(अंदाजे वाचन वेळ : ३५ मिनिटे)
हरिदासला वेटाळातल्या लोकांनी त्या दिवशी गावभर शोधलं होतं. सायंकाळच्या वेळी शेवटी त्याला पकडून त्याच्या घरासमोरच्या पिंपळाच्या वृक्षाच्या खोडाला दोरखंडांनी बांधून ठेवलं होतं. काहीशा बेशुद्धावस्थेतच त्याने दीपककडे बघितलं आणि कसनुसा दीनवाणा हसला फक्त. त्याच्या डोळ्यांत डोळे टाकून दीपक काहीशा तिरस्काराने त्याच्या बापाकडे बघत होता. असला कसा नीच, घृणास्पद असणारा आपला बाप? त्याच्या वयाच्या उत्तरार्धात केवळ त्याच्या बीजानं जन्म झाला म्हणून तरी त्याचा सांभाळ कर असा समाजाचा, नातेवाईकांचा अलिखित पण अधिकारीक अटळ आदेश धुडकावून लावा की मृत्यू येत नाही म्हणून जगणाऱ्या या दयनीय वेडगळाची कीव आली म्हणून म्हणा किंवा पुत्रधर्माला जागावं म्हणून म्हणा, सांभाळ करण्याची त्याची जबाबदारी दीपकला पेलावी लागणार होती. याच्या रक्ताच्या बापाने त्याच्यासाठी केलं तरी काय होतं?
***
बालपणीच्या सुरुवातीचा काळ त्याने ज्या घरी घालविला होता त्या घरी १० वर्षांनी दीपक परतला होता. दहा वर्षांपूर्वी अरविंदाने दीपकला तिथून स्वतःसोबत नागपूरला नेलं होतं. स्वतःच्या पोरासारखं, तळहातावर सांभाळलं होतं. निर्मलाला दिलेलं वचनपूर्तीसाठी, निर्भेळ प्रेमापोटी त्यानं बापाची जबाबदारी सांभाळली होती. दीपकच्या जन्मापासून तो दहा वर्षाचा होईपर्यंत आणि त्यानंतर पुढली १० वर्षं, आजपर्यंत त्याचा बाप झाला होता तो.
हरदास आणि निर्मलाच्या लग्नाला दीपकच्या जन्मापर्यंत ६ वर्षं झाली होती. मोठी अपर्णा, मधली दीपा आणि तिसरा दीपक अशी दिड-दोन वर्षांच्या अंतरानंतर एकापाठोपाठ ही लेकरं त्यांना झाली होती. दोन मुलींच्या पाठी अखेर मुलगा झाला. मुली काय तर शेवटी दुसऱ्यांच्या घरी जाणार आणि त्यांची लग्न झालीत की मग कशाला त्यांना माय-बापाची काळजी? परकं धन असतं त्या. असल्या बुरसटलेल्या विचारांच्या हरदासला हवा असलेला वंशाचा दिवा अखेर मिळाला होता. म्हातारपणी सोय करणारा, सांभाळ करणारा मुलगा जन्मला म्हणून त्याच्या जन्माने सार्थक झाल्यासारखं वाटलं होतं. दीपक जन्मला त्या दिवशी आनंद साजरा करण्याचं कारण म्हणून हरदास दिवस-रात्र प्यायला होता. चढलेली उतरली की परत प्यायचा. भान हरपेपर्यंत प्यायला होता. तसंही त्याला प्यायला कारण लागायचं नाही.
***
क्षितिजावर सूर्य मावळून तासभर झाला असेल. हरिदास आता चुळबुळू लागला होता. बांधलेल्या दोरखंडातून त्याला निसटायचं होतं. पन्नाशीला पोचलेल्या त्याच्या वाळक्या काटक्या शरीरावर स्नायू फक्त सांगाडा हलता ठेवावा एव्हढेच उरले होते. अंगावरची चरबी भीतीनं केव्हाचीच विरघळवली होती. असेल नसेल तेव्हढं बळ एकवटुन, हिसके देत तो सुटका करवून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. अंगाला बांधलेल्या दोरखंडांनी त्याच्या त्वचेला घासून दाह करायला सुरुवात केली होती. पण अंगाचा हा दाह परवडला पण मानसिक दाह त्याला नको होता.
गेल्या १० वर्षांपासून त्याला अंधाराची भीती वाटत होती. अंधाराचीच नव्हे तर स्वतःच्या सावलीही तो घाबरायचा. स्वतःच्या घरात पाऊल ठेवण्याची भीती वाटत होती. ऊन, वादळ, वारा, पाऊस, हिव… कोणत्याही ऋतूत, कसल्याही वातावरणात तो इतर कुठेतरी आश्रय घेत, फिरत रहायचा.
ही वेटाळातली लोकं आपल्यावर भारी पडतील आणि आपल्याला घरात कोंडून ठेवतील अशी भीती त्याला होती. या आधीही त्याला समाजात आणण्यासाठी, माणसात आणण्यासाठी त्याला नातेवाईकांनी, शेजार पाजाऱ्यांनी १०-१२ वेळा पकडून घरी आणलं होतं. त्याला सोबती म्हणून एक-दोघं जणं त्याच्या सोबत त्याच्या घरी थांबायची पण दार वेळी रात्री-बेरात्री किंचाळ्या फोडत तो घराबाहेर पळत सुटायचा. रडत ओरडत शिव्या देत तो हुलकावण्या देऊन लपून राहायचा. ३-४ दिवस निघून गेली की त्याचा सुगावा शेजारच्यांना लागायचा. त्याला समजावून आहे त्या परिस्थितीत सोडून द्यायचे. काही काळ निघून गेला की परत कुणीतरी त्याला पकडून आणायचे. परत घरी ठेवायचे आणि परत तो घरातून पळून जायचा. त्याला त्याच्या घरी कोंडलं होतं तेव्हा रात्रभर त्याच्यावर पहारा ठेवला होता. ठराविक प्रहरी कधीतरी तो दचकून जागा व्हायचा. रडत, ओरडत, कुंथून कुंथून तो कसा कुणास ठाऊक दोऱ्या तोडायचा आणि बेभान उधळून पळायचा. २-४ दा दरवाज्याला मोठं पक्कं कुलूप लावून ठेवलं तरी दरवाजा तोडून तो पळ कसा काढायचा कुणाला समजलं नाही. एकदोनदा पाळत ठेवून बघितलं तेव्हा भीतीने भारावलेल्या तंद्रीत त्याच्या हाडकुळ्या अंगात विलक्षण अंगशक्ती संचारायची आणि ताकदीनं तो धक्का मारून दरवाज्याची कडी, कुलूप तोडायचा. समोर ४-५ जणांनी घेरा घातला असला तरी त्यांनाही तो जुमानायचा नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसायची ती फक्त भीती. ती अतीव भीतीच त्याच्या अमानवी शक्तीचं रहस्य असावं. फ्लाईट किंवा फाईट अवस्थेत असलीच शक्ती अंगी संचारते म्हणे. त्याला मानसिक रुग्णालयात भरती करण्यासाठी एकदा नेल्या गेलं होतं तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी असला काहीसा सिद्धांत सांगितला होता. काहींना तो सिद्धांत पटायचा तर काहींना ती अजब चमत्कारिक गूढ घटना वाटायची. तो लौकरच रुग्णालयातूनही पळाला होता.
त्या वेडाच्या झटक्यांतही त्याने कुणाला इजा केली नव्हती. कुणावर हल्ला केला नव्हता की कुणाच्या वाटेलाही गेला नव्हता. कदाचित म्हणूनच १० वर्षं कारला रोडवरच्या रहिवाश्यांनी त्याला सांभाळलं होतं. वर्ध्यात कुठेही तो विमनस्क अवस्थेत दिसला तरी त्याला हुसकावून देण्याशिवाय आणि थट्टामस्करीच्या नादात टक्के टोणपे देत चिडवलं असलं तरी कसलाही जीवघेणा अपाय केला नव्हता. कुणी नातेवाईक, कुणी ओळखी पाळखीचं किंवा येऊन त्याला डाळ-भात, एखादा कापड, चादर वगैरे द्यायचा. उदार भाव म्हणून मार्केट मधल्या कापडाच्या दुकानं थाटलेली व्यापारी मालक मंडळी खायला प्यायला द्यायची. रसवंती आणि ठेल्यांवरची कुणी त्याला उरला सुरला उसाचा, फळाचा रस वगैरे अधूनमधून द्यायची. घोट – दोन घोट रस प्यायला, भाकरी भाजीचा तुकडा चघळला की उरलेली तो फडक्यात बांधून ठेवायचा. वेड लागण्याच्या आधीच्या त्याच्या आवडत्या गुत्त्यांवर कुणी त्याला अर्धा प्याला दारू दिली तर मात्र त्याला शिव्या शाप देत तो दूर पळायचा. कुणाला त्रास देत नाही तोवर वेड्याला जगवल्या जातं. तोंडातल्या तोंडात, असंबद्ध बरगळत तो एका-ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गावभर सतत चालत राहायचा. इतक्या वर्षांत क्वचित त्याच्या दिनक्रमात फरक पडला असेल. तसं त्याला कुणी फारसं झोपतांना बघितलं नव्हतं. वेड्याच्या मागे वेळ कोण देणार म्हणा. रात्री गस्तीवर पोलीसं फिरायची तेव्हा ह्याला सुरुवातीला नव्या नवख्या पोलिसांनी हटकलं, तुरुंगात डांबलं पण निरुपद्रवी हरिदासची ओळख झाली तेव्हापासून त्यांनीही त्याला गिणतीत घेणं सोडलं. एव्हढंच काय रस्त्यावरची कुत्रीही रात्री त्याच्यावर चुकूनही भुंकत नव्हती. दुरूनच त्याचा गंध आला की मानी पोटाशी खुपसून अंगाची पिशवी करून निमूट झोपी जायची. दिवस-रात्र चाल-चाल चालत तो फिरायचा, पुटपुटत, कधी डोळ्यांतून अश्रू काढत, कधी हुंदके देत, कधी डोक्यावरची, अंगावरची केसं चिडून ओढत, कधी स्वतःच स्वतःला ओरबाडत त्यानं त्या रात्रीपासून अखंड, अविरत नित्यक्रम १० वर्षं राबवला होता.
गेल्या १० वर्षांत हरिदासच्या वेडाचं कारण कुणी तो नोकरीवर असतानाचा ताणतणाव असह्य झाला असावा म्हणून तर कुणी त्याच्या बायकोचा, निर्मलेच्या गळफास लावून घेतलेली आत्महत्या असावी असली तर्क लावीत होती.
त्याला पिंपळाच्या खोडापासून दोघा-तिघांनी सोडवलं. त्याचे हात बांधलेलेच होते. त्याची दोरी दीपकच्या हाती दिली आणि “सांभाळ याला.” म्हणत ती त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाली. दीपकने दोरीचा टोक हाती घेतला. हरिदासकडे बघितलं आणि निमूट त्याला ओढत त्याच्या घराकडे जाऊ लागला. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतींकडे बघत गर्दी हळूहळू पांगायला लागली.
दीपकने कुंपणाचं मोडकळीला आलेलं, एका सांध्याच्या आधारानं असलं तरी कोलमडू बघणारं फाटक उघडलं. त्या दिवशी लाथेच्या जबरदस्त ठोकरेनं हरिदासनं फाटक तोडलं होतं. त्या फाटकासारखंच त्या बाप-लेकांच्या नात्यालाही तोडलं होतं. ते नातंही कोलमडू लागलं होतं. दीपकनं त्या फाटकाला हातानं हलकेच उघडलं. जंग लागलेल्या सांध्याने अंगावर शहरे आणणारा आवाज काढला.
***
अरविंदानं त्या दिवशी १० वर्षांच्या दीपकला याच फाटकातून हरिदास पासून दूर नेलं होतं. अपर्णा आणि दीपा दोघीही त्याच फाटकातून १० वर्षांपूर्वी बाहेर पडल्या होत्या. हरिदासच्या डोळ्यांतली नशेची धुंदी उतरली नव्हती. मुर्दाड झालेल्या नजरेनं तो त्याच्या मुलांकडे बघत होता. लेकरांच्याही डोळ्यात अश्रू नव्हते. त्या घरापासून नातं तोडून दुसऱ्या बापासोबत जात होत्या. यथावकाश त्यांची लग्न तोलामोलाच्या घरांत लावून अरविंदानं निर्मलेला दिलेलं वाचन पाळलं होतं. बापाची कर्तव्यं त्याने पूर्ण करण्याचा जीवतोड प्रयत्न केला होता ते ही अविवाहित राहून. त्या अरविंदाला हरिदासनं अत्यंत खालच्या दर्जाच्या शिव्या देऊन, त्याच्या आणि निर्मलेच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप करून, स्वतःच्या तिन्ही लेकरांना त्यागलं होतं.
***
२६ वर्षांआधी हरिदास आणि निर्मलेचं लग्न झालं होतं. हरिदास २५-२६ वर्षांचा होता. सरकारी खात्यात नोकरीवर होता. तृतीय श्रेणी कर्मचारी असला तरी सुखवस्तू कुटुंबातील होता. त्याच्या बापाकडे ३५-४० एकर जमीन होती. शिवाय कारला रोडला घर बांधण्यासाठी जमीन घेऊन ठेवली होती. लग्नानंतर ती जमीन हरिदासच्या मालकीची होणार होती आणि शेतीतला हिस्साही त्याच्या नशिबात पुढे मागे होताच. निर्मला बारावी पर्यंत शिकली होती. तिची पुढे शिकण्याची इच्छा होती. माय बापाच्या आयुष्यात थोडा तरी हातभार लागावा, सुखाचे काही दिवस त्यांच्याही नशिबी यावे म्हणून तिला नोकरी करायची होती. पण हरिदासचं स्थळ आलं आणि तिच्या आई-बापाने आपल्या डोईवरचा भार आणि कर्तव्य लौकरात लौकर पूर्ण करावं म्हणून तिला व्याहून दिलं होतं. गावाकडे वाढलेली निर्मला तेव्हा जेमतेम १८ वर्षांची होती. माय-बापानं मेंढरू हाकलावं तशी तिला समाजरीतीने नवऱ्याकडे पाठवलं आणि ती तेव्हापासून हरिदासासोबत संसार करू लागली होती.
हरिदास दिसायला गब्बर होता. दणकट अंगापिंडाचा होता. रंगाने काळा होता. सदैव लालसर दिसणाऱ्या तुंबलेल्या नजरेतून बेदरकार वृत्ती झळकत राहायची. पण गाठीशी बापाकडून येणारी वारशाने येणारी संपत्ती आणि सरकारी नोकरी म्हणून नाजूक, गव्हाळ रंगाची, सालस, दबकी-बुजरी शांत गाय निर्मला त्याला नशिबात मिळाली. वरून तिच्या माय बापाने हुंडा म्हणून जमतील तेव्हढा रोख पैसा, सोन्याची गोफ, अंगठी आणि लग्नात रुसला म्हणून हवं ते कर्ज काढून घेऊन दिलं. काहीही करा पण पोरीला पदरात घ्या म्हणत त्याच्या पायी निर्मलासारखी सोज्ज्वळ मुलगी अर्पण केली. आणि त्याने तिला पार चुरगाळून टाकलं होतं.
तिच्या नशिबी लग्नाचं सुख सुरुवातीचे ३-४ महिने पुरलं आणि मग सुरु झाला नवरा नावाच्या नात्यानं केलेला अधिकारीक छळवाद! शारीरिक आणि मानसिक. तेव्हा कारला रोडला वसाहत नावापुरतीच होती. आजूबाजूला दूर दूर पर्यंत शेतीच शेती. त्या पलीकडे मोकळं माळरान. अर्ध्या-पाऊण किलोमीटर अंतरावर दुसरं घर. तेव्हढ्याच अंतरावर तिसरं घर. इतकी वस्ती विरळ होती. सकाळी ८ वाजता हरिदास सायकलच्या पेडला मारत घरून निघायचा. दिवसभर वर्ध्याच्या रेल्वेस्टेशन जवळ त्याच ऑफिस होतं. तिथे असली नसली ती कामं करायचा आणि सायंकाळी ६ वाजता ऑफिसमधून निघाला की ठरलेल्या गुत्त्यावर दारू ढोसायचा. एक बाटली झोऱ्यात टाकायचा. झोकांड्या देत सायकलीला पेडल मारत घरी पोचता पोचता त्याला रात्रीचे ८-९ वाजायचे. निर्मलाने तयार केलेला स्वयंपाक थंडगार झालेला असला की तिला परत चूल पेटवून गरम करायला लावायचा. अर्ध्या शुद्धीत जेवण आटोपलं की मग निर्मलाची मनस्थिती नसली तरी शरीरसुख ओरबाडून घ्यायचा. त्याला नकार देण्याची हिंमत निर्मला करू शकत नव्हती आणि कधी नको म्हंटलं तरी नवराच तो. समाज त्याला अधिकार देतो म्हंटल्यावर थंड शरीरानं झोपून राहणं एव्हढंच तिला भाग होतं. कधी तो अचानक ६-६.३० ला घरी टपकायचा आणि स्वयंपाक तयार नसेल तर निर्मलेवर आरडाओरड करायचा. त्याच्या शिव्या ऐकत, रडत कुढत ती लगबगीनं स्वयंपाक करायला लागे.
सकाळी नवऱ्याच्या अगोदर उठून, झाडलोट करून, न्हाऊन ती स्वयंपाक करे. त्याला आवडेल त्या भाज्या तयार करे. त्याचा टिफिन भरून देई. त्याच्या कपड्यांना इस्त्री करून देई. त्याने फक्त न्हाणं करावं. टिफिन घ्यावा आणि सायकलीवर टांग मारून निघावं ते थेट रात्री घरी यावं. जेवण करावं आणि एखादी गोष्ट मनासारखी झालेली नसली की आरडा-ओरड आणि मारझोड करावी. हे नेहमीचंच झालं होतं आणि तिला ह्याची सवय झालेली होती. कसाही असला तरी तिचा नवरा होता तो आणि लहानपणापासून तिच्या गावाकडेही इतर पुरुष त्यांच्या बायकांना मारझोड करतच होते की. त्या स्त्रियांनीही तिला पुरुषाच्या वाट्याला न जाता दाबून राहण्याचाच सल्ला तिला दिला होता. उगाच कसल्या कारणानं नवरा चिडला आणि त्यानं टाकलं तर अब्रूची हानी बायकांचीच होते. माय-बापही तिलाच दोष देतात. ती ही सोशिकपणे सगळं सहन करत राहिली.
लग्नानंतर अर्ध्या वर्षभराच्या आतच निर्मला गर्भार राहिली. बाळाची चाहूल लागली आणि हरिदासच्या वागणुकीला थोरा-मोठ्यांकडून आडकाठी आली. त्याच्या वागण्यात थोडाफार बदल झाला. त्यामागे त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या घरी तिला सांभाळण्यासाठी राहण्याचं ठरवलं होतं. यथावकाश बाळंतपण झालं. पहिली अपर्णा झाली. मुलगी झाली म्हणून त्यानं तिला दूर लोटलं आणि आठवडाभर घराच्या दूर राहिला. दारूत आकंठ बुडून त्यानं मुलगी झाली म्हणून झालेला हिरमोड भरून काढला. ती वर्ष – दिड वर्षाची होत नाही तोच दुसऱ्यांदा ती गर्भार राहिली. याही वेळेला ये रे माझ्या मागल्या झालं आणि दीपाचा जन्म झाला तेव्हाही आठवडाभर तो दारूच्या नशेत झिंगत दुःख करत पीत होता. दरम्यान त्याची आई – वडिल निवर्तले आणि मग त्याला आडकाठी करायला, समजवायला, ओरड करायला कुणी राहिलं नव्हतं. तिसऱ्यांदा ती पोटुशी राहिली तेव्हाही हरिदासने काही आशा ठेवली नव्हती. पण दीपक जन्माला आणि वंशाला वारस मिळाला म्हणून परत आनंदाखातीर तो पीत राहिला. एव्हाना घरात कधीकाळी असलेली सुखवस्तू श्रीमंती त्याच्या नादारपणाने रोडावायला लागली होती.
वर्षांमागून वर्षं गेली. अपर्णा, दीपा आणि दीपक वयाने वाढत होते आणि हरिदासच्या वागणुकीने घरात दहशतीची भावना तिघा लेकरांतही वाढत होती. हरिदासच्या बेफिकीर वृत्तीने आणि दारू पिण्याच्या सवयीत वाढ झाल्याने त्याला नोकरीवरून वारंवार नोटिसा आणि सस्पेन्शन ऑर्डर मिळत होती. पण सरकारी नोकरी असल्याने महिन्याअखेर पगार खिशात येत होता. खाणारी तोंडं वाढली आणि त्याचा पगार तुटपुंजा पडायला लागला. वरून लेकरांना शाळेत टाकण्यासाठी, वह्या पुस्तकांसाठी लागणार खर्च काढण्यासाठी निर्मलालाच काहीतरी करणं भाग होतं.
त्यांच्या घराजवळ हळूहळू वस्तीही वाढायला लागली होती. सुरुवातीला अर्धा पाऊण किलोमीटर दूर घरं बांधण्यात आली होती. आता ती हाक भराच्या अंतरावर उभारायला सुरुवात झाली होती. क्वचित ऐकू येणाऱ्या हरिदासच्या ओरडण्याची, शिव्या हासडण्याच्या आवाजाची शेजार पाजाऱ्यांना सवय व्हायला लागली होती. पण दारुड्या हरिदासाशी प्रेमानं बोलून काही फायदा नव्हता आणि भांडणं करण्याची हिंमत नव्हती. त्याला समजावून सांगावं म्हणून अखेर अरविंद त्याच्या घरी शेवटचा आला होता. मात्र त्याच दिवशी तिन्ही लेकरांना घेऊन कायमचं वर्धा सोडून जावं लागलं होतं.
***
दीपकला त्याची आई पुसटशी आठवत होती. तो दहा वर्षांचा होता तेव्हा ती निवर्तली होती. तिच्या होत्या नव्हत्या तेव्हढ्या आठवणींतून त्याच्या बहिणी, अरविंद आणि तो एकमेकांना सांगून तिचं अस्तित्व स्वतःच्या मनात जिवंत ठेवत होते.
दीपकने दरवाजा उघडला. बॅग मधून विजेरी काढली. बटन सरकवून त्याने उजेड पडला. घरात सर्वत्र धुळीचं आणि पसाऱ्याचं साम्राज्य होतं. उंबरठ्यावरून पाय घरात टाकला. कुबट, सडक्या आणि धुरकट वासानं त्याच्या नाकात प्रवेश केला. खोकल्याची उबळ कशी बशी शांत करत त्याने नाका-तोंडावर रुमाल धरला. हरिदासला मात्र या धुळीची, वासाची सवय असावी किंवा त्याची संवेदना इंद्रियंच बंद झाली होती. खिडकीच्या चौकटीला दोरखंडानं बांधून हालचाल करू शकेल असं त्यानं हरिदासला सोडलं. नाकाला धरलेला रुमाल त्याने फिट्ट नाका-तोंडावर बांधला. इकडे तिकडे जमिनीवर जोड्याने एक दोनदा पाऊल सरकवला, धुराळा उडाला. थोडी साफ – सफाई करून रात्री घरात झोपावं लागणार होतं. ह्या घराच्या भिंतीनी निर्मलाच्या संघर्षाची, तिच्या उपेक्षेची, कुचंबणेची कहाणी बघितली होती.
***
घर चालवण्याची बहुतांश जबाबदारी निर्मलाने स्वतःवर घेतली होती. हरिदासच्या पगारातून काहीही उरत नव्हतं. वरून त्याच्या पिण्याच्या सवयीने त्याचा इतकं पछाडलं होतं की त्याचा सगळं पगार दारूवरच खर्च व्हायचा. घराचा, किराणा सामानाचा, खाण्याचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी निर्मलाने कल्पकपणे आहे त्यातून थोडं थोडं करत स्वतः भोवती कामाचा व्याप बराच वाढवला होता.
निर्मलाने घराजवळच्या जागेत छोटेखानी बगीचा तयार केला होतं. ऋतूंप्रमाणे काकडी, मुळा, टोमॅटो, कांदे अशी जमेल ती भाजीपाला उगवून घरी भाजीची तरतूद करायची. कुणीतरी सुचवलं होतं म्हणून त्याच्याकडून एक बकरीचं पिल्लू मिळवलं. कोडकौतुकात वाढवून तिला मोठं केलं. तिच्या दुधानं तिच्या तिन्ही लेकरांची तहानभूक भागवली. हरिदासपासून लपवून तिने घरी बसल्याबसल्या कुणासाठी पापड, कुरडया, खारवण, शेवया करू दे, कधी वाती वळून दे, मसाला कांडून दे, घरच्या जात्यावर दळण दळून दे, कधी कुणाचे कसली कामं करू दे असं छोटं मोठं काम करून तिनं हरिदासपासून लपवून बऱ्यापैकी पैसा जमवला.
पुढे अरविंदनं सुचवलं म्हणून घरीच उदबत्त्या, मेणबत्त्या, उटणं बनवू लागली. त्या कार्याला अरविंदाच्या विक्री कौशल्याचा चांगलाच हातभार लागला होता. तिची उत्पादनं चांगल्या गुणवत्तेची असल्यानं बाजारात चांगलाच खप होऊ लागला होता. हरिदासला समजलं तर तो ह्या पैश्यांवरही डल्ला मारून दारूत खर्च करेन अशी तिची भीती होती. म्हणून शक्य तेव्हढं लपवून ती तिचे उद्योग करी. त्याला तिची छोटी मोठी उद्योगं माहिती होती पण उदबत्त्या, मेणबत्त्या, उटणं ह्याबद्दल काही माहिती नव्हतं. त्यामुळे घर चालतंय तर चालू दे करत त्याने तिच्या कडे कानाडोळा केला होता. तिने डब्ब्यात, जमिनीत खड्डा करून, कुणाला अडीअडचणीला उधार, काही बँकेत, काही भिशीत असे करून कमाई वळवली होती. लेकरांच्या नावाने तिने खाती उघडून त्यांच्या भवितव्यासाठी बचत सुरु केली होती. कित्येक वर्षं काटकसर करत त्यांच्या खात्यांत बराच पैसा झाला होता.
तिनंच तिन्ही लेकरांना शाळेत घातलं. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, कधी मधी खाऊ आणि सणासुदीला कपडे यांचाही खर्च तिने स्व उत्पन्नातून केला होता. कधी फारच अडचण आली तर पुढले काही महिने काटकसर करून ती पुढली तजवीज करून ठेवे. लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिच्या साठी चांगली साडी क्वचितच घेऊन दिली असेल. त्यातही तिच्या आवडीनिवडी पेक्षा खिशात पैसा किती आहे त्यावरून साडी कसल्या प्रतीची घ्यायची ते तो ठरवायचा. मुलांसाठीही कधी क्वचितच त्याने स्व खुशीने घेतलं असेल. मात्र एकदा तिने स्वतःसाठी तिच्या आवडत्या रंगाची साडी घेतली आणि नवऱ्यासाठी आवर्जून शर्ट आणि पँटही घेतला. तिला तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल समाधान, आनंद बघायचा असायचा तो त्या वेळीही तिला मिळाला नव्हता.
त्याच्या पुढ्यात तिने शर्ट पँट धरला तेव्हा त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या होत्या. हिला हे सगळं घेण्यासाठी पैसा कुठून मिळाला हे त्याला समजलं नव्हतं. कधीतरी असल्याच आनंदाच्या प्रसंगी त्यानं मिठाचा खडा सोडला होता. असल्याच तिच्या आनंदाच्या क्षणी तिच्याकडे पैसा कुठून तरी येत असावा किंवा कुणीतरी तिला पैसा पुरवत असावा असा त्याच्या मनाने ग्रह करून घेतला होता. त्या वेळी शंकेच्या पालीनं त्याच्या मेंदूत शिरकाव केला होता. तिच्या जहरी कुजबुजीनं संशयाचं भूत त्याच्या मानगुटी बसायला लागलं होतं. वेटाळातल्या किराणासामानाच्या दुकानात कुणीतरी सांगितलं की कुणी पुरुष त्याच्या घरी अधून मधून येत-जात दिसतो. तेव्हापासून त्याच्या मनातला संशय आणखीच गडद होत गेला होता.
असंच एक दिवस त्याच्या मनात संशयानं काहूर माजवलं. घरापासून काही अंतर दूर असतांना त्याला अरविंद हाती थैली घेऊन बाहेर पडतांना दिसला. तेव्हापासून त्याला वाटायचं की निर्मलेचं आणि अरविंदाचं काहीतरी लफडं आहे. अरविंद हाच तिचा प्रियकर असावा आणि तोच तिला हवं नको ते घेण्यासाठी पैसा पुरवत असावा. अरविंद निर्मलाचा दूरचा नातेवाईक होता. पण शेवटी तो पुरुषच आणि स्वतः पुरुष असल्यानं त्याने अरविंदालाही स्वतःच्या श्रेणीत गृहीत धरलं होतं. कदाचित निर्मला स्वतःच्या बदल्यात त्याच्या कडून पैसा अडका घेत असावा. तसंही तिला हरिदास सोबत संग करण्यात कधी इच्छा नसायची. तो त्याला हवं वाट्टेल तेव्हा पुरुषी अधिकाराने मिळवे. त्याच्या साठी ती कधी सजलेली त्याला जाणवली नव्हती. मात्र आता ती नट्टा-पट्टा करतीये ते परपुरुषाला जाळ्यात ओढण्यासाठी. प्रेम, शरीर सुख मिळवण्यासाठी. त्याच्या डोक्यात कल्लोळ सुरु झाला होता. निर्मला तशी हडकुळी असली तरी दिसायला गव्हाळ-पाणीदार चर्येची होती. तिच्यावरती कुणीही तिच्या प्रेमाच्या एका इशाऱ्यावर लोटांगण घेईल अशी होती. गेल्या काही महिनांपासून मात्र तिचं शरीर फुलायला लागलं होतं. ती परत सुंदर दिसायला लागली होती. अंगावर तेज वाढायला लागलं होतं. ह्यामागचं कारण त्याच्या दृष्टीने वरची कमाई असल्याचा त्याचा पक्का ग्रह झाला होता.
***
दीपकने पाठीशी लावलेली बॅग उतरवली आणि एका कोपऱ्यात ठेवली. अंगणात वाढलेल्या झुडुपांच्या फांद्या तोडून त्याने तात्पुरता फडा तयार केला. मधल्या खोलीची जमीन साफ केली. तिथे कुठेतरी फडताळ्यात गादी-चटई दिसली. तिला ओढून खाली पडली तशी गादीचं जीर्णशीर्ण कापडी आवरण टर्रर्रकन फाटलं. इतक्या वर्षांचा जागोजागी कठीण, घट्ट झालेला गादीच्या अंगातला कापूस ओढल्यानं पोट फुटतं तसा बाहेर आला. त्याला परत कोंबून त्यानं जमिनीवर अंथरलं. दुसरी गादी ओढली. ती ही तशीच निघाली. तिलाही त्यानं अंथरलं.
विजेरीच्या उजेडात त्यानं त्याच सुरुवातीचं बालपण घालवलेलं घरं न्याहाळलं. अवदशी कळा त्या घराला आलेली होती. त्या खोलीच्या कोपऱ्यात एक लहानसं देवघर दिसलं. त्याच्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथेच त्याची आई, निर्मला आठ-सव्वा आठ वाजता बाप घराबाहेर पडला की देवपूजेला बसायची.
त्या देवघरातल्या पितळी-चांदीच्या मुर्त्या केव्हांच नाहीश्या झाल्या होत्या. फुटकी-तुटकी एक देवीची मूर्ती आणि एक काळवंडलेली तसबीर तेव्हढीच शिल्लक होती. देवघराच्या छोटेखानी फडताळात बारक्या जुनाट पोथ्या, कसल्याश्या पुरचुंड्या आणि बशीवर पूजेची सुपारी एवढ्याच वस्तू शिल्लक होत्या. सहज चाळाव्या म्हणून त्याने पोथ्या हाती घेतल्या. एक एक पान पलटवलं तश्या त्या शिवणीतून विलग होत होत्या. पान पालटलं की त्याचा कोपरा तुटून हाती यायचा. एका पोथीतून एक पान घसरून फरशीवर पडलं. दीपकने पान उचललं आणि विजेरीच्या प्रकाशात बघितलं.
तो एक जुना फोटो होता. त्याची आई, दोन्ही बहिणी आणि तो अशी चार जणं निर्विकार चेहऱ्यानं कॅमेराकडे थेट डोळे रोखून बघत होते. कधीतरी वर्ध्यातल्या आनंद मेळाव्यात ती चार जणं गेली होती. तेव्हाचा तो फोटो होता. त्या फोटोतला रंग विरून श्वेतधवल होण्याच्या मार्गावर होता आणि त्या फोटोच्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या त्यांच्या आनंदाच्या क्षणाची मैफिल परत त्याच्या स्मृतीपटलावर तराळू लागायला सुरुवात झाली होती.
त्या महिन्यात निर्मलाकडे तिच्या उद्योगातून बराच पैसा आला होता. अरविंदाने वर्ध्याच्या नेहमीच्या पटांगणात भरतो त्या आनंद मेळाव्यातल्या एका व्यावसायिकाकडे निर्मलाकडच्या उत्पादनांच्या विक्रीचा मोठा माल पुरवठा केला होता. तो भराभर संपला होता. तो व्यावसायी पुढल्या महिन्यात दुसऱ्या शहरात होणाऱ्या आनंद मेळाव्यासाठीही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणार होता. निर्मला आणि अरविंदाच्या उद्योगाला आणखी मोठं करण्याची संधी चालून आली होती. हाताशी काही रक्कम त्या व्यावसायिकाने आगाऊ दिली होती. त्यात कच्चा माल खरेदी करून वरचा खर्चही निघणार होता. ही आनंदाची बातमी आणि निर्मलाच्या भागाची रक्कम घेऊन अरविंद त्या दिवशी सकाळीच आला होता. तिच्या हातात रक्कम देऊन त्याने तिच्या तिन्ही लेकरांना खाऊ आणि नवीन कपडे भेट म्हणून आणले होते. तो घराबाहेर निघाला आणि त्याला पुढल्या वळणावर हरिदास ओझरता दिसल्याचा भास झाला.
अपर्णा, दीपा आणि दीपक त्यावेळी घरातच होते. अरविंदाने आणलेला खाऊ आणि नवीन कपडे बघून त्यांचा आनंद गगनास मावेनासा झाला होता. बापाने कधी कौतुक केलं नव्हतं तरी दूरचा नातेवाईक असेलेला अरविंद मामा सदा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. शाळेत पालक म्हणून तो नेहमी यायचा. अडी-अडचणीला मदतीला येई. आईला मदत करे. त्यांना तो देवघरातल्या तसबिरीतल्या श्रीकृष्णासारखा भासे. त्याच्या मदतीच्या हातातून आशीर्वादाची किरणं बाहेर पडतात असा त्यांचा विश्वास होता. हा मामा निर्लेप, निष्पाप भावाने त्याच्या बहिणीला सर्वतोपरी मदत करे त्यामुळे मुलांनाही त्याला लळा लागला होता.
अपर्णा चेहरेपट्टीने निर्मलासारखीच दिसायला लागली होती. पुढल्या वर्षी दहावीत जाणार होती. तिच्या शिकवणीचा जास्तीचा खर्च अरविंदाने उचलला होता. मधली दीपा सातवीत होती. ती तिच्या आईच्या उद्योगात मोठ्या हिरीरीने मदत करे आणि फावला वेळ मिळाला की चित्र काढत, रंगवत बसे. तिच्या चित्रकलेच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी शाळा सुटल्यावर ती अरविंदाकडे सराव करत बसे. चित्रकला परीक्षा उत्तीर्ण होऊन तिला अरविंदांच्या ओळखीने कुण्या स्क्रीन प्रिंटिंगवाल्याकडे त्याचं तंत्र आणि कलाही शिकायची होती.
दीपक त्यावेळी पाचवीत शिकत होता. निर्मलासाठी तो शेंडेफळ होता. तिच्यासाठी तिन्ही लेकरं सामान असली तरी लहान असल्याने त्याचा जास्तच लाड व्हायचा. मुली लहान होत्या तेव्हा एव्हढी मुबलकता नव्हती पण दीपकचा पायगुण असावा किंवा त्याच्या नशिबाचा योग बलवत्तर असावं म्हणून त्याचा जास्तच लाड होत असे. दुधावरची साय, एक तरी जास्तीचा बदाम आणि नव्हाळीची फळं त्याला निर्मला द्यायची. त्या तिघांमधल्या भांडणात लहान म्हणून दीपकचीच निर्मला कड घेई.
अरविंद निघून गेल्यावर ती तिघंही निर्मलाच्या मागे “आनंद मेळाव्यात घेऊन चल” म्हणत भूणभूण करू लागली. कित्येक वर्षांनी मुलांनी हट्ट धरला होता. हाताशी जास्तीचा पैसाही होता म्हणून निर्मलेनंही त्यावेळेस आनंद मेळाव्यात जाण्यासाठी “हो” म्हंटलं होतं. त्या एका हो ने त्या मुलांच्या डोळ्यांत आनंदाची स्वप्नं आकार घेऊ लागली होती. चार दिवसांनी येणाऱ्या शनिवारी आनंद मेळाव्यात जाण्याचं ठरलं आणि तेव्हापासून शनिवारी दुपारपर्यंत दिवस रात्र तिघांची उत्सुकतेची कुजबुज चालत राहे. बाप घरी आला तेव्हा दडून बसणारी ती एकमेकांशी कोड्यात, खाणाखुणा करत शनिवारी आनंदमेळाव्यात जाऊन काय काय गमती जमती करणार याच्या गप्पा करू लागली. त्या आनंदात दर रात्री माय-बापाच्या रात्रीच्या होणाऱ्या भांडणाच्या आवाजाकडे लक्ष न देता निराळ्या दुनियेतल्या स्वप्नांत हरवण्याची संधी त्यांना मिळाली होती.
शनिवारी सकाळी हरिदास घरून टिफिन घेऊन निघाला आणि त्या चौघांनी लगबग सुरु केली. मुलींनी अरविंदमामाने आणलेले नवीन कपडे घातले. तोंडावर पावडर फासलं. उदबत्त्यांचा आणलेल्या अत्तराच्या कुपीतून थेंब थेंब अत्तर बोटांवर घेऊन अंगावरच्या कपड्यांवर लावलं. निर्मलनेनंही कित्येक दिवसांनंतर बाहेर पडतोय म्हणून ठेवणीतली साडी नेसली. हलकाच पण जरासा साज केला, मुलींनी गमंत म्हणून तिलाही अत्तर लावलं. लटक्या रागाने हसत हसत तिने त्या दोघींच्या पाठीत धप्पाटे घातले होते म्हणून खिडकीतल्या चौकटीत बांधून ठेवलेल्या आरश्यात बघत चपाचप खोबरेल तेल लावलेल्या केसांचा चापून चोपून भांग काढत खदाखदा हसला होता.
आनंदमेळाव्यातल्या त्या बड्या व्यावसायिकाशी भेट झाल्यावर तिघं लेकरं सकाळपासून इकडे फिर, तिकडे फिर करत होती. तोवरच्या त्यांच्या आयुष्यातला हा सर्वांत मोठा आनंदाचा क्षण होता. रंगबिरंगी खेळणी, मोठाले निरनिराळे झुले, छोटे मोठे दाटीवाटीनं एकमेकांना चिकटून थाटलेली दुकानं, शेव-चकल्यांचा खमंग सुगंध आणि बरंच काय काय परत परत बघत ती फिरली होती.
मेळ्यातली गर्दी सायंकाळ पर्यंत फार वाढली, झुले, आकाशपाळणे फिरायला सुरुवात झाली होती. ती तिघं आकाशपाळण्यात बसली आणि त्यांची आई आणि अरविंद एका जवळच्या बाकड्यावर बसून काहीतरी बोलत होती. ती तिघं बसली होती ती बकेट खाली वर होई तशी त्यांच्या आईच्या हृदयातली काळजीही खाली वर होई. एकदाचा पाळणा थांबला आणि ती तिघं खाली उतरली तेव्हा तिने तिघांनाही घट्ट पकडून ठेवलं होतं. तिच्या हृदयाची धडधड त्या तिघा लेकरांना जाणवत होती आणि त्यांनीही तिला घट्ट पकडून ठेवले होते.
दीपकच्या दृष्टीस समोर असलेल्या एका फोटोग्राफरच्या दुकानाकडे लक्ष गेलं. परत कधी मेळ्यात येऊ तेव्हा येऊ पण त्या दिवशी तिघांनी घालवलेले सुखाचे क्षण स्मृतीत सांभाळून ठेवण्यासाठी “एकच फोटो काढून घेऊ” म्हणू म्हणून त्याने तगादा लावला होता. झटपट फोटो काढून हाती मिळतो म्हंटल्यावर निर्मलाने हो म्हंटल होतं. त्या दिवशीच्या आठवणी फोटोत एकवटल्या गेल्या होत्या. त्या चौघांचा तो पहिला आणि शेवटचा फोटो होता.
***
हातातला फोटो दीपकने बॅग मध्ये ठेवला आणि पाणावलेल्या डोळ्यांचे काठ बोटांनी पुसले. पहिल्या खोलीत हरिदास भिंतीला डोकं टेकवून पुटपुटत बसला होता. त्याला तिथून उठवून मधल्या दीपकने मधल्या खोलीत आणलं. त्याच्या हाताला बांधलेल्या दोरीला खिडकीच्या चौकटीला बांधलं. हरिदासला भूक लागली असेल म्हणून बॅग मधून एक डबा काढला. पाण्याची बाटली काढली आणि त्याच्या पुढ्यात सरकवली. त्याच्याकडे न बघताच दुसऱ्या कोपऱ्यात भिंतीला पाठ टेकवून गादीवर बसला. दिवसभर धावपळ करत, प्रवास करत हरिदासबद्दल कळलं तसा तो कारला रोडला आला होता. काहीशा अनिच्छेनेच पण अरविंदाने कर्तव्याची जाणीव करवून दिली म्हणून तो त्याला भेटायला आला होता. त्याला जमेल तर सोबत घेऊन नागपूरच्या इस्पितळात त्याला भरती करायला घेऊन जायला आला होता.
दीपक नुकताच नोकरीवर लागला होता. उशिरा का होई ना, कसाही का असेना बाप म्हणून त्याला हरिदासची जबाबदारी घ्यावी म्हणून अरविंदानं समजावून सांगितलं होतं. त्याच्या बहिणींनी हरिदासशी कसलाही संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्यासाठी तो बाप नव्हताच. निर्मला निवर्तल्यानंतर त्यांची काळजी घेऊन वाढवणारा, त्यांची शिक्षणं पूर्ण करवणारा, त्यांच्या लग्नात कन्यादान करणाऱ्या अरविंदालाच त्यांनी बाप मानलं होतं.
वारस म्हणून त्याच्या जन्माच्या वेळी आनंदाच्या भरात हरिदास प्यायला होता. त्यात आनंदापेक्षा त्याच्या स्वार्थाची तहान भागवणं, अहंकाराला कुरवाळणं हाच भाव होता. दीपकलाही त्याच्या असल्या बापाशी कसलाही संबंध ठेवायचा नव्हता. त्याच्या संपत्ती, घर, कशाशीच त्याला घेणं देणं नव्हतं. आज तो परतला होता तो बापाशी नातं सांगायला, संपत्तीवर – घरावर अधिकार लुबाडायला नाही तर नाईलाज म्हणून. बाप म्हणावा असं काही हरिदासनं केलं नव्हतं तरी जन्म घातला म्हणून त्यासोबत येणाऱ्या कर्तव्याच्या जबाबदारीनं तो आला होता. घराच्या भिंतींशी, जमिनीशी त्याचं नातं निर्मलाच्या रहिवासानं, कुण्या काळच्या वास्तव्याने जुळलं होतं. तिची परत एकदा उजळणी होतं होती. एव्हढंच!
***
थकव्यानं डोळ्यांत झोप केव्हा आली ते त्याला कळलंच नाही. झोपेचा अंमल त्याच्या डोळ्यांवर पडत होता. पापण्या जाड होऊ लागल्या होत्या आणि डोक्यात त्या आनंद मेळाव्यात काढलेल्या फोटोच्या, त्या दिवसभराच्या घटना घोळत होत्या. त्यांना घराकडे निघायला उशीर झाला होता. वाटेत अरविंदाचं घर होतं म्हणून निर्मला आणि तिचे तिन्ही लेकरं त्याच्या घरी गेले. दीपक दिवसभर खेळून बागडून त्याच्याकडेच झोपी गेला होता.
दीपकला घेऊन अरविंद त्याच्या घरी पोचला होता. घरासमोर शेजाऱ्यांनी गर्दी केली होती. काही अमंगल घडलं असण्याची शक्यता अरविंदला आली होती. आदल्या दिवशी मुलं पाळण्यात बसलेली असताना निर्मलाने त्याच्या सोबत हरिदासच्या जाचाबद्दल सांगितलं होतं. पाण्यानं पाठवलेल्या डोळ्यांनी हरिदासाच्या निर्दयतेच्या कैफियती मांडल्या होत्या. इतक्या वर्षांचा संसार, तीन लेकरं जन्माला घातल्यानंतर, घराची सगळी जबाबदारी सांभाळत असतानाही हरिदासानं कधी तिला आधार दिला नव्हता. कधी तिचं कौतुक केलं नव्हतं. तिचं अस्तित्व त्याच्या मते फक्त त्याची व्याहलेली हक्काची बायको आणि बिनपगारी मोलकरीण असं होतं. त्याची टोचणी त्याच्या व्यवहारातून तिला मिळत राहायची. तिच्या आशा-आकांशा त्याच्या घरात गुदरमत होत्या. त्याचा नवरा असण्याचा अधिकार सहन करत ती कुढत होती. त्यांच्या भांडणात त्याला तिच्या मनातलं, दुःखाचं गाऱ्हाणं वारंवार सांगून झालं होतं पण त्याला तिची दया येत नव्हती. तिचा वापर संसारातलं खेळणं म्हणून होत होता. त्याच्या वासनेला शांत करण्यासाठी होत होता. नात्यातली जबाबदारी त्याने कधीच मान्य केली नव्हती की त्या नात्याचा आदरही केला नव्हता. त्या दोघांमधलं अंतर वाढत होतं. तिच्याकडे तो पूर्वीही दुर्लक्ष करत असला तरी भांडणांपुरती, जेवताना, घरात वावरताना शब्दांची देवाणघेवाण होत होती. आता ते बोलणं जवळजवळ बंदच झालं होतं. भांडण आणि मारपीट तेव्हढी सुरु होती.
काही महिन्यांपासून त्याच्या राहणीमानातला फरक मात्र तिला जाणवला होता. कधी नव्हे तो टापटीप राहायला लागला होता. अंगावरच्या कपड्यांवर अत्तराचा गंध त्याच्या बाहेरख्यायीपणाची वार्ता देत होती. त्याचे कपडे धुताना कपड्यांवर पडलेल्या संशयास्पद डागांवरून त्याच्या बदफैलीचा तिला शोध लागला होता. त्याच्या व्यभिचाराचे पुरावे तिला अधूनमधून मिळत होते.
त्याला विचारलं तर दररोज होणाऱ्या चापट्या, बुक्क्यांच्या, पट्ट्यांच्या मारपिटीला जोड म्हणून तिच्यावर त्या रात्री अधिकची जबरदस्ती व्हायची आणि विकृततेचा कळस गाठला जायचा. तिच्या अंगावर रट्टांच्या व्रणांसोबत, जळक्या बिड्या विझवल्याच्या, ओरबाडीच्या खाणाखुणा उमटलेल्या होत्या. अंगभर कापडांनी झाकलं तरी अंघोळीच्या वेळी अंगावर थंड पाणी घेतलं तरी अंगभर दाह सुटायचा. कसल्याश्या विकृत मानसिकतेने तो झपाटून गेला होता. भांडणाच्या भरात मारझोड करून थकला की एकदोनदा त्यानं तिला दोऱ्यांनी बांधून ठेवलं होतं. व्रणांनी जखमावलेल्या शशिरावर मोकळी जागी शोधून त्यानं इंजेक्शनने तिचं रक्त काढलं होतं आणि प्याल्यात दारू आणि तिचं रक्त मिसळून प्यायला होता.
तिच्या मारपिटीनं विव्हळण्याची आणि त्याच्या जुलूमाची साक्ष भिंतींत बंदिस्त होऊन जायची. रात्रीच्या काळ्या अंधारात, सभोवतालच्या शांततेत तिचा ओरडा दमन व्हायचा. इतर घरं दूर असल्याने तोपर्यंत तिचं आवाज पोचत नसे. तसाही तिच्या माराचा तिच्यावर होणाऱ्या माराचं थेट प्रमाण होतं. तिचा विव्हळण्याचा, किंचाळण्याचा आवाज वाढला की त्याला आणखी जोर येई. मुलांपर्यंत आवाज जाऊन ती घाबरू नये म्हणून किंचाळ्याना, वेदनेला ती दाबून ठेवे. तोंडातून अस्फुट आवाज तेव्हढा निघे. पण कधी वेदना अनावर झाली की एखादी किंचाळी, ओरडा निघे आणि मग त्याला आणखीच चेव येई.
बापाच्या अवतारानं घाबरून तिची तिन्ही लेकरं घाबरून, कानावर हात ठेवून, डोळे गच्चं बंद करून झोपण्याचा प्रयत्न करायची. त्याच्या मधात पडलं की त्यांनाही लाथा बुक्यांचा मार मिळायचा. त्यांना वाचवण्यासाठी ती त्यांच्या अंगावर स्वतःच्या अंगाचं कवच करे आणि मारझोड खाई. विव्हळत, रडत त्या रात्री माय-लेकरं झोपी जाई. आपल्या मध्यस्थीने आईला आणखी मार मिळतो म्हणून मुलांनी पहिल्या खोलीत स्वतःला बंद करून घेणं सुरु केलं होतं. कान-डोळे बंद केले की दोन संवेदना बंद होतात. सहन करण्याची मानवी यंत्रणा कार्याला लागते आणि संवेदना काही काळापुरती का होईना बधिर होते. सकाळी निर्मलाला उठून नेहमीची कामं वेदना सहन करत करायला लागायची नाहीतर परत फटके मिळायचे.
घराच्या अंगणात उभ्या असलेल्या गर्दीतून वाट काढत दीपक आणि अरविंद पोचले आणि वऱ्हांड्यात ठेवलेल्या निर्मलाच्या प्रेताकडे बघून बावचळून दीपक कोसळला होता. त्याला सांभाळता सांभाळता अपर्णा आणि दीपा दोघेही धाय मोकलून रडायला लागल्या होत्या. अंगणाच्या एका कोपऱ्यात हरिदास डोक्यावर हात धरून मान दोन्ही गुडघ्यांच्या मधात दडवून बसला होता. या दुःखाच्या क्षणी “काय झालं? कसं झालं” ह्या प्रश्नावर फक्त कुजबुज होत होती. कुणी त्याला विचारायचं धाडस करू धजत नव्हतं. निर्मलाने आत्महत्या केली एव्हढीच माहिती त्या गर्दीला पुरवली गेली होती. मुली समोरच्या मृत शरीराकडे बघून सुन्न होऊन फक्त रडत होत्या.
निर्मलाचे अंत्यसंस्कार झाले आणि तो एक दिवस मावळला. हरिदास त्या दिवशीही गायब होता. घरात तिघं लेकरंच होती.
घरात मोठी असल्यानं अपर्णाला निर्मलेनंतर स्वयंपाक करून तिच्या भावंडांना खाऊ घालण्याची जबाबदारी आली. मधात कधीतरी अरविंद थोडं धान्य, भाजीपाला घेऊन आला होता. अधून मधून शेजारपाजारच्या लोकांनी त्यांच्या घरात ढुंकून बघितलं. कुणी विचारपूस करून गेलं. कुणी जमेल तेव्हढी मदत करून गेलं. शेवटी आईच्या मायेला दुरावलेल्या लेकरांना आता स्वतःच स्वबळावर सांभाळावं लागणार होतं. निर्मलाचा दिपकवर विशेष जीव होता आणि अपर्णाने ही दीपकला तसंच सांभाळायला सुरुवात केली होती. त्याला आवडतं म्हणून त्याच्याच आवडीच्या भाज्या तिने बनवल्या होत्या. घराची झाडलोट, साफसफाई सगळं दिनक्रम निर्मला करत होती तसाच तिने करायला सुरुवात केली होती. दीपाला आणि दीपकला ती निर्मलाच असल्याचा भास व्हायला लागला होता. शिवाय तिची चेहरेपट्टी, अंगकाठी, बोलण्या वागण्याची ढब निर्मलासारखी असली तरी आता प्रकर्षाने निर्मलाचं प्रतिरूप असल्यासारखी ती त्यांना भासायला लागली होती.
हरिदास मात्र दारूत बुडून होता. तिघा लेकरांची काळजी घेण्याच्या त्याच्या ध्यानीही नव्हतं. तब्बल दहा दिवस तो परागंदा झाला होता. कुणी ऐकलं की त्याला पोलिसांनी निर्मलाच्या संशयास्पद आत्महत्येची विचारपूस करण्यासाठी नेलं होतं. कुणी म्हणत होतं की तो पळून गेलाय. कुणी त्याला मोठ्या नाल्याशेजारी भटकताना बघितलं असल्याचं म्हणत होतं तर कुणी आणखी काही.
अखेर दहाव्या दिवशी तो भर मध्यान्ही, सावली पायाखाली आलेली असताना, तळपत्या उन्हात काळवंडून घरी आला होता. आल्या आल्या तो खाटेवर पहुडला आणि जागा झाला थेट सायंकाळी. सायंकाळपर्यंत नशा उतरली होती. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. स्वयंपाकघरात भांडी उलथून झाली, डबे हुसकून झाले आणि जेवायला काही उरलं नाही हे बघून त्याने तिघांना शिव्या द्यायला सुरुवात केली. रागाचा भर वाढत होता. ओरडण्याचा आवाज वाढत होता. कोपऱ्यात तिघं लेकरं दबकून एकमेकांना चिकटून बसली होती. त्याच्या ओरडण्याचा आवाज घराच्या भिंतींवर आदळून घुमत होता आणि त्या दडून बसलेल्या लेकरांच्या कानावर पडून त्यांना घाबरवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरच्या भीतीला त्याच्या अधिकाराची ओरडण्याची, धाक- दपटीची संमती समजून त्याने चेवाने कमरेला बांधलेला चामडी पट्टा काढला आणि सटासट आसूड ओढू लागला. पहिला फटका त्या तिघांच्याही अंगाला चाटून गेला. डोळ्यांतून वेदनेच्या अश्रूंनी पापण्यांच्या काठ ओलांडला आणि हुंदक्यांनी ओठांच्या भिंतींना भगदाड पाडलं. “नको बाबा! नाही बाबा! सोडून द्या! जाऊ द्या!” रडत तिघं गयावया करू लागली आणि हरिदास आणखी चेकाळायला लागला.
अचानक दीपा झपाटल्यासारखी ताडकन उठून उभी झाली. तिनं पट्टा वरचेवर हवेत हुकवला आणि अपर्णा आणि दिपकच्या अंगावर स्वतःच्या शरीराचं पांघरून घातलं. हरिदासानं परत हल्ला सुरु केला. पट्ट्याच्या प्रत्येक वाराने दीपाच्या पाठीवर रक्तबंबाळ व्रण उमटायला लागले पण तिने त्या दोघांना पुढला एकही फटका लागू दिला नाही. हरिदास त्यांच्या भोवती फिरून रट्टे हाणायला बघायचा आणि दीपा फिरून प्रत्येक वार अंगावर झेलायची. तिची पाठ सोलून निघत होती पण तोंडातून तिने हुंदकाही काढला नाही. मार मार मारून हरिदासचे हात थकले आणि त्याने पट्टा बाजूला फेकून दिला. हाती आणखी काही लागलं नाही म्हणून मग तो लाथा बुक्क्यांवर आला. तो ही उपाय दीपाने चालू दिला नाही. अखेर हरिदास स्वतःच कोलमडला आणि बडबडत घराबाहेर निघून गेला.
तो निघून गेलेला बघून अपर्णा आणि दीपक दीपाच्या मिठीतुन चुळबुळ करत सुटले. दीपाच्या पाठीवर अपर्णाने आणि दीपक ने रडत रडत सांत्वना देण्यासाठी हात फिरवला. फाटक्या कपड्यांतून दीपाच्या सोललेल्या पाठीवरच्या जखमांवरून हात फिरवतांना त्यांच्या हातांना तांबडं भडक रक्त लागलं. एव्हढं होऊनही दीपा कसल्यातरी तंद्रीत असल्यासारखी मौन होऊन काळजीच्या नजरेतून त्या दोघांकडे बघत होती. क्षणभर त्या दोघांना तिच्या डोळ्यांत तिच्या आईच्या, निर्मलाच्या डोळ्यांचं प्रतिरूप दिसलं. निर्मलानेही कित्येकदा तिच्या लेकरांना असंच हरिदासच्या मारापासून वाचवलं होतं. दीपा त्या वेळा पुरती त्यांची आईच झाली होती.
तिला जमिनीवर अंथरुणावर लेटवून दीपकने हळद गरम करून लावली. अपर्णाने दीपाचं डोकं मांडीवर घेतलं होतं आणि तिच्या डोक्यावरून ती वात्सल्याने, सांत्वनेचा हात फिरवत राहिली. कितीतरी वेळ निघून गेला आणि त्यांचा डोळा केव्हा लागला ते त्यानांच कळालं नाही. डोळे उघडले तेव्हा पहाटेची सूर्याची किरणं खिडकीतून त्यांच्यावर पडली. अपर्णाला जाग आली आणि तिनं बघितलं तर दीपाच्या पाठीवर हळदीचा पिवळा रंग नव्हता. रक्ताळलेल्या जखमाही नव्हत्या. होतं ते फक्त तिच्या पाठीवरचं फाटकं कापड. तिनं दीपाला जागं केलं आणि आदल्या सायंकाळच्या प्रकाराबद्दल विचारलं. बापाने मारलेल्या तीन-चार फटक्यांखेरीज तिला काहीही आठवत नव्हतं. अपर्णाने दीपाला घडलेला प्रकार सांगितला पण दीपाचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. ही गोष्ट दोघींपुरतीच मर्यादित ठेवून त्या आपापल्या कामाला लागल्या होत्या. दीपक झोपूनच होता. त्याला ही गोष्ट माहितीही नव्हती.
निर्मलाच्या तेराव्याची तयारी करण्यासाठी दीपक अरविंदाकडे पैशांची काही मदत मागायला गेला होता. तिथून ती दोघं निर्मलाच्या बँकेत गेली होती. तिथलं काम आटोपता आटोपता बराच उशीर झाला होता.
तिकडे कारला रोडला हरिदास घरी परतला होता, भर दुपारी. परत दारूच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत. झोकांड्या खात त्याने दरवाज्याला लाथ हाणली. दरवाज्याची कुजक्या लाकडाची पाटी त्या आघाताने तुटली. पाटीचे तुकडे खोलीभर जमिनीवर विखुरले. त्या धक्क्याचा आवाज आला म्हणून अपर्णाला स्वयंपाकघरातून धावत पहिल्या खोलीत आली. दीपाही बापाला घरात शिरतांना बघून घराजवळ पोचली होती.
त्याच्या तुंबारलेल्या लाल डोळ्यांसमोर अपर्णा होती. कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या अपर्णाकडे बघून क्षणभर निर्मलाच जिवंत असल्यासारखा भास त्याला झाला. म्हणजे गेले काही दिवस जे काही घडलं, निर्मलाने केलेली आत्महत्या, ते दिवस-रात्र भटकणं भ्रम होता की काय असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. नाही. ही मोठी. निर्मला नव्हेच! उघडझाप करणाऱ्या पापण्यांतून लालबुंद झालेल्या डोळ्यांसमोर निर्मलाची प्रतिमाच क्षणभर तरळली.
***
त्या सायंकाळी तो लौकरच घरी आला होता. घराला कुलूप बघून त्याची चिडचिड झाली होती. स्वतःच्या घराला कुलूप लागलेलं त्याने त्यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. तो पोचायचा तेव्हा नेहमी घरात विजेचा दिवा लागलेला राहायचा. अंगणात छोटासा तेलाचा दिवा तेवत राहायचा. दरवाजा उघडा राहायचा आणि त्याने पाय अंगणात ठेवला की लगेच निर्मला हातातली कामं सोडून लगबगीने दरवाज्यापाशी यायची. अंगणातल्या खाटेवर बसला की त्याच्या पुढ्यात पाण्याचा प्याला घेऊन ती हजर असायची. यात तिच्याकडून आतापर्यंत कधी खंड पडला नव्हता.
दारूच्या व्यसनापायी पैसे उडत होता. बाहेरच्या बाईच्या नादाला लागून तो तिच्यावर कमाई उधळत होता. त्याला बाटलीनं बुडवलं आणि बाईनं बहकवलं होतं. ऑफिसमध्ये लांड्या-लबाड्या करून पैसे खाल्ल्याचं निदर्शनात आल्यानं त्याला काही काळापुरता निलंबित केलं होतं. ऑफिसमध्ये न जाता तो दिवसभर उनाडक्या करत, वेळ वाया घालवत फिरत राहायचा. सोबतीला दारू होतीच. अंधार पडला की घरी परतून खायचं, बायकोवर अधिकार गाजवायचा. स्वतः वर ओढवून घेतलेल्या दारिद्र्याचं खापर आणि निलंबित झाल्याचा राग बायकोपोरांवर काढायचा आणि डोकं शांत झालं की एखाद्या जंगली जनावराप्रमाणे निपचित पडून राहायचा. असं असलं तरी डोक्यावर छत आणि कुठूनही कसंही का होईना खायला प्यायला बायको काही तरी बनवून ठेवते म्हंटल्यावर तो घरी परतायचा. तिला छळायला त्याला काही कारण नको असलं तरी तिच्यासोबत भांडून, अत्याचार करून असुरी आनंद त्याला मिळत होता. काही दिवसांपूर्वी अरविंदाला घरातून बाहेर पडताना बघितल्यावर निर्मलाच्या चरित्रावर त्याने संशय घेतलाच होता. त्याला भांडण्यासाठी ते कारण मिळालं होतं.
दोघा मुलींसोबत हसत-आनंदात गप्पा करत ती घराजवळ पोचत होती. अंधारात हरिदास वाट बघत बसला होता आणि त्या तिघींचा आनंद क्षणात त्यांना दबाव लागला होता. दीपक दिसत नव्हता म्हणून हरिदासने विचारलं तेव्हा तो अरविंदाकडेच थांबल्याचं कळालं. त्या तिघींच्या सजलेल्या शरीरांकडे बघून “त्याने कुठे गेला होता? का गेला होता?” अशी विचारणा केली. त्याचाच तो भांडणात उपयोग करून घेणार होता. काहीसं धुसफुसत त्याने त्या वेळापुरती स्वतःच्या रागावर ताबा ठेवला. नुसताच दूर राहून तो शांत उभा होता. वादळापुर्वी वातावरण शांत असतं आणि मग अचानक ते खवळतं. बाप शांत आहे. आज ओरडला नाही. आदळआपट केली नाही. निर्मलाने घाई घाईत स्वयंपाक बनवला. सर्वांना वाढून घातलं आणि जेवतांना मुलींनी मेळाव्यात केलेल्या गमतीजमतीच्या गोष्टी बालसुलभ भावनेनं, उत्सुकतेनं बोलून दाखवल्या. हरिदास नुसताच “हूँ… हूँ…” करून ऐकत होता. अरविंदाचं नाव मधून मधून ऐकू येत होतं तस तसा त्याच्या डोक्यातला वणवा अधिक पेट घेत होता. जेवण झालं आणि मुली थकून लौकर झोपी गेल्या. निर्मला आणि मुली पहिल्या खोलीत झोपल्या होत्या आणि हरिदास अंगणात खाटेवर थंड हवेत झोपला होता. वारंवार कूस पालटत डोक्यात चाललेल्या संशयाच्या निखाऱ्यांना फुलवत भांडणाची तयारी करत होता. मध्यरात्रीनंतर कधीतरी तो ताणफणत उठला खाटेच्या एका पायाशेजारी कलंडलेली चापट नारिंगीची बाटली चाचपडली. बाटलीचं झाकण उघडून त्याने घटाघटा दारू गळ्याखाली रिचवली. दारू पोटात गेली की संतापाचा अंमल मेंदूत जातो आणि त्या भरात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही याची लौकरच त्याला प्रचिती येणार होती.
त्याने निर्मलाला खांद्याला गदागदा धरून जागं केलं. एव्हढ्या रात्री नवरा उठवतो आहे म्हंटल्यावर निर्मलाला नेहमीप्रमाणे भांडणाचा कार्यक्रम होणार असा काहीसा अंदाज आला होता. त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारूच्या वासाच्या भपकाऱ्याने तिला किळस आली. त्या वासाची इतकी वर्षं सवय झाली असली तरी तिचा जीव हाकून येई. कां कूं न करता ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तिच्या मागे तो ही डुलत डुलत गेला. तिने दरवाजा बंद केला आणि हाताची घडी घातली. तिलाही आज सोक्ष मोक्ष लावायचा होता. दररोजच्या भांडणाला, त्याच्या अत्याचाराला ती त्रासली होतीच. आज तिच्या रागाचा उद्रेक होणार होता. फक्त त्याच्या तिच्या अंगाला हात लावण्याचा उशीर होता.
तिच्या हाताला करकचून पकडून त्याने तिला स्वतःकडे ओढलं तसं तिने जोराचा हिसडा देऊन ठामपणे “नाही!” म्हंटलं. पूर्वी कधी तिने त्याच्या अंग जबरीला नाही म्हंटलं नव्हतं. तो तिच्या उत्तराने चपापला. पण तिच्या कडून नकाराचं उत्तर पहिल्यांदाच ऐकून तो चिडला. त्याने परत एकदा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तिने दुसऱ्यांदा ही “नाही!” म्हंटलं.
या वेळी मात्र त्याच्या दुर्गंधी तोंडातून घाणेरड्या शिव्या निघाल्या. तिच्या चारित्र्यावर चखलफेक करणारे आरोप सुरु केली. त्या अश्लाघ्य शब्दांच्या उच्चारांनी तिच्यातल्या गरीब, शामळू वृत्तीला संतापाने जाळून टाकलं. क्रोधाचा अग्नी प्रज्ज्वलित झाला.
डावा हात उजव्या खांद्यावर घेऊन ती जागेवर ढिम्म उभी होती. उजवा हात कमरेच्या बाजूला सैल पडला होता. रात्रीच्या अंधारात स्वयंपाक घरात ठेवलेली पणती फडफडली आणि कुठून तिच्या अंगी बाळ आलं कुणास ठाऊक? तिचा कमरेपाशी सैल सोडलेला उजवा हात आपसूकच मागे झाला आणि त्या खोलीतल्या स्थिर वातावरणाला कापत झण्णदिशी त्याच्या कानशिलावर कडाडला. त्या आवाजाने खोलीत किरकिरणारी रातकिड्यांची किरकिर क्षणात थांबली. ती जागीच स्तब्ध उभी होती. या आधी चुकूनही तिनं असलं काही करण्याचा विचार केला नव्हता आणि आता वर्षोनुवर्षांची कोंडलेला अपमान त्या झापडीनिशी उद्रेक होऊन निघाला होता. विद्रोहाचा तो एक क्षण तिच्या समाधानाचा होता. त्या विद्रोहात सूड नव्हता. होती स्वत्वाची निखळ जाणीव!
त्याच्या गालातून रक्ताची चिरकांडी फुटून स्वयंपाक घरातल्या जमिनीवर सांडली. त्या झापडीने दोन पाऊलं तो मागे कोलमडला. त्या आगीच्या तापाने भाजलेल्या गालाला थंड तळहाताच्या गारवा शमवू शकला नाही उलट त्याची झोंब मस्तकातल्या चेतातंतूंनी अंगभर पसरवली. दारूची नशा खाडकन उतरली आणि जागा झाला त्याच्यातली पुरुषी अहंकाराचा पाशवी जोर.
दोन्ही हातानी त्याने तिचा गळा पकडला आणि तिला समोर ओढलं. तिच्या पोटात त्याच्या डाव्या पायाचा गुढगा घुसला आणि ती वेदनेने कळवळली. तिच्या डोक्यावरचा अंबाडा त्या झटापटीत सुटला आणि तिचे केसं मोकळे झाले. तिच्या झिंज्यांना पकडून त्याने तिला खोलीच्या मध्यात खेचलं. कोपऱ्यातल्या विहिरीतून पाणी काढण्याचा दोराने त्याने तिच्या गळ्याभोवती फास आवळला. छताला आधार देणाऱ्या आडव्या लाकडावर दोरीचं दुसरं टोक फेकलं. ते टोक जमिनीवर पडताच अंगाचा भार टाकून ओढलं आणि ती जमिनीपासून दोन फूट अंतरावर लटकली.
त्याच्या अंगात असुरी आनंद भिनायला सुरुवात झाली. तिला मरू द्यायचं नव्हतं. तिला जन्माची अद्दल घडवायची होती. त्याच्या पायाखाली तिची जागा असल्याचं तिला मान्य करवून द्यायचं होतं. जवळचा स्टूल त्याने तिच्या पायाखाली सरकवला आणि दोरीची पकड सैल केली. तिच्या पायाच्या बोटं स्टूलवर टेकली आणि गळ्यातला फास जरासा मोकळा झाला. नाकपुड्यांतून, तोंडातून श्वास घेण्याची धडपड तेव्हढ्या क्षणांपुरती सफल झाली. तोंडातून आवाज तेव्हढा निघत नव्हता.
अरविंद आणि तिच्या चारित्र्यावर अनैतिक संबंधांचे आरोप करणं सुरु केले. परत शिव्या देणं सुरु केलं. तिने ते मान्य करावे म्हणून त्याचा तोंडाचा पट्टा सुरु होता आणि शेवटच्या क्षणांत स्वत्त्वावरच्या अभिमानाला कवटाळून मृत्यू पत्करण्याचा तिचा अट्टाहास सुरु होता. त्याने दोरखंड आवळला आणि तिचे पाय स्टूलावरून परत वर गेले. स्टुलाचा आधार घेण्यासाठी पायाच्या बोटांची चुळबुळ अथक चुळबुळ सुरु होती. अंगाची धडपड सुरु होती पण आता त्यांना यश येणार नव्हतं.
तिच्या डोळ्यांसमोर तिची लेकरं झळकली. त्यांच्या जन्मापासून त्या दिवशीच्या आठवणीपर्यंतच्या क्षणाची चित्रमाळा सरकली. खोबणीतून डोळे निसटून गालांवर घरंगळले. तोंडात प्राणवायूचा प्रवेशमार्ग आतापर्यंत मोकळा ठेवण्यासाठी धडपडणारी जीभ सैल होऊन घशात अडकली. हृदयात त्यांच्याबद्दल वात्सल्याची कळ ठेवून तिने अखेरचा श्वास फुफ्फुसांत जाण्याआधीच निरोप घेतला. तिचे प्राण उडून गेले आणि ती स्वयंपाक घरातली पणती विझली. आतापर्यंत शांत असलेले रातकिडे किरकिर करू लागले.
तिची धडपड शांत झाली आणि त्याने दोर सोडला. काय घडलं हे समजायला त्याला वेळ लागला आणि या हत्येचा आळ टाळण्यासाठी त्याने अंधारात चाचपडत दोर असा बांधला की तिने आत्महत्या केली असावी असाच पोलिसांचा समाज व्हावा. माचीस काडी शिलगावून त्याने झटापटीचे सुगावा मिटवले. दरवाजा किलकिलता ठेवून तो मधल्या खोलीत आला. पहिल्या खोलीत अपर्णा आणि दीपा शांत झोपून होते. त्यांना माहिती नसल्याने आणि आतापर्यंत त्याच्या धाकात वाढल्याने त्या साक्ष देणार नव्हत्या. एका दृष्टीने या हत्येची आत्महत्या म्हणून समज होण्याची आणि त्याची सुटका होण्याची शक्यता त्याला जास्त वाटत होती. त्याने मागे वळून बघितलं. दरवाज्याच्या फटीतून निर्मलाचा देह आहिस्ता झुलत होता. त्याने अंगण गाठलं आणि डोळे बंद करून तो खाटेवर पहुडला. त्याचे डोळे उघडले ते अपर्णाच्या किंचाळ्यांनी!
***
हातात झाडणीचा फडा घेऊन अपर्णा उभी होती. त्याने मोठ्याने आरोळी मारली. झोकांड्या देत तिच्या जवळ येत होता. भीतीने तिच्या हातातून झाडू गळून पडला. डावा हात उजव्या खांद्यावर घेऊन ती जागेवर ढिम्म उभी होती. उजवा हात कमरेच्या बाजूला सैल पडला होता. त्या रात्री निर्मला उभी होती तशीच ती उभी होती.
तो तिच्या जवळ आला. त्याच्या तोंडातून निघालेला दारूचा वास तिच्या नाकात गेला. त्या वासाची तिला सवय झाली होती, निर्मला सारखीच! तो फूटभर अंतरावर पोचला होता. अपर्णाच्या मनात त्याच्याबद्दलची भीती अचानक संपली आणि डोळ्यांत स्वत्त्वाचं तेज झळाळलं. पुढल्याच क्षणी हरिदासच्या तोंडातून रक्ताची चिरकांडी उडून जमिनीवर पडली आणि त्या रात्रीसारखाच तो दोन पाऊलं मागे अडखळला. त्याच्या अंगातला पाशवी जोर परत उफाळला आणि त्याने तिचा गळा धरला. त्या रात्रीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ घालणार होती.
अपर्णाच्या किडमिड्या अंगात मात्र बेफाम शक्ती संचारली होती. त्याच्या हाताला धरून तिने पीळ घातला आणि धरलेल्या मनगटाला स्वतःकडे खेचून तिने त्याच्या पेटकाडात डाव्या पायाचा गुडघा मारला. तो वेदनेने कळवळून खाली पडला तसा तिने जवळच्या झाडूने त्याला मार मार मारायला सुरुवात केली. झाडूचे पानं फाटून गळाले. हाताबुक्यांनी तिने त्याला बडवलं. खिडकीपाशी ठेवलेल्या बांबूने त्याची पाठ सोलून काढली. त्या तडाख्यांनी बांबू फुटला आणि त्याच्या कमच्यांनी त्याच्या पाठीवर जखमा देणं सुरु केलं.
तिची अवस्था बघून दीपा प्रचंड घाबरली. तिनं रडणं सुरू केलं आणि अपर्णा तिच्या तंद्रीतून जागी झाली. हातातला बांबू तसाच फेकून ती तिच्या कडे धावली. तिला छातीशी लावून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत राहिली.
तासाभराने अरविंद दीपकला घेऊन पोचला. समोरच्या खोलीत दीपाला घट्ट पकडून अपर्णा बसून होती. दीपक ते सगळं बघून भेदरला होता. तो ही दीपा आणि अपर्णाला जाऊन चिपकला. तिकडे हरिदास माराने विव्हळत होता. अरविंदांच्या आवाजाने तो त्याच्याकडे वळला. त्याने त्याला शिव्या कण्हत रडत शिव्या देणं सुरु केलं. निर्मलाच्या आत्महत्येला अरविंदच कारणीभूत ठरवून तो जागेवरून ओरडायला लागला. आजूबाजूची लोकं गोळा होऊन तमाशा बघू लागली.
अरविंदाला ते सगळं असह्य झालं होतं. त्याने तिघा लेकरांना सोबत घेतलं आणि त्या घराच्या अंगणाच्या फाटकातून तो कायमचंच वर्धा सोडून जाण्यासाठी निघाला. त्याच्या पाठोपाठ जात त्यानं फाटकाला लाथ हाणली. सांध्यातून तुटून ते फाटक कोलमडलं. त्याच्याशी असलेलं त्या तिघा लेकराचं नातं ही कोलमडलं.
पुढे कधीतरी हरिदास रात्री त्याच्या घरून जीवाच्या आकांतानं ओरडत वेड लागल्यानं पळाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोचली होती. पण त्यांना त्याच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नव्हता. हरिदास त्याच्या पापाचा भार वेडेपणाच्या शापाने ग्रसित होऊन भोगत होता.
त्या दोन घटनांत आईनेच अंगात येऊन आपलं रक्षण केल्याची अपर्णा आणि दीपाची भावना होती. निर्मलाच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांची वाच्यता दीपक घाबरेन म्हणून त्यांनी त्याच्यासमोर केली नव्हती. त्या दिवशीनंतर परत कधी असला प्रसंग त्यांनी अनुभवला नाही. त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी अरविंद मामाने स्वतःच आयुष्य पणाला लावलं. त्यांना मोठं केलं. त्यांच्या आयुष्यातला निर्मला हा एक समान दुवा होता. कधीकधी भावुक होऊन अरविंद त्यांना सांगायचा की निर्मला ताई तिच्या तेरावीच्या रात्री त्याच्या स्वप्नात येऊन तिच्या लेकरांची काळजी घे म्हणून वचन घेऊन गेली होती.
***
मध्यरात्र उलटल्यानंतर दीपकला जाग आली तेव्हा समोर खिडकीच्या चौकटीला बांधलेला हरिदास दिसला नाही. अंधारात जमिनीवर, इकडे तिकडे चाचपडून विजेरी हाती लागली, त्याच्या प्रकाशात हरिदास जागेवर नसल्याचं दिसलं. हडबडत त्याने विजेरी चहुवार फिरवली. त्या प्रकाशझोतात त्याला स्वयंपाकघरचा दरवाजा अर्धा उघडलेला दिसला. समोरचं दृष्य बघून तो गांगरला.
क्षणभर त्याच्या आईचा देह त्या खोलीत लटकलेला त्याला दिसला. त्याच्या डोळ्यांतून तिच्या आठवणीने पाणी आलं. उजवा हात अश्रू पुसण्यासाठी त्याने डोळ्यांना लावला. रात्रीच्या सर्वदूर पसरलेल्या शांत वातावरणाला भेदणारी किंचाळी त्याला अगदी जवळून ऐकू आली तसा तो दचकला.
हरिदास स्वयंपाकघरातून भेदरून पहिल्या खोलीत पळाला. दरवाजाची फळी धक्क्याने तोडून तो अंधारात किंचाळत गुडूप झाला. त्याच्या मागे पळून पाठलाग करण्यात काही अर्थ उरला नव्हता.
दीपकने बॅग उचलली. स्वयंपाकघरात त्याने नजर टाकली. त्याला विजेरीच्या झोतात जमिनीवर एक रिकामी पणती दिसली. निर्मलाच्या दुखवट्यांच्या दिवशी हीच पणती स्वयंपाकघरात मधोमध तेवत ठेवली होती. त्याने हळुवार ती पणती उचलली. बॅगमध्ये वेगळ्या पिशवीत सांभाळून ठेवली आणि बॅग पाठीवर टाकून तो घराबाहेर पडला. परत कधीही न येण्यासाठी.
हरिदास मानसिकरीत्या वेड्यांच्या श्रेणीत गणल्या गेल्यामुळे त्याच्यावरचा गुन्ह्याचा ठपका रद्द झाला होता. त्याला खरं शासन त्याचं वेडच देत होतं.
😮 khuup mast katha…👌