अंदाजे वाचन वेळ : ९ मिनिटे
चार महिन्यांच्या सलग प्रयत्नांती आज माझ्या हाती मोठी पर्चेस ऑर्डर आली होती. आणि ती ही विदर्भातल्या सर्वांत मोठ्या आईस्क्रीम उत्पादकाकडून प्रत्येक महिन्यात ५ टन कच्चा माल खरेदी करण्याची, त्यामुळे मी अतिशय आनंदात होतो. गेल्या वर्षाचं अपयश या ऑर्डर मुळे साफ धुवून निघणार होतं. माझ्याच सोबत रुजू झालेल्या सहकाऱ्यांना चांगल्या संध्या मिळाल्या होत्या आणि मला मात्र समोर जाण्यासाठी दुपटी-तिपटीने प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं. उद्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांच्या नाकावर टिच्चून पर्चेस ऑर्डर चा कागद नाचवायचा होता. वरून पहिल्या ऑर्डर चा ७५% ऍडव्हान्स चेक बॉसच्या टेबलावर आपटून बॉस ला ‘हम भी कुछ कम नहीं|’ म्हणत स्वतःची लायकी सिद्ध केल्याची टूम मिरवायची होती.
दहा-साडे दहा वाजता पासूनच उन्हाचे चटके अंगाला झोंबत होते. काम आटोपून बुट्टीबोरीच्या त्या कारखान्यातून निघून तासभर झाला असेल. सूर्य माथ्यावर आला होता. चिडचिड उन्हं होतं. जीव पाणी पाणी करत होता. घश्याला कोरड पडली होती. पाठीवरच्या बॅग मध्ये पाण्याची बॉटल ठेवली होती पण त्यातलं पाणी गरम झालं असेल आणि दहा मिनिटांत दादाजी धुनीवाले मठापर्यंत पोचलो की तिथून पंधरा मिनिटांत आर्वी नाका, डावीकडे पलटलो की पाच मिनिटात घरी!
काळ्याशार भाजलेल्या मातीच्या मडक्यातलं वाळा टाकलेलं एक-दोन ग्लास पाणी प्यायलो तरच तहान जाणार. शिवाय आईनं सकाळचा स्वयंपाक मांडून ठेवलाच असेल. घरी पोचलो की बॅग काढून सोफ्यावर फेकायची, आईला नमस्कार करायचा आणि आपल्या यशाची गुड न्यूज द्यायची असं मी ठरवलं होतं. ही बातमी कशी द्यायची, आईच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा न्याहाळायचा आणि स्वत:चं कौतुक कसं होईल याची मनातल्या मनात मी रंगीत तालीम करत होतो. माझ्या चेहऱ्यावरच्या झळकणाऱ्या आनंदाची रेष न रेष, गालावरच्या स्मिताची लकेर आणि डोळ्यांतली चमक मला स्वत:लाच जाणवत होती.
मनात आनंदी विचारांची धावती चित्रजत्रा सुरूच होती. मोटरसायकलची चाकं उन्हाने वितळू लागलेल्या डांबरी रस्त्यावरून ‘फम्म फम्म ss …’ आवाज करत वेगाने जात होती. आजूबाजूच्या कडुनिंबाच्या झाडांच्या फांद्यापानांतून हवेचा ‘सूं सूं …’ येणारा आवाज संगीतासारखा वाटत होता. वेगात असल्याने आणि रस्त्यावर मध्येमध्ये दुतर्फा झाडांच्या सावलीमुळे उन्ह असलं तरी बरं वाटायला सुरुवात झाली होती. दत्तपूर मागे पडलं तशी मी मोटरसायकलचा वेग वाढवला. घरी लौकर पोचायचं होतं मला.
दादाजी धुनीवाले मठासमोरून वर्धेतून नागपूरकडे जाणारा राज्य मार्ग आहे. मठाच्या मागे आर्वी नाक्याकडे जाण्यासाठी एक बॅचलर रोड आहे आणि मठाच्या थोड्याच आधी प्रियदर्शनी महाविद्यालयाकडे जाणार एक अरुंद रस्ता आहे. तिथे दिवस रात्र मोठ मोठ्या गाड्या ये-जा वाहतूक करत असतात. मठाजवळच्या तिठ्याजवळ वाहतूक नियंत्रणासाठी नुकतेच सिग्नल्स लावले होते. एका महिन्याआधी या ठिकाणी एका भयंकर अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. लोकांनी ओरड केली म्हणून आर टि ओ च्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सिग्नल चा खंबा उभारला आणि वाहतूक नियंत्रकांची नेमणूक केली. तेव्हापासून इथे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी झाले होते.
मी सावधपणे गाडी चालवत असलो तरी शक्यतो अश्या घटनेमुळे माझ्या मनात धडकी बसलेलीच होती. तेवढा तिठा पार केला की डोक्याला ताप नसतो म्हणून गोपुरीकडे जाणाऱ्या आडमार्गाच्या थोड्या आधी गाडी आणखी धीमी केली. धुनीवाले बाबाजींच्या मठाची पांढरी भिंत दिसली. हिरवा सिग्नल दिसला तसा मोटरसायकलचा उजवा इंडिकेटर सुरु केला आणि मी पलटलो.
माझी दृष्टी स्पीडोमीटरच्या काट्याकडे गेली. मीटरवरच्या काचेच्या आवरणातून लाल रंगाच्या अर्धगोलाकृती रेघेच्या पाव भागापर्यंत पोचलेला काटा उतरायला लागला होता. हॅन्डल किंचित उजवीकडे वळवलं आणि डांबरी रस्त्याला चिपकून असलेल्या चाकाच्या दट्ट्यावरून कोपऱ्याकडे भार टाकून गाडी पलटण्यासही ९० अंशाच्या कोनातून फार फार तर ८५ अंशात झुकली असेल तोच माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून उजव्या आरश्यात दिसलेल्या दृश्याने माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. माझ्या मागे २०-३० फूट अंतरावरून तशी ९०-१०० किलोमीटर वेगात सरळ माझ्या दिशेने झेपावणारी एक ट्रॅक्स गाडी दिसली. ट्रॅक्स गाडीला या वेगात इतक्या कमी वेळात ब्रेक मारणे शक्यच नसतं झालं. माझ्या मेंदूत त्या गाडीचा वेग, मोटरसायकल चा वेग आणि पुढल्या क्षणात कापण्याची मलाच अनाकलनीय असणारी आकडेमोड सुरु झाली. गेल्या वीस-एकवीस वर्षांत अडी-अडचणीच्या, भारी वाहतुकीच्या, अरुंद रस्त्यांवर वेळोवेळी आलेल्या अनुभवाची खरी कसोटी इथेच लागणार होती. या सगळ्या चाल-अचलांची समीकरणे जुळवण्यात मेंदू गुंतला असताना समोरून मोठाली औद्योगिक टाक्या वाहून नेणारा सोळा चाकी अजस्त्र ट्रक मात्र त्यापुढच्या क्षणात डोळ्यांच्या डाव्या कोपऱ्यातून दिसला. आतापर्यंतच्या आयुष्यातला दुचाकीस्वारीच्या अक्ख्या अनुभवाची सांगता या तिठ्याच्या मध्यभागी होणारेय हे स्पष्ट कळून चुकलं होतं. या पुढचं समीकरण जुळणं अशक्य कोटीतलं होतं. माझ्यासाठी वेळ धीमा झाला तसा माझ्या डोळ्यांसमोर मेंदूने आतापर्यंतच्या आयुष्याची धावती चित्रफीत झरझर सरकत गेली.
गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा करून हाती मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमुळे परतलेला आत्मविश्वास, ऑफिसमध्ये स्वत:ला अंततः सिद्ध करून दाखवल्याची भावना आणि घालून पाडून बोलणाऱ्या सहकारी सहकाऱ्यांचे जिरलेले चेहरे, बॉसने केलेली आपली निवड चुकीची नव्हती हे त्याच्याच तोंडून ऐकण्याचं समाधान… त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे दोन वर्षांनी घरी आलेल्या लेकराला बघून माझ्या आईची खुललेली चर्या, लहानपणीच वडिल घर सोडून गेल्यानंतर आईने माझ्यासाठी लहानाचा मोठा करता करता खाल्लेल्या खस्ता, त्याग आणि खटाटोपी, शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईसारख्या महानगरात एकटा जाण्याचा माझा ध्यास तडीस नेण्यासाठी तिने केलेलं योगदान, पहिल्यांदा मुंबईसाठी रेल्वेत बसतांना बघितलेला तिचा रडवेला चेहरा आणि तिच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंना सावरण्यास असाह्य मी सुटलेल्या रेल्वेच्या खिडकीतून तिची लांब दूर दूर जात विरत जाणारी आकृती ठिबका होऊन दृष्टीआड होईस्तो बघणारा मी हमसून हमसून रडलेला, कॉलेज मध्ये एकलकोंड्या मला सावरणाऱ्या अविनाश आणि त्याच्या कुटुंबाची आठवण, पदवीग्रहणाचं माझं छायाचित्र आईला मिळाल्यानंतर तिच्या फोनमधून येणाऱ्या अभिमानाच्या स्वराची आठवण, तेव्हा तिच्या दाटलेल्या रुद्ध कंठातून निघालेले आशीर्वाद आणि मला जाणवणारे तिचे सुखाश्रु, कठीण मुलाखत प्रक्रियेतून शेवटच्या ८ उमेदवारांपैकी नोकरीसाठी एकटा मीच निवड झालेला होतो तेव्हा झालेला आनंदात न मावणारा आनंद घेऊन भावी आयुष्यात आईचे कधीही न फिटणारे सगळे ऋण तिच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणं एवढंच ध्येय्यय मनी बाळगून केलेला प्रण, मला मनस्वी आवडलेली सावळ्या वर्णाची नीटस चेहऱ्याची चुणचुणीत अंगकाठी मनीषा आणि तिचं सुहास्य, तिची आणि आईची पुढल्या महिन्यात भेट घालून देण्याचा घाट कसा रचावा या विवंचनेत असतांनाच तिने स्वत:हुन आईला केलेल्या फोनमुळे माझ्या मनावरचं कमी झालेलं दडपण, आता या घडीला आई देवासमोर नैवेद्य देत असेल… या सगळ्या आठवणी आणि विचारशृंखला या एकाच क्षणात एकाच वेळी एकवटल्या आणि मोटरसायकल ८५ अंशावरून ३० अंशावर झुकत अकस्मात घसरली.
“टि ई ई ई ई ईंग” भोंग्याचा मोठयाने आवाज करत मागून येणारी ट्रॅक्स ऐन वेळेत अर्ध्या फुटांवरून काप मारत माझ्या मोटरसायकलच्या मागून वेगाने निघून जाईस्तोवर मी त्या कठीण, उन्हेने डांबर वितळल्यामुळे ठिकठिकाणाहून बारीक गिट्टी निघालेल्या रस्त्यावर उजव्या बाजूने घसरत, फरफटत गेलो. मोटरसायकलचं मागचं चाक वेगात परिक्रमा करत रस्त्याला टेकून गिर्र्कन फिरलं तसं मी २७०च्या अंशात गोलाकार करत फिरलो आणि समोर नजरेला दिसलं ते वीतभर अंतरावरचं ट्रकचं भलंमोठं काळंशार वजनी कठीण चाक आणि त्यावरच्या दणकट चौकटी आकाराच्या दट्ट्या! रबरी चाकाने येणारं काळभोर मरण वीतभर अंतरावरून येऊन ठेपलेलं, माझ्या तोंडातून फक्त हलकासा दबलेला हुंकार निघाला. डोळयांचे पाते लवते न लवते तोच मोटरसायकलसकट मी रस्त्याच्या मधून अत्यंत गतीने घासत जाऊन सरकलो. “भों S S S” कर्णकर्कश आवाजाचा भोंगा वाजवत भरधाव वेगाने ट्रक निघून गेला.
गच्च मिटलेले दोन्ही डोळे किलकिलते उघडून बघितलं. रस्त्यावरून परावर्तित होऊन सूर्याची किरणं माझ्यादृष्टीपटलांवर पडून काळपट चमकदार सोनेरी चंदेरी सरमिसळदार रंगांची आवर्तणं करीत होती. चांदण्या चमकायला लागल्या होत्या. डोकं गरगरत होतं. “सुन्न” आवाज कानातून तीक्ष्ण छिद्रं करत मेंदूत घुसत होती. मी रस्त्याच्या कडेने आडवा-तिडवा पडलेला होतो.
“उचला… उचला… त्याला उठून बसवा रे!”
“पोट्ट्या पाणी आण बे!”
“माय माय वं”
“कुठं लागलं गा बाप्पू?”
“गर्दी नका करू! गर्दी नका करू! अल्लग व्हा. सरका बाजूला. हवा येऊ द्या!”
कानांवर हलके हलके आवाज आदळू लागले.
हृदयाची धडधड छाती वेगाने वर-खाली होत होती आणि श्वासोच्छवास तीव्र झाला होता. अंग बधिर झाल्यासारखं अवजड वाटत होतं. हाता-पायातून जाणीव आणि संवेदना निघून गेल्यासारखं वाटत होतं.
“हल्लूसे उठा!”
“ऐसे… ऐसे… आरामात उठ भाईजान!”
कुणीतरी माझे हात, मान धरत उठवलं. दुसऱ्या कुणीतरी पाठीला आधार म्हणून माझ्या पाठीमागून बगलांमधून छातीशी हातांनी घट्ट पकडून मिठी मारत उभं केलं. टोंगळ्यात दुमडलेले पाय कुणीतरी वाकून सरळ करण्याचा प्रयत्न करत होतं तर आणखी कुणीतरी माझ्या तळहातांना घट्ट पकडून होतं. खेचत खेचतच मला जवळच्या टपरीसमोरच्या तात्पुरत्या कामासाठी बनवलेल्या लाकडी बाकावर बसवलं. एकाने माझ्या गळ्यात लटकलेली हेल्मेटची टिचकी उकलली आणि हलके हलके हेल्मेट डोक्यातून काढलं. दुसऱ्याने माझ्यासमोर पाण्याची बाटली धरून दुसऱ्या हाताने मानेला आधार देत बाटली तोंडाशी लावली. एक घोट पाणी घश्यात गेलं तसं त्या घेतलेल्या घोटाचीच उलटी झाली आणि “खंग खो खो” खोकलत मी माझ्या छातीला हात लावला. एका म्हातारी माझ्या पाठीवर हात चोळत धीर देत काहीतरी बोलली. जमलेल्या घोळक्याने जमेल तशी माझी मदत केली.
माझा श्वासोच्छवास हळहळू सामान्य होऊ लागला. हृदयाची धडधड मात्र अजूनही खूप होतं होती. एव्हाना डोळ्यांत दिसणारी चमक कमी झाली होतं आणि मेंदूतल्या झिणझिण्याही उतरत होत्या. उघड्या डोळ्यांत हात-पायांत होणारी थरथर दिसली आणि जीवात जीव आला. या अपघाताच्या धक्क्यातून मी सावरत असलो तरी अनुभवलेला थरार माझ्या मेंदूने पचवायला बराच वेळ घेतला. काही वेळाने आजूबाजूची कुजबुज, गोंगाट वाढल्याचा ऐकू येत होता. श्रवणक्षमता पूर्ववत ताळ्यावर येऊ लागली होती.
मी सावरत आहे हे बघून मदत करणाऱ्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली. कुणीतरी सोबत घेऊन जाऊ का विचारलं आणि एकाने जवळच्या डॉक्टर कडे नेण्याची सूचना केली.
“आता बरं वाटतंय. थँक यू!” असं धीम्या स्वरात मी दोन-तीनदा पुटपुटलो.
मदत करणारी मंडळी “सावकाश चालवत जा गाडी”, “ऑटो ने जा घरी” म्हणत होती. मी मात्र हातानेच खुणावारे करत ठीक असल्याची मी स्थिर-स्थावर झाल्याचं सांगत होतो. हळूहळू गर्दी पांगली. दोघं-तिघं माझ्या जवळपासच थांबले होते. एकाने मोटरसायकल उभी केली.
“मी सोडून देतो भाऊ. चाला संगं”, दुसऱ्याने म्हंटल.
“नको. आता ठीक आहे मी. धन्यवाद!” म्हणत मी बाकड्यावरून उठलो. अंगावरचे कपडे झटकले. हातात हेल्मेट घेतलं आणि अलटा-पलटी केलं. हेल्मेटची उजवी बाजू चांगलीच घासून निघाली होती. प्लास्टिकचं वायझर तुटलं होतं. हेल्मेटच्या कानशिलापर्यंत मोठी खाच पडली होती. आटपर्यंतचं थर्माकोलचं पॅडिंग झिजलं होती आणि त्या छिद्रातून आतमधलं काळं कापड दिसत होतं.
लंगडत लंगडत चालत मी मोटरसायकलच्या हॅन्डल वर हात ठेवला. मला आधार म्हणून दोघांनी मोटरसायकल आणि मला हलके हलके पकडून ठेवलं होतं. टांग टाकून मी बसलो. मी बटण दाबायला घेतला तसा माझा हात थरथरू लागला. परत मोटरसायकल सुरु करण्याचा विश्वास वाटेना. आत्मविश्वास ढासळला होता. दोन क्षण गेले असतील. दीर्घ श्वास घेऊन मन स्थिर केलं. सेल्फ स्टार्टची बटण दाबली आणि हळू हळू मोटरसायकल हाकत मी घरी पोचलो.
नशिबाने आई देवपूजेत मग्न होती म्हणून काहीही न बोलता मी अंघोळीला गेलो. गरम पाण्याने अंघोळ करून मी बिछान्यावर लेटलो आणि क्षणार्धातच झोपी गेलो.
मृत्यु निश्चित असतांना त्या क्षणी नेमकं काय झालं हे गूढ उलगडण्याचा प्रयत्न सुरु झाला. माझ्या समोर वीतभर अंतरावर चाक असतांना मी रस्त्याच्या कडेला कसा काय पोचलो?
मेंदूने घडलेल्या अपघाती प्रसंगाची आवर्तने सुरु केली. तोच तो प्रसंग डोळ्यांसमोर घडत होता आणि प्रत्येक वेळी त्याच त्याच वेदनांतून मी जात होतो. कितीतरी वेळ तोच तो प्रसंग घडत असल्याने काय खरं, काय भ्रम, काय स्वप्न आणि काय वास्तव तेच कळेना!
“बाळा उठ!” म्हणत आईनं अंगाला हात लावला, “बाप रे! किती फणफणतो आहेस रे तापानं?”
मी कण्हत उठून बसलो. अंग ठणकायला लागलं होतं आणि अंगावर ठिकठिकाणी वेदना होतं होत्या.
“मला बरं नाही वाटत आहे, आई. झोपू दे जरा.” कसंबसं एव्हडंच म्हणालो आणि डोळे बंद केले तसेच परत तीच घटना आठवू लागली. वेड लागलंय असं वाटू लागलं.
“एव्हढा देवासमोरची प्रसादाची खीर तरी खा” म्हणत तिने माझ्या पुढ्यात तिने प्रसादाची वाटी धरली.
मरणाच्या दाढेतून परत आलो होतो. आईने समोर धरलेल्या त्या प्रसादाला मी नाही म्हणूच शकणार नव्हतो. गप्पपणे मी खिरीचा प्रसाद खाल्ला, घोटभर पाणी प्यायलो आणि परत डोळे बंद केले.
मेंदूने परत एकदा अपघाताची ती घटना दर्शवायला सुरुवात केली.
नजरेसमोर तेच काळंकभिन्न चाक आणि त्यावरच्या चौकोनी दट्ट्या दिसल्या. या वेळी मात्र माझ्या समोर सरसर सरकणारी छिन्नविछिन्न अंगाची, रक्तानं माखलेली आकृती दिसली. एका हाताने तिने चाक अडवलं होतं आणि दुसऱ्या हाताने माझ्या मोटरसायकलच्या हॅन्डलला धक्का दिला. मी गोलगोल घसरत रस्त्याच्या कडेने पोचलो आणि पापण्यांच्या उघड-झापे दरम्यान त्या आकृतीच्या अंगावरून “भों S S S” आवाज करत भरधाव वेगाने ट्रक निघून जातांना दिसला. ती आकृती हवेत विरत विरत सिग्नलच्या दिव्यात सामावली.
मी मोटारसायकलवर बसून जेव्हा सेल्फ-स्टार्ट चं बटण सुरु करण्यास घाबरत होतो तेव्हा तीच आकृती परत एकदा माझ्या समोर अवतरली. छिन्नविछिन्न अंगानं हळूहळू मनुष्यरुप घेतलं. माझ्या हातावर हात ठेवला आणि “तुझा काळ आला नाहीये. घरी आई वाट बघतेय तुझी” असं माझ्या कानात बोलून, स्मितहास्य करत परत ती हवेत विरत विरत सिग्नलच्या दिव्यात सामावली.
मी खडबडून जागा झालो. हाती मोबाईल घेतला आणि “ऍक्सीडेन्ट एट धुनीवाले बाबा मठ” टाईप करून गूगल वरती शोध बटण दाबलं. मोबाईलच्या पडद्यावर चित्र उमटलं ते त्या मनुष्याचं होतं.
फारच छान कथा सारंग 🙂
keep it up… hope to read many more from u…. 🙂
धन्यवाद अभिजीत. आणखीही कथा इथे उपलब्ध आहेत. प्रत्येक आठवड्याला काही न काही नवीन कंटेन्ट टाकणार आहेच.
,मस्त लेख
प्रशंसेबद्दल धन्यवाद, अमेय. आणखीही गोष्टी उपलब्ध आहेत.
Khup mast katha !!👌👌