसा समोर जाऊ लागला तस तशी ती साद त्याला आणखी दूरवर घेऊन जाऊ लागली. ती ओढ आणखी प्रबळ होती गेली. भोवताली काय घडत आहे याचं त्याला भान होतं. आपण चालत जातो आहोत हे ही त्याला ठाऊक होतं. पायांच्या पोटऱ्या दमल्या, शिणल्या होत्या. पाय दुखत होते. शेतं ओलांडून तो नदीच्या दिशेनं जंगलात जाऊ लागला. ओलाव्याने वातावरणात थंडी वाढली होती. हुडहुडीनं अंगात कापरं भरलं. कितीतरी वेळ तो नुसता चालत होता.
अंगाला गार वारा झोंबतोय, अंगावर शहरे येताय, कपडे फाटत आहेत, काटे बोचत आहेत, अंगावरच्या झाड झुडुपांनी, काट्यांनी बोचलेल्या त्वचेतून रक्त बाहेर पडत आहे हे सगळं जाणवत असूनही तो त्या सादेच्या प्रभावाला आवर घालू शकत नव्हता. सभोवतालचं भान असूनही तो त्या भुलवणीच्या सादेच्या जाळ्यात गुरफटला होता. त्यातून तो बाहेर पडू शकत नव्हता.
कदाचित हे सगळं स्वप्न असेल. हा भ्रम असेल. असं कुठेतरी त्याला वाटत होतं. कदाचित ही तीच अमानवी शक्ती, लावडीन असेल. पण घडत होतं ते प्रत्यक्ष की संभ्रम ह्याचा फरक करणं त्याला साध्य होती नव्हतं. मेंदूत अंतर्गत द्वंद्व सुरु होतं. वैज्ञानिक विचारसरणी आणि मानसशास्त्राचं आतापर्यंतचं वरवरचं का असेना मिळवलेलं ज्ञान त्याला घडणाऱ्या परिस्थितीचं आकलन करायला लावत होती. उत्तर त्याला सापडत नव्हतं आणि या भ्रमातून तो सुटू शकत नव्हता. जस जसा वेळ जाऊ लागला तस तसा तो या गुंतीत आणखी अडकत जाऊ लागला.
जंगल जिथे नदीजवळ भेटतं तिथल्या वाढलेल्या गवत धांड्यांच्या बनात सुहास पोचला. त्याच्या पायाच्या घोट्यापर्यंत चिखल गाळ माखला होता. चिखल तुडवत तो बनात आतपर्यंत गेला. गाळात एक एक पाऊल सावकाश टाकत टोंगळ्यापर्यंत फसेपर्यंत तो सरकत गेला. गाळात टोंगळ्यापर्यंत तो धसाला होता. हालचाल करून निघणं त्याच्यासारख्याला शक्य नव्हतं. हवेच्या गार झुळुकांसोबत त्याचा नावाची साद त्याच्या कानापर्यँत पोचली. त्याच्या नावाचं एक एक अक्षर स्पष्टपणे उच्चारल्या गेल्याचं त्याला जाणवलं. ही शेवटचीच साद! त्यानंतर ऐकू आला तो या निर्जन, निर्मनुष्य स्थळी खदखदून हसण्याचा कलकलाट.
घुबडांचे घुत्कार आसमंती घुमले आणि कुठूनतरी हुप्प्यानं चित्कार फोडला. फांद्यांवरून सरसर सरकत केकाटत माकडांची टोळी तिथून भीतीनं पसार झाली. वाढलेल्या गवताचे धांडे सळसळले. कलकल हसण्याचा आवाज समीप येऊ लागला. हळू हळू हसण्याचा आवाज अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला. सुहासनं आढावा घेण्यासाठी मान इकडे तिकडे फिरवली. अंधारात कंच्यांयेव्हढे गोळे लक्ककन चमकले आणि अंधारात हरवले. परत एकदा हसण्याचा आवाज आला. या वेळी त्याची खिल्ली उडवण्यासाठी. भीतीनं त्याचा चेहरा पांढरा फटक पडला.
त्यानंतर घोघरा गुरगुरण्याचा ध्वनी ऐकू आला आणि सुहास जागीच गारठला. भीतीची लहर अंगातून गेली. तो ना तर पळून जाऊ शकत होता किंवा ना लढू शकत होता. अजूनही त्याच्या अंतरंगात भ्रम-संभ्रमाचं आणि दृग्गोचर सत्याचं द्वंद्व सुरूच होतं. शारीरिकदृष्ट्या भीतीनं तो गलितगात्र झाला. अंगापायातली शक्ती नाहीशी झाल्याचं त्याला जाणवलं. पुढल्या क्षणी मृत्यू कोणत्या रूपात समोर येणार याचा अंदाज येत नव्हता. हसण्याच्या आवाजासोबत गुरगुरीचा आवाजही वाढीस लागला आणि गवताच्या सळसळीतून एक धड बाहेर पडलं आणि त्याने सुहासवर झेप घेतली. त्या आकाराने सुहासच्या मांडीचा लचका घेतला.
सुहासनं वेदनेनं आरोळी फोडली. रात्रीची शांतता भेदून त्याची आरोळी जंगलात घुमली. वेदनेनं तो विव्हळला. त्या आकाराने परत एकदा कडाडून चावा घेतला तसा तो जीवाच्या आकांतानं आणखी जोरात ओरडला. काडडकन आवाज येऊन मांडीचं हाड तुटलं असण्याची जाणीव झाली. रक्ताचा पाट त्याच्या मांडीतून वाहू लागला. चिखलात रक्त मिसळू लागलं. त्या आकृतीतून निघणारी भयावह भेसूर गुरगुर क्षणोक्षणी वाढतच होती. त्यानं विव्हळून मान आजूबाजूला फिरवली. मोकळे असलेले हात त्या आकृतीला मारण्या-ढकलण्यासाठी फिरवले पण त्या शक्तीशी लढण्यात त्याचे प्रयत्न तोकडे पडत होते. विव्हळून त्याने वर आकाशाकडे बघितलं. दोन चमकत्या लाल डोळ्यांतून, जीभ लपलप करत ती त्याच्याकडे बघत होती.
“लावडीन!” क्षणात त्याच्या अवचेतन मनानं उत्तर दिलं. त्याच्या मनातली भीती वाढीस लागली तस तशी त्या लावडीनीचा आकार, रुप त्याच्या डोळ्यांसमोर आरेखत स्पष्ट होत गेलं.
दिसायला ही मानवी आकाराची असली तरी विकृत तोंडावळ्याची आणि पिचलेल्या अंगाची होती. खाली जमिनीकडे मुंडकं आणि वरती आकाशाकडे पाय करून हवेत कधी विरत, कधी दृष्य होत ती सुहासच्या माथ्यावर अधांतरी अवकाशात तरंगत होती. त्याच्या डोळ्यांशी भिडंत होताच तिनं दात विचकवले. अंधारातही तिचे चकाकीत पांढरे सुळ्यांसारखे दात झळाळले. तोंड वासून तिनं लपापणारी जीभ त्याच्या चेहऱ्यावरून फिरवली. वर्षोनुवर्षे अतृप्त तहान भूक भागवण्याची तिची आस कदाचित आज पूर्ण होणार होती. कित्येक रात्रींनंतर हे मानवी सावज तिला सापडलं होतं.
त्याचा श्वासोच्छवास अनियंत्रित गतीनं वाढला. हृदयाची स्पंदनं तीव्र झाली. अंगाच्या रंध्रारंध्रांतून दरादरा घामाचा पाझर फुटला. अंग थरथरायला लागलं. धमन्यांतून रक्त सळसळून वाहायला सुरुवात झाली. रक्तचाप वाढू लागला. क्रत्कपं धडाडू लागले.
हवेतच पलटी मारून तिनं पाय खाली घेतले. सुहासच्या डोळ्यांत डोळे रोखून तिनं तिच्या अंगातून असंख्य धाग्यांनी विणलेली जाळी काढली आणि त्याला वेष्टण घातलं. त्याच्या शरीराशी लगट करत त्याच्या अंगाला ती चिकटली. तिच्या वेष्टणाचा विळखा घट्ट होऊ लागला. तो झटपटू लागला पण त्या विळाख्यातून सुटणं काही शक्य नव्हतं.
पुढल्या प्रत्येक क्षणाला अंगातून शक्तिपात होत असल्याचा त्याला जाणवलं. अंगाभोवतीच्या त्या वेष्टणानं असंख्य सुयांनी त्याची जीवनऊर्जा शोषून घ्यायला सुरुवात केली. शरीर सुन्न व्हायला सुरुवात झाली होती. लावडीनीचं शरीर भराभर स्पष्ट व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्या तुटलेल्या मांडीवरची जबड्याची पकड आणखी घट्ट होत गेली. कंठय गुरगुरीसोबत विभत्स हसण्याचा आवाजही वाढीस लागला होता.
सुहास फक्त विव्हळू शकत होता. थकव्यानं शरीर कोलमडू लागलं होतं. डोळे मिटू लागले.
अचानक त्याच्या मांडीला झटका बसला. मांडीच्या मांसाचा तुकडा शरीरातून फाटून बाहेर पडल्याचं त्याला जाणवलं. त्याची मांडी त्या जबड्यांतून मुक्त झाली. फटका बसल्यावर कुत्रं केकाटतं तसा आवाज झाला. दुसऱ्याच क्षणी त्या लावडीनीने गुंडाळा घातलेल्या वेष्टनातूनही त्याची मुक्तता झाली. बेशुद्ध होण्याआधी राधाच्या आईचा चेहरा त्याला दिसला.
त्या रात्री कधीतरी आजोबांना जाग आली. सुहास जागेवार दिसला नाही म्हणून शेजार पाजाऱ्यांना घेऊन शोधकार्य सुरु झालं. कुणाच्यातरी सुचवण्यावरून नदीकाठी त्याचा शोध सुरु झाला. गावकऱ्यांच्या एका टोळक्याला नदीवर दूरवर अंधारात पांढरी कापडं हलताना दिसली. जवळ पोचले तेव्हा राधा सुहासला गाळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतांना दिसली.
किलकिलत त्याचे डोळे उघडले. त्या खोलीत त्याच्या शिवाय दुसरं कुणीही नव्हतं. शुद्धीवर येईपर्यंत त्याला त्रास नको म्हणून खोलीत कुणालाही थांबण्याची परवानगी नव्हती. अंगावरच्या व्रणांकडे बघत सुहासने खोलीबाहेर नजर टाकली. बेंचवर आजी आजोबा, त्याचे आई बाबा आणि गावातली काही मंडळी डॉक्टरांसोबत बोलत होती. यथावकाश त्याचे आई-वडील आणि आजी आजोबा खोलीत आले. त्याची विचारपूस झाली. काही दिवस दवाखान्यातच ठेवून नंतर त्याला घरी जाण्याची मुभा देण्यात येणार होती.
त्या रात्री काय घडलं याचं विश्लेषण सुहासच्या मनात सुरु होतं. कदाचित लहानपणी अवचेतन मनात राधेसोबत घडलेली घटना, त्या अमानवी शक्तीबद्दलच्या गोष्टी, एकूणच सारं वातावरण यामुळे सुहासच्या मनानं ती सगळी पात्रं आणि प्रसंग प्रत्यक्षात घडत आहेत असा आभास निर्माण केला. कुलूप मुठीनं तुटणं यामागे कदाचित कुलूप नीट न लागलेलं असणं किंवा जुनं कुलूप कमकुवत असणं हे कारण असू शकतं. त्याच्या मनानं कल्पना केली म्हणून प्रचंड मानसिक ताणतणावाखाली अर्धनिद्रेत तो नकळत चालतही गेला असेल. ऐकलेल्या आणि कल्पलेल्या गोष्टी आभासात खऱ्या वाटतील अशी परिस्थितीही निर्माण झाली असू शकते.
मांडीपासून तळपायापर्यंत प्लास्टर बांधलेलं त्याला दिसलं. कुण्या श्वापदानं त्याच्यावर हल्ला केला होता हे निश्चित. तरस माणसांच्या हसण्यासारखा आवाज काढतो हे त्याला माहिती होतं. कदाचित तो प्राणी तरसच असेल.
कदाचित तो बेशुद्ध होण्याआधी त्या तरसाला राधेनं हाकललं असेल. किरकोळ शरीरयष्टीच्या, वेडसर राधेनं असं काही करू शकण्याची शक्यता नव्हती. तरी त्याला नदीकाठी शोधलेल्या गावकऱ्यांनी राधा त्याला गाळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती म्हंटल्यावर एक वेळी ते मान्यही करायला सुहास तयार होता पण तिच्या अंगी एकट्याने तरसाशी झुंज देण्याची शक्ती कशी आली? किंवा त्या आकृतीनं त्याला सोडून तिथून पळ का काढला? त्या सादेचं रहस्य, त्याला दिसलेली आकृती, ते प्राणशक्ती शोषक वेष्टन यांची काही सांगड होत नव्हती. त्याचं काही आकलनानं बुद्धीला पटेल असं स्पष्टीकरण नव्हतं.
औषधांच्या गुंगीचा प्रभाव परत एकदा त्याला जाणवायला लागला. तसाही तो थकला होताच. त्याच्या घरची मंडळी त्याची काळजी घ्यायला तिथेच होती. त्याने डोळे मिटले आणि निद्रेच्या अधिन झाला.
दूरवरून त्याच्या कानी ती साद परत ऐकू आली… “सु … हा… स… S S S … सु … हा… स… S S S …”
😮😐 bappre… Bhayank..!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!