
जेव्हा छोट्टीशी भूक लागते आणि काही हलकं फुलकं खावंसं वाटतं तेव्हा मोनॅको टॉपिंग्ज खा. लहान असताना अशी काहीशी जाहिरात बघायचो. खूप इच्छा व्हायची की असलं काहीतरी आपल्याकडे का नाही बनवत. एक दोनदा खाऱ्या बिस्किटांवर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि टोमॅटो पेरून बारीक शेव भूरभूरून असा प्रयोग केला होता खरा पण तेव्हा गावात चीझ कुठे मिळत नव्हतं. आणि कितीही प्रयत्न केला तरी जाहिरातीत दाखवीत तसं टॉपिंग दिसायला आकर्षक कधी बनतच नव्हतं. मन खट्टू व्हायचं.
फास्ट फॉरवर्ड…
आज मोनॅको टॉपिंग्ज बनवलं. किसलेल्या चीझचा डोंगर मोनॅको बिस्किटवर उभारला, कांदा, कोथिंबीर पेरली. मागून डोरीटो शोभेला लावला जसा नावेला शीड असतो ना अगदी तसा. आजकाल मोबाईल मध्ये बरेच चांगले कॅमेरे येतात. थोडी इमेज एडिटिंग केली की झालं. बरं, आता दिसण्यापेक्षा खाण्याकडे भर त्यामुळे एका घासात एक टॉपिंग या गतीने प्लेटभर टॉपिंग्ज गट्टम्…